ओल्ड ट्रॅफोर्डला पहिल्या उपांत्य लढतीत इंग्लिश कर्णधार बॉब विलिसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामी जोडी ग्रॅहम फॉवलर आणि ख्रिस टॅवरेने डावाच्या प्रारंभी कोणतीही जोखीम न घेता आपली झुकझुक गाडी सुरू केली होती. मात्र ते दोघेही आपण कसोटी नव्हे तर एकदिवसीय सामना खेळतोय हे विसरून गेलेले होते. तर दुसरीकडे कपिलदेव आणि बलविंदरसिंग संधूने सलामी जोडीला चांगलेच खिळवून ठेवल्याने धावगती वर यायचे नाव घेत नव्हती. शेवटी धावगतीचे दडपण येताच ख्रिस टॅवरेचा संयम सुटला आणि बिन्नीने त्याला किरमाणीकडे झेल द्यायला भाग पाडले‌. विकेटची बोहणी होताच बिन्नीच्या आक्रमणाला धार आली आणि ग्रॅहम फॉवलरच्या बॅट आणि पॅडमधून चेंडूने वाट काढत स्टंटचा वेध घेतला होता.

८४ धावांत दोन बळी जातात डेव्हिड गॉवर आणि ऐलन लॅंबने आणखी पडझड न होऊ देता २५ षटकांत संघाचे शतक फळ्यावर लावले. मात्र हे दोघेही फलंदाज अजिबात लयात दिसत नव्हते. बिन्नी आणि मदनलाल यांच्या स्विंगने आणि दक्ष क्षेत्ररक्षणाने या दोघांच्या मुसक्या बांधल्या गेल्या होत्या. त्यातच मोहिंदर अमरनाथच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला गॉवरने चोच मारली आणि स्वस्तात आपला बळी घालवला. १०७ धावांत ३ मोहरे गळताच इंग्लंडचा संघ दडपणाखाली आला आणि मैदानात माईक गॅटींग अवतरला‌. मात्र गेल्या १४ षटकात एकही चौकार लागला नव्हता आणि गॅटींग, लॅंब सारख्या एक्स्प्रेस गोलंदाजी खेळण्याऱ्या फलंदाजांना मोहिंदरची मध्यमगती आणि किर्ती आझादची फिरकी चांगलीच सतावत होती. एकेका धावेसाठी झगडणारी ही जोडी अखेर लॅंब धावबाद होताच तुटली‌.

खरेतर भारतीय गोलंदाजांना वातावरणा एवढेच खेळपट्टी पण साथ देत होती. तुलनेत संथ आणि खेळपट्टीचा असमतोल बाऊंस, गोलंदाजांचा विकेट टू विकेट मारा, जोडीला प्रभावी क्षेत्ररक्षणाने इंग्लिश संघाचा श्र्वास कोंडलेला होता. महाबली गॅटींग आणि तडाखेबंद फलंदाज इयान बॉथम हतबल होऊन भारतीय गोलंदाजीचे जाळे तोडू पाहत होते आणि यातच मोहिंदरच्या ऑफ कटरने गॅटींगचा लेग स्टंप मुळासकट उपटून त्याला चालता केले होते. तर दुसरीकडे कपिलने बॉथमसाठी किर्ती आझादचा सापळा लावलेला होता. किर्तीच्या ऑफ स्पिनसाठी ऑफला केवळ ३ क्षेत्ररक्षक उभे करून बॉथमला ऑफला खेळायला मजबूर केले होते.  किर्तीच्या हळुवार चेंडूने जास्त उंची न घेता सरळ स्टंपवर आदळणे पसंत केले आणि इथेच बॉथमचा बळी जाताच इंग्लंडच्या पराभवाची पावती फाडली गेली‌ होती. १६० धावांत बॉथमसह ६ बळी जाताच इंग्लंडच्या फलंदाजीतील हवा गुल झाली आणि संपूर्ण संघ २१३ धावांत गुंडाळला गेला होता.

२५ जुनला लॉर्डला अंतिम सामना खेळण्यासाठी भारताला ६० षटकात २१४ धावा करायच्या होत्या आणि हे आव्हान भारताने आनंदाने स्विकारले होते. सलामीलाच सनी आणि श्रीकांतच्या ४६ धावांच्या भागीदारीने इंग्लंड संघाचे दडपण वाढवले होते. मात्र गावसकर वैयक्तिक २५ धावांवर असतांनाच पॉल ऐलॉटचा बळी ठरला. सनी पाठोपाठ श्रीकांतही बॉथमला टोलवण्याच्या प्रयत्नात बॉब विलिसला झेल देऊन बसला.  ५० धावांत सलामी जोडीला गु़ंडाळताच इंग्लंडला सामन्यात परतण्याचे वेध लागले होते मात्र खेळपट्टीवर मोहिंदर अमरनाथ आणि यशपाल शर्माने इंग्लंडची "डाळ शिजू दिली नाही". दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी दमदार ९२ धावांची भागीदारी करत सामना इंग्लंडकडे झुकणार नाही याची दक्षता घेतली होती.

धावसंख्या १४२ वर असतांना मोहिंदर अमरनाथ ४६ धावा काढून तंबूत परतला मात्र तोपर्यंत भारतीय संघ धोक्याच्या पातळीतून बाहेर आलेला होता. मोहिंदर बाद होताच संदिप पाटीलने मैदान सांभाळत इंग्लिश गोलंदाजांना "सळो की पळो करून सोडले". त्याने केवळ ३२ चेंडून ८ खणखणीत चौकारांसह अर्धशतक ठोकत इंग्लिश आक्रमणाची "हवा काढून टाकली होती". विजयासाठी केवळ ९ धावा बाकी असतांनाच यशपाल शर्मा ६१ धावा करून बाद झाला मात्र तोपर्यंत इंग्लंड संघाने मनोमन आपला पराभव स्विकारला होता. विजयासाठी १ धावा हवी असतांना उत्साही प्रेक्षकांनी मैदानाचा ताबा घेतला होता. अखेर इंग्लिश कर्णधार बॉब विलिसने सर्व क्षेत्ररक्षक ऑफला ठेवताच संदिप पाटीलने चौकार ठोकत अंतिम सामन्याचे तिकीट बुक केले.

सेमीफायनलला इंग्लंडच्या पराभवाला त्यांची कुर्मगती फलंदाजी कारणीभूत ठरली. डेव्हिड गॉवर, ऐलन लॅंब, माईक गॅटींग, इयान बॉथम सारखे धुरंधर फलंदाज संघात असतांना २१३ ही धावसंख्या त्या संघाला न्याय देणारी नक्कीच नव्हती. इंग्लिश फलंदाज एवढे दडपणाखाली खेळले की ६० षटकात केवळ १२ चौकार मारले गेले तर २१३ या धावसंख्येत मिस्टर एक्स्ट्रा म्हणजेच २९ अतिरिक्त धावांचा समावेश होता. भारतातर्फे कपिलने ३, बिन्नी आणि अमरनाथ प्रत्येकी २,२ बळी घेतले तर ऐलन लॅंब आणि इयान गुल्ड धावबाद झाले होते. याउलट कपिलचे कल्पक नेतृत्व, संघाचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, गोलंदाजांचा भेदक मारा, फलंदाजांच्या उपयुक्त खेळी या सर्वांचा सांघीक परिणामाने भारताने विजयाला गवसणी घातली होती.

क्रमशः,,,

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel