दुर्योधन म्हणजे महाभारतातील आपणा सगळ्यांना माहिती असलेला महान खलनायक. दुर्योधन हा शकुनी मामाचा लाडका भाचा होता. तो त्याच्या शब्दाबाहेर नसे. शकुनी एके दिवस आपल्या कक्षात बसला होता. त्याने आपल्या शेजारी उभ्या असलेल्या सेवकाला बोटांनी जवळ येण्याची खूण केली. “राजपुत्र दुर्योधनाला सांग मामा शकुनी त्याची वाट पाहतोय त्वरित कक्षात यावे.” तो सेवक आपला भाला सांभाळत धावत पळत महालाच्या त्या मजल्यावरून वर दुर्योधनाच्या कक्षाकडे गेला. त्याला पोहोचेपर्यंत धाप लागली होती. “महाराज आपणास मामा शकुनी यांनी बोलवले आहे त्वरित.” दुर्योधानाने आपले उपरणे घेतले आणि पायात उंची जोडे घातले आणि तो शकुनीच्या कक्षाकडे निघाला. त्याने कक्षात प्रवेश केला. शकुनी त्याच्या जवळ आला. “ये दुर्योधना, सर्वश्रेष्ठ योद्ध्या ये. आता ती वेळ आली आहे जेव्हा तू आणि तुझे भाऊ मिळून त्या शुद्र पांडवांना हरवशील आणि तू या हस्तिनापुराचा नव्हे तर अखंड भारतवर्षाचा राजा होशील.” हे उद्गार ऐकून दुर्योधनाचा उर गर्वाने भरला. शकुनीने दुर्योधनाच्या चेहऱ्यावरचा आनंद हेरला. एक छदमी हास्य करून शकुनी म्हणाला, “आपले विचारांचे वारू इथेच थोपव दुर्योधना. राजा होण्यासाठी तुला युद्ध जिंकावे लागेल. युद्ध हे केवळ बळाने नाही तर छळाने हि जिंकता येते. आणि युद्धात सर्व माफ असते.” दुर्योधांच्या चेहरा शंकांकीत झाला. “मी समजलो नाही मामाश्री”
शकुनी पुढे आला. त्याने आपला हात दुर्योधनाच्या खांद्यावर ठेवला आणि त्याला आपल्या आसनात बसवले. तो आसनाच्या मागे गेला आणि दबक्या आवाजात त्याच्या कानाशी बोलू लागला. “सहदेव हि पांडवांच्या साखळीतील एक अशक्त कडी आहे असे सगळे समजतात. परंतु त्याच्याकडे जे ज्ञान आहे तेच ज्ञान पंडुला प्राप्त होते. महाराज धृतराष्ट्र नेहमी राज्य विस्तारावर असाचे तेंव्हा आपल्या चातुर्याने त्या पांडूने सारे ज्ञान राजऋषींकडून मिळवले. मरताना आपले ज्ञान तो या सहदेवाला देऊन गेला.” दुर्योधन जरा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “मामाश्री त्या सहदेवाचा पांडवांनाच काही उपयोग नाही तर आपल्याला काय उपयोग असेल.” “इथेच तर चुकलास दुर्योधना, तो आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग करणार नाही परंतु सदुपयोग नक्कीच करेल जर त्याला करायला लावला तर.......!” “मामाश्री तुम्ही कोड्यात बोलताय ते माझ्या आकलना पलीकडले आहे. मला सांगा नक्की मी काय करणे अपेक्षित आहे..?” “आता तु विचारतोस म्हणून मी सांगतो, तू त्या सहदेवाकडे जा, त्याला एकट्याला भेट. त्याला भविष्याचे ज्ञान आहे. त्याचा फायदा आपण आपल्या विजयासाठी करून घेऊ शकतो.” “मामाश्री त्याला असे काही सांगितले किंवा विचारले तर तो मला सांगेल का.?” दुर्योधनाचा प्रश्न रास्त होता. शकुनीने दुर्योधनाच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि दुर्योधनाचा चेहरा प्रफुल्लीत झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे दुर्योधन आपले संध्या स्नान उरकून शकुनीचे आशीर्वाद घेण्यासाठी गेला. “विजयी भवः”
दुर्योधनाचा रथ सहदेवाच्या कुटी कडे जात होता. त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. "आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न देता त्याने या बद्दल पांडवांना सांगितले तर..??" त्याचा रथा बरोबर विचारांचे वादळ ही थांबले. तो रथातुन उतरला आणि सहदेवाच्या कुटीकडे चालु लागला.सहदेव आपल्या कुटी मध्ये अभ्यास मरत बसला होता. काही चोपड्या आणि ताम्रपट वाचत होता. जणु त्याला दुर्योधनाच्या आगमनाची माहिती होती. ""या भ्राताश्री..!!!" जणुकाही सहदेव दुर्योधनाची वाटच पाहत होता. दुर्योधन आत एका आसनावर बसला. जरा विचार करुन आणि आपला अहंकार बाजुला सारुन त्याने सहदेवा विचारले " सहदेवा, मी तुझ्या ज्ञानाबद्दल आणि सिद्धीबद्दल ऐकुन आहे. मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत.ज्याची उत्तरे तु पक्षपात न करता देशील आणि आपला क्षत्रिय धर्म पाळशील अशी आशा व्यक्त करतो." "भ्राताश्री आपण निश्चिंत असावे. माझे ज्ञान मला पक्षपात करण्याची अनुमती देत नाही. तसेच जे योग्य आहे ते करण्यास सांगते." "सहदेवा आता आपल्यामध्ये जे होईल ते कुणालाही कळता कामा नये!!" दुर्योधनाने निक्षुन सांगितले. सहदेवाने ही "माझी विद्या त्याची अनुमती देत नाही भ्राता दुर्योधन आपण निश्चिंत रहावे." असे उत्तर दिले. "सहदेवा मला युद्धासाठी एक असा दिवस सुचव जो दिवस कौरवांसाठी शुभ असेल. मला आपल्यामधील युद्धाचा चांगला मुहुर्त सांग. जो फक्त तुला आणि मला माहिती असेल. या बद्दल तु इतर कुणालाही वाच्यता करणार नाहीस." हे एकुन सहदेवाला आश्चर्य वाटेल असे दुर्योधनाला अपेक्षीत होतं. परंतु सहदेवाने आपल्या चोपड्या पाहिल्या आणि डोकंही वर न काढता एक दिवस दुर्योधनाला सांगितला. सहदेवावर विश्वास ठेवायला शकुनीने सांगितले होते त्यामुळे दुर्योधनाने त्याच्या उत्तराला प्रतिप्रश्न केला नाही. त्याने सहदेवाला सोन्याची नाणी आणि द्रव्य देऊ केले. सहदेवाने सांगितले, " मी तारिख सांगितली तरी संहार टाळु शकत नाही. अापल्याला विनंती आहे की शक्य झाल्यास युद्ध सुरु करु नका." "युद्ध अटळ आहे सहदेवा" दुर्योधन उत्तरला. त्याची सहदेवाच्या कुटीतुन बाहेर पडणारी पाउले सोबत सहदेवाचा आवाज घेउन गेली. त्या दिवसानंतर सहदेव कुणाशी फारसा बोलला नाही. त्याला मिळालेले हे ज्ञान आशिर्वाद होता की शाप हे त्याला कळले नाही. दुर्योधन युद्धातला त्याचा शत्रु होता. तरी सहदेवाने हा विचार बाजुला ठेवुन त्याला अपेक्षित असे उत्तर दिले होते.