न्याय

वामनरावांवर मुलाच्या खुनाचा आरोप होता.त्यांच्या पंचवीस वर्षांच्या मुलाचा त्यानी खून केला होता.पित्याचे काळीज एवढे कठोर निष्ठुर कसे होऊ शकते असा सर्वांनाच प्रश्न पडला होता.वामनरावांना अटक झाली होती.नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते .गेले काही दिवस पेपरमध्ये याबद्दल चर्चा चालल्या होत्या.काही लोक वामनरावांच्या बाजूचे होते .काही पेपरमध्ये पत्रेही त्याचप्रकारची येत होती.उलट सुलट चर्चा चालल्या होत्या.काही जणांना वामनरावांनी जे केले ते योग्यच केले असे वाटत होते.आम्ही त्यांच्या जागी असतो तर तसेच केले असते असा त्यांच्या बोलण्याचा लिहिण्याचा आशय होता .तर काही जण वामनराव क्रूरकर्मा आहेत त्यांना काळीज नाही .त्यांच्या गुन्ह्य़ाला माफी नाही त्यांना फाशी दिले पाहिजे असे काही जणांचे म्हणणे होते .या उलट सुलट चर्चेमध्ये वामनराव काहीच बोलत नव्हते .

त्यांच्या डोळ्यातून पाणी सतत वहात होते .अापण केले ते योग्यच केले असे त्यांना वाटत होते .प्राप्त परिस्थितीत दुसरा काही मार्ग नव्हता असे त्यांचे प्रामाणिक मत होते.

त्यांनी दोन वर्षांपूर्वी कोर्टाकडे अर्ज केला होता .त्यात त्यांच्या मुलाला दयामरणाची परवानगी द्यावी अशी विनंती होती .कोर्टाने त्यांची विनंती फेटाळली .त्यानंतर ते हायकोर्टात गेले. तिथेही त्यांची विनंती फेटाळण्यात आली .शेवटचा प्रयत्न म्हणून ते सुप्रीम कोर्टाकडे गेले.तिथे त्यांच्या वकिलाने दयामरण मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले .परंतु आपल्या संविधानामध्ये तशी तरतूद नाही तेव्हा तशी परवानगी देता येत नाही असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला .

असा निकाल आल्यास काय करायचे ते वामनरावांनी अगोदरच ठरवून ठेवले होते .त्याप्रमाणे त्यांनी एके दिवशी त्यांच्या मुलाला खूप झोपेच्या गोळ्या दिल्या .दुसऱ्या दिवशी त्यांचा मुलगा झोपेतून काळझोपेतून उठला नाही. डॉक्टरनी मृत्यूचे सर्टिफिकेट देण्याअगोदर जेव्हा तपासले तेव्हा त्यांना संशय आला. हा मृत्यू नैसर्गिक नाही असे त्यांना वाटले. त्यांनी सर्टिफिकेट  देण्यास नकार दिला. त्यांनी पोलिसांना कळविले. पोस्टमार्टेममध्ये मुलाचा मृत्यू जास्त गोळ्यांच्या सेवनाने झाला असा अहवाल आला.मुलगा स्वतः अशा गोळ्या घेऊ शकत नाही .त्याला त्या दुसऱ्या कुणी दिल्या असल्या पाहिजेत .त्याच्या जवळ वामनरावांशिवाय दुसरा कुणीही  नव्हता .सबब वामनरावांनी त्याला गोळ्या दिल्या असल्या पाहिजेत असा निष्कर्ष काढण्यात आला .वामनरावांना अटक करण्यात आली.त्यांनीही होय मी मुलाला गोळ्या दिल्या असा जबाब दिला. कायद्याने मला परवानगी दिली नाही. नियती व माझे मुलावर असलेले प्रचंड प्रेम यामुळे मला नाईलाजाने त्याला गोळ्या द्याव्या लागल्या असा जबाब त्यांनी दिला .

वामनरावांवर संशय घेण्यासाठी पोलिसांना तसे सबळ कारण होते .ते दोन वर्षे सतत निरनिराळ्या कोर्टामध्ये मुलाच्या  कायदेशीर मृत्यूसाठी झगडत होते .त्यामध्ये ते असफल झाल्यामुळे शेवटी त्यांनी नाईलाजाने त्याला दयामरण दिले असावे असा निष्कर्ष कुणीही काढू शकत होता .पोलिसांनी तसा निष्कर्ष काढला यात काहीच चूक नव्हती. पोलिसांच्या दृष्टीने कायद्याच्या भाषेत ते दयामरण नव्हते तर तो खून होता . वामनरावांनीही लगेच आपला गुन्हा कबूल केला .मात्र ते त्याला गुन्हा म्हणण्याला तयार नव्हते. एका बाजूने ते जरी रडत असले जरी त्यांना दुःख होत असले तरीही आपण केलेले कृत्य योग्य होते असा त्यांचा ठाम विश्वास होता .आणि आज कोर्टात केस उभी राहिली होती .त्यांनी वकील  दिला नव्हता.त्यांची बाजू ते स्वतःच मांडणार होते . 

अकरा वाजता कोर्ट सुरू झाले .कोर्टरूम खचाखच भरली होती.कोर्टाबाहेरही बरीच गर्दी जमली होती .गर्दीतील एक गट वामनराव निर्दोष आहेत त्यांनी केले ते बरोबरच केले त्यांना कोर्टाने दोषमुक्त केले पाहिजे असे ओरडत होता . जज्ज साहेब आपल्या खुर्चीवर येऊन बसले.सरकारी वकिलाने आपले म्हणणे थोडक्यात मांडले.

आरोपीने आपल्या मुलाला झोपेच्या गोळ्यांचा जाणीवपूर्वक ओव्हरडोस दिला त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला .आरोपी शिक्षेस पात्र आहे. 

एवढी तीन वाक्ये बोलून सरकारी वकील खाली बसले.आपल्याकडे ही केस यावयाला नको होती असे स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते .अत्यंत नाईलाजाने त्यांनी वरील तीन वाक्ये बोलली होती.त्यांना मनातून वामनरावांनी जे केले ते योग्यच केले असे वाटत असावे .

जज्ज साहेबांचा चेहरा नेहमी निर्विकार असे .परंतु यावेळी तो दयापूर्ण होता.ज्याप्रमाणे सरकारी वकिलाला ही केस त्यांच्याकडे नको होती असे वाटत होते  त्याचप्रमाणे जज्ज साहेबांनाही ही केस आपल्यासमोर यायला नको होती असे स्पष्टपणे  त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.आपद्धर्म केवळ आपल्याकडे सोपवलेले कर्तव्य यामुळे ते दोघेही आपापले काम करीत होते असे दिसत होते .

शेवटी जज्ज साहेबांना त्यांचे काम करणे भाग होते .त्यांनी वामनरावांना नेहमीप्रमाणे विचारले .तुम्हाला तुमचा गुन्हा मान्य आहे काय ?त्यावर वामनरावांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिले. परमेश्वराला स्मरून मी सांगतो की माझ्याकडून कोणताही गुन्हा झालेला नाही .या कोर्टापुढे आणि कायद्याप्रमाणे कदाचित जरी मला शिक्षा झाली तरी मला वरच्या कोर्टात परमेश्वराकडे शिक्षा होणार नाही .तो दयाघन माझी मनस्थिती माझी परिस्थिती समजून घेईल व मला केवळ माफच करील असे नव्हे तर तो मी केले ते योग्यच केले असे निश्चितपणे म्हणेल.

वरील वाक्ये बोलून पुढे वामनरावानी बोलण्यास सुरुवात केली .मी आज पंचावन्न वर्षांचा आहे .पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा अरविंदचा जन्म झाला त्यावेळी मी व माझी पत्नी दोघांनाही अवर्णनीय आनंद झाला होता .अरविंद गोरापान गुटगुटीत होता .तो जसजसा वाढत होता तसतसे त्याचे निरनिराळे विभ्रम पाहून आमचा आनंद गगनात मावत नसे .त्याच्या भविष्याबद्दल आम्ही अनेकदा बोलत असू .तो शाळेत जाऊ लागला .मुळातच बुद्धिमान असल्यामुळे त्याची प्रगती चांगली होती .त्याने आपला पहिला नंबर कधीही सोडला नाही .त्यासाठी त्याला विशेष  परिश्रमही करावे लागत नव्हते .पुढे यथावकाश बारावी होऊन तो कॉलेजमध्ये जाऊ लागला. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला तो होता .त्याचे वय केवळ एकोणीस वर्षांचे होते .त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता .त्याचे अनेक मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते .हास्य विनोद सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे सर्वजण घेत होते.बोलता बोलता एका मुलाने नवीन रॉयल इनफिल्ड घेतल्याचे सांगितले. सर्वजण ती गाडी पाहण्यासाठी बाहेर आले .कोरी करकरीत नवी साडेतीन हॉर्सपॉवरची म्हणजेच तीनशे पन्नास सीसीची ती गाडी पाहून त्यावरून एखादी राइड घ्यावी असे प्रत्येकालाच वाटले.अरविंदच्या मित्रांपैकी दोन तीन जणांनी त्यावरून दोन चार किलोमीटरची टेस्ट आनंद राइड घेतली .अरविंदला ही त्यावरून एक राइड घ्यावी असे वाटले .बाहेर काय चालले आहे त्याची आम्हाला कल्पना नव्हती .आम्ही आत वाढदिवसाच्या पार्टीच्या तयारीमध्ये मग्न होतो .अरविंद राइड घेण्यासाठी फाटकातून बाहेर पडला आणि थोड्या वेळात सर्व काही संपले .त्याने दुर्दैवाने हेल्मेट घातले नव्हते.वाटेत त्याला एका मोटारीने उडविले .त्या मोटारीचा ड्रायव्हर नशेमध्ये  होता .सिग्नल नसताना चौकांमध्ये सिग्नल तोडून येऊन त्याने अरविंदला ठोकर मारली .सर्वांचा उत्सवाचा वाढदिवसाचा आनंद मावळला.जो तो गुपचूप आपापल्या घरी निघून गेला . अरविंदच्या डोक्याला जबर मार बसला .त्याने हॉस्पिटलमध्ये अनेक महिने काढले . तो बरा झाला परंतु संपूर्णपणे अपंग राहिला .त्यापेक्षा तो मेला असता तर फार बरे झाले असते .त्याचा केवळ मेंदू थोडा बहुत काम करू शकत होता.हात पाय नैसर्गिक क्रिया इत्यादींवरील त्याचे नियंत्रण संपूर्णपणे नष्ट झाले होते. मांसाचा एक जिवंत गोळा असे त्याचे स्वरूप राहिले .काही लुबडे शब्द तो बोलू शकत असे.सवयीने आम्हाला त्याचे बोलणे कळत असे .बाकी कुणालाही तो काय बोलत असे ते कळत नसे .डॉक्टर त्याच्यामध्ये सुधारणा होईल असे आश्वासन काही काळ देत होते .आम्ही त्याला उत्कृष्ट वैद्यकीय ट्रीटमेंट मिळावी म्हणून अमेरिकेत जाऊन आलो .कशाचा काही उपयोग झाला नाही .शेवटी त्याच्यामध्ये काहीही सुधारणा होणार नाही असे निश्चित झाले .त्याला भरवावे लागे.त्याच्या सर्व नैसर्गिक क्रियांवरील नियंत्रण नष्ट झाले होते .आम्ही सर्व त्याचे प्रेमाने करीत होतो .त्याची अवस्था पाहून सौभाग्यवतीच्या डोळ्याचे पाणी खळत नव्हते .तिने हाय खाल्ली खंगत खंगत एके दिवशी ती मृत्यू पावली .आता सर्वस्वी मी एकटा पडलो .नर्सेस ठेवून व मी स्वतः त्याचे सर्व काही करीत असू.परंतु असे किती वर्षे चालणार .मी जर काही कारणाने मृत्यू पावलो तर त्याच्याकडे कोण बघणार.या विचाराने मला रात्र रात्र झोप येत नसे .अरविंदलाही अशा जगण्याचा कंटाळा आला होता .त्याच्या लुबड्या बोबड्या शब्दांमध्ये तो मला त्याला विष द्यायला सांगत असे .मी कायद्याचा आदर करणारा मनुष्य आहे.मी त्याला तसाच मृत्यू देऊ शकलो असतो . कदाचित डॉक्टरच्या संगनमताने मी पूर्णपणे सुटू शकलो असतो .परंतु मला तसे करावयाचे नव्हते .मी माझ्या मुलाचा खून केला असे लौकिक दृष्ट्या होणे मला पसंत नव्हते.त्याला दयामरण मिळाले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटत होते .मोडक्या तोडक्या शब्दांमध्ये अरविंदही तसेच म्हणत असे .अशा चेतनाहीन जीवनाचा त्याला उबग आला होता .त्याला शक्य असते तर त्याने केव्हाच आत्महत्या केली असती .परंतु दुर्दैवाने तेवढेही करणे त्याला शक्य नव्हते .त्या अपघातात मी मेलो का नाही असे तो सारखे म्हणत असे .

सर्व गोष्टी कायदेशीर हाव्यात म्हणून मी कोर्टाकडे दयामरणाचा अर्ज केला .जिल्हा न्यायालयापासून अत्युच्च न्यायालयापर्यंत सर्वांनी संविधानात तशी तरतूद नाही म्हणून तो अर्ज ती विनंती फेटाळली .या न्यायप्रक्रियेमध्ये दोन वर्षे गेली .शेवटी मी स्वतःच न्यायाधीश व्हायचे ठरविले .मी माझ्या समोर स्वतःच अर्ज ठेविला.दोन्ही बाजू माझ्या मीच मांडिल्या.आणि शेवटी  दयामरण द्यावे असा निकाल दिला .

आणि त्याप्रमाणे मी त्याला माझ्या काळजावर दगड ठेवून  दयामरण दिले.

मी गुन्हा केलेला नाही .मी प्राप्त परिस्थितीत न्यायच केलेला आहे.जग काहीही म्हणो कायदा काहीही म्हणो परंतु मी न्यायच केलेला आहे परमेश्वर मला नक्कीच समजून घेईल.आता तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची असेल ती द्या ती भोगण्यास मी तयार आहे .माझी विनती एकच आहे की मला मृत्युदंडाची शिक्षा जज्जसाहेबानी कृपावंत होऊन द्यावी .

जज्ज साहेबांनी पुढील प्रमाणे निकाल दिला .कायदा हा मनुष्यासाठी आहे .मनुष्य कायद्यासाठी नाही .कोणताही कायदा किंवा नियम अत्यंत कठोर अपरिवर्तनीय अलवचिक असता कामा नये .न्यायदेवता अंध आहे असे म्हणतात.परंतु न्यायदेवतेने अंध असता कामा नये .मी जो निकाल देत आहे तो  कायद्याला कदाचित मान्य होणार नाही .कदाचित वामनरावाना कुठेतरी आत वाईट वाटेल . कारण या सर्व क्लेशातून सुटण्यासाठी मृत्यू हाच त्यांचा जिवलग सखा आहे .मला स्वतःला प्रामाणिकपणे असे वाटते की त्यांनी स्वतः जज्ज बनून दया मरणाचा दिलेला निकाल बरोबर आहे .

* त्यामुळे मी त्यांची खुनाच्या आरोपातून मुक्तता करीत आहे .*

* निकालाच्या दुसऱ्या  दिवशी वामनराव आपल्या अंथरुणामध्ये मृत्यू पावलेले आढळले.*

१२/२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel