मराठेशाही बुडविल्याचा दोष दुसऱ्या बाजीरावावर सहजच येतो, व त्या दोषास धनी होण्याइतकी त्याची लायकीहि होती यांत शंका नाही; पण एक तर एका रावबाजीशिवाय ज्याला सामान्यतः नादान म्हणता येईल असा कदाचित् नारायणरावाखेरीज पेशवाईत दुसरा पुरुषच झाला नाही ही गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे. सवाई माधवराव अल्प वयांत वारला व त्याच्या नांवाने राज्यकारभार चालत असला तरी तो  सर्व नाना फडणवीस चालवीत असे.

 

अर्थात् राज्यरक्षणाच्या दृष्टीने सवाई माधवरावाच्या कारकीर्दीस नांव ठेवण्यास जागा उरत नाही. रघुनाथराव स्त्रैण होता तरी तलवारबहाद्दर होता व या दृष्टीने राज्यरक्षणास त्याचा उपयोगच झाला असता. या सर्वांवरून निदान एवढें खास म्हणतां येईल की, सतराशे चौदापासून सतराशें नव्याण्णवपर्यंत मराठी राज्याची चढतीच कमान होती, व खडर्याच्या लढाईपर्यंत मराठी दौलतीचा जो डौल होता तो तसाच पुढे टिकता तर मराठी राज्य बुडण्याचे काहीच कारण नव्हते.

 

मराठ्यांच्या राज्यांत ब्राह्मण पेशवे हे जसे उदयास आले व मराठ्यांनी त्यांस उदयास आणले तसेच ब्राह्मण पेशव्यांच्या अमदानीत त्यांनी शिंदे, होळकर, गायकवाड यांसारखे मराठे सरदार उदयास आणले. मराठी राज्य टिकविण्याची जबाबदारी एकट्या पेशव्यांवरच होती असें म्हणतां येत नाही.

 

पेशवे, रास्ते, पटवर्धन या ब्राह्मण सरदारांइतकीच सातारकर महाराजांवर व शिंदे, होळकर, गायकवाड या मराठे सरदारांवरहि ती होती. सातारच्या दरबारांत पेशव्यांस वरिष्ठ मान होता तो माधवराव पेशव्यांपर्यंत त्यांच्या कर्तबगारीमुळे सकारणच होता.

 

शाहूमहाराज कधीहि पेशव्यांच्या कैदेत नव्हते व त्यांच्या मागून आलेल्या सातारच्या गादीच्या धन्यास कैद झाली असल्यास तीहि त्यांच्या नादानपणामुळे सकारणच होती. सातारचे गादीचा अभिमान शिंदे, होळकर, गायकवाड वगैरे ब्राह्मणेतर सरदारांस होता किंवा नव्हता यांपैकी एक कांहींतरी निश्चित म्हटले पाहिजे.

 

त्यांना हा अभिमान नव्हता म्हटले म्हणजे पेशव्यांवरील दोषारोपांचा सर्वच ग्रंथ आटोपला. उलटपक्षी त्यांना हा अभिमान होता असे म्हटले तर त्यांना पेशव्यांस बाजूस ठेवून व सातारकर महाराजांचें नांव पुढे करून राज्यकारभार चालविण्याचा उद्योग करण्यास नको कोणी म्हटले होते ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel