इंजिनीरिंग म्हटलं की एकूण ४ वर्ष आणि एका वर्षाला २ सत्र म्हणजे ४ वर्षात एकूण ८ सत्र ज्याला सेमिस्टर असं इंग्रजीत म्हटल्या जातं. प्रत्येक सेमिस्टरला वेगवेगळे विषय राहायचे निदान ५-६ विषय तरी एका सेमिस्टरला असायचे. नेहमीचे लेक्चर करून मुले कंटाळयाची तर कधी मजा असायची. प्रॅक्टिकलमध्ये कडक शिक्षक असले की मुले प्रमाणिकतेने प्रॅक्टिकल करायचे नाहीतर कधी अर्धवट करून, न करताच,' हो सर पूर्ण केलं' म्हणून खोटं बोलायचे.
कंटाळा आला की बंक बंक म्हणून ओरडणारी मुलं बंक मिळाला की कॉलेजच्या बागेत गप्पा मारत, ग्राउंडवर क्रिकेट खेळतांना दिसायचे, बाहेरच्या चहाच्या टपरीवर चहा पीत मजा करायचे. मधल्या २ युनिट टेस्टचं टेन्शन गेलं की मग गंमत सुरु व्हायची ती सबमीशनची. assignment सबमिट करणे, file report, project report सबमिट करणे असा कार्यक्रम सुरु व्हायचा. टॉपर्सची फाइल नेहमीच कंप्लिट असायची त्यामुळे सबमिशनच्या आदल्या दिवशी ती फाइल कोणा एकाने मागून आणायची आणि सगळे कॉपी करायचे. दुसऱ्या दिवशी टॉपर्सच्या आधीच सरांकडून फाइल चेक करायची. बिचारा टॉपर फाइल शोधत फिरायचा. चेक करताना सरच त्याला रागवायचे कुणाचं कॉपी केलं म्हणून,'सर सगळ्यांनीच माझं बघून लिहलं' म्हटल्यावर सरांना त्याच्यावर विश्वास बसत नसे. हे दिवस आठवले की वाटतं किती पागल होतो आपण. हे दिवस कसे बसे निघाले की सर्वांना धक्का बसायचा तो फायनल एक्साम चा. १५ दिवसांच्या मिळालेल्या सुट्टीत 1st yr, 2nd yr, 3rd yr आणि 4th yr या सगळ्यांची ग्रंथालयात गर्दी असायची. नेहमी कॉलेजला दांडी मारणारे, होस्टेलला, गार्डनमध्ये 'हे थोडंस समजून सांग ' म्हणून फिरतांना दिसायचे. या दिवसात काहीजण स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्येही अभ्यास करताना दिसत असे. काहीजण upsc सारख्या मोठ्या परीक्षेची तयारी करण्यासारखे जिद्दीने अभ्यास करताना दिसत तर काहीजण परीक्षा नसल्यासारखे काळजी न करता इकडे तिकडे सैरावैरा फिरताना दिसत असे.
'किती अभ्यास करशील या वेळी टॉपर तूच येशील वाटतं' असे म्हणणारे रिझल्ट लागल्यावर स्वतःच टॉपर असायचे. एक्साम मध्ये कुठून तरी २ लाइन माहित पडल्या की २ पेजेसचं विश्लेषण लिहिण्याचं टॅलेंट आमच्या इंजिनीअर्स मध्ये होतं. पेपरला उत्तर सांगायची सुद्धा बेट लागायची. जबरदस्तीने टॉपर्स कडून पार्टी घायचे आणि कुणी नुसतं पास झालं म्हणून सगळ्यांना पार्टी द्यायचेत. परीक्षेनंतर १५-२० दिवसांच्या सुट्या लागायच्या आणि त्यानंतर पुन्हा एक नवं सेमिस्टर नव्याने सुरु व्हायचं...!!