आतां अवधान । एकलें चि द्यावें । मग पात्र व्हावें । सर्वसुखा ॥१॥

ऐसें असे माझें । प्रतिज्ञावचन । ऐका संतजन । उघड हें ॥२॥

तुम्हां सर्वज्ञांच्या । सभेमाजीं येथ । नसें हो बोलत । आढयतेनें ॥३॥

द्यावें अवधान । तुम्हीं संतजनीं । माझी विनवणी । सलगीची ॥४॥

जरी तुम्हांऐसीं । माहेरें श्रीमंत । लळे पुरे होत । लळ्यांचे हि ॥५॥

मनोरथांचें हि । जे का मनोरथ । सर्व ते निभ्रांत । पूर्ण होती ॥६॥

प्रसन्नतारूपी । मळे भरा आले । कृपाद्दष्टिजलें । आपुलिया ॥७॥

थकलों भागलों । सुखें मी लोळेन । साउली देखोन । आतां तेथें ॥८॥

डोह सुखरूपी । अमृताचे तुम्ही । लाहूम ओल आम्ही । निजेच्छेनें ॥९॥

कराया सलगी । जरी येथें भ्यावें । तरी शांत व्हावें । मग कोठें ? ॥१०॥

ना तरी बालक । बोबडें चि बोले । टाकीत पाउलें । साडींतिडीं ॥११॥

परी तयाचें हि । करोनि कौतुक । समाधान -सुख । पावे माता ॥१२॥

तेविं तुम्हां संत - । सज्जनांची प्रीति । लाभो आम्हांप्रति । कैसी तरी ॥१३॥

ही च एक आस । मानसीं धरोन । लडिवाळपण । करूं आम्ही ॥१४॥

एर्‍हवीं सर्वज्ञ । तुम्ही सन्तजन । तेथें मी अजाण । काय बोलूं ! ॥१५॥

शारदा -पुत्रासी । विद्या मेळवाया । हवी का कराया । घोकंपट्टी ! ॥१६॥

काजवा तोत देखा । असो किती मोठा । काय त्याचा ताठा । सूर्यापुढें ! ॥१७॥

वाढावयाजोगीं । अमृताच्या ताटीं । पक्वानें कोणतीं । आणावीं हो ! ॥१८॥

स्वभावें शीतल । जयाचीं किरणें । तयासी । विंजणें । घडे केवीं ! ॥१९॥

ऐसें ऐकवावें । नादासी गायन । घालावें भूषण । भूषणासी ! ॥२०॥

सांगा सुगंधानें । काय तं हुंगावें । सागरें नाहावें ॥ कोणे ठायीं ! ॥२१॥

आघवें आकाश । घालील जी पोटीं । ऐसी वस्तु मोठी । दुजी कोठें ? ॥२२॥

तेविं होवोनियां । अवधानतृप्ति । पावोनियां चित्तीं । समाधान ॥२३॥

मुखें धन्योद्‍गार । काढाल आपण । ऐसें वक्तेपण । असे कोणा ! ॥२४॥

परी सर्व विश्वा । प्रकाशिता होय । ऐसा जो का सूर्य - । नारायण ॥२५॥

तया काडवात । लोवोनियां देखा । ओवाळूं नये का । भक्तिभावें ! ॥२६॥

किंवा ओंजळींत । घेवोनियां तोय । अर्पूं नय काय । सागरातें ! ॥२७॥

मानितों महेश । तुम्हां मूर्तिमंत । प्रभु श्रोते संत । सज्जन हो ॥२८॥

तुमचा मी भक्त । जरी शक्तिहीन । करितों पूजन । प्रेमभरें ॥२९॥

तरी बोलरूपी । निर्गुंडी -त्रिदळ । स्वीकाराल बेल । मानोनियां ॥३०॥

बापाचिया ताटीं । बैसोनियां बळ । त्यासी च कवळ । देऊं लागे ॥३१॥

मग तो हि जैसा । प्रेमें संतोषून । आपुलें वदन । पुढें करी ॥३२॥

तैसा मी तों जरी । बालबुद्धि जड । करीं बडबड । तुम्हांपाशीं ॥३३॥

तरी तेणें तुम्ही । पावाल संतोष । स्वभाव -विशेष । प्रेमाचा हा ॥३४॥

स्वीकारिलें मज । आपुला मानोनि । तुम्हीं संतजनीं । प्रेमभरें ॥३५॥

म्हणोनि माझिया । सलगीचें ओझें । वाटेना सहजें । तुम्हांलागीं ॥३६॥

मारीतसे ढुसी । वत्स पुन्हां पुन्हां । धेनु सोडी पान्हा । अधिक चि ॥३७॥

देखा संतजन । प्रियाचिया रोषें । प्रेम तें होतसे । द्विगुणित ! ॥३८॥

मज लेंकराचें । ऐकोनि वक्तृत्व । सुप्त कृपाळुत्व । तुमचें जें ॥३९॥

जाहलें तें जागें । ऐसें चि जाणोन । द्यावें अवधान । बोलिलों मी ॥४०॥

एर्‍हवीं आडींत । घालोनि का कोणी । पक्वदशा आणी । चांदिण्यातें ॥४१॥

नभा कैसी कोण । घाली गवसणी । वार्‍यासी का कोणी । गति देई ? ॥४२॥

जळातें पातळ । न लगे करावें । न लगे मंथावें । नवनीत ॥४३॥

तेविं लाजोनियां । मागें वळे बोल । देखोनि सखोल । गीता -तत्त्व ॥४४॥

अहो वेद ते हि । जेथें मौनावले । निवांत झोंपले । जिये स्थानीं ॥४५॥

गीतार्थ तो कैसा । बोलूं मराठींत । अधिकार येथ । कोठें मज ॥४६॥

ऐसा हि मी परी । तीव्र इच्छा करीं । धरोनि अंतरीं । एक आशा ॥४७॥

करावें आपुलें । प्रेम संपादन । गीतार्थ । सांगोन । धिटाईनें ॥४८॥

तरी चंद्राहून । स्वभावें शीतल । जें का जीववील । सुधेहून ॥४९॥

ऐसें अवधान । कृपेनें देवोन । मनोरथ पूर्ण । करा माझे ॥५०॥

तुमचिया कृपा - । द्दष्टीचा वर्षाव । होतां सर्वथैव । मजवरी ॥५१॥

माझिया बुद्धींत । सर्वार्थाचें पीक । पिकेल निःशंक । पूर्णपणें ॥५२॥

परी ज्ञानांकुर । जाईल सुकोन । जरी उदासीन । तुम्ही येथें ॥५३॥

अवधानरूपी । जरी मिळे खाजें । वक्तृत्व सहजें । पुष्ट होय ॥५४॥

आणि वक्त्याचिया । अक्षरांसी दोंदें । सुटती । स्वच्छंदें । प्रमेयांचीं ॥५५॥

पहातसे अर्थ । बोलाची च वाट । अर्थीं प्रकटत । अभिप्राय ॥५६॥

मग अभिप्राय । ह्या परी अनेक । एकांतून एक । उपजती ॥५७॥

आणि भावरूप । फुलांचा बहर । येतसे साचार । बुद्धीवरी ॥५८॥

म्हणोनि संवाद -। रूपी अनुकूल । सर्वथा वाहेल । जरी वारा ॥५९॥

तरी साहित्याचे । रसपूर्ण मेघ । वर्षतील चांग । अंतरंगीं ॥६०॥

आणि जरी श्रोते । दुश्चित उदास । वितळेल रस । मांडला तो ॥६१॥

अहो चंद्रकांत । द्र्वे हें तों साच । परी चंद्राचें च । कौशल्य तें ॥६२॥

तैसें वक्त्याचें तें । वक्तृत्व कोठून । जरी सावधान । नसे श्रोता ॥६३॥

असो , आम्हां गोड । करोनिया खावें । कां हें विनवावें । तांदुळांनीं ॥६४॥

किंवा कळसूत्री । बाहुलीनें वायां । प्रार्थावें कासया । मूत्रधारा ॥६५॥

काय तिजसाठीं । नाचवी तियेला । वाढवी तो कला । आपुली च ॥६६॥

म्हणोनियां आम्हां । काय प्रयोजन । द्यावें अवधान । म्हणावया ॥६७॥

तंव ते श्रीगुरु । बोलती सहज । काय झालें तुज । ज्ञानदेवा ॥६८॥

प्रार्थिसी तें सर्व । पावलें आम्हांतें । आतां गीतार्थातें । प्रगटवीं ॥६९॥

देवें नारायणें । निरूपिलें सार । सांग तें सत्वर । श्रोतयांसी ॥७०॥

मग संतोषून । निवृत्तीचा दास । पावोनि उल्हास । म्हणे ऐसें ॥७१॥

आतां ऐका संत - । सज्जन हो तेथें । बोलिले पार्थातें । भगवंत ॥७२॥

श्रीभगवानुवाच --

इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।

ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ‍ ॥१॥

पार्था , पुन्हां तुज । सांगेन हें बीज । अंतरींचें गुज । जीवाचिया ॥७३॥

ऐशा परी निज - । अंतरींची खून । कां गा उकलून । दाखवावी ॥७४॥

तुज शंका ऐसी । येणें स्वाभाविक । तरी सुज्ञा ऐक । सांगूं आतां ॥७५॥

करावें श्रवण । घ्यावें समजून । ऐसी आस्था पूर्ण । तुझे ठायीं ॥७६॥

आणि आम्ही जें जें । सांगूं तुज सुज्ञा । तयाची अवज्ञा । करिसी ना ॥७७॥

बोलूं नये तरी । बोलणें तें घडो । गूढपण मोडो । आमुचें गा ॥७८॥

परी आमुचिया । जीवींचें जें गुज । तयाची उमज । पडो तुज ॥७९॥

थानामाजीं तरी । असे दूध गूढ । परी नव्हे गोड । थानासी तें ॥८०॥

म्हणोनि लाभतां । अनन्य बालक । इच्छापूर्ति -सुख । मिळो तया ॥८१॥

ना तरी काढोन । बीज मुडयांतील । पेरिलें चोखाळ । भूमीमाजीं ॥८२॥

तरी म्हणूं ये तें । काय धनंजया । सांडोनियां वायां । गेलें ऐसें ॥८३॥

ह्यालागीं सुमन । आणि शुद्धमति । अनन्य जे होती । अनिंदक ॥८४॥

गौप्य तरी तें हि । तयांप्रति सुखें । आपुलिया मुखें । सांगावें गा ॥८५॥

आतां गुणांनीं ह्या । अर्जुना संपन्न । नाहीं तुझ्याविण । दुजा कोणी ॥८६॥

म्हणोनियां गुज । तरी चोरोनियां । तुज पासोनियां । ठेवूं नये ॥८७॥

गूढ गूढ ऐसें । काय वाखाणून । होय आकलन । तुज कैसें ॥८८॥

विज्ञानासहित । तरी आतां तुज । ज्ञानन तें सहज । सांगेन मीं ॥८९॥

भेसळलें जैसें । नाणें खेरें । मग काढावें तें । पारखोनि ॥९०॥

किंवा चोंचीच्या च । चिमटयानें जैसें । निवडावें हंसें । पय -पाणी ॥९१॥

तैसें पार्था , ज्ञान । आणिक विज्ञान । आतां विभागून । देऊं तुज ॥९२॥

पाहें पवनाच्या । धोरवरी चांग । उफणितां मग । आपोआप ॥९३॥

दाणेयांची रास । खालतीं सांठोन । फोल तें उडोन । जाय जैसें ॥९४॥

तैसें जाणितां जें । प्रपंच -आभास । बांधोनि गांठीस । प्रपंचाच्या ॥९५॥

मोक्ष -सिंहासनीं । मुमुक्षूलागोन । बैसवितें जाण । धनंजया ॥९‍६॥

राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम ‍ ।

प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ‍ ॥२॥

जया ज्ञाना सर्व । विद्यांचिया गांवीं । आचार्य पदवी । गुरुत्वाची ॥९७॥

सर्व हि गुह्यांत । ज्ञान जें वरिष्ठ । पवित्रांत श्रेष्ठ । असे जें का ॥९८॥

धर्माचें निजधाम । तेविं सर्वोत्तम । नुरवी जें जन्म । आणि मृत्यु ॥९९॥

गुरु -मुखें अल्प । उगवतां दिसे । ह्रदयीं जें असे । स्वयंसिद्ध ॥१००॥

येई आपोआप । तयाचा प्रत्यय । गुरु -कृपा होय । जिये वेळीं ॥१०१॥

तेविं चढोनियां । सुखाची च वाट । घेतां येई भेट । ज्ञानाची ज्या ॥१०२॥

आणि ज्ञानाची ज्या । भेट होतां मग । भोग्य भोक्त भोग । एक होती ॥१०३॥

परी भोगाचिया । ऐल सीमेवरी । चित्त उभें तरी । सुख पावे ॥१०४॥

असोनि जें ऐसें । सुलभ सुगम । वरी । परबह्म - । पद देई ॥१०५॥

असे ह्याची एक । थोरवी आणिक । जाई ना जें देख । हातीं येतां ॥१०६॥

घेतां अनुभव । होई ना जें उणें । अविकराणणें । अवीट जें ॥१०७॥

केविं लोकांचिया । उरलें हातोन । ज्ञान हें असोन । थोर भलें ॥१०८॥

ऐसी शंका येणें तुज स्वाभाविक होसी तूं तार्क्तिक । धनंजया ॥१०९॥

जळतिये आगीं गालिती जे उडी । व्हावी चक्रवाढी । म्हणोनियांत ॥११०॥

लोभिष्ट ते लोक । सोडितील कैसें । आत्म -सुख ऐसें । सुलभ्य जें ॥१११॥

पवित्र जें रम्य । सुखोपायें गम्य । सर्वश्रेष्ठ धर्म्य । पावन जें ॥११२॥

आपुल्या चि ठायीं । आपणासी प्राप्त । अवीट शाश्वत । सर्वोत्तम ॥११३॥

ऐसें हें समस्त । आहे सुखमय । तरी लोक सोय । सांडिती कां ॥११४॥

येथें ऐसी शंका । घ्यावयासी जागा । असे , परी उगा । राहें पार्था ॥११५॥

अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य पंरतप ।

अप्राप्य मां निवर्नन्ते मुत्युसंसार्क्या ॥३॥

जवळी च दूध । शुद्ध आणि गोड । पदराचें आड । त्वचेचिया ॥११६॥

परी तो गोचीड । तया अव्हेरून । रक्त चि पिऊन । राहे जैसा ॥११७॥

कमळाचा कंद । तळ्यामाजीं असे । तेथें चि तो वसे । बेडूक हि ॥११८॥

परी मकरंद । सेवावा भ्रमरें । बेडकासी उरे । चिखल चि ॥११९॥

घरीं भूमीमाजीं । हंडे धन -पूर्ण । परी दैवहीन । नेणोनि तें ॥१२०॥

करी उपवास । तेथें चि बैसोन । कंठितो जीवन । दीनवाणें ॥१२१॥

तैसा सकल हि । सुखांचा विश्राम । असतां मी रां । अंतरांत ॥१२२॥

नेणोनियं मातें । विषयांच्या ठायीं । भुलोनियां जाई । मति -मंद ॥१२३॥

गिळितां थुंकावी । अमृताची चूळ । बहु मृगजळ । देखोनियां ॥१२४॥

तोडावा परीस । बांधिला जो गळां । शिंपला लाभला । म्हणोनियां ॥१२५॥

तैसीं तीं बापुडीं । न पावती मातें । अहंममत्वातें । वेंगाटोनि ॥१२६॥

जन्म -मृत्यूचिया । मग दोन्ही तटी । गटगळ्या खाती । वारंवार ॥१२७॥

एर्‍हवीं मी तरी । प्रत्यक्ष समोर । जैसा का भास्कर । द्दष्टीपुढें ॥१२८॥

परी उदयास्त । तया रात्रं -दिन । तें हि नाहीं न्यून । माझ्या ठायीं ॥१२९॥

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।

मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ॥४॥

माझा चि विस्तार । विश्व नोहे काय । दुधाचें चि होय । दहीं जैसें ॥१३०॥

ना तरी बीज चि । झालें वृक्षाकार । किंवा अलंकार । भांगार चि ॥१३१॥

तैसें चराचर । माझा चि विस्तार । जाण गा साचार । धनंजया ॥१३२॥

अव्यक्तत्वें होतें । थिजोनि राहिलें । तें चि पसरलें । विश्वाकारें ॥१३३॥

त्रैलोक्याच्या रूपें । ऐसा मी अमूर्त । आकारलों येथ । धनुर्धरा ॥१३४॥

आणि महत्तत्त्वा - । पासोन साद्यन्त । जीं देहापर्यंत । सर्व भूतें ॥१३५॥

भासती तीं पार्था । माझ्या ठायीं जाण । जैसा भासे फेण । जळामाजीं ॥१३६॥

परी तया फेणा - । माजीं पाहूं जातां । दिसे ना सर्वथा । जळ जैसें ॥१३७॥

किंवा स्वप्नांतील । अनेकत्वाभास । न ये प्रत्ययास । जागृतींत ॥१३८॥

तैसा भूताभास । जरी माझ्या ठायीं । तरी मी तों नाहीं । तयांमाजीं ॥१३९॥

उपपत्ति ही च । अर्जुना , बरवी ॥ सांगितली पूर्वीं । तुजलागीं ॥१४०॥

म्हणोनि जो बोल । बोलिला साचार । तयाचा विस्तार । नको आतां ॥१४१॥

परी पार्था , माझें । स्वरूप जें साच । राहूं दे तेथें च । द्दष्टि तुझी ॥१४२॥

न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ‍ ।

भूतभृन्न च भृतस्थो ममात्मा भूतभावनः ॥५॥

मायोचिया पैल । कडे माझें रूप । सांडोनि संकल्प । पाहूं जातां ॥१४३॥

तरी मजमाजीं । भूतें हें हि व्यर्थ । सर्व मी यथार्थ । म्हणोनियां ॥१४४॥

एर्‍हवीं संकल्प - । रूप सांजवेळे । झांकोळती डोळे । बुद्धीचे हि ॥१४५॥

म्हणोनि मी जरी । असें अखंडित । तरी झांजडींत । भिन्न भासें ॥१४६॥

जैसें शंका जातां - । क्षणीं च तें साचें । लोपतें माळेचें । सापपण ॥१४७॥

तैसी संकल्पाची । लोपतां ती सांज । अखंड सहज । स्व -रूपें मी ॥१४८॥

एर्‍हवीं भूमीच्या । आंतुनी स्वयंभ । निघती का कोंब । घडेयांचें ॥१४९॥

तयांची घडण । सर्वथा ती जान । होय बुद्धींतून । कुलालाच्या ॥१५०॥

ना तरी अर्जुना । सागराच्या आंत । खाणी का आहेत । तरंगांच्या ? ॥१५१॥

परी घडतां च । वार्‍याचा संसर्ग । सागरीं तरंग । नुठती का ? ॥१५२॥

पाहें धनंजया । कापसाच्या पोटीं । होती काय पेटी । कापडाची ? ॥१५३॥

परी वेढित्याच्या । द्दष्टीनें तो जाण । साचार वसन । नव्हे काय ? ॥१५४॥

घडविलें जरी । सुवर्ण -भूषण । तरी सोनेंपण । मोडे ना तें ॥१५५॥

परी वरिवरी । भूषणाचा भास । भासे तो लेत्यास । साच वाटे ॥१५६॥

पाहें पडसाद । वाटे तरी साच । परी आपुला च । शब्द तो गा ॥१५७॥

पाहूं जातां जें जें । आरशांत भासे । तें तें रूप असे । आपुलें च ॥१५८॥

तैसें माझ्या शुद्ध । स्वरूपाचे ठायीं । कल्पोनि जो पाही । नाना भूतें ॥१५९॥

तयासी तयाच्या । संकल्पानुसार । भासतो साचार । भूताभास ॥१६०॥

मग मायेचा त्या । होवोनियां लोप । संकल्पाची झोंप । संपतां चि ॥१६१॥

सरे भूताभास । तो हि आपोआप । निर्मळ स्वरूप । उरे माझें ॥१६२॥

निजांगीं भोंवळ । भरतां च मग । भोंवे सर्व जग । ऐसें भासे ॥१६३॥

तैसी आपुली च । कल्पना ती देख । अखंडीं अनेक । पहातसे ॥१६४॥

आतां कल्पना ती । सांडोनि तत्त्वतां । पाहूं जातां पार्था । रूप माझें ॥१६५॥

तरी मी भूतांत । भूतें माझ्या ठायीं । ऐसें स्वप्नांत हि । नये कल्पूं ॥१६६॥

भूतांचें धारण । करीं एकला मी । राहें अंतर्यामीं । तयांचिया ॥१६७॥

जाहला संकल्प - । सन्निपात जयां । ते चि ऐसें वायां । बोलती गा ॥१६८॥

म्हणोनियां ऐक । प्रियोत्तमा नीट । विश्वा हि सकट । विश्वात्मा मी ॥१६९॥

आणि जो हा मिथ्या । भूत -समुदाय । तयासी आश्रय । निरंतर ॥१७०॥
सूर्य -किरणांच्या । आधारें केवळ । मिथ्या मृगजळ । भासतसे ॥१७१॥

तैसे माझ्याठायीं । भासे भूतजात । मी तों अखंडित । ऐसें जाण ॥१७२॥

मदाश्रयें ऐसे । होती प्राणीगण । परी नसें भिन्न । तयांहूनि ॥१७३॥

प्रभा आणि भानु । एक चि संपूर्ण । भूतांसी अभिन्न । असें तैसा ॥१७४॥

ऐश्वर्य -योग हा । आमुचा तत्त्वतां । कळला ना पार्था । तुजलागीं ? ॥१७५॥

भूत -भेदाचा तो । संबंध गा येथें । आतां उरे कोठें । सांगें मज ॥१७६॥

नको मानूं भूतें । माझ्याहूनि भिन्न । मी हि तयांहून । भिन्न नसें ॥१७७॥

यथाकाशास्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् ‍ ।

तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥६॥

पाहें पार्था , जैसें । जेवढें गगन । गगनीं पवन । तेवढा चि ॥१७८॥

हालविला तरी । भिन्न ऐसा भासे । एर्‍हवीं तो असे । गगन चि ॥१७९॥

तैसें भूतजात । माझ्या ठायीं साच । कल्पावें तरी च । आभासतें ॥१८०॥

निर्विकल्पीं तरी । नाहीं भूतमात्र । आघवा सर्वत्र । मी च एक ॥१८१॥

कल्पनेच्या योगें । भूतांचें अस्तित्व । ना तरी अभाव । म्हणोनियां ॥१८२॥

कल्पनेच्या संगें । होतो भूताभास । जाय तो लयास । निःसंकल्पीं ॥१८३॥

माया -योगें जीवा । लागला संकल्प । समूळ ती लोप । पावतां च ॥१८४॥

भूतांचें अस्तित्व । अथवा अभाव । व्यापार हा सर्व । मग कोठें ? ॥१८५॥

म्हणोनि ऐश्वर्य - । योग हा जो आहे । पुनः पुन्हां पाहें । तो चि एक ॥१८६॥

ऐशा प्रतीतीच्या । बोधार्णवांतील । होईं तूं कल्लोळ । एक पार्था ॥१८७॥

स्थावर -जंगमीं । मग आपोआप । आपुलें चि रूप । पाहशील ॥१८८॥

मग देव म्हणे । पार्था , तुजप्रति । आली ना जागृति । ज्ञानाची ह्या ॥१८९॥

द्वैतस्वप्न मिथ्या । झालें किंवा नाहीं । सांग लवलाहीं । तरी आतां ॥१९०॥

कल्पनेची झोंप । पुन्हां कदाकाळीं । पार्था , जरी आली । बुद्धीलागीं ॥१९१॥

तरी भव -स्वप्नीं । जाशील गुंतोन । हारपोनि ज्ञान । अभेदाचें ॥१९२॥

म्हणोनि ही निद्रा । समूळ मोडेल । जागृति जोडेल । निरंतर ॥१९३॥

जेणें जीवा शुद्ध । ज्ञानरूपता च । ऐसें वर्म साच । दावूं आतां ॥१९४॥

तरी आतां लक्ष । देवोनियां ऐक । सांगेन जें एक । तुजलागीं ॥१९५॥

करी माया सर्व । भूतांसी निर्माण । संहार हि जाण । करी ती च ॥१९६॥

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् ‍ ।

कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ‍ ॥७॥

प्रकृति हें नांव । जियेलागीं देती । निवेदिली होती । मागें तुज ॥१९७॥

अष्टधा ती एक । जीवरूपा दुजी । ऐसी द्विविध जी । होय पार्था ॥१९८॥

असो हें तों सर्व । तुजलागीं ठावें । न लगे सांगावें । पुन्हां तें च ॥१९९॥

कल्पक्षयीं लीन । होतें भूतजात । माझिया अव्यक्त । प्रकृतींत ॥२००॥

तीव्र उन्हाळ्यांत । भूमीमाजीं तृण । सबीज सुलीन । होय जैसें ॥२०१॥

ना तरी वर्षान्तीं । येतां शरत्काल । जैसें मेघ -जाल । नभीं आटे ॥२०२॥

जळीं जैसी लाट । किंवा आकाशांत । पवन निवांत । लोपे जैसा ॥२०३॥

ना तरी मनींचें । मनीं लोपे स्वप्न । जागृति संपूर्ण । येतां जैसें ॥२०४॥

तैसें तें प्राकृत । मिळे प्रकृतींत । अर्जुना , कल्पान्त । होय जेव्हां ॥२०५॥

मग कल्पारंभीं । मी च सृजीं सृष्टि । ऐसें जें बोलती । जगामाजीं ॥२०६॥

त्या हि विषयींची । उपपत्ति साची । ऐक सव्यसाची । सांगेन मी ॥२०७॥

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनःपुनः ।

भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ‍ ॥८॥

तंतूचा च नित्य - । संबंध म्हणोन । दिसे जैसी वीण । वस्त्रामाजीं ॥२०८॥

मग तियेचिया । आधारें तें जाण । भरे सान । चौकडयांनीं ॥२०९॥

तेविं प्रकृतीचा । माझिया साचार । सहजें स्वीकार । करीं जेव्हां ॥२१०॥

तेव्हां प्रकृती च । नटे पंचात्मक । आकार अनेक । घेवोनियां ॥२११॥

जैसें दुधालागीं । लागतां विरजण । स्वभावें आटोन । दहीं होय ॥२१२॥

तैसी प्रकृती च । सृष्टिपणाचिया । येई धनंजया । आकारातें ॥२१३॥

जळाचें सान्निध्य । लाभतां बीजातें । बीजाचें च होतें । झाड जैसें ॥२१४॥

तैसा मी केवळ । सृष्टीचें । निमित्त । विस्तारते येथ । प्रकृती च ॥२१५॥

नगर हें रायें । वसविलें ऐसें । बोलती तें असे । जरी साच ॥२१६॥

तरी पाहूं जातां । खरोखरी तेथ । शिणले का हात । रायाचे त्या ? ॥२१७॥

स्वप्नामाजीं असे । तो चि प्रवेशत । जागृतावर्स्थेत । मग जैसा ॥२१८॥

पाहें धनंजया । तैसा चि साचार । करीं मी स्वीकार । प्रकृतीचा ॥२१९॥

तरी स्वप्नांतून । येतां जागृतीस । पडे का आग्रास । पायांलागीं ॥२२०॥

किंवा स्वप्नांतून । असतां तयास । घडे का प्रवास । सांगें मज ॥२२१॥

भूतसृष्टीचें ह्या । कर्तृत्व तें देख । नसे कांहीं एक । मजकडे ॥२२२॥

हा चि अभिप्राय । सर्वथा यथार्थ । धनंजया येथ । ध्यानीं घेईं ॥२२३॥

राजाश्रयें जैसी । प्रजा ती साचार । आपुले व्यापार । करितसे ॥२२४॥

तैसी मदाधारें । प्रकृति च जाण । सर्वथा निर्माण । करी विश्व ॥२२५॥

पौर्णिमेचा चंद्र । भेटतां साचार । भरती अपार । सागरीं ये ॥२२६॥

परी तेथें काय । पडती चंद्रास । अल्प हि सायास । सांगें मज ॥२२७॥

लोह -चुंबकाच्या । सान्निध्यांत पाहें । लोह चळताहे । जड जरी ॥२२८॥

तरी त्या लोहासी । कराया आकृष्ट । पडती का कष्ट । चुंबकासी ॥२२९॥

काय सांगूं फार । ह्या परी साचार । करीं मी स्वीकार । प्रकृतीचा ॥२३०॥

आणि एकाएकीं । मग ती प्रकृति । लागे भूतसृष्टि । प्रसवाया ॥२३१॥

विल -पल्लवांना । कराया उत्पन्न । समर्थ ती जाण । भूमि जैसी ॥२३२॥

तेविं धनंजया । सर्व प्राणीगण । सर्वथा आधीन । प्रकृतीच्या ॥२३३॥

बाळपणादिक । अवस्थांसी देख । आधार तो एक । देह -संग ॥२३४॥

किंवा उद्भवाया । नभीं मेघ -माला । आधार एकला । वर्षाकाल ॥२३५॥

ना तरी स्वप्नासी । निद्रा चि कारण । धनुर्धरा जाण । होय जैसी ॥२३६॥

तैसी अखिल हि । भूत -समुद्राची । स्वामिनी ती साची । प्रकृति च ॥२३७॥

स्थावर जंगम । सूक्ष्म किंवा स्थूळ । जगासी तों मूळ । प्रकृति च ॥२३८॥

म्हणोनि भूतांची । करावी उत्पत्ति । किंवा तयांप्रति । सांभाळावें ॥२३९॥

इत्यादिक सर्व । कृतींचें कर्तृत्व । न ये सर्व थैव । मजकडे ॥२४०॥

चांदण्याच्या वेली । पसरल्या जळीं । वाढ नाहीं केली । चंद्रानें ती ॥२४१॥

तैसीं सर्व कर्में । जाण धनंजया । मजपासोनियां । दूर ठेलीं ॥२४२॥

न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय ।

उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥९॥

अडवील कैसा । सैंधवाचा घाट । सिंधु -जळ -लोट । सुटतां चि ॥२४३॥

तैसा मी शेवट । सर्व हि कर्मांतें । मग का तीं मातें । बांधितील ? ॥२४४॥

काय सांगें धूम्र - । कणांची पिंजरी । प्रतिरोध करी । झंझावाता ॥२४५॥

ना तरी अंधार । प्रवेशेल काय । सांग बरें सूर्य - । बिंबामाजीं ॥२४६॥

पर्जन्याच्या धारा । पर्वताच्या पोटीं । जैशा न खोंचती । धनुर्धरा ॥२४७॥

तैसें कर्मजात । प्रकृतीचें देख । न होय बंधक । मजलागीं ॥२४८॥

एर्‍हवीं ह्या विश्वा - । माजीं सव्यसची । अवधारी मी चि । एक असें ॥२४९॥

परी विश्वीं राहें । उदासीनापरी । करवीं ना करीं । कांहीं एक ॥२५०॥

घाली ना नियम । किंवा निवारी ना । गृहामाजीं कोणा । दीप जैसा ॥२५१॥

आणि कोण कैसा । करी व्यवहार । हें हि तो साचार । नेणे कांहीं ॥२५२॥

गृहींचे व्यापार । चालावया जाण । जैसा तो कारण । साक्षीभूत ॥२५३॥

भूतांचिया ठायीं । तैसा मी असोन । राहें उदासीन । भूतकर्मीं ॥२५४॥

असो बहुत हे । करोनि पर्याय । पुनः पुन्हां काय । सांगूं तुज ॥२५५॥

येथें एक चि हा । अभिप्राय भला । घेईं एक वेळां । ध्यानामाजीं ॥२५६॥

मयाऽध्यक्षेण प्रकृतिः सचराचरम् ‍ ।

हेतुनानेन कौन्तेय जगाद्विपरिवर्तते ॥१०॥

लोक -व्यवहार । चालाया सकळ । निमित्त केवळ । सूर्य जैसा ॥२५७॥

तैसा सृष्टीचिया । उत्पत्तीसी जाण । असें मी कारण । पंडुसुता ॥२५८॥

निज -प्रकृतीचा । करितां स्वीकार । सृष्टि चराचर । पावे जन्म ॥२५९॥

म्हणोनियां हेतु । होय मी सृष्टीसी । उपपत्ति ऐसी । जुळतसे ॥२६०॥

धनंजया सर्व । भूतें माझ्या ठायीं । परी मी तों नाहीं । भूतांमाजीं ॥२६१॥

धरोनि ही ज्ञान - । प्रकाशाची सोय । पाहें हा ऐश्वर्य - । योग माझा ॥२६२॥

किंवा माझ्या ठायीं । नाहींत भूतें हि । आणि मी हि नाहीं । भूतांमाजीं ॥२६३॥

स्वरूप -बोधाची । ऐसी च ही खूण । न हो विस्मरण । तियेचें गा ॥२६४॥

अर्जुना , सर्वस्व । आमुचें हें गूढ । दाविलें उघड । परी तुज ॥२६५॥

आतां अंतरीं च । भोगीं आत्मसुख । वृत्ति अंतर्मुख । करोनियां ॥२६६॥

नये ज्ञान -वर्म । जोंवरी हें हाता । तोंवरी सर्वथा । पंडुसुता ॥२६७॥

सत्य -स्वरूपाचें । घडे ना दर्शन । जेविं तुषीं कण । सांपडे ना ॥२६८॥

एर्‍हवीं तें वाटें । तर्काचिया बळें । जणूं आकळलें । यथार्थत्वें ॥२६९॥

परी सांगें मृग -। जळाचें जें ओल । तयानें भिजेल । काय भूमि ? ॥२७०॥

जळामाजीं जैसें । पसरितां जाळें । जाळीं सांपडलें । चंद्रा -बिंब ॥२७१॥

परी तें तीरासी । काढोनि झाडितां । बिंब काय हाता । लागे तेथें ॥२७२॥

तैसे वाचाबळें । प्रतीतीचा डौल । दाविती जे फोल । शब्द -ज्ञानी ॥२७३॥

तयांलागीं सत्य । ज्ञाग तें तों नाहीं । होईल ऐसें हि । घडे केविं ॥२७४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel