अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाऽहमहमौषधम् ‍ ।

मन्त्रोऽहममेवाज्यमहमग्रिरहं हुतम् ‍ ॥१६॥

ज्ञानाचा उदय । अंतरीं होईल । तरी तो मुदल । वेद मी च ॥५१७॥

आणि तो जें विधि अनुष्ठान । ‘ क्रतु ’ तो हि जाण । मी च असें ॥५१८॥

तया कर्मांतून । यज्ञ सागोपांग । प्रकटे जो मग । तो हि मी च ॥५१९॥

देवा -पितरांसी । आहुति जी देती । अन्न तें किरीटी । मी च जाण ॥५२०॥

मी च सोमादिक । वनस्पति नाना । आज्य मी अर्जुना । समिधा मी ॥५२१॥

मंत्र होम -द्रव्य । ऋत्विज हि मी च । स्वरूप माझें च । अग्नि तो हि ॥५२२॥

तयामाजीं जें जें । करिती हवन । तें तें सर्व जाण । मी च आहें ॥५२३॥

पिताहमस्य जगतो माता घाता पितामहः ।

वेद्यं पवित्रमोंकार ऋक्सामयजुरेव च ॥१७॥

ज्याच्या अंग -संगें । प्रकृति अष्टांग । प्रसवते जग । पिता तो मी ॥५२४॥

पाहें जेविं अर्ध - । नारी -नेटश्वरीं । पुरुषण जो नारी । तो चि होय ॥५२५॥

तेविं चराचरीं । जगन्माता मी च । मी धाता साच । विश्वचा ह्या ॥५२६॥

होवोनि उत्पन्न । जग जेथें राहे । आणि वाढताहे । जीवित हें ॥५२७॥

सर्वथा साचार । अर्जुना , तें स्थान । जाण मजवीण । दुजें नोहे ॥५२८॥

प्रकृति -पुरुष । जाहलीं उत्पन्न । जयाच्या अमन - । मनामाजीं ॥५२९॥

तो मी त्रिभुवनीं । संपूर्ण विश्वाचा । पितामह साचा । पंडु -सुता ॥५३०॥

सर्व ज्ञानमार्ग । जया गांवा येती । जयातें बोलती । वेद ‘ वेद्य ’ ॥५३१॥

पडोनि उमज । नाना मतें जेथें । पावती ऐक्यातें । स्वभावें चि ॥५३२॥

आणि झाली जेथें । धनंजया देख । शास्त्रांसी ओळख । एकमेकां ॥५३३॥

जेथ होती ज्ञानें । चुकलीं एकत्र । ऐसें जें पवित्र । तें हि मी च ॥५३४॥

घोष -ध्वनि -नाद - । आकाराचें स्थान । धनंजया जाण । असे जो का ॥५३५॥

ऐसा तो ॐ कार । मी च गा साचार । होय जो अंकुर । ब्रह्मबीजा ॥५३६॥

अ उ म अक्षरें । जयाचिया पोटीं । उपजतां होती । तिन्ही वेद ॥५३७॥

म्हणोनि ऋग्वेद । आणि यजुःसाम । म्हणे आत्माराम । मी च तिन्ही ॥५३८॥

ऐसी जी का वेद - । परंपरा साच । सर्व हि ती मी च । धनंजया ॥५३९॥

गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुह्रत् ‍ ।

प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम् ‍ ॥१८॥

धनंजया , जिया । प्रकृतीच्या पोटीं । चराचर सृष्टि । सांठवे ही ॥५४०॥

शिणोनि ती तेथें । घेतसे विश्राम । सर्वथा परम - । गति ती मी ॥५४१॥

जयाचिया योगें । प्रकृति ही साच । आली नसती च । अस्तित्वासी ॥५४२॥

आणि सत्तामात्रें । जयाच्या साचार । सर्व चराचर । प्रसवे जी ॥५४३॥

त्या चि प्रकृतीच्या । होवोनि स्वाधीन । भोगी जो त्रिगुण । ऐसें वाटे ॥५४४॥

विश्व -श्रियेचा तो । भर्ता मी च येथ । अर्जुना , यथार्थ । जाण ऐसें ॥५४५॥

आणिक सकळ । त्रैलोक्याचा स्वामी । असें कैसा तो मी । ऐक आतां ॥५४६॥

आकाशें सर्वदा । सर्वत्र वसावें । क्षण हि नसावें । वातें स्वस्थ ॥५४७॥

जाळोनि टाकावें । पावकें सकळ । वर्षावें सजळ । मेघ -राजें ॥५४८॥

पर्वतें बैठक । न कधीं सोडावी । सीमा नोलांडावी । सागरानें ॥५४९॥

धरणीनें प्राणी । करावे धारण । अर्जुना , ही जान । आज्ञा माझी ॥५५०॥

मी च बोलविला । तरी वेद बोले । चालविला चाले । सूर्य तो हि ॥५५१॥

मी च हालविला । तरी प्राण हाले । विश्व हें सगळें । चाळवी जो ॥५५२॥

माझ्या चि आज्ञेनें । भूतें ग्रासी काळ । ऐसीं हीं सकळ । आज्ञांकित ॥५५३॥

जयाचीं गा होती । ऐसा जो समर्थ । तो मी जगन्नाथ । जाण पार्था ॥५५४॥

असोनि सर्वत्र । गगनासमान । राहे उदासीन । तो हि मी च ॥५५५॥

नामरूपात्मक । चराचरीं । भरलासे एक । अंतर्बाह्य ॥५५६॥

तेविं चि आधार । होवोनियां राही । नाम - रूपाचा हि । स्वभावें जो ॥५५७॥

जळाचे चि जैसे । जाहले कल्लोळ । कल्लोळीं तों जळ । असे जैसें ॥५५८॥

तैसी होय जेथें । विश्वाची रचना । असें मी अर्जुना । निवास तो ॥५५९॥

अनन्य -शरण । येई मज तरी । तयाचे निवारीं । जन्म -मृत्यु ॥५६०॥

शरणागतासी । म्हणोनि आश्रय । मी च एक होय । निरंतर ॥५६१॥

पार्था , जैसे जैसे । प्रकृतीचे भेद । तैसा चि विविध । होवोनियां ॥५६२॥

प्राणीमात्रामाजीं । प्राण -रूपें येथ । वर्ततों जगांत । मी च एक ॥५६३॥

जैसा सागरांत । तैसा थिल्लरांत । भास्कर बिंबत । सारिखा च ॥५६४॥

तैसा ब्रह्मादिकां - । पासोनि कीटकां - । पर्यंत मी सखा । सर्वांलागीं ॥५६५॥

जाण त्रैलोक्याचें । जीवन मी साचें । सर्ग -संहाराचें । मूळ तें मी ॥५६६॥

प्रकटती शाखा । जैशा बीजांतून । पुन्हां बीजीं लीन । वृक्षत्व तें ॥५६७॥

संकल्पाच्या योगें । तैसें विश्व होय । संकल्पीं च लय । पावे पुन्हां ॥५६८॥

ऐसा जगद्‍बीज । मूळ जो संकल्प । वासनास्वरूप । अति सूक्ष्म ॥५६९॥

स्वभावें तो जेथें । कल्प -क्षयीं राहे । स्थान तें मी आहें । जाण पार्था ॥५७०॥

जाण पार्था , जेथें । एकीं निराकारीं । नाम -रूपें सारीं । हारपती ॥५७१॥

आणि वर्ण -व्याक्ति । आटोनियां जाती । जेथें नष्ट होती । जाति -भेद ॥५७२॥

सर्व हि संकल्प - । वासना -संस्कार । पुन्हां चराचर । रचावया ॥५७३॥

जेथें राहोनियां । असती अमर । निधान साचार । तें हि मी च ॥५७४॥

तपाम्यहमहं वर्षं निगृह्लाम्युत्सृजामि च ।

अमृतं चैव मृत्युश्च सद्सच्चाहमर्जुन ॥१९॥

सूर्य़ -रूपें मी च । पाडोनियां ऊन । टाकितों शोषून । विश्व सारें ॥५७५॥

मग मी च इंद्र । होवोनि वर्षतां । तें चि समृद्धता । पावे पुन्हां ॥५७६॥

पाहें पार्था , अग्नि । जैसें काष्ठ खाय । मग तें चि होय । अग्निरूप ॥५७७॥

मरतें मारितें । तैसें असे जें जें । स्वरूप तें माझें । ऐसें जाण ॥५७८॥

मृत्यूचिया भागीं । म्हणोनि जें कांहीं । धनंजया तें हि । रूप माझें ॥५७९॥

आणि वस्तुमात्रीं । तत्त्व अमर जे । तें तंव सहजें । मी च आहें ॥५८०॥

बहु बोलोनियां । सांगावें जें कांहीं । सर्व हि तें घेईं । एकदां च ॥५८१॥

तरी अविनाश । तेविं नाशिवंत । जाण हें समस्त । मी च आहें ॥५८२॥

म्हणोनि मी नसें । ऐसा नाहीं ठाव । सर्वत्र सदैव । संपूर्ण मी ! ॥५८३॥

परी प्राणी पाहें । कैसे दैवहीन । न घेती दर्शन । नित्य माझें ॥५८४॥

गेले जळावीण । तरंग सुकोन । रश्मि दीपावीण । देखती ना ॥५८५॥

नवल हें तैसें । असोनि मद्रूप । नेणती स्वरूप । आपुलें ते ॥५८६॥

विश्वीं अंतर्बाह्म । कोंदलों मी एक । मद्रूप चि देख । त्रैलोक्य हें ॥५८७॥

परी कैसें कर्म । आड आलें जीवां । नेणती । मद्भावा । नास्तिक ते ॥५८८॥

अमृताचे कूपीं । पडोनि साचार । म्हणावें बाहेर । काढा ऐसें ॥५८९॥

तया करंटयांची । तैसी गति होय । तेथें कोणें काय । करावें गा ! ॥५९०॥

घांसभरी अन्न । मिळावें म्हणोन । धांवे वणवण । अंध जैसा ॥५९१॥

चिंतामणिवरी । मग पडे पाय । तरी पुढें जाय । लाथाडोनि ॥५९२॥

तैसें जरी ज्ञान । सोडोनियां जाय । ऐसी स्थिति होय । प्राणियाची ॥५९३॥

म्हणोनियां जें जें । केलें ज्ञानाविण । तें तें वृथा जाण । धनुर्धरा ॥५९४॥

अंध गरुडाचे । पंख तरी चांग । परी उपयोग । काय त्यांचा ? ॥५९५॥

तैसें सत्कर्माचे । सायास जे होती । ते तों वृथा जाती । ज्ञानाविण ॥५९६॥

त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्टाव स्वर्गातिं प्रार्थयन्ते ।

ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक - मश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ‍ ॥२०॥

वर्णाश्रमधर्में । वर्तोनि किरीटी जे होती । विधिमार्गा ॥५९७॥

कैसे तिन्ही वेद । डोलविती मान । कौतुकें यजन । चाले जेव्हां ॥५९८॥

जयांपुढें ठाके । यज्ञक्रिया मूर्त । घेवोनि हातांत । फळभोग ॥५९९॥

यज्ञमृर्ति ऐसे । दीक्षित सुजाण । सोमरस -पान । करिती जे ॥६००॥

पार्था , तयांनीं त्या । पुण्याचिया नांवें । जोडलें आघवें । पातक चि ॥६०१॥

तीन हि वेदांत । होती पारंगत । आचरती शत । यज्ञ जरी ॥६०२॥

तरी तें यजन । अर्पिती ना मज । स्वर्ग -सुख -काज । धरोनियां ॥६०३॥

बैसोनि हि जैसा । कल्पतरूखालीं । गांठवीत झोळी । दैवहीन ॥६०४॥

आणि मग धांवे । मागावया भीक । तैसें चि हें देख । याज्ञिकांचें ॥६०५॥

शतावधि यज्ञीं । यजोनियां मातें । इच्छिती स्वर्गातें । भोग -लुब्ध ॥६०६॥

सांग म्हणावें का । ह्यातें पुण्याचार । पाप चि साचार । नव्हे का हें ? ॥६०७॥

मजवीण झालें । स्वर्ग -सुख प्राप्त । तरी पुण्य -पंथ । मूढांचा तो ॥६०८॥

तया सुखा ज्ञानी । संबोधिती हानि । विघ्न तें म्हणोनि । उपेक्षिती ॥६०९॥

एर्‍हवीं पाहोन । नरकींचें दुःख । स्वर्गालागीं सुख । ऐसें नांव ॥६१०॥

परंतु जें सत्य । नित्यानंदमय । निर्दोष तें होय । रूप माझें ॥६११॥

स्वर्ग -नरक हे । जीवा नागवून । माझियापासून । दूर नेती ॥६१२॥

म्णोनियां जाण । धनुर्धरा चांग । दोन्हीं आडमार्ग । चोरांचें हे ॥६१३॥

पुण्यात्मकें पापें । यावें स्वर्गलोकीं । पडावें नरकीं । पापात्मकें ॥६१४॥

मग जेणें माझ्या । स्वरूपाची प्राप्ति । तें चि गा किरीटी । शुद्ध पुण्य ॥६१५॥

सर्व मदंतरीं । असोनियं जीव । दुरावें मी देव । जेणें कर्में ॥६१६॥

तया पुण्य -कर्म । ऐसें संबोधितां । न तुटे का पार्था । जीभ तेथें ? ॥६१७॥

असो , ऐशा रीती । यजोनियां मातें । चित्तीं वांछिती ते । स्वर्ग -भोग ॥६१८॥

जेणें प्राप्त नोहे । अर्जुना , मद्रूप । ऐसें पापरूप । पुण्य जें का ॥६१९॥

तेणें पुण्यें मग । लाहोनियां बळ । गांठिती वेल्हाळ । स्वर्ग -लोक ॥६२०॥

जेथें अमरत्व । हें चि सिंहासन । राजधानी -स्थान । अमरावती ॥६२१॥

जेथें ऐरावता - । सारिखें वाहन । कोठारें हि पूर्ण । अमृताचीं ॥६२२॥

जेथें अष्टमहा - । सिद्धींचीं भांडारें । आणिक खिल्लारें । सुरभींचीं ॥६२३॥

जेथें चिंतामणि - । रत्नांची जमीन । उभे देवगण । सेवेसाठीं ॥६२४॥

कल्पवृक्षांचीं च । जेथें क्रीडोद्यानें । नित्य चाले गाणें । गंधर्वांचें ॥६२५॥

विलासिनींमाजीं । उर्वशी प्रमुख । आणि रभादिक । नृत्याड्‍गना ॥६२६॥

शय्यागृहामाजीं । जोडोनियां हात । उभा मूर्तिमंत । कामदेव ॥६२७॥

करी जेथें चंद्र । सडा -संमार्जन । शिंपोनि किरण । अमृताचे ॥६२८॥

आणि वायुऐसे । धांवणारे दूत । पाहती गा वाट । आज्ञेची च ॥६२९॥

ब्रहस्पति आदि - । करोनि ब्राह्मण । इच्छिती कल्याण । आशीर्वादें ॥६३०॥

लोक -पाळांचिया । तोडीचे विख्यात । असती राऊत । जिये स्थानीं ॥६३१॥

करोनियां पंक्ति । देव उभे ठेले । पुढें अश्व चाले । उच्चैःश्रवा ॥६३२॥

असो हें , पुण्यांश । तोंवरी च देख । ऐसें स्वर्ग -सुख । भोगिती ते ॥६३३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel