राजा ज्ञानसेनच्‍या दरबारात दररोज शास्‍त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्‍त्रासंबंधी चर्चा करण्‍यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्‍त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्‍हणून घोषित केले जात असत त्‍यांना राजा धन आणि मान देऊन सन्‍मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्‍या दरबारात असाच शास्‍त्रार्थ चालला होता. त्‍या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्‍यात आले. राजाने त्‍याचा भरसभेत सत्‍कार केला व मान देण्‍यासाठी त्‍याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्‍याच्‍या विद्वत्तेच्‍या सन्‍मानार्थ राजा स्‍वत: त्‍याला चव-या ढाळत त्‍याला घरापर्यंत सोडण्‍यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्‍मानाने घरी आला हे पाहून भारवीच्‍या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले. घरी आल्‍याबरोबर भारवीने मातेला साष्‍टांग नमस्‍कार केला पण पित्‍याला मात्र उपेक्षेने उभ्‍याउभ्‍याच नमस्‍कार केला. त्‍याच्‍या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्‍याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्‍मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्‍वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्‍याने त्‍याच्‍या त्‍याही नमस्‍काराचा स्‍वीकार केला आणि त्‍याला चिरंजीवी भव असे म्‍हटले. गोष्‍ट इथेच संपली असे नाही. मात्‍यापित्‍यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्‍या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्‍हते. याचे कारणही स्‍पष्‍ट होते की भारवीला यश पचविता आले नव्‍हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्‍या धुंदीत शिष्‍टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्‍याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्‍हणाली,'' तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्‍यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्‍त्रार्थ करायला जाणार होतास त्‍याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्‍या काळात ते परमेश्‍वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्‍यांनी कितीतरी स्‍वत:च्‍या इच्‍छा दाबून ठेवल्‍या व तुला शास्‍त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्‍मत्त होऊन तू त्‍यांची उपेक्षा केलीस हेच आम्‍हा दोघांच्‍या खिन्नतेचे कारण आहे.'' हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्‍याने मातापित्‍याच्‍या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्‍यात पुन्‍हा कधीही त्‍याने मातापित्‍यांची सेवा करण्‍यात कसूर केली नाही.

तात्‍पर्य :- आयुष्‍यात आपल्‍याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्‍यास मिळाली तरी त्‍यापाठीमागे आपल्‍या आईवडीलांची पुण्‍याई असते हे प्रत्‍येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्‍मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel