दिनांक १८ जुन १९८३, दिवस शनिवार, वेळ सकाळची, आणि स्थळ होते नेवील ग्राऊंड, रॉयल टनब्रिज, वेल्स इथले. टिपीकल इंग्लिश वातावरण, हिरवीगार खेळपट्टी, हवेत गारवा आणि या सर्वांची धार वाढवणारा पिसाट वारा. अर्थातच भारत आणि झिम्बाब्वे म्हणजेच दोन्ही संघ छोटे (मिनोज) असल्याने तमाम क्रिकेटपंडीत सामना फारसा गांभीर्याने घेतल्यास उत्सुक नव्हते. मात्र *हर छोटा एकदिन बडा हो जाता है* हे विसरून कसे चालणार होते? भारताच्या दृष्टीने हा सामना म्हणजे जिवनमरणाचा प्रसंग होता तर झिम्बाब्वे संघ *हम भी डुबेंगे सनम तुमकोभी ले डुबेंगे* साठी सज्ज होता.

या महत्त्वपुर्ण सामन्यासाठी भारतीय फौजफाटा सुसज्जीत करण्यात आला होता. थोरले सेनापती सुनिल गावसकर आणि दख्खनचा आक्रमक सेनानी क्रिस श्रीकांत यांनी आक्रमणाची फळी उभारली होती. मध्यफळीची तटबंदी मुंबई प्रांताचे युवराज संदिप पाटीलसह दिल्लीच्या नावाजलेल्या मोहिंदर अमरनाथ आणि यशपाल शर्मा या इनफॉर्म सरदारांच्या हाती होती. मध्यफळीत दगाफटका झालाच तर रसद पुरवायला  सरसेनापती विश्वासराव म्हणजेच संघनायक कपिलदेव आपले राखीव अष्टपैलू सैनिक  बिन्नी,शास्त्री,मदनलाल यांच्या सोबत दिमतीला होते. शिवाय यष्टिमागे भारतीय तोफखाना सांभाळणारा खंदा सरदार सय्यद किरमाणी प्रसंग बाका असला की बॅटरूपी तलवार उपसायला नेहमीप्रमाणे हजर होता. अटीतटीच्या प्रसंगी मुंबई सुभ्याचे सरदार बलविंदर सिंग संधू बॅट चालवण्यात तरबेज होते.

एकवेळ अर्जुनाला शरवेध करतांना पक्षाचा डोळा दिसला नसता मात्र कपिलसेनेला विजयाशिवाय दुसरे काही दिसणे शक्य नव्हते आणि म्हणूनच नाणेफेक जिंकून पहिला निर्णायक वार करायच्या उद्देशाने संघनायक कपिलदेवने फलंदाजी पत्करली. मात्र कुशल योद्धे, पराक्रमी फौज असुनही रणभुमीचे वातावरण तुमच्या सोबत नसेल तर पानिपत अटळ असते हे पानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या २२२ वर्षांनंतर पुन्हा एकदा अनुभवायला आले. झिम्बाब्वेचा हा पाचवा सामना होता आणि १ विजय आणि ३ पराभवासह त्यांना उपांत्य फेरीच्या आशा जवळपास मावळल्या होत्या. त्यामुळे त्या संघावर अजिबात दडपण नव्हते आणि आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी ते सज्ज होते. झिम्बाब्वे संघाचे आक्रमण २६ वर्षीय पिटर रॉसन आणि २४ वर्षीय केविन करन या ताज्या दमाच्या गोलंदाजांनी सांभाळले होते.

स्विंग गोलंदाजीला अनुकूल वातावरण लाभताच या दोघांनी रेड चेरी म्हणजेच लालबुंद चेंडू ताब्यात घेतला आणि चेंडूनेही काळवेळेचे भान ठेवत, हिरव्यागार खेळपट्टीची मानमर्जी राखत *बिलनची नागीन निघाली, नागोबा डोलायला लागला* सारखे खेळपट्टीवर डोलायला सुरुवात केली. तर कवचकुंडले लाभलेल्या कर्णाच्या रथासारखा भारतीय फलंदाजीचा रथ या दोघांनी केलेल्या स्विंगच्या चिखलात रुतून बसला. ० ० ५ १ ९ हा कोणत्याही अत्यावश्यक सेवेचा टेलिफोन नंबर किंवा सिक्रेट कोड नसून गावसकर, श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ, संदिप पाटील आणि यशपाल शर्मा यांच्या या महत्त्वाच्या लढाईतल्या धावा होत्या. युद्धाच्या प्रारंभीच दगाफटका झाला होता.

सामन्याचा तिसऱ्या चेंडूवर भारतीय संघाचा सर्वोत्तम फलंदाज सुनील गावस्करला पिटर रॉसनने शुन्यावर पायचितात पकडले आणि *प्रथमाग्रासे माक्षिकापात झाला*.  परिस्थिती आणखी चिंताजनक झाली जेंव्हा कातील फलंदाज श्रीकांत भोपळा न फोडताही केविन *करनला शरण गेला.* भारतीय संघाचे बाहु छाटताच रॉसन, करन जोडागोळीला आणखी चेव चढला आणि मोहिंदर अमरनाथ, संदिप पाटीलला स्वस्तात निपटवत तंबूचा रस्ता दाखवला. आता फलंदाजीचे 'यशापयश' नि:संदिग्धपणे "यशपाल" शर्मावर अवलंबून होते मात्र *सुखके सब साथी, दुखमे न कोय* अशा भयावह स्थितीत यशपाल शर्मा  भारतीय संघाची सावरू शकला नाही.

*जगात अज्ञानासारखे दुसरे कोणतेही सुख नाही* असे म्हणतात. नाणेफेक जिंकून कपिलदेव निवांतपणे शॉवर घ्यायला स्नानगृहात गेला आणि रणांगणाच्या धुळधाणीपासून बेखबर होता. इथल्या मैदानावर खेळाडूंचे ड्रेसिंग रूम तळमजल्या खाली बेसमेंटमध्ये होते. दुर्दैवाने त्यादिवशी विंडीज आणि कांगारू यांच्यात लॉर्डस, लंडनला हायव्होल्टेज सामना असल्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग ची सर्व सामुग्री त्या सामन्यासाठी तैनात होती आणि बिबिसीच्या संपामुळे या सामन्याच्ये धावते समालोचन उपलब्ध नव्हते. मात्र सेनापतीला युद्धाची इत्यंभूत माहिती देणे खबऱ्यांचे परमकर्तव्य होते आणि यालाच जागून राखीव खेळाडू सुनिल वासन धापा टाकत ड्रेसिंग रूमला आला. आपले दोन मोहरे गळाले याची बातमी त्याने स्नानगृहाचा दरवाजा ठोठवत शॉवर घेत असलेल्या कपिलदेवला दिली. आणिबाणी सदृश परिस्थिती होताच कपिल तातडीने बाहेर आला परंतु तोपर्यंत तिसरा बळी गेल्याची खबर धडकली आणि अवघे ड्रेसिंग रुम स्तब्ध झाले. अखेर संघसहकाऱ्यांनी मिळून कपिलला फलंदाजीला तयार केले मात्र तोपर्यंत बिनधास्त फलंदाज  संदिप पाटील चौथ्या बळीच्या रुपात मान खाली घालून मैदानाबाहेर येत होता. अचानक समोर सेनापती कपिलदेवला पाहून संदिप पाटील ओशाळला आणि आयुष्यात पहिल्यांदा कपिलदेवला नजर न मिळवता मान खाली घालून तंबूकडे मार्गस्थ झाला.

क्रमश:,,,,,

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel