बुधवार, दिनांक २२ जुन १९८३, सेमीफायनल करिता ओल्ड ट्रॅफोर्ड, मॅंचेस्टरचे रणमैदान सज्ज झालेले होते. अ गटात सहापैकी पाच सामने दणदणीत पणे जिंकून इंग्लंडने गटात सर्वोच्च स्थान घेत उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केलेला होता तर ब गटात ६ पैकी ४ सामने जिंकून भारताने गटात दुसरे स्थान पटकावत उपांत्य फेरीत मुसंडी मारलेली होती. बॉब विलिसच्या नेतृत्वाखाली खेळणारा इंग्लिश संघ आपली मजबूत फलंदाजी आणि दर्जेदार गोलंदाजीवर विसंबून होता तर भारतीय संघ नवखा कर्णधार कपिलदेवच्या नेतृत्वात "नया है वह" या भुमिकेत होता. मात्र या दोन संघांव्यतिरिक्त ओल्ड ट्रॅफोर्डची खेळपट्टी महत्त्वाची भुमिका निभावणार होती आणि तिच्या एकूण वागणुकीवरुन इंग्लिश संघासाठी ती "गैरोपे करम अपनोपे (गोरोंपे) सितम" करणार हे निश्चित होते. शिवाय आऊटफिल्ड फास्ट असल्याने इथे खेळाडूंच्या शारिरीक क्षमतेचा चांगलाच कस लागणार होता.
सेमिफायनल सारख्या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची अॅनाटॉमी समजून घेणे गरजेचे आहे. इंग्लिश संघ आपल्या घरगुती वातावरणात खेळणार होता आणि सहाजिकच याचा त्यांना फायदा होणार होता. सलामीची जबाबदारी डावाखुरा फलंदाज ग्रॅहम फॉवलर आणि फेविकॉल फलंदाज ख्रिस ट्रॅवरे सांभाळून होते. ग्रॅहम फॉवलरने साखळी सामन्यात लागोपाठ ४ अर्धशतक ठोकत इंग्लंडला उपांत्य फेरीत पोहचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती तर कासवछाप फलंदाज ख्रिस ट्रॅवरे एक बाजू सांभाळून विरोधी गोलंदाजांना चांगलाच हैराण करत असे. तिसऱ्या क्रमांकावर डावाखुरा शैलिदार फलंदाज डेव्हिड गॉवर डावाची सुंदर गुंफण करत असे तर महाबली माईक गॅटींग मध्यफळीचा कणा होता. इंग्लिश संघाचा मध्यफळीचा आणखी एक फलंदाज ऐलन लॅंब, याला खरेतर ऐलन लॉयन म्हणायला पाहिजे कारण बेधडक फलंदाजी ही त्याच्या डाव्या हाताचा खेळ होता, भलेही तो उजव्या हाताने फलंदाजी करत असे. सहाव्या क्रमांकावर सर्वांना हवाहवासा वाटणारा जगप्रसिध्द अष्टपैलू खेळाडू इयान बॉथम सामन्याला कलाटणी देण्यात माहिर होता. खरे सांगायचे झाले तर इयान बॉथम इंग्लिश संघासाठी संकटमोचक होता. मात्र एक्स्प्रेस गोलंदाजी खेळण्याची ची सवय असलेले इंग्लिश खेळाडू भारतीय मध्यमगती माऱ्याचा सामना कसाकाय करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरले होते.
गोलंदाजी ही इंग्लिश संघाचा नेहमीच मजबूत बाजू असल्याने आणि सोबत वेगवान गोलंदाजीला अनुकूल वातावरण असल्याने फारशी चिंता नव्हतीच. बॉब विलिस (६ फुट ६ इंच), ग्रॅहम डिली (६ फुट ४ इंच) आणि पॉल ऐलॉट (६फुट ४ इंच) या वेगवान सुपरफास्ट त्रिकुटासोबत अष्टपैलू इयान बॉथमची स्विंग गोलंदाजी म्हणजे "सोनेपे सुहागा" होते. पॉल ऐलॉट मजबुत शरीरयष्टीचा, उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करायचा तर ग्रॅहम डिली आणि बॉब विलिसला त्याकाळची इंग्लंडची सर्वोत्तम वेगवान जोडी मानले जायचे. भलेही ग्रॅहम डिली वलयांकित खेळाडू नसला तरी दखल घेण्याइतपत तो चांगली गोलंदाजी नक्कीच करायचा. डिलीबाबत एक मजेशीर कहाणी आहे. १९७९ ला माईक ब्रिअरलीच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघ ऑस्ट्रेलिया, पर्थच्या वॅका मैदानावर कसोटीला उतरला होता आणि नवोदित डिलीला कर्णधाराने नवीन चेंडू सोपवत त्यावर सार्थ विश्वास दाखवला होता. डिलीने पहिल्या डावात ३ बळी घेतले होते तर दुसऱ्या डावात डेनिस लिलीला गलीमध्ये पिटर विलीकडून झेलबाद केले होते. तेंव्हा गमतीने हे समीकरण असे मांडले जायचे "'लिली' कॉट 'विली' अॅट 'गली' बाय 'डिली'"
पहिल्या दोन विश्वचषकात तळाशी असलेल्या भारतीय संघाने सेमीफायनलला झेप घेतली होती आणि यजमान इंग्लंडसोबत निकराची लढाई होणार होती. मुख्य म्हणजे भारतीय फलंदाजी कोणत्याही एका फलंदाजावर विसंबून नसल्याने प्रत्येक सामन्यात नवीन कोणीतरी फलंदाजीत तारणहार ठरत होता. सलामीला गावसकरचे एका टोकाला शास्त्रीय संगीत असायचे तर दुसरीकडे श्रीकांतचा डिस्को डान्स. जिथे गावसकर ची फलंदाजी पाहून आत्मीय समाधान मिळायचे तर श्रीकांतची फलंदाजी बसल्या जागी बल्ले बल्ले करत भांगडा करायला लावायची. गावसकरची "मुर्ती छोटी पण किर्ती मोठी" असायची. उसळत्या खेळपट्टीवर, दर्जेदार वेगवान गोलंदाजीला हेल्मेटशिवाय सनीला तोंड देताना पाहणे, एक अद्भुत अनुभूती होती. श्रीकांतचा मात्र नैसर्गिक आक्रमक खेळ सगळ्यांना वेडावून टाकायचा. एवढ्या सुंदर सलामी जोडीच्या पाठोपाठ "अमर अकबर अँथनी" मैदानात उतरायचे. अमर म्हणजेच संदिप पाटील अर्थातच सॅंडी, बेधडक, निडर आणि अत्यंत आक्रमक फलंदाज. या विश्र्वचषकाच्या एक वर्ष अगोदर भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता आणि दुसऱ्या कसोटीत सॅंडीने इंग्लिश गोलंदाजांची कत्तल करत १२९ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने बॉब विलिसच्या एका षटकात सहा चौकार ठोकले होते. कदाचित बॉब विलिसच्या पाठीवर त्याचे वळ १९८३ विश्र्वचषका पर्यंत सुकलेले नसावे. यशपाल शर्मा अकबर सारखा मवाळ पण त्याची फलंदाजी एकदम नजाकतभरी असायची. शिवाय मोठ्या गाजलेल्या खेळाडूंच्या भाऊगर्दीत त्याचे नाव नेहमीच गडप व्हायचे. मोहिंदर अगदी अॅंथनी सारखा, जेवढा पराक्रमी तेवढाच खट्याळ. गुणी फलंदाज आणि हॅंडी गोलंदाजी ही त्याची ख्याती होती. सहाव्या क्रमांकावर कपिलदेव नेहमीप्रमाणेच "सदाबहार नगमे" सारखा असायचा. झिम्बाब्वे विरूद्ध तर त्याने एकट्याने अख्खे बिनाका गितमाला गाऊन भारतीय संघाची शान राखली होती.
भारतीय गोलंदाजी मुख्यत: मध्यमगती असल्याने त्याचा चांगला फायदा इंग्लिश खेळपट्ट्यांवर झाला. सलामीला कपिलदेव आणि बलविंदरसिंग संधू आक्रमणाची सुरूवात करायचे परंतू त्याकाळी डावाच्या प्रारंभी फलंदाज गोलंदाजांवर तुटून पडायचे नाही किंबहुना तत्कालीन क्रिकेटचे नियम, ६० षटकांचा सामना असल्याने सुरवातीला हाणामारी फारशी व्हायची नाही. एकदा या दोघांना व्यवस्थित खेळून काढले की मदनलाल, बिन्नी आणि मोहिंदर अमरनाथ फलंदाजांच्या रडारवर यायचे परंतु बरेचदा "शिकारी खुद यहाँ शिकार हो गया" असे व्हायचे. डावाच्या मध्यात हे मध्यमगती त्रिकुट फलंदाजांना बांधुन ठेवायचे आणि यांच्या सापळ्यातून सुटतांना फलंदाज आपला बळी द्यायचे. मात्र सेमीफायनल करिता कपिलदेवने इंग्लिश फलंदाजांच्या तोंडाला पाणी सुटेल असा गोलंदाज संघात घेतला होता. आतापर्यंत विश्र्वचषकात फारसा उजेड न पाडणारा हा खेळाडू सेमीफायनलला काय दिवे लावणार याची सर्वांनाच चिंता होती. मात्र कपिलदेव आपल्या निर्णयावर ठाम होता, कारण कपिलला सामना नव्हे तर विश्र्वचषक जिंकायचा होता.
क्रमशः,,,,