पण शिंदे, होळकर व गायकवाड यांच्या मनांत सातारच्या गादीचा विशेष अभिमान धरण्याचे कधी आले असें कागदपत्रांवरून दिसत नाही. शिंदेहोळकरांनी मुलुख मिळविला तो सर्व उत्तराहिंदुस्थानांत व तेथे त्यांनी स्वतंत्र होऊन राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला.

 

शिंद्यांनी तर सालबाईच्या तहाच्या वेळी स्वतःस स्वतंत्र संस्थानिक बनवून पेशवे किंवा सातारकर महाराज यांपैकी कोणाचाच मुलाजा ठेवला नाही. यावर कदाचित् कोणी असें म्हणेल की, शिंदे होळकर गायकवाड हे मूळ पेशव्यांच्या अमदानीत प्रत्यक्ष उदयास आले; त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुषांस पेशव्यांनीच हाताशी धरून प्रथम सरदार बनविलें, यामुळे त्यांना पेशवे हेच आपले धनी असें वाटे, व एका अर्थाने हे खरेंहि आहे.

 

राणोजी शिंद्याने पहिल्या बाजीरावाचे जोडे उरावर संभाळून व इमानाची परीक्षा देऊन सरदारी मिळविली व त्याचा मुलगा महादजी यानेंहि उत्तर हिंदुस्थानांत पराक्रम करून दिगंत कीर्ति मिळविली तरीहि तो पेशव्यांच्या चरणपादुकांना विसरला नाहीं व सवाईमाधवरावास दिल्लीच्या बादशहाकडून आणलेली वकीलमुतालकीची वस्त्रे ज्या हाताने अर्पण करून पेशवाईच्या ऐश्वर्यात भर घातली, त्याच हाताने त्याने सवाईमाधवरावांचे जोडे उचलले! शिंद्यांच्या दौलतीच्या भूषणांत पेशव्यांचे जोडे राखून ठेवण्यात आले होते असे ग्रँट डफ म्हणतो! पण महादजीच्या वेळेपर्यंत शिंद्यांनी पेशव्यांच्या गादीशी में इमान राखलें तें पुढे दौलतराव शिंद्याने कितपत पाळले?

 

दुसरा बाजीराव नादान म्हणून आपल्या धन्याला प्रतिबंधांत ठेवण्याचा हक्क जर शिंदेहोळकरांस पोहोचत होता तर पेशवे किंवा फडणवीस यांनाहि सातारकर महाराज नादान वाटल्यास त्यांनाहि प्रतिबंधांत ठेवण्याचा हक्क का पोहोचूं नये?

 

सातारचे राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या नात्यानेच पहावयाचे तर शिंद्यांनी कोल्हापुरकरांवर फौज का न्यावी? कोल्हापुरकर झाले तरी छत्रपती शिवाजी   महाराजांचे वंशजच होते.

 

 

शिंदे व होळकर यांनी इंग्रजांशी शेवटी जे तह केले त्यांत त्यांनी सातारच्या गादीची किंवा सर्व. साधारणरीत्या छत्रपती शिवाजी  च्या वंशजांची आठवण ठेविली होती असे दिसत नाही. सर्व गोष्टीतली गोष्ट ही की, पेशवाई बुडाल्यानंतर छोटेंसें कां होईना, पण इंग्रजांनी सातारकर महाराजांस स्वतंत्र राज्य दिले होते तें तरी सातारकरांनी कोठे टिकविले? पेशवाईच्या नाशानंतर अवघ्या ३० वर्षांत हेहि राज्य बुडालेंच की नाही?  बरें, इंग्रज सर्वच बुडवावयास निघाले होते असे म्हणावे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचें एक राज्य अद्याप कोल्हापुरास व पेशव्यांचे सरदार शिंदे व होळकर यांची राज्य उत्तर हिंदुस्थानांत अद्यापि जिवंत आहेत!

 

या सर्व गोष्टींचा विचार करतां मराठेशाही बुडण्यास अमुक एकच पुरुष किंवा अमुक एकच घराणे अथवा जात कारणीभूत झाली असे म्हणता येत नाही. इंग्रजी सत्तेचा पूर आला म्हणून कोणत्या तरी निमित्ताने त्या पुरांत मराठी राज्ये वाहून गेली व पुरांत झाले तरी सर्वच झाडे उन्मळून पडतात असे नाही, कांहीं टिकतातही. या न्यायाने वर दर्शविल्याप्रमाणे काही मराठी राज्ये अद्यापि टिकून आहेत.

 

मराठी पातशाही बुडविली असा आरोप करून ब्राह्मणांना दोष देणारे जसे काही असमंजस लोक आढळतात, तसेच पेशवाईच्या अखेर इंग्रजांशी परस्पर राजकारण करून आपली बंधमुक्तता करूं पाहण्याचा प्रयत्न केल्याचा दोषारोप सातारच्या दरबारावर करून पेशवाई बुडविण्यास त्यांनी मदत केली असे म्हणणारे असमंजस लोकहि काही आढळतात. पेशवे नोकर व सातारकर महाराज धनी हे नाते लक्षात घेतां पेशव्यांनी त्यांना कैदेत ठेवणे अयोग्य होते असे एका दृष्टीने म्हणतां तरी येईल; पण आपणास कैदेत टाकणाऱ्या नोकराविरुद्ध व तीहि स्वतःच्या बंधमुक्ततेकरितां इंग्रजांपाशी दाद मागण्याने सातारकर धन्यास बेइमानीचे लांछन कसे लागू शकते हे समजणे कठिण आहे.

 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel