यावेळी आम्ही 'पोलंड-स्लोव्हाकिया-हंगेरी' असा युरोप मधील तीन देशांचा दौरा आखला होता. मुंबईतून डायरेक्ट पोलंड फ्लाईट न मिळाल्याने अगोदर मुंबई ते दुबई आणि नंतर दुबई ते वॉर्साव (पोलंड) असा एकूण अकरा-बारा तासांचा प्रवास होता. मुंबईतून रात्रीचा प्रवास असल्याने विमानतळ सोडल्यानंतर लगेचच बाहेर जग सगळं अंधारात बुडून गेलं. दुबईत पोहोचो तर सकाळ झालेली होती. पुढची फ्लाईट लगेचच असल्याने पळत पळतच आम्ही त्या टर्मिनलला पोहोचलो. आतल्या आतच ट्रान्सफर असल्याने इमिग्रेशन प्रक्रिया तशी एकदमच सोपी झाली होती. लवकरच विमानात प्रवेश करत आम्ही आपापल्या सीट पकडल्या. मी अगोदरच विंडो सीट रिझर्व्ह करून ठेवली होती. दुबईहून निघालेलं विमान जसजसे पश्चिमेकडे जाऊ लागले तसतसे खाली दिसणाऱ्या करड्या, विराण टेकड्या मागे पडत होत्या. बराचवेळ या वैराण भागावरून प्रवास चालू होता, सौदी अरेबिया, इराक, सिरिया, टर्की, हा बराचसा भाग विमानातून करडा, रखरखीत दिसतो. विमानातील प्रत्येक सीटसमोर असलेल्या स्क्रीनवर हा प्रवास आपल्याला दिसत असतो. विमानाच्या छोट्या खिडकीतून मधेच कुठे एखादे शहर दिसत होते. आकाश निरभ्र असल्याने खालचा परिसर एवढ्या उंचीवरूनही भकास, विराण असलेला दिसत होता. पुढे पुढे हे दृश्य बदलून टेकड्यांच्या उंच भागावर साठलेले बर्फ दिसू लागले. आणि काही वेळाने सर्व काही धुक्यात हरवून गेले.            

एक लांबचा वळसा घेत आमचे विमान पोलंडची राजधानी असलेल्या 'वर्साव' च्या चॉपिन एअरपोर्टवर उतरले. सर्व साहित्य घेऊन खाली उतरलो. बाहेर मस्तपैकी पांढरे भुरभुरीत बर्फ पडत होते. माझा तर बर्फातील हा पहिलाच अनुभ होता, त्यामुळे कधी एकदा ते बर्फ अंगावर घेतोय असे झाले होते. लगेज बेल्टवरून सर्वजण आपापले साहित्य घेत होते. विमानतळ तसे फार मोठे नव्हते. आम्ही दोन-तीन जण सहज बाहेर आलो आणि बर्फवृष्टी काय असते याची हलकीशी चुणूक पाहायला मिळाली. लगेचच पुन्हा आत गेलो. त्या क्षणभरात अंगाला भिडणाऱ्या थंडीने पुढील आव्हानाची कल्पना आली. आपापल्या बॅगांमधून आवश्यक ते कपडे घेत सर्वांनी आतून थर्मल बॉडी वॉर्मर, त्यावर शर्ट, त्यावरून जर्किन्स, हातमोजे, डोक्याला कान टोपी असा पेहराव केला..... सर्वजण आल्याची खात्री करून घेत आम्ही बाहेर आलो. बाहेर आमच्या साठी स्थानिक टुरिस्ट बस उभी होती. अपटुडेट पांढऱ्या शुभ्र पोशाखातील तिचा ड्रायव्हर 'डॅमियन' हा ड्राइव्हर वाटण्याऐवजी बॉलिवूडच्या सिनेमातील हिरो वाटत होता.      

त्या थंडगार बर्फाळ वातावरणातून आमचा प्रवास सुरु झाला. पोलंडची स्थानिक प्रमाणवेळ आपल्यापेक्षा ३.३० तास मागे. त्यामुळे आम्ही तिथे पोहोचलो तेंव्हा दुपार झालेली होती. कडकडून भुकाही लागल्या होत्या. पहिले गाठले ते एक इंडिअन रेस्टोरंट. आपल्या गुजराथच्या जयेश भाईने पोलंडच्या भूमीतआपले बस्तान बसवलेलं आहे, छानसे इंडियन रेस्टोरंट उभे केलेले आहे.. मस्त जेवण मिळाले. तिथून पुढे टूर मॅनेजरने गायडेड सिटी टूर ठेवली होती. पण लोकल गाईड अजून यायचा होता. मग आमच्या बसने आम्हाला डाऊन टाऊन मधील एका म्युझियम जवळ नेऊन सोडले. बर्फातून चालतच आम्ही त्या म्युझियम मध्ये गेलो. पोलंडमधील सुप्रसिद्ध पियानो वादक 'शॉपेन' याच्या स्म्र्तीप्रित्यर्थ हे म्युझियम बांधलेले आहे. पण मुळात आमचाच काय, सर्व भारतीयांचाच म्युझिअम च्या बाबतीतला तोकडा प्रतिसाद पाहता, आणि त्यातही अनोळखी व्यक्तीच्या जीवन कहाणीत इंटरेस्ट नसल्याने लवकरच तिथून बाहेर पडलो. तोपर्यंत बाहेर आमचा लोकल टूर गाईड आलेला होता. आणि इथून आमची सिटी टूर सुरु झाली. जाता जाता गाईड वॉर्साव शहराची माहिती देत होता. आणि आम्ही त्या शहराचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत होतो. वॉर्साव चा थोडासा इतिहास जर बघितला तर, दुसऱ्या महायुद्धात सर्वात जास्त हानी पोहोचलेले हे शहर. युद्धात हे शहर ९०% नष्ट झाले होते. जर्मनीच्या पराभवानंतर मित्र राष्ट्रांनी युद्धात जिंकलेल्या देशांचे आपल्या सोयीने वाटे केले. आणि त्यात हा पोलंड सोव्हियत रशियाच्या वाट्याला आला होता. रशियाने पोलंडवर फक्त राज्य केले नाही तर पोलंडच्याच जनतेला हाताशी धरत या संपूर्ण शहराची नव्याने उभारणी केली. पडलेल्या इमारती मधील एकही तुकडा वाया न घालवता तेच मटेरियल वापरून शहर उभारणीला सुरुवात केली. अगदी अलीकडे म्हणजे १९९० साली रशियाने पोलंड सोडला आणि पोलिश जनता स्वतंत्र झाली. आणि आज जर ते शहर बघितले तर, तिथेच आपल्याला कळेल कि आजही आपण त्या जगाच्या किमान पन्नास वर्षे मागे आहोत. वर्सावमधील साधारण एकसारख्या दिसणाऱ्या आणि वास्तुशास्त्राचा बेजोड नमुना असलेल्या शेकडो इमारती, ऐसपैस रस्ते, शहर भर फिरणारी ट्राम व मेट्रो, आणि सर्वात महत्वाची म्हणजे डोळ्यात भरेल अशी स्वच्छता. कौतुक करावे तेव्हढे थोडेच.

वॉर्सावमधील सर्वात आवडलेला आणि कायम आठवणीत राहील असा अनुभव म्हणजे त्या बर्फाळलेल्या जमिनीवरून केलेला एक तासाचा पायी प्रवास. गाडीने आम्हाला एका स्पॉटवर सोडले, तिथून पुढे नो व्हेहिकल झोन होता. वॉर्साव मधील हा मुख्य चौक. हलके बर्फ पडत होते, थंडगार वारे वाहत होते, अन त्यातून चालत जाणे एकाचवेळी खूप आनंद दायी आणि त्रासदायकही होते. फोटो काढायला म्हणून एखादा मिनिट हातमोजे काढले तरी, हात आहेत कि नाहीत असे वाटावे अशी थंडी. आणि अशात त्या संपूर्ण परिसराला चक्कर मारत बस ज्या दुसऱ्या टोकाला थांबली होती तिथे जायचे होते. खूप मजा आली. तापमान मायनस सहा-सात डिग्री. गाईड आम्हाला त्या रस्त्यावरील काही ऐतेहासिक इमारतींविषयी माहिती देत होता, कुठे कुठे आत नेऊनही दाखवत होता, त्यातच केंव्हातरी आमच्या ग्रुप मधून मागे रेंगाळलेले दोघे जण (नामोल्लेख मुद्दाम करत नाही) हरवले. बाकीचे पुढे आलो, हे कुठे सापडेनात. तिथे आवर्जून फक्त पोलिश भाषाच बोलली जाते, इंग्लिश येत असली तरी कोणी बोलणार नाही. त्यामुळे काय विचारायचे हा प्रश्न. गाडीने तीन-चार चकरा मारल्यानंतर एकेठिकणी हे दोघे आम्हाला सापडले. तेही बसला शोधत फिरत होते. असो.

उरलेली सिटी टूर करत, वेळेअभावी तिथल्या एका बागेत भेट देणे कॅन्सल करत आम्ही पुन्हा रात्रीचे जेवण करूनच 'हॉटेल हिल्टन गार्डन इन'  या पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रवेश केला. हो मुद्दाम सांगायचे म्हणजे तिथल्या कुठल्याही ठिकाणी हमाल दिसला नाही, तसेच हॉटेल वर सुद्धा सामान रूम मध्ये घेऊन जायला कुणीही नसते, आपला भार आपला आपणच वाहायचा असतो. सातारा सोडल्यानंतर ४० तासांनी बेडवर अंग टेकले होते. शरीर थकले असले तरी जे काही बघितले ते बघून मन मात्र टवटवीत प्रसन्न झाले होते............ असा संपला पहिला दिवस. बाकी पुढील भागात.

अनिल दातीर (सातारा)
(९४२०४८७४१०.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel