नेवील ग्राऊंडला चेंडूच्या वळवळी वाढलेल्या होत्या. तोंडाला मानवी रक्ताची चटक लागलेल्या नरभक्षक वाघासारखे रॉसन, केविन करनची जोडी शिकारीला चटावली होती. गावसकर, श्रीकांत, मोहिंदरची शाही डिश पचवून या हिंस्त्र वेगवान जोडीने वाघाचं काळीज असलेल्या संदिप पाटीलकडे आपला मोर्चा वळवला. खरेतर संदिप पाटील असो अथवा विव रिचर्डस, हेडन, ख्रिस गेल, सेहवाग अथवा शाहिद आफ्रिदी असो यांच्या रक्तात आरबीसी किंवा डब्ल्युबीसी पेक्षाही आक्रमक पेशीच जास्त आढळण्याची शक्यता आहे. किंबहुना खेळपट्टीवर जाऊन गोलंदाजांकडे तुच्छतेने बघून त्यांना "उठता लाथ बसता बुक्की" हाणने हेच अशा आक्रमक फलंदाजांचे ध्येय असते. मात्र "चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे" असतातच. आजचा दिवस गोलंदाजांचा होता आणि आक्रमण हाच बचावाचा सर्वोत्तम मार्ग समजत संदिप पाटीलने कंबर कसली. मात्र इथेच घात झाला. केविन करनला ऑन साइडला फ्लिक करायच्या नादात संदिप पाटील हॉटनला झेल देऊन बसला आणि ४ बाद ९ धावा अशी आपल्या संघाची दुरावस्था झाली.
स्वराज्यावरचे संकट आणखी गडद होत चालले होते. शत्रुंच्या वेगवान हालचालीने आपल्या सलामीची फळी कापून मध्यफळीला भगदाड पाडणे सुरू केले होते. भारतीय गोटात शोककळा पसरली होती. युवराज संदिप पाटील जड अंतःकरणाने तंबुकडे परतत होते. समोर बघतात तो काय सेनापती कपिलदेव खिन्न मनाने रणांगणात उतरत होते. कपिलशी नजरानजर चुकवत संदिप पाटीलने ड्रेसिंग रूमच्या पायऱ्या उतरणे सुरू केले आणि थोडावेळ बुड टेकवत नाही तोच पंजाबचे जांबाज सरदार यशपाल शर्मा सेनापती कपिलदेवला एकाकी सोडून रणांगणातून माघारी परतले होते. सुतक लागल्यासारखे ड्रेसिंग रूमचे वातावरण निर्माण झाले होते, पाचही अग्रणी फलंदाज उदासवाण्या,भकास चेहऱ्याने शुन्यात बघत होते.
महाभारतात द्दुतात (जुगारात) हरताच द्रौपदीचे वस्त्रहरण होतांना पांडवांची जी अवस्था झाली अगदी तशीच अवस्था या पाच धुरंधर फलंदाजांची झाली होती. तरीपण महाभारतात श्रीकृष्णाने एंट्री करत द्रौपदीचे वस्त्रहरण थांबवले होते मात्र भारतीय फलंदाजीचे वस्त्रहरण कोण थांबवणार हा लाखमोलाचा प्रश्न होता. शिवाय केवळ वस्त्रहरण थांबवून काम भागणार नव्हते तर संघाला भरजरी वस्त्र नेसवल्याशिवाय काही फायदा होणार नव्हता. मात्र कपिलदेव शिवाय या नाजुक प्रसंगी धिरोदात्तपणे फलंदाजी कोण करू शकेल किंबहुना कपिलला कोण साथ देईल आणि कितपत साथ देईल यात शंकाच होती. कारण कपिलव्यतिरिक्त जे अष्टपैलू खेळाडू संघात होते त्यांची स्थिती "बनी तो बनी नहीतो अब्दुल गनी" सारखी होती.
इकडे भारतीय संघाची हालत खस्ता होत चालली होती आणि तिकडे सामन्याच्या आयोजकांना जुलाब सुरू झाले होते. "घोडं मेलं ओझ्याने शिंगरू मेलं हेलपाट्यान" अशी त्यांची अवस्था झाली होती. भारतीय संघाची घसरगुंडी पाहता सामना लंचच्या पहिले संपणार आणि लंचची ऑर्डर व इतरही व्यवसायीक हितसंबंधांना फटका बसणार या विचाराने आयोजक सैरभैर झाले होते. झिम्बाब्वे संघ सोडता बाकी सगळ्यांचेच "देऊळ पाण्यात होते". अतिउत्साही पत्रकार आणि हवशे नवशे गवश्यांनी तर दुपारनंतर पिकनिकसाठी जुगाड बांधणे सुरू केले होते. मात्र क्रिकेटमध्ये सामन्याचा शेवटचा चेंडू टाकतपर्यंत काहीही घडू शकते हे सर्वांनाच माहित होते. अखेर "आलिया भोगाशी असावे सादर" म्हणत कपिलदेवने खेळपट्टीवर पाऊल टाकले.
०५ बाद १७ अशा बिकट परिस्थितीत कपिलने संघाचा भार खांद्यावर घेतला. नक्कीच एखाद्या व्यक्तीचे चरित्र तो संकटात असताना दृष्टीस पडते आणि पुढे झालेही तसेच. "शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ" हे कपिलला चांगले ठाऊक होते शिवाय अर्धा संघ स्वस्तात गारद झाला असतांनाच अवाजवी साहस अंगलट येऊ शकते याची कपिलला कल्पना होतीच. हिच वेळ, हिच खेळी त्याला "हिरो किंवा झिरो" ठरवणार होती. शिवाय तो घरचा म्हणजेच संघाचा कर्ता पुरुष, त्याच्याच जिवाला बरेवाईट झाले तर संघातल्या कच्याबच्यांनी बघायचे कुणाकडे हा प्रश्नच होता. यामुळे "जहाल कपिलने मवाळ मार्ग स्विकारला." काळवेळ महत्त्वाची होती, त्यामुळे त्याने आपल्या नैसर्गिक आक्रमक वृत्तीला काही काळासाठी निर्बंध घातला कारण वेळेचे महत्त्व "समयको जो ना समझा वो मिट गया, तलवारसे तो बच गया लेकिन फुलसे कट गया" हे तो जाणून होता.
इकडे भारतीय ड्रेसिंग रूममध्ये स्मशानशांतता पसरली होती. निर्जिव पुतळ्यासारखे सर्वजण माना खाली घालून बसले होते. एकमेकांशी काही बोलायची किंवा काही विचारायची कुणाचीही हिम्मत होत नव्हती. एवढेच नव्हे तर बेसमेंटमधून वर जाऊन सामना बघायचे धाडस कुणातच उरले नव्हते. जे फलंदाज बाद होऊन परतले ते "ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं" म्हणत तर उर्वरित फलंदाज "गम उठानेके लिए मैं तो जिऐ जाऊंगा" करत मनातल्या मनात देवाचा धावा करत होते. कपिलला जाऊन बराच वेळ झाला होता आणि अजुनही ड्रेसिंग रुमच्या पायऱ्यांचा आवाज कोणाच्याही कानावर पडला नव्हता. मात्र थोड्याच वेळात प्रेक्षकांचा गोंगाट वाढायला लागला होता. टाळ्या, आरोळ्या,शिट्ट्यांचे आवाज स्पष्ट ऐकायला येऊ लागले होते. त्यातच गणपती बाप्पा मोरया, भारत माता की जय, वंदे मातरम्, हरहर महादेव च्या गगणभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. भारतीय ड्रेसिंग रूममध्ये मात्र आपण जे ऐकतो ते खरे आहे की निव्वळ भास होतो आहे हे कळायला मार्ग नव्हता. अखेर मन मोठे करत, उसने अवसान आणत चुळबुळ्या श्रीकांत वर गेला आणि त्याने जे पाहिले ते पाहून तो बेंबीच्या देठापासून ओरडला कारण मैदानात आग आगीवर फिदा झाली होती.
क्रमश:,,,,,,