माधव व माधवी हे आदर्श जोडपे होते .माधवची सीए फर्म होती आणि ती छान चालली होती .माधवी स्त्रीरोगतज्ञ होती तिचा दवाखाना होता आणि तोही व्यवस्थित चालला होता .दोघेही सबंध दिवसभर आपापल्या कामात व्यस्त असत .त्यांना दोन मुले होती मोठा मुलगा वय वर्षे चौदा लहान मुलगी वय वर्षे अकरा .आपापल्या कामांमधून त्यांना रविवार सुटी मिळे.माधवी स्त्रीरोगतज्ञ असल्यामुळे एखादी इमर्जन्सी आली तर तिला रविवारीही काम करावे लागे.
रविवार निरनिराळ्या कामांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये केव्हा संपला ते त्यांना कळत नसे .घरात जरी नोकरचाकर असले तरी स्वतः करावयाची अशी अनेक कामे असत.त्याशिवाय मित्रांच्या मैत्रिणींच्या भेटीगाठी किंवा इतर काही कामे असत.
माधवचे आई वडील वृद्ध होते .आईचे वय सुमारे शहात्तर तर वडिलांचे वय सुमारे ऐशी होते.दोघेही नेहमी घरातच असत.वय व प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे हिंडणे शक्य नव्हते . एकेकाळी दोघेही प्रचंड अॅक्टिव्ह होती .प्रवास मित्रमंडळींच्या बैठकी नातेवाईकांच्या भेटी यांमध्ये दोघेही व्यस्त असत व आनंद लुटत असत .जसे वय वाढत गेले तसे निरनिराळ्या रोगांनी शरीरात घर केले. बीपी डायबेटीस संधिवात पार्किन्सन इत्यादी .गोळ्या वगैरे व्यवस्थित चालू असल्यानंतर तशी दोघे व्यवस्थित टुणटुणीत वाटत .परंतु बाहेर फिरायला जाणे कुणाच्या आधाराशिवाय शक्य नसे.जरी ड्रायव्हर असला तरी त्यांना आपल्याबरोबर कुणीतरी सहाय्यक (आपला माणूस) असल्याशिवाय फिरता येणे शक्य नसे.
औद्योगिकरण नागरीकरण लोकसंख्या विस्तार इत्यादीमुळे शहर झपाट्याने विस्तारत होते. स्वाभाविक उत्सुकतेपोटी शहराची किती कुठे कशी वाढ झाली ते पाहावे असे वाटे.त्यांच्या तरुणपणात लोकसंख्या कमी असल्यामुळे व एकूणच लोकांची आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे हॉटेल व्यवसाय फारच नगण्य स्वरूपात होता .हॉटेलात जेवायला जाण्याची प्रथाही विशेष नव्हती .व्यवस्थित जेवणही क्वचित कुठेतरी मिळत असे .घरी जरी सर्व प्रकारचे जेवण शिजवले जात असले तरी हॉटेलात जाऊन जेवण्याची मजा काही निराळीच होती.त्यांच्या तरुणपणात छोटी छोटी दुकाने होती हल्ली मोठे मॉल झाल्याचे ते जाहिरातीच्या स्वरूपात वर्तमानपत्रातून वाचत असत .पूर्वी सिनेमा थिएटर्स ही छोटी वेगळ्या प्रकारची होती .हल्ली एकाच इमारतीत प्रत्येक मजल्यावर सिनेमागृह वगैरे सुरू झाले होते .घरी जरी टीव्हीवर किंवा प्रोजेक्टरच्या मार्फत कोणताही सिनेमा बघता येत असला तरी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याची गंमत ती वेगळीच .त्याचप्रमाणे हॉटेलात जाऊन जेवण्याची गंमत तीही वेगळीच .
सर्वच वृद्ध व्यक्तींचे वरीलप्रमाणे विचार असणे स्वाभाविक आहे .त्यांना आतून तसे वाटणे संयुक्तिक आहे .जे नेहमी बाहेर फिरत असतात त्यांना या गोष्टी चटकन लक्षात येत नाहीत.त्यासाठी प्रचंड संवेदनशीलता व प्रेम आवश्यक असते .बर्याच वेळा अशा गोष्टी लक्षात येत नाहीत किंवा आल्या तरी त्याकडे कानाडोळा केला जातो .अनेक वेळा आपल्याला वेळ नाही असे तरुणांना वाटते .जसा आपण इतर कामांसाठी वेळ काढतो निश्चित करतो तसा तो या कामासाठीही निश्चित केला पाहिजे असे बर्याच जणांच्या लक्षात येत नाही . आई वडिलांना सांभाळणे हेच कित्येकांना जड वाटते .तिथे त्यांच्या भावना जाणून घेऊन त्याप्रमाणे त्यांना निरनिराळ्या ठिकाणी फिरवणे ही तर अशक्यप्राय गोष्ट .आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारी तरुण जोडपी दिसतात .अमेरिका ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी जाऊन भारतातील आईवडिलांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करणारी जोडपीही दिसतात . जरी आर्थिक स्वातंत्र्य असले तरी वृद्धपणी मायेचा आसरा आधार हवासा नेहमी वाटतो .पैसा सर्वच गोष्टी मिळवून देऊ शकत नाही .
मनुष्य बऱ्याच वेळा र्हस्व दृष्टीचा असतो.त्याला तत्कालिक मजा व आनंद दिसत असतो.आपणही कधीकाळी वृद्ध होणार आहोत हे तो विसरलेला असतो . केव्हा केव्हा निरनिराळ्या कामामुळे आपण वेळ देऊ शकत नाही असे त्याला प्रामाणिकपणे वाटत असते. लिहिता लिहिता बरेच विषयांतर झाले .किंवा विषयाला धरूनच बरेचसे विचार सहज मांडले गेले .
तर आपले माधव व माधवी आणि त्यांची मुले वरील प्रकारची नव्हती . अत्यंत संवेदनशील व पितृमातृभक्त अशी ती दोघे होती.कितीही कामे असोत त्यांनी एक नियम स्वतःवरच घालून ठेवला होता .दर पंधरा दिवसांनी आई वडिलांना दोघांनाही बाहेर घेऊन कुठे तरी निदान एक तासभर तरी जायचेच.त्याच वेळेला शक्य असेल तर ती आपल्या मुलांना म्हणजेच आजोबा आजींच्या नातवंडांनाही बरोबर घेत असत. एका पंधरवड्यात दोघांनाही घेऊन शहराच्या कुठल्या तरी भागांमध्ये ती दोघांना फिरवून आणित.कटाक्षाने गाडी हळू चालवावयाची मधून मधून रस्त्याच्या कडेला ती थांबवावयाची व अशा प्रकारे दोघांनाही गावाचे दर्शन व्यवस्थित होईल त्यांना आनंद होईल इकडे कटाक्षाने लक्ष द्यायचे .कधी देवदर्शन कधी शहरदर्शन कधी मॉल दर्शन कधी चित्रपट दर्शन त्यांच्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे कलाप्रमाणे ते घडवून आणित असत.त्याचप्रमाणे त्यांना कटाक्षाने निरनिराळया हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जात असत.दर पंधरा दिवसातून एक किंवा दोन तास ते आई वडिलांसाठी आरक्षित ठेवीत असत .मुलांना बरोबर नेल्यानंतर त्यांची आजोबा आजींना सांभाळण्यासाठी मदत तर होतच असे परंतु त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे योग्य वयात त्यांच्यावर योग्य संस्कार होत असत.
असेच एकदा ते आई वडिलांना घेऊन एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते .आई व्हिलचेअरवर होत्या तर वडील काठी घेऊन चालत होते .आईची व्हीलचेअर स्वतः माधव ढकलीत होता .तर माधवी वडिलांना आधार देऊन हळूहळू नेत होती .मुलांच्या आपापसात गप्पा चालल्या होत्या तरीही त्यांचे आजोबा आजींकडे पूर्ण लक्ष होते. या सहाजणांकडे आत येत असताना व कोपर्यातील टेबलावर स्थानापन्न होत असताना सर्वांचे लक्ष गेले होते. निरनिराळ्या वयोगटातील लोकांच्या चेहऱ्यावर निरनिराळे भाव त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार उमटलेले स्पष्टपणे दिसत होते.
या आनंदी वातावरणात हे कोण थेरडे इथे आले ?
या दोघांनी जेवायला यायचे सोडून बरोबर हे लोढणे कशाला घेऊन आले आहेत ?
बहुधा आई वडिलांजवळ खूप पैसा असावा तो आपल्यालाच मिळावा या इच्छेने ही चापलुसी चाललेली असावी .
कुणी का येईना आणि जाईना आपल्याला काय करायचे आहे ?
कधीतरी आपणही असेच वृद्ध होणार त्यावेळी आपल्याला आपली मुले अशाप्रकारे प्रेमाने वागवतील का?
आपण आत्तापर्यंत आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष केले त्यांच्या भावना ओळखल्या नाहीत आता मात्र त्यांना घेऊन जेवायला यायचेच .
अशी आदर्श मुले प्रत्येक आई वडिलांना मिळावीत .
हे आई वडील किती भाग्याचे आहेत .
हे षटकोनी कुटुंब एखाद्या ताजमहाला प्रमाणे सुंदर आहे .
या दोघांना प्रेमाचा पुरस्कार प्रदान केला पाहिजे .
अशी संवेदनशीलता सर्वांजवळ असेल तर जग किती सुंदर होईल .
वेटर व सर्व ग्राहकांचे लक्ष या षटकडीकडे लागले होते .
त्या दोघांचे म्हणजेच माधव माधवी यांचे लक्ष मात्र आपल्या आई वडिलांना जपून नेऊन जाग्यावर व्यवस्थितपणे बसवण्याकडे होते .
त्यानंतर निरनिराळया पदार्थांची ऑर्डर देण्यात आली .आई वडील व्यवस्थित जेवीत आहेत की नाही याकडे त्या चौघांचेही लक्ष होते .अर्थात त्यांचेही जेवण चालले होते .आई वडिलांना रुचणारे पदार्थ त्यांच्यासाठी,मुलांना हवे असलेले पदार्थ त्यांच्यासाठी , तर त्या दोघांना रुचणारे आवडणारे पदार्थ त्यांच्यासाठी अशा ऑर्डर्स दिल्या जात होत्या .वडिलांना पार्किंन्सनचा त्रास असल्यामुळे हाताने किंवा चमचाने त्यांना नीट जेवता येत नव्हते.त्यांना मुलाने किंवा सुनेने भरवलेलेही आवडत नव्हते .आपण स्वयंपूर्ण असावे असे वडिलांना स्वाभाविकपणे वाटत होते .स्वतःच्या हाताने किंवा हातात चमचा घेऊन जेवणातील आनंद वेगळा .दुसऱ्याने भरविल्यामुळे तो आनंद मिळत नाही .शिवाय आपल्या अपंगत्वाची जाणीव प्रकर्षांने होते तो भाग निराळाच. जेवतांना वडिलांचे काही वेळा शर्टवर सूप अन्न सांडत होते .मुलगा तत्परतेने टिप कागदाने ते टिपून घेत होता .एका बाजूला तो स्वतः जेवतही होता .नात व नातू आजोबा व आजीच्या बाजूला बसून त्यांना हे खा ते खा हे चांगले आहे ते चांगले आहे याला अमुक म्हणतात त्याला तमुक म्हणतात वगैरे चिवचिवाट करीत होती .माधवीही सासूकडे पूर्णपणे लक्ष देत होती .हे सर्व करताना आपण विशेष काही करीत आहोत असा कोणताही भाव कोणाच्याही चेहऱ्यावर नव्हता .अत्यंत सहजपणे गप्पा मारीत त्यांचे जेवण चालले होते. हॉटेलमधील काही लोक किंवा नवीन येणारे ग्राहक आपल्याकडे पाहात आहेत हे त्यांच्या गावीही नव्हते.
माधवने वडिलांना त्यांचे जेवण झाल्यावर वॉशरुममध्ये नेले .बरोबर मदतीला नातू होताच .त्यांचे शर्टवर किंवा पँटवर सांडलेले अन्न व्यवस्थित साफ करून टाकले .त्यांची शर्ट पॅन्ट चष्मा ठाकठीक केला .व त्यांना हाताला धरून सावकाश त्यांच्या कलाने तोलाने बाहेर आणले .
माधवीने ही सासू बाईंकडे संपूर्ण लक्ष देऊन त्यांची साडी ठाकठीक केली .यावेळी माधवी व नात त्यांची व्हिलचेअर ढकलीत होती .ती सहाजण हॉटेल बाहेर पडत असताना हॉटेलमधील एका वयस्कर गृहस्थाने त्यांना अहो महाशय म्हणून हाक मारली .माधवने मागे वळून पाहिले.ती वयस्कर व्यक्ती म्हणाली की तुम्ही काहीतरी मागे सोडून जात आहात तुमच्या ही गोष्ट लक्षात आली आहे का?
माधवने आपले खिसे चाचपले व तो म्हणाला की मी सर्व काही बरोबर घेतले आहे .
त्यावर ती व्यक्ती हसून म्हणाली की मी त्याबाबतीत बोलत नाही माझा मुद्दा वेगळाच आहे.
*तुम्ही इथे असलेल्या प्रत्येक मुलासाठी आदर्श ठेवत आहात व त्याच प्रमाणे प्रत्येक पित्याच्या मनांमध्ये आशेची ज्योत लावत आहात *
या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या नाहीत परंतु इथे असलेल्या प्रत्येकाच्या लक्षात आलेल्या आहेत.या त्या वयस्कर माणसाच्या बोलण्यावर त्या हॉलमधील सर्व ग्राहकांनी उठून त्या चौघांच्या सन्मानार्थ टाळ्या वाजविल्या .
२२/१/२०१९©प्रभाकर पटवर्धन