भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी क्रिकेटला पैसा आणि प्रसिद्धीचे जे वलय लाभलेले आहे ते भाग्य हाॅकीच्या वाट्यास आलेले नाही. आज भारतीय क्रिकेटला जे सोन्याचे दिवस आलेले आहेत किंबहुना कसोटी, एकदिवसीय सामने, टी ट्वेंटीत बऱ्या प्रमाणात भारतीय क्रिकेट संघ जी दादागिरी दाखवत आहे त्याची मुहुर्तमेढ खऱ्या अर्थाने १९८३ च्या विश्वचषकात रोवली गेलेली होती. पिढी दरपिढी यात नवनवीन खेळाडूंनी आपले योगदान देत क्रिकेटचा वृक्ष आणखी बहारदार केलेला आहे‌. शिवाय बीसीसीआयच्या अख्त्यारीत क्रिकेटचे नियमन येताच भारतीय क्रिकेटविश्व गर्भश्रीमंतीत दाखल झालेले आहे. चला तर मग विरंगुळा म्हणून आपण १९८३ च्या विश्वचषकाचे एक अवलोकन करूया.

१९८३ च्या पहिले भारतीय क्रिकेट संघ फारसा नावारूपाला आला नव्हता. तुरळक कसोटी विजय आणि सामने अनिर्णित राखणे यातच आपले सौख्य सामावले होते. नाही म्हणायला आपल्याकडे दिग्गज फलंदाजांची कमतरता नव्हती परंतु प्रतिपक्षाची दाणादाण उडवणारे किंवा उरात धडकी भरवणाऱ्या गोलंदाजांची वाणवा होती. शिवाय त्याकाळी वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि कांगारू सारख्या धाकड संघासमोर संघं शरणं गच्छामी ठरले असायचे.  पहिल्या (१९७५) आणि दुसऱ्या (१९७९) एकदिवसीय विश्वचषकात तर आपल्या संघाची कामगिरी पाहून  तिसऱ्या म्हणजेच १९८३ च्या विश्वचषकाबाबत कुणीही फारसे आशावादी अथवा उत्साही नव्हतेच.

पहिल्या दोन विश्वचषकात एकूण सहा सामन्यात आपल्या संघाने फक्तन एक विजय मिळवला होता. १९७५ ला भारतीय संघ इंग्लंड, न्युझीलंड आणि पुर्व आफ्रिका संघासोबत अ गटात समाविष्ट होता आणि दुबळ्या पुर्व आफ्रिका संघावर १० गड्यांनी मात करत एकमेव विजय मिळवला होता. १९७९ च्या दुसऱ्या विश्वचषकात तर परिस्थिती आणखी हलाखीची होती. वेस्ट इंडिज, न्युझीलंड आणि लंकेसमवेत भारतीय संघ ब गटात सामील होता. यावेळी तर कसोटीचा दर्जा प्राप्त न झालेल्या लंकेकडून आपल्याला पराभवाची नामुष्की पत्करावी लागली होती. अर्थातच पहिल्या दोन्ही विश्वचषकात पहिल्याच फेरीत गारद होत भारतीय संघ परतल्याने १९८३ ला वर्हाड लंडनला जाऊन कोणते दिवे लावणार याबाबत शंका नव्हती. मात्र प्रत्येक काळ्या ढगाला चंदेरी किनार असते हे विसरून कसे चालणार होते,,, आणि झालेही तसेच.

Winner doesn't do different things, they do things differently असे का म्हणतात याचा प्रत्यय १९८३ ला आला‌. पाकविरूद्ध सुनिल गावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पराभवाचा चांगलाच दणका बसला होता.  खरेतर ही एकादृष्टीने इष्टापत्तीच होती. विश्र्वचषक स्पर्धेच्या अवघे चार महिन्याआधी कपीलदेवच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली आणि इथेच भारतीय संघाच्या नियतीने गालात खुदकन हसणे सुरू केले होते. १९८३ ला भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता आणि अपेक्षेप्रमाणे आपण कसोटी मालिका २/० ने गमावली होती. मात्र एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात आगामी विश्वचषकात आपण नक्की काय करू शकतो याची किंचितशी कल्पना आलेली होती. गयानाच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बलाढ्य विंडीजला भारतीय संघाने त्यांच्याच मायभुमीत खडे चारले होते.

वास्तविकत: १९७५, १९७९ असे दोन्ही विश्र्वचषक जिंकत विंडीजचा संघ त्याकाळी ऐन भरारीत होता. त्यांचे फास्ट अँड फ्युरीअस गोलंदाज विरोधी फलंदाजांची खांडोळी करण्यात तरबेज होते तर त्यांचे निष्ठूर निर्दयी फलंदाज कोणत्याही गोलंदाजांची लिलया कत्तल करण्यास त्यांना अजिबात सोयरसुतक नव्हते. नाणेफेक कोण जिंकले, खेळपट्टी कशी आहे, गेमप्लान काय आहे याच्याशी त्या संघाला काहीही देणेघेणे नव्हते. क्रिकेट विश्र्वाचे अनभिषक्त सम्राट असल्याने विंडीज विरूद्धचा एक विजय भारतीय संघाला विशेषतः कपिलदेवला नवी उर्मी, नवी उर्जा देऊन गेला होता. विंडीजला आपण एकदा हरवू शकतो तर वारंवार का हरवू शकत नाही या अतृप्त लालसेची एकमेव शिदोरी विश्वचषकापुर्वी भारतीय संघाच्या पाठीशी होती.

क्रमश:,,,,,

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel