ऍडमिशननंतर आम्ही थेट गजानन महाराजांचा मंदिरात गेलो. समान असल्याने रुम करायची होती पण विचारल्यावर कळलं की सगळ्या रूमा आधीच बुक झाल्यात.
'आता करायचं काय?'
असं बाबांनी विचारल्यावर ते म्हणाले की तुम्ही तुमचं सामान लॉकरमध्ये ठेऊ शकता म्हणजे सुरक्षित राहील आणि काउंटर वरून गादी-चादर घेऊन मंदिराच्या परिसरात विश्रांती करू शकता. मी लॉकरमध्ये सामान ठेवायला गेली आणि बाबा चादर-गादी आणायला. थकले असल्याने झोप चांगली लागून सकाळी पक्षांच्या किलबिलाहटाने जाग आला. आम्ही आंघोळ-तयारी करून महाराजांचं दर्शन घेतलं. उगाच जाण-येणं होईल म्हणून आईने सर्व गरजेचं सामान आधीच बॅगमध्ये दिलेलं होतं. आम्ही दोघंही नंतर ऑटोने कॉलेजला पोहोचलो. बाबांनी होस्टेलला जाण्याचा रस्ता गार्ड काकांना विचारला. गार्ड ने सांगितलं,
'येथून तुम्ही सरळ जा तुम्हाला मुलींचे वसतिगृह लिहिलेला एक सिमेंटचा बांधलेला पॉईंटर दिसेल'. धन्यवाद म्हणून आम्ही गार्डच्या म्हणण्याप्रमाणे होस्टेलच्या दिशेने निघालो. तिथे मुलींचे एकूण तीन होस्टेल होते. नवीन येणाऱ्या विद्यार्थीनींसाठी 'संत जनाबाई' होस्टेल होतं. मी तिथल्या वॉर्डन मॅडमला विचारलं,
'मॅडम माझी रुम कोणती आहे?'
मॅडमने मला होस्टेल रिसिप्ट मागितली, मी दाखवली आणि मॅडमने रजिस्टरमध्ये नोंद करत मला सांगितलं,
'तुला रूम नंबर २११ अलॉट झाली आहे आणि होस्टेलच्या आतमध्ये जेंट्स अलाउ नाही आहे'.
मी 'ओके' म्हटलं. माझ्या जीवनातील पहिलं होस्टेल संत जनाबाई आणि २११ ही माझी पहिली रुम. मॅडमच्या 'gents not allowed' च्या सूचनेप्रमाणे मी बाबांना होस्टेलच्या खालीच थांबायला लावलं. मी माझं भारी सामान कसंतरी वर नेलं पण रुम नंबर मला भेटेना. मी दुसऱ्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर आणि तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर असा माझा आउट करणीचा खेळ सुरु होता पण रुम काही आउट होईना. आता विचारू कोणाला हा विचार करत असताना कारण होस्टेल म्हटलं की सगळ्या रुमा सारख्या. मग मी थोडासा उघडा असलेला दरवाजा हाताने ठोकला आणि विचारलं,
'मी माझं सामान आत ठेऊ शकते का? कारण मला माझी रुमच दिसत नाही आहे.'
मी सामान आत ठेवलं तिने मला रुमही दाखवली पण माझी रूम बंद होती. ती म्हणाली तुझी रुममेट येतपर्यंत तुझं सामान माझ्याकडे ठेऊ शकते. मी लगेच खाली गेली आणि वॉर्डन मॅडमला, रुमला लॉक आहे म्हणून सांगितलं. वॉर्डन मॅडम म्हणाल्या,
'कॉलेजला गेली असेल कॉलेज सुटलं की येईल संध्याकाळी'. मी मनात म्हटलं आता तर फक्त दुपार झाली आजून खूप वेळ वाट पहावी लागणार.
मी खाली बाबांना भेटली, त्यांना सगळी हकीकत सांगितली बाबा म्हणाले,
'काही हरकत नाही नंतर ठेवशील बाळा. अ गं ऐक माझी आता २:३० ची गीतांजली एक्सप्रेस आहे मला निघावं लागणार '.
बाबांच्या या शब्दांमुळे माझ्या मनात-डोक्यात विचारांचे वादळ सुरु झाले. इतक्या लाडात वाढलेली मी आई-बाबांपासून कधीच दूर गेली नाही. आज त्यांच्यापासून इतकं लांब राहणं माझ्यासाठी फार अवघड होतं. खरंतर आई-बाबांसाठी पण ते अवघडच होतं. आता मला रोज आई-बाबा दिसणार नाही, आईच्या हातचं ते चविष्ट जेवण, तिने रोज सकाळी उठण्यासाठी जोरात मारलेली हाक, बाबांसोबत बसून पेपर वाचत शब्दकोश सोडवणे. आई-वडिलांचं प्रेमाचं हे अतूट धाग्याने गुंफलेलं नातं मला दुरावायचं नव्हतं तर ते स्वतःच भविष्य घडवत सावरायचं होतं. माझ्या विचारांचे चक्र बाबांना समजत होते त्यांच्याही डोक्यात हेच सुरु होतं. मी रडत होती बाबांच्याही डोळ्यात अश्रू दाटून आलेले होते. पण बाबांनी स्वतःला सावरत, खंबीर होऊन मला खंबीर बनवण्यासाठी म्हणाले,
'अगं उदयाला तुझं कॉलेज आहे, पहिला दिवस आहे न, मग असं रडून कसं काय चालणार बाळा. तसंही दादू, मी , तुझी आई पाच दिवसानंतर पुन्हा येऊ तुला भेटायला मग तर झालं. हस आता'
मी हो म्हणत धीर धरला, मनाला सावरलं. बाबा येतो म्हणून निघून गेले. मी होस्टेल गार्डनमध्ये एकटीच बसलेली होती. संध्याकाळ झाली, कॉलेज सुटलं. मुली होस्टेलच्या दिशेने येताना दिसल्या. तशीच मी माझ्या रुम पुढे सामान घेऊन उभी होती. माझी रुममेट आली तिने दार उघडलं मी सगळं सामान आतमध्ये व्यवस्थित लावलं.
आता झोपणार तितक्यात आईचा फोन आला. आईने विचारलं,
'रुम मिळाली न, सामान नीट लावलस की नाही, जेवण केलास न' वगैरे वगैरे. सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊन मी म्हटलं,
'हो गं आई माझा होस्टेलमध्ये प्रवेश अगदी सुखद झालाय तू काळजी नको करू '. अश्याप्रकारे माझा हा होस्टेलचा प्रवास...!!