उठी उठी बा मुनिनंदना । भक्त पातले दर्शना ।
त्यांची पुरवी तू कामना । पाही नयन उघडूनी ॥ध्रु.॥
उघडुनिया करुणादृष्टी । दासा धरी आपुले पोटी ।
नको येऊ देऊ हिंपुटी । घाली कंठी मिठी हर्षें ॥१॥
हर्षे तुझे पदी रंगले । दारागारा विसरले ।
निजदेहा न भुलले । विनटले निजभावे ॥२॥
निजभावे येता शरण । लपविसी का बा चरण ?
जेणे तरती दुष्टाचरण । मग मरणभय कैचे ? ॥३॥
नको करु निष्ठुर मन । शीघ्र देई आश्वासन ।
तू अससी करुणाघन । तापशमन करि शीघ्र ॥४॥
उठी उठी बा सद्गुरुराया । उठी उठी करुणालया ।
उठी उठी वा चिन्मया । निजमाया आवरी ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.