मधुकरराव अंगणातील झोपाळ्यावर बसून मंद झोका घेत होते . बरेच जण त्याला पोर्च म्हणत.परंतु मधुकररावाना कटाक्षाने त्याला अंगण म्हटलेले आवडे .मधुकररावांना घरात सर्वजण दादा म्हणत असत .झोका घेता घेता दादा काल आमोदजवळ झालेला संवाद आठवत होते. काही दिवस आमोद त्यांना त्याचे म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता. बौद्धिक दृष्ट्या तार्किक दृष्ट्या त्यांना आमोदचे बोलणे पटत होते .सर्वच गोष्टी बुद्धीने सोडविता येत नाहीत .बऱ्याच गोष्टी भावनिक स्वरूपाच्या असतात .मेंदू काय सांगतो त्यापेक्षा हृदय काय सांगते ते आपण ऐकत असतो.

जवळ जवळ साठ वर्षांपूर्वी ही बंगली दत्तोपंतांनी म्हणजे दादांच्या वडिलांनी बांधली होती .त्यावेळी हे गाव होते . गाववजा शहर किंवा शहरवजा गाव असे त्याचे स्वरूप होते.दत्तोपंतांनी त्यांच्या कोकणातील गावाहून येथे येऊन ही बंगली बांधली होती .त्याकाळी दत्तोपंत पीडब्ल्यूडीमध्ये होते.मधला काही काळ सोडला तर त्यांची बहुतेक नोकरी इथेच जिल्ह्याच्या गावी झाली होती.गावापासून फार दूर त्यानी ही बंगली बांधली होती .एक हजार स्क्वेअर मीटरचे पाच सहा प्लॉट्स सहज पडतील एवढी ही जागा होती .छोटीशी बंगली बांधून आजूबाजूला त्यांनी अनेक झाडे लावली होती .आंबा पेरू डाळिंब साखरजांब सीताफळ रामफळ अननस केळी असे अनेक प्रकार होते.त्यांनी इथे कोकणाचा छोटासा माहोल उभा केला होता.

पाण्यासाठी त्यांनी एक बोअर विहीर खणून त्यावर एक पंप बसविला होता .मधुकररावांची आई दत्तोपंतांची पत्नी सीताबाई त्या सगळ्या झाडांना पाणी देत असे.त्या काळात दत्तोपंतांना बऱ्यापैकी पगार होता.त्याचप्रमाणे वरकड उत्पन्नही होत असे.अनेकांची पीडब्ल्यूडीमध्ये अनेक कामे असत .दत्तोपंत नेहमी नियमाप्रमाणे वागत असत.त्यांनी कधी कुणाचेही काम पैशांसाठी अडवून ठेवले नाही.  त्याचप्रमाणे पैसा मिळतो म्हणून त्यांनी कुठचेही अनियमित बेकायदेशीर काम केले नाही.लोक खूष होऊन जो पैसा त्यांच्या खिशात ठेवीत तेवढाच ते घेत असत.

दत्तोपंत नोकरीला लागले त्यावेळी भाड्याच्या घरात गावात राहात होते .गावाकडील स्वतःच्या मालकीची थोडी जमीन विकून व पैसे साठवून त्यांनी ही जागा विकत घेतली होती .लांब लांब असे विखुरलेले बंगले तुरळक स्वरूपात होते.या बंगलीत दत्तोपंत राहायला आले त्यावेळी मधुकरराव म्हणजेच आपले दादा तीन चार वर्षांचे असतील .त्याच वेळी बागेतील अनेक झाडे जमिनीतून हळूहळू   वर येत होती.जमीन सुपीक असल्यामुळे थोड्याच वर्षांत झाडे वाढून दाट सावली निर्माण झाली .

या झाडांच्या सानिध्यात हळूहळू दादा मोठे झाले .त्यामुळे या बंगलीबद्दल व झाडांबद्दल त्यांच्या मनात अफाट प्रेम जिव्हाळा अापुलीक होती .गोड पेरू गोड रसाळ अांबे सीताफळ केळी अननस बागेत पिकविलेला भाजीपाला सर्वच त्यांना गोड गोड वाटत असे .पोर्चमध्ये चुकलो अंगणामध्ये टांगलेल्या झोपाळ्यावर त्यांना नीट चढता येत नव्हते,तेव्हापासून म्हणजे गेली जवळजवळ साठ वर्षे ते इथे राहात होते .ही जागा सोडून दुसरीकडे जाण्याची कल्पनासुद्धा त्यांना  असह्य वाटत असे .

गेल्या साठ वर्षांमध्ये गावाचे रूपांतर शहरात व शहराचे रूपांतर मोठ्या शहरात होत होते.आजूबाजूला अनेक बंगले उभे राहात होते .तोही काळ आता जुना वाटू लागला होता .फ्लॅट संस्कृती आली होती .चाळ संस्कृती, घर संस्कृती,बंगला संस्कृती,हळूहळू नष्ट होत होती .अनेक मजले असलेली व एकत्रित अनेक बिल्डिंग्ज असलेली अशी स्वयंपूर्ण निवास संकुले उभी राहत होती .दादांनी बँकेमध्ये जन्मभर नोकरी केली .आता ते तिथून निवृत्त होऊनही दोन तीन वर्षे झाली होती .गावात विविध प्रकारची कॉलेजेस उभी राहात होती .त्यांचा मुलगा आमोद त्याचाही जन्म या बंगलीतच झाला होता .तो शिकून आता कॉलेजात प्राध्यापक म्हणून काम करीत होता .त्यांची सून सुनंदा एलआयसीमध्ये नोकरी करीत होती.आजूबाजूला अनेक मजली इमारती उभ्या राहिल्यामुळे ,नेहमी वाहणारा वारा आता अडत होता .तरीही अंगणातील झोपाळ्यावर बसल्यावर कुठून ना कुठून मंद वाऱ्याच्या झुळका येत असत .भोवतालची झाडी गार वारा यामुळे त्यांचे घर व परिसर उठून दिसत असे.

दादांचे व आमोदचे मित्र या त्यांच्या छोट्याश्या ठिकाणाला ओअॅसिस म्हणत असत .माळरानावरील रखरखाटामध्ये यांची बंगली खरेच ओअॅसिस वाटत असे.असे सर्व चांगले चालले असताना आमोदने हे ओअॅसिस विकण्याची भाषा दादांजवळ काढली. कितीतरी दिवस एक बिल्डर आमोदच्या मागे लागला होता.त्यांच्या जागेचे पंचवीस लाख रुपये तो देणार होता.शिवाय नवीन होणार्‍या  निवास संकुलांमध्ये तो एका मजल्यावरील चार बेडरुमचा फ्लॅटही त्यांना देणार होता.दादांचे या जागेबद्दलचे प्रेम आमोदला माहित होते .हा विषय दादांजवळ कसा काढावा या विचारात तो अनेक दिवस होता.

एक दिवस हा विषय त्याने आईजवळ दादांच्या नकळत काढला .आईने नाइलाजाने संमती दिल्यावर मग त्याने हा विषय दादांजवळ काढला.बंगली बरीच जुनी झाली होती.ती पाडून आता नवीन बांधणे आवश्यक होते .त्यासाठी निदान हल्लींची महागाई  लक्षात घेता पन्नास लाख रुपये खर्च आला असता.मिळणारा चार बेडरुमचा फ्लॅट म्हणजे  हल्लीच्या काळात सोन्याचा तुकडा होता.दादा आजोबा होण्याची चाहूल लागली होती .प्रत्येकाला स्वतंत्र बेडरूम मिळून शिवाय पाहुण्यासाठी एक बेडरूम शिल्लक राहिली असती.नवीन संकुलांमध्ये जिम, पोहण्याचा तलाव, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हॉल, ज्येष्ठ मंडळींसाठी एक हॉल, जॉगिंग ट्रॅक, सर्वत्र हिरवळ, कारंजी ,दोन तीन मोटारी राहतील एवढे पार्किंग, शिवाय शाळा कॉलेजमध्ये जाण्यासाठी बस, अशा अनेक सुविधा मिळणार होत्या.सर्व बांधकाम पूर्ण होईपर्यंत एक दोन वर्षे राहण्यासाठी फ्लॅटही बिल्डर देणार होता .हे सर्व अामोदने दादांना समजावून सांगितले.हवी तेवढी निरनिराळी उत्कृष्ट फळे पंचवीस लाखांच्या व्याजामध्ये आणता येतील हे समजावून सांगितले .

दादांना हे सर्व बौद्धिक दृष्ट्या पटत होते .परंतु हृदयाला मात्र पटत नव्हते . त्यांचे बाबा निरनिराळय़ा झाडांना दादांच्या पाठचे बंधू बहिणी वगेरे म्हणत असत. त्या सर्वांना उखडून टाकायचे ओअॅसिस उद्ध्वस्त करायचे ही कल्पना त्यांना पटत नव्हती.आपण निरनिराळ्या झाडांबरोबर कसे खेळलो, कसे वाढलो, त्यांची मधुर फळे कशी चाखली,याच गोष्टी त्यांना आठवत होत्या . झोपाळ्यावर बसून मंद झोके घेत येणारा गार वारा त्यांना आठवत होता .त्यांचे लग्न झाल्यावर त्यांचा संसार या बंगली मध्येच फुलला होता .माधवी त्यांची पत्नी, तिच्या बरोबरचा श्रृंगार, तिच्याबरोबर घालविलेले येथील गोड दिवस,सर्व मधुर आठवणी त्यांना येत होत्या .बाबांचा या बंगलीवर व झाडांवर केवढा जीव होता तेही त्यांना आठवत होते.हे सर्व सोडून जायचे,हे सर्व उद्ध्वस्त करायचे त्यांच्या जिवावर आले होते.त्यांनी अमोलला विचार करून सांगतो असे म्हटले होते .मुलगा व सून घरी नसताना माधवीने त्यांच्या पत्नीने त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला .आपले असे किती दिवस राहिले आहेत .एकुलता एक मुलगा व सून यांच्या बरोबरच आपल्याला दिवस काढायचे आहेत.ती जर रंजीस नाखूष असतील तर त्याची बोच कुठे तरी रहाणारच.नवीन बंगला बांधण्यासाठी पैसा कुठून आणणार ?मुलगा सून यांचा वाढता संसार मित्र मैत्रिणी पावणा रावळा येणारा जाणारा सुनेच्या माहेरची मंडळी या सर्वांसाठी मोठी बंगली जागा आवश्यक आहे .ती आपसुकच आपल्याला मिळत आहे .प्रवाहाच्या ओघाबरोबर टिकून राहण्यासाठी आपण नमते घेतले पाहिजे .

दादांना सर्व काही समजत होते. सर्व काही पटत होते.परंतु ह्रदय मात्र नाखूष होते.या सर्व गोष्टी दादांना आठवत होत्या.मंद झोके घेत वाऱ्याच्या झुळका अंगावर घेत परिसरातील झाडाकडे पाहत त्यानी शेवटी अामोदला होकार देण्याचे निश्चित केले.

आमोदचे दादांवर नितांत प्रेम होते. दादांना काय वाटत असेल त्याची त्याला पूर्ण कल्पना होती .दादांना न दुखविता त्याला सर्व काही व्यवस्थित व्हावे असे वाटत होते .त्यावर त्याने बिल्डर जवळ बोलून एक तोडगाही काढला होता .मिळणार्‍या  पंचवीस लाखांमध्ये गावापासून दूर पंचवीस तीस किलोमीटरवर एखादी जागा घ्यावी त्या ठिकाणी फार्म हाऊस बांधावे .तिथे येथील झोपाळा अंगणात टांगावा.शक्य असतील त्या सर्व झाडांचे येथून व्यवस्थित उच्चाटन करून ती तिथे बागेत लावावीत .आजच्या विज्ञानाला ते सहज शक्य आहे.सुट्यांमध्ये विकएंडला फार्म हाऊसवर सर्वांना जाता येईल. दादा आईची प्रकृती चांगली असेल त्यांना वाटत असेल तर ते तिथेही काही दिवस राहतील.या योजनेमुळे दादा व आई कसनुसे होणार नाहीत .ज्यांना ते आपले भाऊ बहिण समजतात, ती झाडे तिथे सुरक्षित असतील .बिल्डर जवळ आपली कल्पना बोलून त्याने त्याच्या मदतीने तशी एक चांगली जागाही पाहून ठेवली होती.बिल्डर फार्म हाऊस उभारण्यासाठी पूर्ण सहाय्य करणार होता .

दादा मंद झोके घेत विचार करीत असताना आमोदची मोटार येऊन थांबली.दादांनी त्याला फ्रेश होऊन ये मला तुझ्याजवळ काही बोलायचे आहे असे सांगितले .आमोद फ्रेश होऊन आल्यावर  त्याने काल सुचविलेल्या योजनेला पूर्ण संमती दर्शविली .तोंडाने संमती देत असताना त्यांच्या चेहर्‍यावर पसरलेली नाखुषी अामोदच्या लक्षात आली. तो खुर्चीतून उठून दादांच्या शेजारी झोपाळ्यावर येऊन बसला.त्यांचे हात त्याने  आपल्या हातात घेतले.हजार शब्द जी भावना पोचवू शकत नाहीत ती भावना एक स्पर्श सहज पोचवतो.दादांना आमोदला काय म्हणायचे आहे ते न सांगता लक्षात आले.त्यांनीही आमोदचे हात घट्ट धरले. 

आमोदने फार्म हाऊसची योजना दादांना संपूर्णपणे समजावून सांगितली.फार्म हाऊस,आपली सर्व झाडे जगणार, झोपाळा राहणार,हे ऐकून दादांना आपण दहा वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटले . आमोद आपली किती काळजी घेतो, आपल्या मनातील विचार किती अचूक समजतो आणि त्याप्रमाणे कसा वागतो हे पाहून त्यांचे डोळे भरून आले .

दुसऱ्या दिवशी आमोद बरोबर फार्म हाऊसची जागा बघण्यासाठी सर्व कुटुंबीय गेले.जागा व कल्पना सर्वांनाच खूप पसंत पडली.बिल्डरने सहा महिन्यांमध्ये बंगली व सर्व झाडे तिथे लावून दिली.फार्म हाऊसवर आऊटहाऊस बांधून तिथे एक माळी कायमचा कामासाठी व राखणदार म्हणून ठेविला . दोन वर्षांत नवीन निवास संकुल बांधून पूर्ण झाले.दादा व माधवी केव्हा इकडे तर केव्हा फार्म हाऊसवर राहात असतात.

दादांचा आवडता जुना झोपाळा नवीन फार्म हाऊसच्या अंगणात बांधला आहे .त्यांचे भाऊ बहिण समोर पाणी पिऊन वाऱ्यावर डोलत असताना दिसतात .दादा झोपाळ्यावर बसून पायाने झोका हलवीत सर्वत्र पाहात असतात.माळ्यावर लक्ष ठेवीत असतात .त्याला सूचना करीत असतात .माधवी त्यांच्या शेजारी झोपाळ्यावर येऊन बसते .दोघांनाही शहरातील जुने दिवस आठवतात .

*झोपाळ्यावर कुणी नसते त्यावेळीही वाऱ्यावर झोपाळा मंद डुलत असतो*

२१/३/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel