'बुडापेस्ट' हि हंगेरीची राजधानी. शहरातून वाहणाऱ्या 'डेन्युब' या नदीने बुडापेस्टचे दोन भाग केलेत. हि डेन्युब नदी युरोपच्या १९ देशांमधून वाहत काळ्या समुद्राला जाऊन मिळते. आपली गंगा जशी मोठी आहे तशीच हि डेन्युब नदी. पण या नदीत साधा कागदाचा कपटा देखील पडलेला दिसला नाही. अतिशय स्वच्छ पाणी. हंगेरीयन भाषेत बुडा म्हणजे जल आणि पेस्ट म्हणजे शांत. शांतजल असा काहीसा बुडापेस्टचा अर्थ होईल.आमचा बुडापेस्टमधील दुसरा दिवस सिटी टूर ने सुरु झाला. शहराच्या मध्यवर्ती भागात एक मोठा चौक आहे त्याला स्वातंत्र्य चौक म्हणतात. तिथल्या स्वातंत्र्य वीरांचे भव्य पुतळे तिथे उभे आहेत. एक सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याकडील पुतळे जसे ब्रॉन्झ मध्ये घडवल्याने आणि करड्या रंगामुळे उठून दिसतात तसे युरोपातील सर्व पुतळे मळकट हिरव्या रंगात असल्याने काहीसे गंजलेले वाटतात. या चौकात आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेलेत असे आमच्या गाईड ने आवर्जून सांगितले, आणि 'नरेंद्र मोदी, ए स्ट्रॉंग मॅन' म्हणून कौतुकही केले, तेंव्हा मोदींचा आणि भारताचा अभिमान वाटला. हंगेरीत आणि भारतात काही साम्य आहेत. इथेही लोकशाही आहे. (आपल्या इतकी लिबरल आहे कि नाही माहित नाही, आपल्याकडे कुठलाही दीडशहाना चौकात उभे राहून पंतप्रधानांनाही शिव्या घालतो, इतर कुठे असे स्वातंत्र्य(?) असेल असे वाटत नाही.) इथे दर चार वर्षांनी निवडणूक होते, आणि राष्ट्रपती हे जरी कायद्याने सर्वोच्च पद असले तरीही जास्त अधिकार पंतप्रधानाला आहेत. दुसरे साम्य म्हणजे हंगेरीचा राष्ट्रध्वज आपल्यासारखाच आणि त्याच तीन रंगात आहे, रंगांचा पॅटर्नही सेम आहे, फक्त आपल्या राष्ट्रध्वजात अशोक चक्र आहे, ते हंगेरीच्या राष्ट्रध्वजात नाही.
या स्वातंत्र्य चौकाच्या शेजारीच एका गोठलेल्या पाण्याच्या तलावावर अनेकजण स्केटिंग करत होते. एक वयस्कर जोडपे अतिशय सुंदर नृत्याविष्कार सादर करत होते. यानंतर आम्ही डेन्युब च्या पुलावरून पलीकडे एक उंच टेकडी होती तिथे गेलो. आपल्या चार भिंतीसारखे तिथे स्मारक आहे. इथून बुडापेस्टचा नजारा खूपच सुंदर दिसत होता. गाईड आम्हाला कौतुकाने ती टेकडी दाखवत होता, पण त्याला जेंव्हा सांगितले आमच्याकडे मोठं मोठे डोंगर आहेत, तेंव्हा हिरमुसला बिचारा. इथून पुन्हा खाली उतरत दुसऱ्या बाजूच्या टेकडीवर गेलो, तिथे जुन्या काळचा राजवाडा, किल्लासदृश्य अनेक बांधकामे, एक भव्य चर्च होते. इथल्या भव्य राजवाड्यात आता सध्याचे प्रेसिडेंट राहतात. पण प्रेसिडेंट राहातात म्हणून त्या भागाला उगाच पोलीस छावणीचे स्वरूप दिलेले नव्हते. हो तसा दरवाज्यावर पारंपारिक वेशातील गार्ड्सचा पहारा होता. इथला 'चेंज ऑफ गार्डस' सेरेमनी सुद्धा आम्हाला बघायला मिळाला. इथला हा परिसर डोळ्यात साठवून घेत परत फिरलो. खाली उतरल्यानंतर 'मिस्टर मसाला' मध्ये दुपारचे जेवण झाले. यानंतरचा वेळ फ्रीटाईम अर्थात खास खरेदीसाठी राखून ठेवलेला होता. परदेशात आलोय म्हटल्यानंतर घरच्या मंडळींना, मित्रांना भेटीदाखल काहीतरी घेऊन जाणे हे ओघाने आलेच.. एका भव्य मॉल मध्ये सर्वांचीच भरपूर खरेदी झाली. तशा वस्तूंच्या किमती फार स्वस्त नसल्या तरी घेण्यासारख्या होत्या.
रात्रीच्या जेवणाची व्यवस्था 'डेन्युब' नदीतील क्रूझ वर केली होती. बोटिंग मध्ये नावीन्य नसल्याने त्यात काही कौतुक नव्हते, (तसेही मला गोव्यातील किंवा दुबईतील आणि इथंही क्रूझ सफर हा प्रकार कधी आवडला नाही). पण हे क्रूझ डिनर बुडापेस्टमधील एक प्रचलित प्रकार होता. वेलकम ड्रिंक म्हणून दिलेली शॅम्पेन आणि नंतरची वाईन सुंदर होती, आणि त्या पेक्षाही 'डेन्युबच्या काठावरच्या सर्व इमारती अतिशय सुंदर रोषनानीने सुशोभित केलेल्या होत्या. तो नजारा मात्र अप्रतिम. जेवण ठीक होते. ही क्रूझ सफर संपवून बाहेर आलो. पण अजून तशी झोपण्याची वेळ झालेली नव्हती. मग तिथल्याच मार्केटमधून सर्वांनी एक चक्कर टाकत फिरत फिरत टाईमपास केला. बसने पुन्हा आम्हाला हॉटेलवर सोडले.
तिसऱ्या दिवशी अजून एक अडव्हेंचर्स राईड ठेवलेली होती. 'सेगवे' राईड. दोन चाकांच्या या गाडीवर बॅलन्स सांभाळत उभे राहायचे, पुढे झुकले कि चालू, मागे आले कि ब्रेक असा प्रकार. ५-१० मिनिटाच्या पूर्वतयारी नंतर हि राईड सुरु झाली. मला वाटत होते कि, इथेच कुठेतरी मोकळ्या जागेत चक्कर मारून १५-२० मिनिटात हि राईड संपेल, पण दोन चौक ओलांडून पुढे डेन्युब च्या पुलावरून काल ज्या उंच टेकडीवरील प्रेसिडेंटच्या राजवाड्यावर गेलो होतो, तिथपर्यंत हि राईड होती. गार वाऱ्यातून तो सेगवेचा प्रवास खूप मस्त वाटला. थंडीमुळे काकडून गेल्यावर तिथे जी गरम गरम कॉफी मिळाली ती अप्रतिम होती. येताने पुन्हा किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूने उतरून, पूल क्रॉस करत मूळ ठिकाणी परत आलो. संस्मरणीय अनुभव. हा 'डेन्युब' नदीवरचा पूल नंतर अनेक सिनेमांमधूनही दिसला. दोन्हीबाजूंच्या कमानीवर बसवलेले दोन सिंह ही तर बुडापेस्टची ओळख.
त्या रात्रीचे जेवण मिस्टर मसाला मध्येच होते, पण शेवटचा दिवस म्हणून संजयजी नि कॉकटेल डिनर वुईथ रशियन बॅले डान्स असा कार्यक्रम ठेवला होता. सर्वांनीं आपापली डान्सची हौस भागवून घेतली. तो शेवटचा दिवसही खूप मजेत गेला. रात्री कॅसिनो मध्येही अनेकांनी कमाई केली. आपल्या एक रुपयाला इथले चार फ्लोरिंट्स, त्यामुळे कॅसिनोत बेटवर लावलेली रक्कम उगाचच मोठी वाटत होती. बुडापेस्ट लुटले म्हणा ना.
दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आवरून बुडापेस्टचे विमानतळ गाठले, येतानाची फ्लाईट साडेसात तासांची होती पण बुडापेस्ट ते दुबई प्रवास साडेचार तासात झाला. दुबई एअरपोर्टवर चार तासांचा ट्रान्झिट पिरियड होता. इमिग्रेशन उरकून सर्वजण ड्युटी फ्री शॉप्स मध्ये घुसले. दुबईला काय खरेदी करायची असते हे काही सांगायला नको. येताने प्रत्येकाच्या हातात ३-४ पिशव्या वाढल्या होत्या. दुबईवरून निघालेली फ्लाईट मुंबई एअरपोर्टवर पोहोचली. लगेज ताब्यात घ्यायच्या अगोदरच एकजण येऊन चिकटला 'साहेब' ५०० रुपये द्या, लायनीत उभे न राहता, दुसऱ्या दरवाजाने १० मिनिटात बाहेर नेतो' असे म्हणाला. आणि आपल्या 'भारतात' पोहोचल्याची जाणीव झाली.....................
अनिल दातीर (सातारा)
(९४२०४८७४१०.)