आठवणीतले काही क्षण आठवले की नकळत आनंद देऊन जातात ते आठवणींचे क्षण म्हणजे पुणेला गेलेली ४ दिवसांची सहल. हे दिवस आठवले की आठवते पहिल्याच दिवशी कितीतरी वेळ वाट पाहायला लावणारी ती बस. त्याच बस मधून पुढे प्रवास केला तो आळंदीला, ज्ञानेश्वर महारांजांचे समाधी स्थान,भक्तांच्या दर्शनासाठी लाभलेली अशी ही पावन पुण्यभूमी. पहिल्या दिवशी 'गजानन महाराज संस्थान आळंदी' प्रवास केल्यानंतर दुसऱ्यादिवशी निघालो ते पुणेतील कंपनींना भेट द्यायला. पुणेतील प्रवास हा अगदी रोमांचक होता, खिडकीतून बाहेर डोकावताना बांधलेली ती पहाडं, तो निसर्ग निराळा आणि फुलणारा होता. जिकडे तिकडे धुकच-धुकं आणि बसमधून आत शिरणारा, झुळझुळणारा थंडगार वारा. पुणेतील मोठमोठी कंपनी आम्ही बघितल्या Persistent, LTI, E-Zest इत्यादी. त्यातल्या एका कंपनीला भेट दिली ती E-Zest. प्रवासातील तिसरा दिवस हा कधी न विसरणारा नेहमी आठवणीत राहणारा होता. त्या दिवशी आम्हाला आमच्या स्वप्नातला दिवस सत्यात उतरल्यासारखा वाटला. ते स्वप्नातलं जग म्हणजे Imagica. थीम पार्क, वॉटर पार्क,स्नो पार्क असं सगळे पार्क एकत्रीत असणारा हा पुणेमधील Imagica पार्क होता. नायट्रो रोलर कोस्टर, डीप स्पेस, डेअर टू ड्रॉप, मिस्टर इंडिया मधील मस्ती, स्नो पार्क मधला आनंद, निसर्गातील ती पहाडं, झाडेवेलींची ती हिरवळ, पाण्याचा धबधबा आणि आता अस्तित्वात नसणारे प्राणी म्हणजे डायनॉसॉर हे दर्शवणारे जुरासिक पार्क. अशा या Imagica मध्ये कितीतरी दिवसानंतर सगळ्यांच लहानपण उजळून आलं.
शेवटच्या दिवसाची भेट ही पुणेमधील "रामकृष्ण" कंपनीची. कंपनीचं नावं हे देवाचं नाव,आणि येथील काम करणारी माणसं देखील धार्मिक विचारांची. म्हणतात ना, "विज्ञानाला आध्यात्माची जोड असावी" तेथील मॅडम-सरांनी आम्हाला नोकरीबद्दल, कंपानीबद्दल माहिती दिली, त्यांनी अनुभवलेले अनुभव सांगितले. एवढच नाहीतर "खरंतर आपण काय शिकतो, आणि कंपनीमध्ये नेमकं काय घडतं" यातला फरक देखील सांगितला. त्यामधील एक भारदस्त व्यक्तीमत्त्व, निर्मळ स्वभाव, चेहऱ्यावर गोड हास्य असणारे, ज्यांच्या गोड वाणीने श्रोत्यांचे मन जिंकून घेणारे वक्ता म्हणजे "योगेश्वर कस्तुरे" सर.
ट्रेनिंग म्हणजे नेमकं काय? हे सांगतांना त्यांनी एक साधं उदाहरण दिलं. एक चोर असतो त्याला त्याच्या मुलाला ट्रेनिंग द्यायची असते. हे ट्रेंनिंग देणार तरी कसं? हा प्रश्न त्या अनुभवी चोराला पडतो. तो त्याच्या मुलाला म्हणतो, "चल आता ट्रेनिंगला". चोर त्याला राजवाड्यात घेऊन जातो. त्याच्यासाठी ही चोरी म्हणजे "एखाद्या मोठया कंपनीमधील ट्रेनिंग" "ट्रेनिंगमध्ये पस झालं तर टिकणार नाहीतर जाणार". राजवाड्यात सगळे रात्रीला निवांतं झोपलेले असतांना, हे दोघे हळूच, चाहूल न लागता, नजर चुकवून राजवाड्याच्या खजिन्याजवळ पोहोचले. सगळं सामान पोत्यात भरून झाल्यानंतर, चोर आपल्या मुलाला खाली केलेलं कपाट पुन्हा उघडायला लावतो आणि म्हणतो,"बघ काही राहाल तर नाही ना?". जसा हा डोकावुन कपाटाच्या आत पाहतो तसाच चोर त्याला आतमध्ये ढकलून कापाटाचं दार बाहेरून लावतो. त्या खोलीतील एक भांड जोरात खाली आपटून पळून जातो. त्या भांड्याच्या आवाजाने राजवाड्यातील सर्वे जागे झाले. चोराच्या मुलासाठी "जीवनातला सर्वात मोठा धोका!. आपल्याच बाबाने दिलेला." त्या क्षणी चोराच्या मुलाला त्याचाच बाबांवर खूप राग आला तो मनात म्हणाला, " एकटच पळून जायचा होतं तर शांतपणे जायचं न ,सर्वांना जागे करून कश्याला जायचं". त्याला बाहेरुन आवाज आला.."चोरी झाली..चोरी झाली". राजाच्या आदेशानुसार जिकडेतिकडे शोध सुरु झाला. त्यावेळी चोराच्या मुलाच्या डोक्यात फक्त आणि फक्त एकच विचार होता,"कापाटाच दार उघडताच झपाट्याने पळायचं". त्यातल्या एकाने कपाटाच दार उघडलं, दार उघडताच चोर एकदम फुर्रर्र..सर्वांना आश्चर्य वाटलं, बाहेरून बंद असणाऱ्या कपाट मधून चोर..चोराचा मुलगा जाम घाबरलेला होता, मागे त्याला पकडण्यासाठी शिपाई लागले होते. त्याला एक समोर विहीर दिसली. स्वतःची सुटका करण्यासाठी त्याने विहिरीजवळचा एक मोठा दगड विहिरीत जोरात फेकला. शिपायाला वाटलं चोर विहिरीत कुदला. त्याची सुटका झाली. तो घरी पोहोचला. जितक्या रागाने त्याने घरचा दार वाजवला तेवढ्याच शांततेने त्याच्या बाबाने दार उघडला. तो त्याच्या बाबांवर फार चिडला, रागावला होता. तो शांत झाल्यानंतर त्याने त्याचा मुलाला समजावून सांगितलं, तो हसत म्हणाला,"तू ट्रेनिंग मध्ये पास झालास, आता तू खरा चोर झाला".
या मजेदार उदाहरणातून "ट्रेनिंग हे कधीच पूर्ण होत नसते, ते सतत चालु असते. मग ते ट्रेनिंग मिळतं, किंवा आपण घेतो. जीवनातील प्रत्येक ट्रेनिंग हे वेगळी असते. जो पर्यंत कुठलं ट्रेनिंग मिळत नाही तो पर्यंत कुठलीही गोस्ट आपण स्वतः अनुभवत नाही. प्रत्येकाच ध्येय वेगळं असतं, जीवनशैली वेगळी असते, वेगवेगळ्या इच्छा-अपेक्षा असतात. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी स्वतः ला एक्स्पर्ट बनवा, स्वतः ला एक्सप्लोर करन शिका. कुठलंही काम करतांना ते "सबमिशन मोड" मध्ये नाही, तर ते "एक्सप्लोरेशन मोड " मध्ये करा, मग तो अभ्यास जरी असला तरी चालेल. मग जीवनातील कुठलंही ट्रेनिंग तुम्ही सहजतेने पार करू शकाल." हा संदेश त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला.
या कंपनीला भेट दिल्यानंतर कॉलेजची पाखरं, कॉलेजच्या घरट्यात पुन्हा परत आली.
मनाच्या कोपऱ्यात आठवण म्हणून खोलवर रुजून बसणारे हे पुण्यातील चार दिवस म्हणजे आमच्यासाठी अविस्मरणीय दिवस!
पुन्हा पुणेमधील धुकं पहावी, असं वाटतं या डोळ्यांना!
खिडकीतून पुन्हा हळुवार वाऱ्याचा स्पर्श व्हावा, असं वाटतं या मनाला!
वाटतं पुन्हा अनुभवावा, या हिरव्यागार निसर्गाला..!!