१९८३ च्या क्रिकेट विश्र्वचषकासाठी देशाच्या जवळपास ७५ कोटी लोकसंख्येतून १४ खेळाडू निवडण्यात आले होते. त्याकाळी क्रिकेट मुख्यत: मुंबई, दिल्ली सारख्या महानगरात रांगत असल्याने छोटं शहर अथवा गावखेड्यातून क्रिकेटपटू नसल्यात जमा होते. सोबतच बरेचदा आर्थिक परिस्थिती सक्षम असलेल्या घरातूनच किंवा राजे महाराजे सारख्यांचा यात वरचष्मा होता. ज्या  १४ खेळाडूंची निवड झाली त्यात मुंबईचे पाच तर दिल्लीच्या चार खेळाडूंचा समावेश होता. विशेषतः इंग्लंडचे वातावरण आणि झटपट क्रिकेट फारसे अंगवळणी न पडलेल्या भारतीय संघात पाच खंदे फलंदाज, सात अष्टपैलू खेळाडू, एक वेगवान गोलंदाज आणि यष्टीरक्षक सय्यद किरमाणीचा समावेश होता. चला तर मग आपण या खेळाडूंची एक धावती ओळख करून घेऊया.

१) कर्णधार कपिलदेव रामलाल निखंज

हरियाणा हरिकेन म्हणून नावाजलेला हा खेळाडू आपल्या समकालीन इयान बोथम, सर रिचर्ड हॅडली आणि इम्रानखान सारख्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूंच्या तुलनेत काकणभर सरसच होता. भारतीय निर्जिव, संथ खेळपट्ट्यांवर या पठ्ठ्याने रक्ताचे पाणी करत वेगवान गोलंदाजांची जमात जिवंत ठेवली. आऊटस्विंगर हे त्याच्या भात्यातील प्रमुख अस्त्र होते तर सहाव्या क्रमांकावर तडाखेबंद खेळी करण्यात निपुण होता. जबरदस्त फिटनेस हे त्याच्या यशाचे गमक होते‌. कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा कपिलने रिचर्ड हॅडलीचा सर्वात जास्त बळींचा विश्वविक्रम मोडला तेव्हा *हकिकत है ये ख्वाब नहीं कपिलका जवाब नहीं* हे पालुपद प्रचंड लोकप्रिय झाले होते.

२) सुनिल मनोहर गावसकर

लिटिल मास्टर, सनी या टोपणनावाने प्रख्यात असलेले सुनिल गावसकर तंत्रशुद्ध, आदर्श फलंदाजीचे विद्यापीठ होते. *वुई वॉंन्ट ब्लड* अशा आरोळ्या ठोकणाऱ्या विंडीजच्या बेभाण क्रिकेटरसिकांसमोर हेल्मेट न घालता सर्वकालीन सर्वश्रेष्ठ रक्तपिपासू गोलंदाजांना जे तोंड दिले, क्रिकेटजगतात त्याला आजही तोड नाही. गावसकर यांच्यावर एकदिवसीय सामन्यात कुर्मगती फलंदाजीचा अप्रिय शिक्का असला तरी १९८७ विश्वचषकात नागपूरला न्युझीलंडविरूद्ध आपल्या अंतिम एकदिवसीय सामन्यात त्यांनी किवी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत दणकेबाज शतक ठोकले होते. गावसकर यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच त्यांच्या एक चाहत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता यावरून त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येते.

३) क्रिष्णम्माचारी श्रीकांत

क्रिस श्रीकांत म्हणून ओळखला जाणारा तामिळनाडूचा हा सलामीचा फलंदाज पैसा वसूल खेळी करायचा. एका टोकाला गावसकर यांची मवाळ तर दुसरीकडे श्रीकांतची जहाल फलंदाजी बघायची मजा काही औरच होती. जवळपास ९० अंशाच्या कोनात वाकून फलंदाजी करणारा हा खेळाडू स्क्वेअर कटचा बादशहा होता. जोरदार फटका हानून वर मी काही केलेच नाही अशा थाटात स्क्वेअर लेगला शतपावली करून गोलंदाजांना खिजवणे हा त्याचा आवडता उद्योग होता. खरेतर श्रीकांत म्हणजे  संघात लाईव्ह वायर होता. विरोधी कोणीही कसो अथवा गोलंदाज कोणताही असो डावाच्या सुरवातीला सर्जिकल स्ट्राईक करत संघाला एक उत्तम सुरुवात करुन देत होता. श्रीकांत फलंदाजीला आला की सारखा सारखा सुर्याकडे बघायचा,,सारखं नाकाला हात लावायचा, स्टान्सच्या वेळी पुढचं कोपर अचानक दुमडायचा,,,खुप मजा वाटायची त्याची फलंदाजी बघतांना.

४) संदिप मधुसूदन पाटील

मध्यफळीतला आक्रमक फलंदाज म्हणून संदिप पाटीलचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मुंबईकर, मनाचा राजा,वागण्यात बिनधास्त असलेल्या या खेळाडूला सांभाळणे कर्णधारासाठी अवघड असायचे. यांचेच मोस्ट अपडेटेड व्हर्जन आपण सध्याच्या विराट कोहलीमध्ये काही अंशी बघू शकतो.

५) मोहिंदर अमरनाथ भारद्वाज 

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संघाचे प्रथम कर्णधार असलेले लाला अमरनाथ यांचे सुपुत्र असलेले मोहिंदर अमरनाथ जिमी या टोपणनावाने प्रसिद्ध होते. मध्यफळीतील अत्यंत उपयुक्त आणि शानदार फलंदाज असलेला हा खेळाडू आपल्या चमत्कारिक गोलंदाजीने संघाला तारुन न्यायचा. काहीसा वागण्यात आपले वेगळेपण जपणारा हा खेळाडू निवड समितीला जोकर म्हणून हिनवण्यात मागेपुढे पाहत नव्हता‌‌. मात्र हॅंडल दी बॉल आणि एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षणात बाधा आणल्यामुळे बाद होणारा हा एकमेव खेळाडू आहे. करिअरमध्ये प्रचंड चढ-उतार पाहिलेला हा खेळाडू *कमबॅक किंग* म्हणून ओळखला जायचा. मोहिंदर अमरनाथ यांच्या गोलंदाजीची शैली आपण काही अंशी सचिनच्या गोलंदाजीत पाहू शकतो. उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध मोहिंदर अमरनाथ यांनी डावाखुरा शैलीदार फलंदाज डेव्हीड गॉवर आणि माईक गॅटींग यांचे महत्त्वपूर्ण बळी टिपत इंग्लंडची घसरगुंडी सुरू केली होती. मोहिंदर अमरनाथ गोलंदाजी करतांना अर्धा रस्ता डुलत डुलत यायचा आणि शेवटी एकदम जोरात रनअप संपवायचा.

६) यशपाल शर्मा

पंजाबकडून खेळणारा हा खेळाडू मध्यफळीत पाय रोवून उभा रहायचा. वादळी व्यक्तीमत्वाच्या यशपाल शर्मा मोठ्या खेळी लिलया खेळायचा. विशेषतः ८३ विश्वचषकात विंडीजविरूद्ध पहिल्याच सामन्यात ८९ तर उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध ६१ धावांच्या खेळी महत्त्वपूर्ण मानल्या जातात.

७) दिलीप बळवंत वेंगसरकर

कर्नल या टोपणनावाने प्रसिद्ध हा मुंबईकर खेळाडू मध्यफळीचा आधारस्तंभ होता. क्रिकेटच्या पंढरीत अर्थातच लॉर्डस मैदानावर लागोपाठ तिन कसोटी शतके ठोकण्याचा अनोखा पराक्रम यांच्या नावावर आहे. 

८) रविशंकर शास्त्री

उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणारा हा मुंबईकर खेळाडू ८३ विश्वचषकात फारसा गाजला नाही परंतु प्रथम श्रेणी सामन्यात बडोद्याच्या तिलकराजच्या एका षटकात सहा षटकार मारण्याचा भिमपराक्रम रवी शास्त्रींनी करून दाखवला होता. ऑस्ट्रेलियात १९८५ ला  झालेल्या बेन्सन अॅड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट स्पर्धेत रवी शास्त्रीला मॅन ऑफ दी सिरीजचा पुरस्कार आणि ऑडी कार बक्षिस मिळाली होती. ती गाडी रविदास नावाच्या जहाजातून भारतात आणली गेली होती. रवी शास्त्री मुळे ऑडी हे नाव त्याकाळातही परिचित झाले होते.

९) किर्तीवर्धन भागवत झा आझाद

आक्रमक फलंदाज आणि ऑफब्रेक गोलंदाजी करणारा हा खेळाडू एक उत्तम अष्टपैलू खेळाडू होता. 

१०) रॉजर माइकल बिन्नी

८३ विश्वचषकात सर्वाधिक १८ बळी रॉजर बिन्नी यांच्या नावे आहेत. इंग्लंडच्या वातावरणाचा लाभ घेत आपल्या स्विंग गोलंदाजीने फलंदाजांना बिन्नीने चांगलेच नाकी नऊ आणले होते. उत्तम गोलंदाजी सोबतच तळाला छोट्या भागीदारी आणि उपयुक्त खेळी करण्यात बिन्नीचा मोठा वाटा असायचा.

११) सय्यद मुजताब हुसेन किरमाणी

उत्कृष्ट यष्टिरक्षण आणि जबाबदार फलंदाज ही यांची ओळख होती. ८३ विश्वचषकात यष्टिमागे १३ झेल आणि एका खेळाडूला यष्टिचित करत आपली भूमिका योग्यरित्या पार पाडली. मुख्य म्हणजे झिम्बाब्वे विरूद्धच्या *करा अथवा मरा* सामन्यात कर्णधार कपिलदेव सोबत नाबाद १२६ धावांची भागीदारी विश्र्वचषक जिंकण्याच्या मार्गातले पहिले पाऊल म्हणून ओळखले जाते.

१२) बलविंदरसिंग संधू

मुंबईचा हा खेळाडू मध्यमगती गोलंदाजी आणि तळाला चांगली फलंदाजी करायचा. बलविंदर संधू सुद्धा इंग्लिश वातावरणाचा फायदा घेत आपल्या स्विंग गोलंदाजीने संघाला बळी मिळवून दिले. विशेषतः अंतिम सामन्यात आपल्या इनस्विंगरने  गॉर्डन ग्रिनिजचा त्रिफळा उडवत भारतीय संघाला विकेटची बोहनी करून दिली होती. 

१३) मदनलाल उधौराम शर्मा

दिल्लीचा हा अष्टपैलू खेळाडू मध्यमगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करायचा. कपिलदेव, रॉजर बिन्नी, मोहिंदर अमरनाथ आणि मदनलाल या चौकडीने आपल्या गोलंदाजीच्या बळावर विश्र्वचषक भारताच्या झोळीत टाकला होता. विशेषतः अंतिम सामन्यात व्हिव्ह रिचर्डसचा अनमोल बळी टिपत मदनलालने भारतीय विजयाचे प्रवेशद्वार उघडलेले होते. व्हिव्ह रिचर्डस सारखे महान खेळाडू आपली विकेट देत नसतात तर वाट्टेल त्या भावाने त्यांची विकेट घ्यावी लागते याची उत्तम जाण मदनलाल यांना होती. म्हणूनच रिचर्डस आक्रमण करत असतांनासुद्धा मदनलाल यांनी हट्टाने कपिलदेव कडून गोलंदाजी हिसकून घेतली होती ‌

१४) सुनिल वासन

इंग्लंडला विश्वचषकासाठी गेलेल्या संघात कोणताही सामना न खेळलेला हा दिल्लीकर खेळाडू डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करायचा.

क्रमश:,,,,

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel