लेखक - राजेंद्र एन. घोटकर
भल्या पाह्यटच शामराव दहा- बारा बाया घेऊन खारीच्या वाटंनं झपाझप पावलं उचलत निंघाला. सप्पाईच्या हाती धार देऊन पाजवलेले टोकदार इरे होते. कारणही तसंच होतं. आता सप्पा जवारीचा उभा गुळ खुळून पालथा करायले चालले होते. दहा-अकरा वाजेपर्यंत गुळ खुडाचा होता.
गावापासच्या चार येक्कर खारी भरुन त्यानं यंदा ठेकेदारी जवारी पेरली होती. जवारीसाठी राखून ठेवलेली जमीन वाहून वाहून चांगली कमावून ठेवली व्हती. काडी तडसं नावालेही नोह्यतं. माती हाताले लोण्यावाणी मऊ लागत होती. पाऊसमानही बरं होतं. तिफणीनं पेरलेल्या जवारीवर उमरे झाले. जवारी एकसरशी वापून आली. शामरावचं खारीचं वावर आता जीमनीवर चादर हातरल्यासारखं कसं हिरवंगार दिसत होतं. जवारीमंधी संगस त्यानं मुंगही पेरला होता. जवारीची भरली मेर पाहून शामराव मनापासून सुखावला होता. हिरवं सपन त्याच्या डोऱ्यात भरभरून वाहत होत. जवारी कंबरभर आली. हिरवीकंच जवारी वाहत्या वाऱ्यासंगं सळसळत होती. वाऱ्यासंगं नाचत होती. आनं आता ती पोटऱ्यावर आली होती. हिरव्यागार धांड्यातून पिशा डोकावू लागल्या होत्या. काही कणसं चिकावर येऊन पिशा लुसलुशीत दाण्यावर आल्या होत्या. मंधामंधी वाणीची गोल गरगरीत टपोरी कणसं रांगेनं माना झुलवत होती. जवारीचं असं भरलेलं शिवार पाहून शामरावले हरीक आला. थ्यो आतून लय सुखावून गेला होता. कणसं कशी रबरबीत हिरव्या दाण्यानं टरारून भरलेली दिसत होती. कोवळे लुसलुशीत दाण्याभरले कणसं पाहून डुंग्याडुंग्यानं हुळ्या कणसावर बसायला लागल्या होत्या.
भल्या सकारीस शामरावनं कोठ्यातून बैलं बाह्यर काढून बैलायचा शेणशेणकोर करून शिबल्यात भरून खाताच्या ढीगावर फेकून आला. कोयमट गरम पाण्यानं हात धुतले. पानचुलीजवळची राखळ हातात बारीक करून तोडांत कोंबून दात खसखस घासले. आनं कोमट पाण्यानं चूळ भरून गुरला केला. तसेच वल्ले हात ढुंगणावर पुसून च्याहाची वाट पाहत चुलीजवळ बसला. इकडं शांतीचं सळासारवण झालं होतं. तिनं पितरंचा च्याहाचा गंज पानचुलीच्या उल्यावर ठेवला आनं साखरपत्ती दूध घालून चहा चांगला खदखद शिजल्यावर कपबशीत भरून शामरावच्या हातात देल्ला. शामराव चुलीजवळ शेकता शेकता कपातला चहा बशीत वतून फुरुक फुरुक पेऊ लागला. शातीचं पण चहा पेणं झालं होतं.
कोठ्यातल्या भरणावरच्या चार डेरी, फाटे, ताटवा, कडा असं मारोशीसाठी लागणारं सामान बंडीत भरलं आनं संगं पहार (सबल) घेऊन बंडीचं जू बैलायच्या खांद्यावर देऊन वावराच्या वाटंनं लागला. गावाबाह्यर बंडी गोदरीतून चाकुंड्यानं जायले लागली. तवा शामरावनं तोंडावर फडकं बांधून घेतलं. गोदरी च्या पुढं दोन वावरानंतर बंडी त्याच्या वावरात येऊन बाभरीच्या झाडाखाली येऊन थबकली.
शामरावनं बैलाच्या गळ्यातल्या बेड्डया काढून बैलायच्या मानंवरुन धूर उतरवून धिऱ्यावर ठेवली. बैलं धुऱ्यावर सळपून थोडी हिरवी पालाड बैलायच्या पुढं टाकली. बैलं कोवरी पालाड सोलू लागले. आता शामराव मारोशी कोठंसा टाकावी ह्याचा विचार करत करत पाहार खांद्यावर घेऊन दाट जवारीतून फिरू लागला.
जवारीचे चारी कोनटे फीरल्यावर त्यानं बरोबर मंधात सवाळ जाग्यावर मारोशी टाकावी या इराद्यानं आखणी करुन चार दरं खोदायले लागला. दहा वाजले होते एव्हाना चार दरं खोदून झाले होते.
घरुन जेवन करुन आल्यावर मंग मारोशी उभारावी ह्या इराद्यानं त्यानं पहार दरातच ठेवून धुऱ्यावर आला. ''होऱ्याsss हो sss'' असा आवाज करत कणसायवर बसलेल्या होऱ्या हाकलून लावत तो बैयलायकडं आला. पालाड खाऊन बैलं बसले होते. धनी दिसताच दोन्ही बैलं वर माना करुन पाहू लागले. दोन्ही बैलं सोडून दुसऱ्या वजी लंबे सळपले आनं शामरावनं घराची वाट धरली.
शामराव घरी आला. शांती घरी वाट पाह्यत होतीच. चुलीवर गरम झालेलं पाणी उपसून बालटीत घेतलं आनं थ्ये भरलेली बालटी आंगधून्यात नेऊन ठेवलं. शामरावनं आंग धुतलं. आणं देवाले उदबत्ती लावून हात जोडले. शामराव सफरीतच पोतं टाकून खाली बसला. शांतीनं ताट पुढं मांडलं. दोघांनी मिरुन जेवन केलं. जेवन झाल्यावर शांतीनं भांडेकुंडे जमा करून ठेवले. जेवन शिकाळ्यात झाकून ठेवलं. किसना, प्रेमीला शाळेत गेली होती. ती दुपारच्या सुटीत रोजच्या सारखी जेवायले येणार होती म्हणून किल्ली कोनाड्यात ठेवून देल्ली. दुसर्या वावरात कापूस फुटून बोंडायतून बाह्यर डोकावत होता. शामराव शांतीला म्हणाला. "शांते, वावरात भाय कापूस फुटून हाये. डुकरं बी भाय त्रास देते. तू असं कर, जेव्हडा जमल तेवढा कापूस येचून घे. खारीतल्या जवारीवर होरे भाय चटावले हाये. मी आता मारोशी टाकून देतो. आनं दुपारच्या पारघीत मी पण येतो कापूस येचू लागाले." शांतीनं होकार भरला आनं हातात पालव घेऊन त्याची चुंभर डोकस्यावर घेतली. पाण्यानं भरलेली चरवी चुंभरीवर ठेवली. रीकाम्या हाती बकरीची दावली घेऊन वावराकडं निंघली होती. शामराव पण हातात जर्मनी कडीचा डबा पाण्यानं भरुन गोदरीतून वावराच्या वाटनं लागला. बैलं तहानलेली होती जवळच्या नाल्यात बैलायले पाणी दाखवून शामरावनं पुन्हा बाजूलेस बैलं लंबे सळपले. त्यायच्या पुढं कापलेली हिरवी पालाड टाकून आपल्या कामाले लागला.
बंडीतल्या डेरी, फाटे, ताटवा, कडा सर्व सामान खाली टाकलं. दोन डेरी खांद्यावर घेऊन जवारीत शिरला. तसा जवारीतून सळसळ आवाज त्याच्या कानावर आला. तो आवाजाच्या दिशेनं पाहू लागला. दहा बारा डुकरायचा करप जवारीचे उभे धांडे चुरत होता. जवारी चार पायात घालून पालथी पाडत होता. हे पाहून शामरावले चर्र घाम फुटला. तोंडातून शब्द निंघत नव्हता. "आता काय करावं ?" तो सोतासीच पुटपुटला आनं यकदम मोठ्यानं वरडला. डुकरं जीव घेऊन परु लागले आनं दुसर्या वावरात घुसले. शामरावच्या जीवात जीव आला. तसं माणूस डुकरायचा तावडीत सापडला तर माणसाले उभ्यानं चिरते हे शामराव आयकून होता. तरीपण त्यानं हिंमत केली होती.
त्यानं आता भेतभेतच डेरी दरात टाकून उभ्या केल्या. चारही डेरी टाकल्यावर फाटे टाकून दरात माती धकावली. पहारीनं दरातली माती कुचावली. फाटे वाशिनच्या येलानं बांधले आनं वरुन ताटवा टाकला. दिवसा सावलीसाठी आनं रातच्या जागलीसाठी मारोशीवर वरुन कळा बांधला. दुपारपावतं शामरावनं मारोशी उभी केली होती. तिकडं शांता एकटीच कापूस येचत होती. बकरी मध्ये मध्ये तुरीचा पाला आनं पऱ्हाटीतली भोवरी, शेवरं, हेटी असं खात होती. मधीमधी बोंडंई चाटत होती.
किसनाची शाळा सुटली होती. घरी आल्यावर पाठीवरून पुस्तकाची थैली तशीच बहीनीच्या हवाली करून टणाटण हुडक्या मारत गोदरीच्या वाटनं खारीत शिरला. बापानं जवारीत उभारलेली मारोशी पाहून किसनला लई आनंद झाला. त्यानं "बाsss" अशी आरोळी ठोकून मारोशीवर येंगला. शामराव कणसांवर बसलेल्या होऱ्या हाकलत एका कोनट्यात जवारीतलं तन बैयलायले घेत होता. त्याले किसनचा आवाज आयकू आल्यावर त्यानंही प्रतिसाद देल्ला. "आरे लेका असा एकटादुकटा वावरात शिरू नगं, डुकरं फाडून टाकन लेका! "
शामराव पोराले बोलला. सूर्य मावळतीला आला. माथ्यादिस झाली. अंधार पडू लागला. शामरावनं कापलेलं गवताचं पेंडकं डोक्स्यावर घेऊन तो बैलायकडं आला. किसननं मुंगाच्या शेंगा वरपून पॅंटाच्या दोन्ही खिशात कोंबल्या आनं हातातल्या शेंगा खात खात बापाच्या दिशेनं बंडीपाशी आला. शामरावनं गवत बंडीत ठेवलं. बैलं बंडीले जुतले आनं दोघंही बापलेक बंडीत बसले. बंडी गावाच्या वाटंला लागली. शांती कापसाचं गाठुळं घेऊन घरी आली व्हती. दाव्याभरली बकरी सायवनात डेरीले बांधली.
असेच काही दिवस गेले. जवारी आता चांगली रसरशीत हुड्ड्यावर आली व्हती. कणसं दाण्यानं टरारून भरलेले धांडे जमीनीवर वाकले होते. धांड्यायले दाणेभरल्या कणसायचा भार पेलवेनासा झालेला व्हता. काहीकाही थांड्यायले खाली हिरवे बास फुटून पोटरीजले व्हते. जवारीत मुंगाच्या मोठमोठ्या झ्यालींनी जमीन पांघरली होती. मुंग भरून आला होता. आता शामराव रोज सकाळी बैलायचं शेनशेनकोर करुन शांतीच्या हातचा गरमगरम चहा पेऊन बैलं संग घेऊन जवारीवरच्या होऱ्या हाकलाले वावरात येऊ लागला. संग जवारीतलं वाढलेलं तन बयलायले भारा भरून घेत. सकाळी तो मारोशीवर येंगला. पाखरं डुंग्याडुंग्यानं कणसावर बसून दाने टिपतानी त्याले दिसली तशी त्यानं हातात गोफण घेऊन गोफणीत लहान दगडं घेऊन पाखरायच्या दिशेनं भिरकावली. पाखरं उडून बाभरीच्या झाडावर बसली. होsss ऱ्या... हो करत पाखरं हाकलून लावली. बाभरीजवळच्या जवारीची कणसं पाखरायनं दाणे खाऊन येक डुंगं पार चोपळं केलं होतं. कधीकधी डुकरही जवारीत घुसायचे. त्यामुळं जवारीची नासधूस झाली होती. दिवसा पाखरं आनं रात्री डुक्करायपासून जवारी वाचवण्यासाठी थ्यो मारोशीवर बसून जागल करू लागला.
एक दिवस शामरावनं सकाळी चारपाच कणसं खुडून घरी आणली. घरच्या पानचुलीत भाजून त्या दाण्याचं नवं टाकलं. आंघोळ करुन भाजलेल्या जवारीचे दाने, तुप-साखर शांतीनं काढून देल्ले. शामरावनंही आंघोळ करून तो एका झाकणीत थ्यो प्रसाद, उदबत्ती आनं हातात गडवाभर पाणी घेऊन मारुतीच्या पारावर गेला. मारुतीवर गडव्यातलं पाणी घातलं. मारोतीले हुड्ड्याच्या शरनीचा परसाद ठेवला. घरातल्या सरवायले जवारीच्या हुड्ड्याची शेरणी वाटली. किसणाले आनं प्रेमीलेच्या तोंडावर झालेला आनंद त्यानं पाहिला. शामराव आनं शांती मनोमन सुखावली. यंदा भरपूर जवारी होऊ दे असं मनातल्या मनात बोलून त्यानं मारुतीला हात जोडले.
टपोरी कणसं भोरड झाली. हिरवा रंग बदलून करडा सोन्यासारखा पिवळा दिसायला लागला. कणसं सूर्याच्या तपनात सोन्यासारखी दिसाले लागली. जवारीचे कनसं काय संपूर्ण मेरच सोन्यासारखी पिवळी धुम्म दिसत होती. जवारी सोनं लेवून वावरभर पसरली होती. कणसं भोरड झाले होते. जवारी कापणीवर आली होती. चारपाच बाया मजूरीनं घालून जवारी कापली. कालपर्यंत उभी असलेली जवारी आडवी झाली. आता वावरभर फडके निपचित पडले होते. चारचार फडके उचलून शामराव जवारीच्या पेंड्या बांधू लागला. बांधलेल्या पेंड्या जमा करुन वावराच्या मधोमध गुळ सजला. गुड भलामोठा झाला होता. जवारी उभी असलेल्या वावरात आता फक्त फणकटं आनं मुंगाचे फळके शिल्लक राहिले होते. दहा बारा खंड्या जवारी होईल असा कयास शामरावनं लावला. केलेल्या कष्टाचं सोनं झाल्याचं समाधान दोघायच्याही मुखावर दिसत होतं.
शांती गुळ खुडण्याच्या कामाले बाया पाहू लागली. "गुळ खुडायले चालतेकावं सये" शांतीनं विचारलं. "थ्या खरवड्यायचा झाल्यावर सांगतो पाय, अजच्या दिवस त्यायचा हाये. बाया हो मनंतं उद्या येतो आमी दहा बारा झनी, पण दुपारपर्यंत होईलनंवं." सई बोलली. "हो, ये नं माय. आभाराची खारी हाये, कव्वा बरसल काह्यी भरोसा नाय. लवकर निंघन त बरं होते". शांती काकुळतीनं बोलली. सईनं पाथंवरच्या साऱ्या बायायले विचारून सईले होकार देल्ला. शांती सईच्या बोलीवर राहून घरी आली आनं उद्या गुळ खुडाले बाया भेटल्या असं आपल्या नवर्याले सांगलं.
शाती आनं शामराव भल्या पाह्यटस उठले. शामरावनं बैलं बाह्यर काढले. बैलायचं शेणमुत केलं. तोपावर शांतीनं सडासारवण करून चुलीवर चहाचा गंज ठेवला. ईस्तो सरकऊन च्याहा शिजवला. शिजलेला च्याहा गारणीनं कपबशीत गारुन नवऱ्याले देल्ला. आपणबी घेतला. वाटीत दहीभात घेतला. पोरं झोपलेलीच होती. कवाड टेकवून शांतीनं गुंड डोईवर घेतला. दोघंय वावराच्या वाटंनं लागली. वाटत मजूर बाया पाजवलेले इरे घेऊन वाट पाह्यतच होत्या. गोदरीच्या वाटनं नाकाले पदर लावत डाले, ईरे घेऊन बाया गुळापासी आल्या.
शांतीनं वाटीत आणलेला दहीभात शामरावनं आपल्या हातात घेऊन गुळावर शिपला. गुळाभोवताल शिपला. पाच पेंड्या खुळून मोहीतीर केलं. आनं विस विस पेंड्या प्रत्येक बाईच्या पुढं टाकल्या. सर्व बाया धारदार इऱ्यानं झपाझप कणसं खुडाले भिळल्या. खुळलेली कनसं पटापट डाल्यात पळत होती. शामराव डाले भरू भरू खऱ्यात मेळीलगत टाकत होता. दिवस वर चढला. अर्धा गुळ खुडणं झाला. शामराव घरी आला. पोरं उठली होती. शामरावनं प्रेमीलेला मजूरायसाठी चहा करायला सांगितलं. प्रेमीलेनं चहा भरून डब्यात देल्ला. संग पाच सहा कपं देल्ले. किसन अज शाळेत गेला नव्हता. शामरावनं खुट्याचे बैलं सोडले. पाणी पाजले. किसन मी पण येतो म्हणून मांगं लागल्यानं त्याच्या हाती बैलायचे कासरे देऊन किसनला पुढं घालून एका हातात चहाचा कळीचा डबा घेऊन मागून चालू लागला. सर्व बायायनं चहा पेऊन पुन्हा कामाला लागल्या. आता किसनही डाले भरण्यात मदत करू लागल्यानं पटापट डाले रीकामे होऊ लागले. दुपारच्या पारघेपर्यंत अख्खा गुळ खुडून पालथा झाला. खऱ्यात कणसायचा मोठा उंचच उंच ढीग झाला.
आता एकच काम राह्यलं होतं, खऱ्यातल्या कणसायवर पाथ धरणं. आभाराची खारी होती. आकाराचे ढग वर घिरट्या घालत होते. जवारी लवकर निघनं हवं होतं. रात्रीची कणसायवर पाथ धरायची असं शामरावनं ठरवलं. शेजारच्या चार पाच कास्तकारायले विचारून माथ्यदिसा शामरावनं बैलं गोळा करुन आणले. खऱ्याजवळ भोवताली बांधून बैलांपुढं कडबा टाकला आनं बादकन पाथ धरावी म्हणून चार घास लावायले तो घराकडं निघाला. घरी शांतीनं भाजी भाकरी करुन ठेवलीच होती. शामराव घरी आला. हातपाय धुतले. चुलीजवळ भितीलेच लेटून बसला. शांतीनं पान वाढलं. शामरावनं लगबगीनं जेवन केलं. शांतीले सांगून, संग काही सामान घेऊन हातात कंदील घेतला आनं अंधारल्या वाटनं कंदीलाच्या मिनमिनत्या उजेडात वावराच्या वाटंनं लागला.
आल्याआल्या शामरावनं सामान बंडीवर ठेवलं. कंदीलाची वात लहान केली. गोणा बंडीवर पसरला. बंडीवरचं चऱ्हाट घेऊन मेढीले बांधलं. एकाण्याएकाण्या बारा बैलं मेढीजवळ आणले. मेढीले सर्व बैलं गोवले. कडीच्या डब्यातलं चार घुट पाणी पेऊन डबा बंडीच्या उभारीले अडकवला.
पाथ चालू लागली. गोलगोल फिरु लागली. अंधारात शामराव बैलायच्या पाथीमांग गोलगोल फीरत होता. मंधी मंधी बैलायचे शेपटं मुरगाळत बैलं घाईनं घुमवत होता. बैलायमांग चालता चालता भजनं, तुक्याचे, ज्ञानाचे, नाम्याचे अभंग ओव्या आळवत होता. शामराव पायाखाली अंधार तुडवत होता. वाळलेली टपोरी दाणेदार कणसं बारीक होत होती. पाथ हाकलता हाकलता हातात दातार घेऊन कणसं पलटवत होता. करता करता अर्धी रात झाली. शामरावनं पाथ थांबवली बैलं ठकले होते आनं शामरावही. पाणी प्यावं ह्या विचारात उभारीचा डबा घेतला आनं एक भली जांभई देऊन जमीनीवर बुळ टेकवलं. डब्याच्या झाकणात पाणी घेतलं, गुरला केला आनं घटाघटा पाणी प्याला. थोडीथोडी थंडी जाणवत होती. बैलही फिरुफिरु ठकलेली होती. थांबलेली बैलं एकमेकाले हुमाले मारत होती. बुजाळत होती. त्यायले बसता येत नोव्हतं. ठकलेल्या बैलायकडं नजर टाकली आनं पुन्हा मोठ्ठी जांभई देत उठला. त्यानं वर काळ्याकुट्ट आभाळात पाहिलं. जोहन चांलणी अजून उगवाचीच होती. अंदाज बांधला आनं थांबलेल्या बैलायले आवाज देल्ला. पाथीचे बैलं पुन्हा गोलगोल फीरू लागले. "कास्तकारायच्या भोगात हे असच गोलगोल फिरणं राह्यते बाप्पा" बैलायले हाकलता हाकलता थ्यो म्हणला. हे फक्त फिरणारे बैलं आयकत होते. हातात दातार घेऊन कणसं पलटवले. दाणे कणसाबाह्यर पडून कणसं हलकी झाली होती. पिशाच तेवढ्या शिल्लक राहील्या होत्या. त्या शामरावनं घोरुन काठनं भोवताली लावल्या. पाथ फिरता फिरता वर पाह्यलं. जोहन चालणी आकाशात चमकत होती." चारक वाजले असल" शामराव सोताच पुटपुटला. गारवा वाढला होता. आता शामरावच्या आंगात काह्यीच जान राह्यली नोव्हती. रातभर फिरु फिरु पार ठकला होता. डोळे जळ आले होते. जवारीचा भूसा उडून आंगाले लागत असल्यानं आंग किचकीच खात होतं. शामरावनं पाथ मेढीपासून सोडली आनं दावन खऱ्याबाह्यर काढली. एकेक बैलं अलग करुन खुट्यायले सळपले. बैलांपुढं धांडे टाकले. रातभर गरगर फिरलेले बैलं ठकून गेल्यानं लटलट बांधल्या जागी बसले. डोक्स्याचं फडकं सोडून त्यानं आंग झटकलं. झुलपूट झालं व्हतं. गावातल्या कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कानावर पडला. पाखरायचा किलबिलाटही खोपटातून आयकू येत व्हता. गार वारा अंगाले झोंबत व्हता.
काल दिवसभर दिसणारे टपोरे कणसं खऱ्यात बैलायच्या पाथीनं पायाखाली येऊन रगडून पिशायमंधी रुपांतरीत झाले होते. भुसा आन् बोंड भरलेले दाने आता उजेडात ठळक दिसत होते. जवारीची नाही तर मोत्याची रास खरं भरून पडलेली पाहून शामराव रातभरचा शिणभाग ईसरुन गेला. खऱ्यात पसरलेली जवारीची रास त्यानं डोरे भरून पाह्यली. गेल्या कितीतरी वर्षांनी जवारीचं रग्गड पिक आलेलं तो पयल्यांदाच पाह्यत होता.
राजेंद्र एन. घोटकर
घुग्घूस. त. जि. चंद्रपूर
संवाद - ९०२१९१८८५१
मेल - ghotkarrajendra@gmail.com