'वर्साव' ला गुड बाय म्हणत आम्ही तिथून ३०० किलोमीटर वर असलेल्या 'क्रॅकोव' या पोलंड मधील दुसऱ्या मोठ्या शहराकडे प्रयाण केले. जातानाचा प्रवास अर्थातच नयनरम्य होता. मध्ये मध्ये छोटी पण टुमदार खेडी येत जात होती. आवर्जून सांगावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे, युरोप मध्ये कुठल्या गोष्टीची वानवा असेल तर ती माणसांची. गावेच्या गावे पास व्हायची पण माणसे दिसायचीच नाहीत. ऐसपैस रस्ते, टुमदार बंगले, प्रत्येक पार्किंग लॉट भारी भारी गाड्यांनी भरलेला, पण कुठेतरी एखादा दुसरा माणूस चालताना दिसायचा.

'क्रॅकोव' हे एक सुंदर शहर. या क्रॅकोवचा इतिहास म्हणजे, दुसरे महायुद्ध सुरु होताच अगदी सुरुवातीच्या काळातच जर्मनीने पोलंड वर कब्जा केला आणि क्रॅकोव जर्मन सेनेच्या अत्याचारी हातात गेले. पण जेंव्हा जर्मनीचा पराभव व्हायला लागला, रशियन सेना क्रॅकोवच्या सीमेवर येऊन पोहोचली तेंव्हा जर्मनांनी प्रतिकार न करता हे शहर सोडून दिले आणि क्रॅकोव्ह वर रशियाची सत्ता स्थापन झाली. त्यामुळे या शहरात पडझड फारसी झाली नाही. अजूनही हे शहर सोळाव्या सतराव्या शतकातील इमारती अंगावर बाळगत दिमाखात उभे आहे. पोलिश संस्कृती ठळकपणे उठून दिसते ती याच शहरात. या इमारती सोळाव्या सतराव्या शतकातील आहेत असे गाईड सांगत होता पण त्या बघून अलीकडेच २०-२५ वर्षांपूर्वी बांधल्या असतील असे वाटावे एवढ्या त्या नवीन दिसत होत्या, कुठेही पडझड झालेली नव्हती. ऐतेहासिक वारसा असलेला मुख्य चौक, तिथली स्मारके, आजूबाजूच्या छोट्या छोट्या गल्ल्या, इथे वाहनांना परवानगी नाही. त्यामुळे हा परिसर पायी फिरत एन्जॉय करता येतो.

दुपारी आम्ही 'सॉल्ट माईनला' भेट द्यायला गेलो. शब्दावरून वाटत असले तरी मिठाची खान कशी असू शकेल? असा प्रश्न मनात असल्याने हे वेगळेच काही असेल असा आमचा सर्वांचा होरा होता. पण ती खरेच मिठाचीच खान होती. जमिनीच्या खाली ३५० फुटांपर्यंत ५००-७०० पायऱ्या उतरत आम्ही गेलो. लांब रुंद बोगदे, मध्ये दोन चर्च, एक रेस्टोरंट, असे बरेच काही होते पण हे सर्व जमिनीखालीच. या भूगर्भीय खाणीतून अति शुद्ध नैसर्गिक मीठ काढले जायचे आणि त्या काळी उपलब्ध असलेल्या लाकडांपासून तयार केलेल्या अजस्त्र यंत्रांनी ते मीठ वर जमिनीवर आणले जायचे. इतक्या खोलीवर असूनही इथली हवा अतिशय शुद्ध आणि तब्येतीला चांगली आहे. त्यामुळे आजही पोलंडमधील अनेक दमेकरी इथे निसर्गोपचारासाठी येतात असे गाईडने सांगितले. आत मध्ये दोन हॉल तर एवढे मोठे होते कि एकावेळी हजार दीड हजार माणसे बसू शकतील, आणि हे सर्व जमिनीच्या खाली ३५० फुटांवर. आम्ही गेलो ती तिसरी लेव्हल होती, पण त्याखालीही अजून सहा (एकूण नऊ) लेव्हल्स आहेत असे गाईडने सांगितले. त्या पर्यटकांसाठी सध्या बंद केल्या आहेत.    परतीच्या प्रवासात नेहमीप्रमाणे इंडियन रेस्टोरंट मध्ये जेवण आणि वेळ होता म्हणून थोडीशी खरेदी, भटकंती असा टाईमपास करत हॉटेलवर पोहोचलो. आणि पोलंड मधील दुसरा दिवस संपला.

या पुढचा दिवस मात्र विशेष असणार होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील कॉन्सन्ट्रेशन कॅम्प व्हिजिट आहे असे टूर मॅनेजर ने सांगितले, आणि अचानक मला क्लिक झाले कि कॉन्सन्ट्रेशन कॅम्प म्हणजेच आपण वाचलेली हिटलरची छळ छावणी. 'ऑशविट्झ' चा वाचलेला इतिहास डोळ्यासमोरून तरळून गेला. आणि तिथे भेट देण्यातील उत्सुकता अजून वाढली.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही या 'ऑशविट्झ' ला भेट द्यायला निघालो. साधारणतः २.३० तासांच्या प्रवासानंतर आम्ही तेथे पोहोचलो. तिथल्या प्रवेशाच्या सोपस्कारानंतर आम्ही आत गेलो. गाईड बरोबर होती. हो, सांगायचे राहिले.... युरोपात सगळ्या पर्यटनस्थळांना भेट देताने गाईड आपल्याला एक हेडफोन आणि रिसिव्हर देतात. हेडफोन कानाला लावून एक विशिष्ठ स्टेशन ट्यून केले कि त्या गाईडचा आवाज आपल्याला स्पष्ट ऐकायला येतो. त्यामुळे गाईडच्या अवती भोवतीच रेंगाळायची गरज पडत नाही. आरामात आजूबाजूला पाहात तुम्ही माहिती ऐकू शकता. असो.

आत मध्ये चाळीसारख्या दुमजली, लाल विटांमध्ये बांधलेल्या बऱ्याच इमारती होत्या. तिथे ज्यू लोकांना कोंडून ठेवले जायचे. पोलंड मध्ये ज्यूंची संख्या खूप होती. रात्रीच्या वेळी जर्मन सैनिक ट्रक घेऊन ज्यूंच्या वस्तीत यायचे आणि तुम्हाला चांगल्या ठिकाणी ठेवले जाणार आहे, असे खोटे सांगत तडक घराबाहेर काढून या ट्रक मध्ये भरले जायचे. आपल्या बरोबर फक्त मौल्यवान वस्तूंची एखादी बॅग हातात घ्यायला परवानगी असायची. पुढे या ज्यूंना जनावरांसारखे रेल्वेच्या बंदिस्त वॅगन्स मध्ये कोंबून त्यांना या छळ छावण्यांमध्ये आणले जायचे. तिथे आल्यावर त्यांची वर्गवारी केली जायची. लहान मुले आणि स्रिया एका गटात, तरुण माणसे दुसऱ्या गटात आणि वृद्ध माणसे तिसऱ्या गटात. अशी वर्गवारी करून या तिसऱ्या गटाला सरळ गॅस चेंबर मध्ये कोंडले जायचे. त्या अगोदर त्यांच्या अंगावरील सर्व कपडे, बूट चपला, मौल्यवान वस्तू व इतर साहित्य सगळे काढून घेतले जायचे. आणि या हॉल मध्ये विषारी वायू सोडून त्यांना अतिशय वेदनादायक मृत्यू दिला जायचा. मेलेली माणसे शेजारच्याच भट्टीत जाळून टाकली जायची. बाकी तरुण वर्गाकडून प्रचंड काम करून घेतले जायचे, आणि ते मरेपर्यंत हे अत्याचार चालू राहायचे. त्या कॅम्पमध्ये गेलेल्यांना एकमेकांविषयी कधीच कळून दिले जायचे नाही, त्यामुळे आपले आप्तेष्ट दुसरीकडे कुठेतरी अजूनही सुखात असतील आणि पुन्हा कधी तरी भेटतील या आशेवर हे लोक हे अतिशय वेदनादायक जीवन कंठायचे. महायुद्ध संपल्यानंतर जिवंत राहिलेले लोक या छावण्यांमधून बाहेर आल्यानंतर इथे किती अत्याचार झाले हे जगाला कळले. आणि संपूर्ण मानव जात हादरून गेली. या या एकट्या  'ऑशविट्झ' छळ छावणीत जवळ जवळ अकरा लाख लोकांना यमसदनास पाठवण्यात आले, हे ऐकून त्या क्रूरतेची परिसीमा लक्षात येईल. अनेक इमारतीत मोठं मोठ्या हॉल मध्ये या लोकांचे असंख्य बूट-चपला, चष्मे, बॅगा, कपड्यांची गाठोडी, वापरायच्या वस्तू, डोक्यावरचे केस, यांचे मोठं मोठे ढीग आजही जतन करून ठेवले आहेत. मी तसा सहसा हळवा होत नाही, पण हे ढिगारे बघून माझ्याही अंगावर काटा आला नि क्षणभर डोळे ओले झाले. विषन्न मनस्थितीत हि ऑशविट्झ ची छळ छावणी आम्ही सोडली. (ऑस्टविझ च्या छळ छावणीतील सध्या पर्यटकांचा होणारा छळ सांगायचा राहिला, तिथे टॉयलेट वापरासाठी १.५० झोलटी म्हणजे आपले २५ ते २६ रुपये, वसूल केले जात होते.)

परतीच्या प्रवासात आमची जेवण्याची सोय एका ट्रॅडिशनल पोलिश रेस्टारंट मध्ये केली होती. 'शो मस्ट गो ऑन' या उक्तीप्रमाणे पाहिलेले दृष्टीआड करत आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला. तिथे गिटार, फ्लूट आणि लोकल तंतू वाद्द्यांच्या साहाय्याने सादर केलेला फोक शो होता. त्यात दोन पोलिश तरुणीही डान्स करत होत्या. आम्हीहि त्यात भाग घेत तो शो एन्जॉय केला. आमच्यातील एकाला तर त्या मुलींनी हाताला धरून आपल्याबरोबर डान्स करायला उद्युक्त केले आणि त्यानेही योग्य साथ देत त्या शोची रंगत वाढवली. जेवणानंतर आम्ही क्रॅकोव मधील 'हॉटेल मर्क्युर ग्रँड' या पंचतारांकित हॉटेल वर पोहोचलो आणि लवकरच निद्राधीन झालो.'हॉटेल मर्क्युर ग्रँड' मधील वास्तव्य अप्रतिम..............

(पुढचा प्रवास पुढील भागात)..........................

अनिल दातीर (सातारा)
(९४२०४८७४१०.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel