ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षोणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।

एवं त्रयीधर्ममनुप्रपन्न गतागतं कामकामा लभन्ते ॥२१॥

परी त्या पुण्याची । संपतां चि पुंजी । ओसरते तेजी । इंद्रत्वाची ॥६३४॥

मग त्याच भव्य । दिव्य -लोकांतूण । येती परतोन । मृत्यु -लोकीं ॥६३५॥

वेश्येचिया भोगीं । संपतां संपत्ति । उभें करी ना ती । दाराशीं हि ॥६३६॥

तैसें लज्जास्पद । होतसे जीवन । तयां पुण्यहीन । जाज्ञिकांचें ॥६३७॥

मज शाश्वताचें । नेणोनियां वर्म । झाले स्वर्ग -काम । पुण्य -कर्में ॥६३८॥

अमरता त्यांची । जावोनियां वायां । अंतीं पुन्हा तयां । मृत्यु -लोक ॥६३९॥

जैसें स्वप्नामाजीं । सांपडलें धन । जाय हारपून । जागृतींत ॥६४०॥

पार्था , वेदज्ञांचें । तैसें स्वर्ग -सुख । सर्वथा क्षणिक । जाणावें गा ॥६४१॥

वेदविद्येमाजीं । जाहला प्रवीण । परी माझें ज्ञान । नाहीं जरी ॥६४२॥

तरी जाण तैसा । व्यर्थ तो बापुडा । दाण्याविण कोंडा । पाखडिला ॥६४३॥

म्हणोनियां पार्था । धर्म हे वेदोक्त । मजविण होत । निरर्थक ॥६४४॥

जाणोनियां मातें । नेणशील कांहीं । तरी च तूं पाहीं । सुखी होसी ॥६४५॥

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ‍ ॥२२॥

जयांनीं आपुलें । मजलागीम चित्त । केलें समर्पित । सर्वभावें ॥६४६॥

मातेचिया पोटीं । मूल तें गर्भस्थ । राहतसे स्वस्थ । जैशा रीती ॥६४७॥

तैसें मजविण । आणिक बरवें । दिसे ना स्वभावें । जयांलागीं ॥६४८॥

निरंतर माझें । करावें भजन । तरी च जीवन । सार्थ वाटे ॥६४९॥

ऐसे एकनिष्ठ । होवोनियां जीवें । मज सर्वभावें । चिंतोनियां ॥६५०॥

नित्य उपासिती । जे का मज देवा । तयांची तों सेवा । मी च करीं ॥६५१॥

मग मजमाजीं । तल्लीन ते होतां । वाहतसें चिंता । मी च त्यांची ॥६५२॥

पक्षिणीचा जीव । जैसा पिलांठायीं । पंख आले नाहीं । जयांलागीं ॥६४३॥

तैसें करीं मी च । तयांचें समस्त । जें जें माझे भक्त । अपेक्षिती ॥६५४॥

आपुली तहान - । भूक विसरोन । बाळातें जतन । करी माय ॥६५५॥

तैसे मनोभावें । अनन्य -शरण । तयांचें रक्षण । करीं मी च ॥६५६॥

जरी तयां माझ्या । सासुज्याची चाड । तरी ते हि लाड । पुरवितों ॥६५७॥

इच्छिती ते सेवा । तरी निरंतर । प्रेमाचा पदर । आड ठेवीं ॥६५८॥

जें जें भाविती तें । मी च तयां द्यावें । दिलें हि ठेवावें । संरक्षोनि ॥६५९॥

ऐसा योग -क्षेम । तयांचा आघवा । सर्वथह पहावा । लागे मज ॥६६०॥

कां जे सर्वभावें । मज निरंतर । मानिती आधार । एकासी च ॥६६१॥

येऽप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ।

तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ‍ ॥२३॥

सर्वव्यापकातें । मज नेणोनियां । नाना संप्रदायां । स्वीकारोनि ॥६६२॥

अग्नि -इंद्र -सूर्य - । सोमासी आहुति । देवोनि यजिती । जे जे कोणी ॥६६३॥

तयांचे हि पावे । सर्व तें मातें च । सर्वांठायीं मी च । म्हणोनियां ॥६६४॥

परी भक्तीची ती । नव्हे उजू रीत । असे विपरीत । भाव त्यांचा ॥६६५॥

पाहें वृक्षालागीं । शाखा पानें साचीं । एका चि बीजाचीं । जरी होती ॥६६६॥

तरी करी मूळ । जळाचें सेवन । घालावें जाणोन । तेथें चि तें ॥६६७॥

ना तरी एका चि । देहाचीं दहा हि । जरी होती पाहीं । इंद्रियें हीं ॥६६८॥

आणि तयांनीं जे । सेवावे विषय । भोक्ता जरी होय । एक त्यांचा ॥६६९॥

तरी करोनियां । पक्वान्नें बरवीं । कैसीं तीं भरावीं । कानामाजीं ? ॥६७०॥

पुष्पें सुगंधित । आणोनियां चांग । लावावीं का सांग । लोचनासी ? ॥६७१॥

तेथें रस जो तो । मुखें चि सेवावा । परिमळ घ्यावा । नासिकेनें ॥६७२॥

तैसा सर्वांठायीं । मीच च हें जाणोन । करावें यजन । माजें पार्था ॥६७३॥

नेणोनियां मातें । करिती भजन । तरी तो गा शीण । वाउगा च ॥६७४॥

ज्ञान हें चि जाण । कर्माचे लोचन । असावें संपूर्ण । निर्दोष तें ॥६८५॥

अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।

न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥२४॥

सकल हि यज्ञ - । सामुग्रीचा भोक्त । मजविण पार्था । कोण आहे ? ॥६७६॥

सर्व हि यज्ञांचा । मी च आदि अंत । नेणोनि हें भ्रांत । पूजी देवां ॥६७७॥

जैसें गंगा -जळ । अर्पिति गंगेस । देव -पितरांस । उद्देशोनि ॥६७८॥

तैसें माझें मज । अर्पिती तें सर्व । परी भिन्न भाव । ठेवोनियां ॥६७९॥

भिन्नभाव चित्तीं । म्हणोनि किरीटी । तयांलागीं प्राप्ति । नाहीं माझी ॥६८०॥

मग जेथें जेथें । बाळतिती आस्था । तें तें चि सर्वथा । पावती ते ॥६८१॥

यान्ति देवव्रता देवान्पितृन्यान्ति पितृव्रताः ।

भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ‍ ॥२५॥

काया -वाचा -मनें । उपासिती जे का । देवां इंद्रादिकां । भक्तिभावें ॥६८२॥

तयांलागीं होय । अर्जुना देहान्तीं । देवत्वाची प्राप्ती स्वर्गलोकीं ॥६८३॥

किंवा श्राद्धादिक । पितरांचीं व्रतें । आचरिती येथें । मनोभावें ॥६८४॥

तयांचॆं जीवन । संपतांक्षणींच । पावती ते साच । पितृलोक ॥६८५॥

जारण -मारण । इत्यादि अघोर । प्रयोग साचार । आचरोनि ॥६८६॥

क्षुद्रदेवतादि । भूतपिशाच्चांतें । मानोनि दैवतें । पूजिती जे ॥६८७॥

तयांलागीं होय । भूतत्वाची प्राप्ति । सोडोनियां जाती । देह जेव्हां ॥६८८॥

ऐशापरी जैसा । जयांचा संकल्प । कर्में फलद्रूप । तैसीं तयां ॥६८९॥

मग मी च कानीं । ऐकिला जयांनीं । देखिला नयनीं । मी च एक ॥६९०॥

भाविला जयांनीं । मी च एक मनीं । नाम -संकीर्तनीं । रंगोनियां ॥६९१॥

वंदिला सर्वांगीं । सर्वांठायीं एक । दान -पुण्यादिक । मत्प्रीत्यर्थ ॥६९२॥

जेणें ज्ञानें होय । माझें चि दर्शन । तें चि अध्ययन । केलें ज्यांनीं ॥६९३॥

माझ्या चि स्वरूपीं । ठेवोनियां प्रीति । पावले जे तृप्ति । अंतर्बाह्य ॥६९४॥

सर्व हि जीवन । माझ्या कारणीं च । लाविती जे साच । मनोभावें ॥६९५॥

हरि -दास्य हें चि । आम्हांसी भूषण । ऐसें जे मीपण । मिरविती ॥६९६॥

जयांलागीं एक । लोभ तो माझा च । म्हणोनि जे साच । लोभी होती ॥६९७॥

कामना माझी च । म्हणोनि सकाम । जाहले सप्रेम । माझ्या प्रेमें ॥६९८॥

पावोनि मद्रूप । भुलोनियां गेले । जाणों विसरले । लोकांलागीं ॥६९९॥

जाणती मातें च । जयांची गा शास्त्रें । जयांचिया मंत्रें । लाभें मी च ॥७००॥

ऐशापरी ज्यांचे । सर्व हि व्यापार । होती निरंतर । माझ्यासाठीं ॥७०१॥

मरणापूर्वीं च । मद्रूप ते साच । तयां गति मी च । देहान्तीं हि ॥७०२॥

म्हणोनियां माझें । करिती यजन । तयां ऐक्य पूर्ण । मद्रूपीं च ॥७०३॥

तयांनीं तो केलें । आत्म -समर्पण । निमित्त करोन । पूजनाचें ॥७०४॥

धनंजया आत्म - । समर्पणावीण । नाकळें मी जाण । कोणातें हि ॥७०५॥

आम्ही ब्रह्मज्ञानी । ऐसें म्हणे कोणी । तरी तो अज्ञानी । हें चि साच ॥७०६॥

झालें मज ज्ञान । ऐसा अभिमान । धरी तरी न्य़ून । तें चि तया ॥७०७॥

पाहूं जाती माझें । परमात्मरूप । यज्ञ -दान -तप । आचरोनि ॥७०८॥

तरी तया नाहीं । काडीचें हि मोल । कर्माचा तो डौल । फोल त्यांचा ॥७०९॥

ज्ञान -बळें थोर । कोण वेदाहून । तो हि राहे मौन । धरोनियां ॥७१०॥

शेषाहून श्रेष्ठ । बोलका नाहीं ना । तो हि अंथरुणा - । तळीं दडे ॥७११॥

छंद जो घेवोनि । सनकादि मुनि । राहिला होवोनि । वेडे पिसे ॥७१२॥

थोराहून थोर । शंभु जो साचार । करितं विचार । तापसांचा ॥७१३॥

तो हि अभिमान । सांडोनि समस्त । पाहें पद -तीर्थ । माथां वाहे ॥७१४॥

पद्मजेसमान । सर्वथा संपन्न । सांग दुजी कोण । असे पार्था ॥७१५॥

जियेचिया घरीं । श्रियेऐशा दासी । सादर । सेवेसी । निरंतर ॥७१६॥

खेळतां तयांनीं । केलीं घरकुलें । तयां नांव दिलें । इंद्र -पुरी ॥७१७॥

तरी इन्द्रादिक । सर्व हि तयांचीं । न होती का साचीं । बाहुलीं च ? ॥७१८॥

मग तयांसी तो । नावडोन खेळ । मोडिती सकळ । घराचार ॥७१९॥

तेव्हां महेन्द्राचे । दीन हीन रंक । न होती का एक । क्षणामाजीं ? ॥७२०॥

ज्या ज्या वृक्षाकडे । फेकिती त्या द्दष्टि । ते ते सर्व होती । कल्प -वृक्ष ॥७२१॥

सामर्थ्यसंपन्न । ऐशापरी दासी । घरीं जियेपाशीं । वावरती ॥७२२॥

इंदिरा जी ऐसी । मुख्य मालकीण । ती हि अभिमान । सांडोनियां ॥७२३॥

लीनपणें पायां - । पाशीं च बैसोन । सर्वस्व अर्पून । करी सेवा ॥७२४॥

म्हणोनि सांडावें । दूर थोरपण । तेविं अभिमान । पांडित्याचा ॥७२५॥

आणि जगीं व्हावें । लीनाहून लीन । तरी सन्निधान । लाभे माझें ॥७२६॥

उघडितां नेत्र । भास्करें सहज । चंद्र हि निस्तेज । होय जेथें ॥७२७॥

तेथें काजव्यानें । मिरवावें किती । आपुली ती दीप्ति । दाखवोनि ॥७२८॥

तैसें तप जेथें । पुरें ना शंभूचें । ऐश्वर्य लक्ष्मीचें । उणें वाटे ॥७२९॥

तेथें हें प्राकृत । हेंदरें मानव । परमात्मभाव । केविं जाणे ? ॥७३०॥

ह्या चि लागीं पार्था । वैभवाचा गर्व । सांडोनियां सर्व । लीनपणें ॥७३१॥

सकळ गुणांचें । उतरावें लोण । समूळ सांडोन । देह -भाव ॥७३२॥

पत्रं पुष्णं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।

तदहं भक्त्युपह्र्तमश्नामि प्रयतान्मनः ॥२६॥

मग कोणतें हि । मिळेल जें फळ । नीरस । असो कैसें ॥७३३॥

तें चि अर्पावया । भक्तिभावें भलें । मजपुढें केलें । भक्त -राजें ॥७३४॥

तरी तें घेवोनि । न फेडितां देंठ । सेवितों यथेष्ट । आवडीनें ॥७३५॥

ना तरी अनन्य - । भक्तिचिया नांवें । जरी मज द्यावें । फूल एक ॥७३६॥

तरी तो सुगंध । न हुंगितां साच । तें हि मी मुखीं च । घालीतसें ॥७३७॥

फुलें तीं राहोत । परी पान एक । शुष्क वा साजूक । असो कैसें ॥७३८॥

तरी सर्वभावें । भरलें देखोन । सुखें स्वीकारोन । खाऊं लागें ॥७३९॥

अगा भुकेल्यातें । लाभावें अमृत । मग तेणें तृप्त । व्हावें जैसें ॥७४०॥

अमृतासमान । भक्ताचें तें पान । देई समाधान । तैसें मज ॥७४१॥

ना तरी प्रसंगें । न जोडे पाला हि । सांकडें तों नाहीं । उदकाचें ॥७४२॥

उदकातें काय । द्यावें लागे मोल । तें तरी मिळेल । हवें तेथें ॥७४३॥

तें चि घेवोनियां । मजलागीं भलें । जेणें समर्पिलें । सर्वभावें ॥७४४॥

भव्य जें वैकुंठ । तयाहून थोरें । बांधिलीं मंदिरें । तेणें मज ॥७४५॥

कौस्तुभापासोन । निर्मळ । आगळीं । लेणीं लेवविलीं । मज तेणें ॥७४६॥

क्षीराब्धिसमान । रम्य शय्या -स्थानें । निर्मिलीं गा तेणें । असंख्यात ॥७४७॥

कर्पूर चंदन । आणि कृष्णागरु । ह्यांचा मह -मेरु । सुगंधित ॥७४८॥

समर्पोनि मज । तेणें दीपमाळ । लाविली उज्ज्वळ । आदित्यांची ॥७४९॥

तेणें मज क्ल्प - । वृक्षांचीं उद्यानें । अर्पिलीं गो -धनें । सुरभींचीं ॥७५०॥

गरुडासारिखीं । वाहनें अपार । वाहिलीं साचार । तेणें मज ॥७५१॥

दिव्यामृताहून । रसाळ जीं देख । पक्वान्नें अनेक । वाढिलीं गा ॥७५२॥

समर्पिला भक्तें । उदकाचा लेश । तरी ऐसा तोष । होय मज ॥७५३॥

काय सांगावें हें । सुदाम्याचे पोहे । भक्षिले तें आहे । तुज ठावें ॥७५४॥

न म्हणें हा सान । न म्हणें हा थोर । जाणें मी साचार । भक्ति एक ॥७५५॥

असे भक्ति -भाव । जयांचें अंतरीं । तेथें वास करीं । निरंतर ॥७५६॥

जाण पार्था , जळ । पत्र पुष्प फळ । मिष हें केवळ । भजावया ॥७५७॥

अनन्य -भक्ताचें । भक्ति -तत्त्व शुद्ध । तेथें चि संबंध । आमुचा गा ॥७५८॥

म्हणोनियां पार्था । ऐक सावधान । करीं गा स्वाधीन । बुद्धि एक ॥७५९॥

मनोमंदिरांत । सहजें साचार । न पडो विसर । माझा तुज ॥७६०॥

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददसि यत् ‍ ।

यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ‍ ॥२७॥

करिसी जे कांहीं । व्यापार उद्योग । भोगिसी जे भोग । बहुविध ॥७६१॥

पाहोनियां पात्र । करिसी जें दान । ना तरी यजन । नाना रीती ॥७६२॥

तपोव्रतादिक । करिसी साधनें । वांटिसी वेतनें । सेवकांसी ॥७६३॥

ऐसें जें जें कर्म । होईल स्वभावेम । भावें समर्पावें । तें तें मज ॥७६४॥

परी कर्तृत्वाची । नको आठवण । ऐसें तें धुवोन । द्यावें मज ॥७६५॥

शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः ।

संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥२८॥

दग्घ बीजें जैसीं । पेरिलीं भूमींत । तरी नाहीं येत । अंकुरोनि ॥७६६॥

तैसें शुभाशुभ - । कर्म -फळ तया । न बाघे माझिया । भक्तालागीं ॥७६७॥

द्यावयासी फळ । सुखदुःखरूपें । उरेल स्वरूपें । जरी कर्म ॥७६८॥

तरी भोगावय । तें चि सुखदुःख । जीवा देह एक । घ्यावा लागे ॥७६९॥

परी सर्व कर्में । होतां दमर्पण । संपलें जनन - । मरण हि ॥७७०॥

जन्म - मृत्यूंतूण । भक्त होतां मुक्त । सुखदुःखातीत । स्वभावें चि ॥७७१॥

म्हणोनि लागे ना । जेणें दीर्घ काळ । स्व -रूप निर्मळ । जाणावया ॥७७२॥

ऐसी संन्यासाची । सुगम ही खूण । दिली दाखवून । तुजलागीं ॥७७३॥

देह -बंधनांत । नको पडूं आतां । नको बुडूं पार्था । सुख -दुःखीं ॥७७४॥

नित्य निरंतर । जो मी सुखरूप । तेथें चि तदूप । सुखें होईं ॥७७५॥

समोऽहं सर्वभृतेषु न मे द्वेष्योअऽस्ति न प्रियः ।

ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ‍ ॥२९॥

सदा सर्वां भूतीं । सारिखा मी देव । आपपरभाव । नाहीं तेथें ॥७७६॥

जाणोनियां माझें । ऐसें चि स्वरूप । उपटोनि रोप । अहंतेचें ॥७७७॥

मग काया -वाचा - । मनोभावें मातें । सेविती जे येथें । कर्मद्वारा ॥७७८॥

देहधारी तरी । होती देहातीत । राहती ते भक्त । माझ्याठायीं ॥७७९॥

आणि मी हि राहें । धनंजया जाण । ह्रदयीं संपूर्ण । तयांचिया ॥७८०॥

बीजीं वटा -वृक्ष । सामावोनि राहे । बीजकण आहे । वटीं जैसा ॥७८१॥

तैसें तयां आम्हां । पाहें परस्पर । बाहेरी अंतर । नांवाचें चि ॥७८२॥

परी अंतरंग । वस्तूचा विचार । करितां साचार । मद्रूप ते ॥७८३॥

घालोनियां गळां । आणिकांचें लेणें । जैसें मिरवणें । वरिवरी ॥७८४॥

तैसें तयांचें तें । शरीर -धारण । ते तों उदासीन । सर्वथैव ॥७८५॥

सुगंध निघोनि । जाय वार्‍यासंगें । बासें फूल मागें । उरे देठीं ॥७८६॥

तैसा आयुष्याच्या । मुठीमाजीं देख । देह मात्र एक । उरे त्यांचा ॥७८७॥

परी भक्ति -बळें । अहंता सकळ । बैसली केवळ । माझ्या ठायीं ॥७८८॥

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ‍ ।

साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥३०॥

ऐशा प्रेमभावें । भजेल जो मातें । मागुतीं तयातें । जन्म नाहीं ॥७८९॥

मग कोण पुसे । त्याचे जाति -वर्ण । कोण आचरण । पाहे त्याचें ? ॥७९०॥

असो नीच योनि । असो पापराशि । जीवन जयासी । भक्ति -मार्ग ॥७९१॥

अंतीं मति जैसी । पुढें गति तैसी । म्हणोनि भक्तीसी । वाहिला जो ॥७९२॥

अर्जुना , तो आधीं । जरी दुराचारी । तरी तो निर्धारीं । सर्वोत्तम ॥७९३॥

बुडाला हि कोणी । जैसा महा -पूरीं । निघाला बाहेरी । जगोनियां ॥७९४॥

राहोनि जिवंत । ऐलथडी आला । तरी तो बुडाला । म्हणूं ये का ? ॥७९५॥

तैसा पार्था , झाला । जो का ज्ञानी भक्त । जळालें दुष्कृत । सर्व त्याचें ॥७९६॥

म्हणोनियां होय । आधीं जरी पापी । अनुतापरूपी । तीर्थीं मग ॥७९७॥

करोनियां स्नान । झाला तो पावन । मातें उपासून । सर्वभावें ॥७९८॥

तरी तयाचें चि । पवित्र तें कुळ । जन्म तो निर्मळ । तयाचा चि ॥७९९॥

जन्मोनियां तो चि । जाहला कृतार्थ । सकळ शास्त्रार्थ । तो चि जाणे ॥८००॥

तेणें चि अष्टांग । अभ्यासिला योग । तेणें तप चांग । आचरिलें ॥८०१॥

जया माझें ठायीं । अखंड आवडी । पावे पैलथडी । कर्माची तो ॥८०२॥

असो जेणें मनो - । बुद्धीचे साचार । सर्व हि व्यापार । करोनियां ॥८०३॥

एकनिष्ठारूपी । भरोनियां पेटी । ठेविली किरीटी । मजमाजीं ॥८०४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to अभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ९ वा