१९८३ चे समर सर कराण्यास सर विवियन रिचर्ड्स सरस ठरतील याबाबत कुणालाच शंका नव्हती. तरीपण आज विंडीजची ग्रहदशा बिघडलेली आहे हे कुठेतरी जाणवत होते. क्लाईव्ह लॉईड आल्याआल्याच एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असतांना त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले होते आणि उर्वरित सामना तो डेस्मंड हेन्सला रनरच्या रुपात घेऊन खेळणार होता. खेळपट्टीवर रिचर्डसचे धुमशान चालूच होते आणि क्लाईव्ह लॉईड सोबत त्याचे फलंदाजीतील डेडली कॉम्बीनेशन भारतीय स्वप्नांचा कधीही चुराडा करण्यास सक्षम होते. त्यामुळे भारतीय पाठीराखे डोळ्यात प्राण आणून रिचर्डसच्या विकेटची चातकासारखी वाट बघत होते.
अखेर तमाम भारतीयांच्या प्रार्थनेला फळ आले आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मदनलालला टोलवण्याच्या नादात रिचर्डसचा झेल उंच उडाला आणि पारध्यासारखा कपिलदेव चेंंडूरुपी सशाला पकडायला सरसावला होता. तो केवळ लाल रंगाचा, पाच औंसाचा गोल, लेदरचा गोळा नव्हता तर भारतीय क्रिकेटविश्वाला नवी सोनेरी पहाट देणारा ओटीपी होता. या एका घटनेने भारतीय क्रिकेटविश्व *तिमिरातून तेजाकडे* जाणार होते. याच एका छोट्याशा प्रसंगात भविष्यातील सचिन, धोनीसारखे सुपरस्टार जन्माला येणार होते आणि याच महत्त्वाच्या घटनेने भारतीय क्रिकेटविश्वाच्या कक्षा रुंदावणार होत्या. मदनलालच्या जाळ्यात रिचर्डस संपुर्णत: फसला होता मात्र आता वेळ होती या *संधीचे सोने* करायची.
रिचर्डसच्या बॅटेतून चेंडूने टेकऑफ घेताच कपिल मिडविकेटवरून अधाशासारखा उलटपावली धावत सुटला तर सिमारेषेकडून यशपाल शर्मा सुद्धा याच लक्ष्याच्या मागावर निघाला. अखेर गोलंदाज मदनलालने जिवाच्या आकांताने ओरडला *यश रुक जा, यश रुक जा*. कारण यशपाल शर्मा कितीही चांगला क्षेत्ररक्षक असला तरीही प्रेक्षकांच्या प्रचंड गदारोळात, आऊटफिल्डमध्ये झेल घ्यायला जी चपळता, लवचिकता, फिजीकल फिटनेस, जिगर आणि हॅंड आय कॉर्डीनेशन लागते, त्याची सर कपिल शिवाय अन्य कोणालाही येणार नव्हती. म्हणूनच मदनलाल यशपालवर ओरडत मनोमन या दोघांची टक्कर होऊ नये म्हणून देवाकडे प्रार्थना करत होता. अखेर रिचर्डस नावाची मोठी मासळी जाळ्यात फसताच भारतीय संघाने नि:श्र्वास टाकला. संघाच्या डोक्यावरचे मणभर ओझे कमी झाल्याने भारतीय खेळाडूंना *आकाश दोन बोटे ठेंगणं* झालेलं होतं तर भारतीय पाठीराख्यांनी मैदानात घुसखोरी करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या होत्या.
३ बाद ५७ वर लॅरी गोम्सने क्लाईव लॉईड सोबत डाव सावरणे सुरु केले मात्र हेन्स आणि रिचर्डसचा बळी घेतल्याने मदनलालची राजधानी एक्सप्रेस सुसाट सुटली होती. त्यातच सिम मुव्हमेंटने लॅरी गोम्सच्या बॅटची कड घेत गावसकरच्या सुरक्षीत हातात विसावणे पसंत केले होते. ६६ धावांत चौथा बळी जाताच विंडीजच्या ड्रेसिंग रूममध्ये खळबळ उडाली. मात्र अजुनही सामना बरोबरीत होता. खेळपट्टीवर क्लाईव्ह लॉईड काळापहाड बनून भारतीय विजयाच्या मार्गात ठामपणे उभा होता. इथेच कपिलने कल्पकता दाखवत रॉजर बिन्नीला चेंडू सोपवला आणि बिन्नीने आपल्या कर्णधाराला निराश केले नाही. बिन्नीला फटकावतांना लॉईडचा अंदाज चुकला आणि चेंड एक्स्ट्रा कव्हरला उभा असलेल्या कपिलच्या हातात
स्थिरावला. लॉइडची गच्छंती होताच पुन्हा एकदा प्रेक्षकांनी मैदानात तर भारतीय संघाने विजयाकडे मुसंडी मारली होती.
विंडीजच्या अर्ध्या संघाचा खात्मा करताच सामना भारताकडे झुकू लागला मात्र अजुनही फॉड बॅकस, जेफ्री दुजां सारखे फलंदाज खेळपट्टीवर उभे होते. संधूच्या गोलंदाजीत बॅकसला किरमाणीने झेलबाद केले तर अखेरचा नावाजलेला फलंदाज जेफ्री दुजांला अमरनाथ ने त्रिफळाचीत केले. विंडीज संघाला घसरगुंडी लागताच अमरनाथने मार्शलला स्लिपमध्ये गावसकर तर्फे झेलबाद केले. संपुर्ण सामन्यात आक्रमक क्षेत्ररक्षण लावत कपिलने विंडीजच्या चांगल्याच नाड्या आवळल्या होत्या तर स्लिपमध्ये गावसकरने दोन उत्तम झेल घेत आपली *कॅप्चर* ही उपमा सिद्ध केली होती. १२४ धावांत ८ बळी जाताच विंडीजचे शेपूट जास्त वळवळणार नाही याची कपिलने काळजी घेतली आणि स्वत: गोलंदाजीला येत ऐंडी रॉबर्टसला पायचितात अडकवले. १४० धावसंख्येवर अमरनाथने माइकल होल्डींगला बाद करत विंडीजची धडपड थांबवली.
मायकेल होल्डींगला पंचांनी बाद देताच तिरंग्यासह भारतीय पाठीराख्यांनी मैदानात एकच धाव घेतली. तब्बल दिडशे वर्षे भारतावर अधिराज्य गाजवणाऱ्या इंग्लंडच्या भुमीवर भारतीय ध्वज अभिमानाने फडकू लागला होता. अवघा हिंदुस्थान प्रचंड जल्लोषात न्हाऊन निघाला होता. अविस्मरणीय कामगिरी करत भारतीय संघाने देशाला दिग्विजयाची अनोखी भेट दिलेली होती. आबालवृद्ध सगळेच या जागतिक कारनाम्याने भारावून रस्त्यावर उतरलेले होते. तिकडे ड्रेसिंग रुममध्ये उत्साहाला उधाण आलेलं होतं. कपिलदेव अमरनाथ सोबत विंडीजच्या ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भेटायला गेला आणि पाहतो तर काय, स्मशानशांततेत सर्वच खेळाडू खिन्न मनाने मान खाली घालून बसलेले होते. कोणीही बोलायच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी कपिलने क्लाईव्हची भेट घेत त्याच्याकडे शॅम्पेनच्या बॉटल्सची मागणी केली. लॉईडने मान हलवत कपिलला इशारा केला आणि कपिलने अमरनाथ सोबत शॅम्पेनची लयलूट करत भारतीय ड्रेसिंग रूमची वाट धरली.
भारतीय संघाचा मुक्काम लॉर्डसच्या जवळच असलेल्या वेस्टमोरलॅंड या हॉटेलमध्ये होता आणि या मार्गावर तिरंग्यासह मिनी इंडीया अवतरला होता. रात्रभर लाडू वाटपा सोबतच बल्ले बल्ले करत भांगडा डान्स सुरु होता. भारतीय विजयाची बातमी धडकताच तत्कालीन राष्ट्रपती झैलसिंग यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले तर पंतप्रधान इंदिराजींनी कपिल आणि संघसहकाऱ्यांचे कौतुक करत *इंडिया कॅन डू इट* असे गौरवोद्गार काढले होते. कपिलने प्रुडेंशियल विश्र्वचषक हातात घेऊन उंचावतात शॅम्पेनची बरसात होऊ लागली होती. अंतिम सामन्यात २६ धावा आणि ३ बळी घेणाऱ्या मोहिंदर अमरनाथची मॅन ऑफ दी मॅच म्हणून निवड झाली होती आणि याकरिता त्याला ६०० पौंड बक्षिसादाखल मिळाले होते.
या विजयाचे दुरगामी परिणाम भारतीय क्रिकेटवर झाले. शहरी भागातून क्रिकेटने छोट्या शहराकडे वाट धरली तर क्रिकेटमध्ये ही करिअर होऊ शकते ही भावना खेळाडूंमध्ये रूजू लागली. हळूहळू कसोटीपेक्षा एकदिवसीय सामने जास्त लोकप्रिय होऊ लागले आणि यानंतर विविध एकदिवसीय स्पर्धेचे पेव फुटले. कालांतराने एकदिवसीय सामन्याचे आणखी छोटे रुप म्हणून टी ट्वेंटीचा उदय झाला. मात्र एकदिवसीय सामने असो की टी ट्वेंटी,,यात फलंदाजांना अनुकूल नियम झाल्याने क्रिकेटचे हे दोन्ही प्रकार हाणामारी साठी ओळखल्या जाऊ लागले. तंत्रशुद्ध फलंदाज दुर्मिळ होऊन बसले आणि हातोडाछाप फलंदाजांचे ठोक उत्पादन होऊ लागले. १९८३ नंतर प्रथमच इंग्लंडबाहेर विश्र्वचषक स्पर्धेचे आयोजन होऊ लागले आणि १९८७ ला भारतात रिलायन्स कपच्या रुपात ही स्पर्धा खेळली गेली. ८३ विश्वचषकानंतर विंडीज संघाला उतरती कळा लागली आणि कित्येकदा हा संघ विश्र्वचषक स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी धडपडू लागला. ८३ नंतर विंडीज संघाने भारताचा दौरा केला होता आणि त्यात भारतीय संघाला बुकलून काढले होते. मात्र *१९८३ ला बुंदसे गई वो हौदसे नहीं आती* अशी विंडीज संघाची अवस्था झाली होती.
क्रिकेट विश्र्वचषक १९८३ वर्णन समाप्त.
***************************************