इंग्रज लोक हिंदुस्थानांत प्रथम व्यापारी वेषाने आले व नंतर हळूहळू त्यांनी राज्य स्थापन केले. या गोष्टीस अनुलक्षून पुष्कळांस कदाचित् असा प्रश्न सुचत असेल की,
"मराठ्यांची मूळ चूक हीच झाली नाही काय की, त्यांनी इंग्रजांना आपल्या देशांत व्यापाराची परवानगी दिली?"
पण असला प्रश्न समजसपणाचा आहे असे आम्हांस वाटत नाही. आजचे विचार जुन्या काळाला लावण्याची चूक मनुष्य नेहमी करीत असतो. ज्या वेळी इंग्रज लोक व्यापार करण्यास प्रथम हिंदुस्थानांत आले त्या वेळी हे आपल्या देशांत न आलेले बरे असे वाटण्यास काहीच कारण नव्हते. पुढे हे लोक आपणांस भारी होऊन आपले राज्य घेतील असें दुःस्वप्न मराठ्यांना त्या वेळी पडले नाही. कारण, त्यांच्या वेळच्या व त्यांना माहीत असलेल्या जगाच्या पूर्वीच्या इतिहासांत हातांमध्ये प्रथम तागडी घेऊन येऊन मागाहून तख्त बळकावल्याचे उदाहरण घडलेले नव्हतें. वैश्यवृत्ति व क्षात्रवृत्ति या वेगळ्या आहेत, त्यांची अदलाबदल होऊ शकत नाही, किंबहुना वर्ण हा वृत्तिनिष्ठ असल्यामुळे वृत्तिसंकर म्हणजे तो एक वर्णसंकरच अर्थात् पाप होय; व हे पाप कोणी म्हणजे परके लोकहि करीत नसतात, असे चातुर्वर्ण्यावर विश्वास ठेवणाऱ्या हिंदी लोकांस वाटले असल्यास नवल नाहीं !
महाराष्ट्र देशांत मारवाडी वगैरे वैश्यवृत्तीचे लोक अनेक झाले व त्यांनी व्यापाराकरितां देशांतरही केले; पण त्यांच्यापैकी कोणी राज्याची आकांक्षा धरल्याचा अनुभव नव्हता. मोंगल वगैरे यवन इकडे येऊन त्यांनी राज्य स्थापिली ही गोष्ट खरी, पण ते उघड उघड जेते न राज्य म्हणूनच आले, व्यापारी म्हणून आले नव्हते. अर्थात् व्यापाऱ्याची जात वेगळी व राज्य करणाराची जात वेगळी, तिची अदलाबदल होऊ शकत नाही, असाच त्या वेळच्या मराठ्यांचा विश्वास असावा असे वाटते; आणि तसा तो असल्यास चूक म्हणतां येत नाही!
आपल्या हातांतून तागडी गळून पडली केव्हां, तलवार तेथे आली केव्हां व आपल्या बुडाखाली तख्त बसलें केव्हां हे स्वतः इंग्रजांचे इंग्रजांनाच जर कळले नाही, सर्व प्रकार जर त्यांमाहि स्वप्नसाक्षात्काराप्रमाणे झोंपेंतच झाला तर मराठयांना तरी टोपीकर पहिल्याने डोळ्यांस दिसतांच हे पुढे आपले राज्य घेणार असें कसें वाटावें ? व त्यांना आपल्या राज्यांत राहूं देण्यास प्रतिबंध करण्याची बुद्धि त्यांना कशी व्हावी ? उलटपक्षी, ते आपल्या राज्यांत आले तर बरें असेंच वाटले असावे.
'स्वदेशी'चा मंत्र मनुष्याला फक्त प्रसंगविशेषींच म्हणजे आपत्तीच्या किंवा विपत्तीच्या विशेष प्रसंगींच आठवतो, सुस्थितीत आठवत नाही हे प्रसिद्धच आहे. मूर्तिमंत समंद पुढे येऊन उभा राहिला म्हणजे मग तोंडांत रामनाम येते! हिंदी लोकांना बंगालच्या फाळणीनंतर 'स्वदेशी' आठवली व इंग्रजांना ती सांप्रतच्या महायुद्धानंतर आठवली !
इंग्रज हिंदुस्थानांत आले तेव्हां हिंदी लोक सुस्थितीत होते, तेव्हां त्यांना आजच्या अर्थाने 'स्वदेशी' कशी सुचणार? मनुष्य हा स्वभावतः विलासप्रियच असतो. सांपत्तिक सुस्थिति असली म्हणजे विलासबुद्धि सहजच बळावते. शिवाय असा कोणताहि देश नाही की, ज्याला सर्व प्रकारच्या कारागिरीचा किंवा कला- कौशल्याचा मक्ता ईश्वराने दिला आहे. म्हणून चैनीचे व विलासाचे पदार्थ मिळतील तेथून, आपपरभाव न ठेवतां मनुष्यास विकत घ्यावे लागतात. एरवीं चैन किंवा विलासबुद्धि पुरी होत नाही.
हिंदुस्थानांत इंग्रज हेच काही पहिले विदेशी व्यापारी आले नव्हते. त्यांच्यापूर्वी पोर्तुगीज, त्यांच्या. पूर्वी डच, त्यांच्यापूर्वी यवन असे अनेक परकीय लोक इकडे व्यापाराकरितां येत असून परदेशी माल विकत घेण्याचा परिपाठ इकडे सर्रास पडलेला होता. बरें, मराठे कांहीं एकच सर्वसत्ताधारी नव्हते. त्यांचा मुलुख आधीच थोडा, त्याला समुद्रकिनाऱ्याची एकच पट्टी व या पट्टीत इंग्रजांचा व्यापार फारच थोडा होता. त्यांचा व्यापाराचा भर मराठयांच्या हाती नसलेल्या मुलखांतच विशेष होता.व या इतर मुलखांतच, ते आधीच इतके बळावले होते की, मराठ्यांनी त्यांना आपल्या मुलखांत येऊ न दिल्याने हिंदुस्थानांतून त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागता अशी स्थिति नव्हती.
तात्पर्य, इंग्रजांच्या व्यापाराला प्रतिबंध करून त्यांना सुरवातीस आपल्या राज्यांत बहिष्कार घालणे हे त्या वेळी स्वाभाविक किंवा शक्य नव्हते. पण याच्याहि पलीकडे जाऊन असे म्हणता येईल की, इंग्रज व्यापा-यांस प्रतिबंध न करितां त्यांना उत्तेजन व सवलती देऊन आपल्या राज्यांत बोलावणे हेच अधिक स्वाभाविक असून त्या वेळच्या मराठ्यांना इष्टहि वाटले असले पाहिजे.
व्यापारी म्हटला की, तो आपणाकडे ओढावा, त्यापासून त्याचा फायदा असला तरी आपलाहि आहे, हे मनुष्यमात्राला उपजत बुद्धीचे अर्थशास्त्रच शिकवते. घरी चालत आलेला सौदागर घालवून दिला असे जगाच्या चरित्रांतील कोणत्याहि राष्ट्राच्या इतिहासांत आढळणार नाही. आपल्या कारागिरांत उत्तेजन देणे वेगळे व परकी व्यापाऱ्यांवर बहिष्कार घालणे वेगळे. किंबहुना स्वदेशी कारागिरीचे चीज व फैलाव होण्यास परकी व्यापाऱ्यांची मदत घेणेच जरूर असते. आपला कारागिरीचा माल परदेशांत गेला तरच त्याला भारी किंमत येते; कारण त्याची अपूर्वाई तेथेच विशेष. तसेंच आयात मालावरील जकातीचे उत्पनहि बरेंच असते. ते सुखासुखी कोण गमावणार?
या नियमास अनुसरून त्या काळी परक्या व्यापाऱ्यांची हिंदुस्थानांत चहा होत असे कारण त्यांच्या हातून कोट्यावधि रुपयांचा देशी कारागिरीचा माल परदेशास जाऊन त्याच्या मोबदला मौल्यवान् सोने रुपें वगैरे हिंदुस्थानांत येई. शिवाय इकडे पैदा न होणारे उपयुक्त व चैनीचे असेहि अनेक जिन्नस त्यांच्या मार्फत मिळत; अशा प्रकारे त्यांच्यापासून दुहेरी फायदा होई तो कोण टाकून देणार ? व तो टाकावयाचा कां, तर हे व्यापारी पुढे. मागें शिरजोर व सत्ताधीश होऊन आपला व्यापार बुडवितील आणि आपले राजकीय स्वातंत्र्य हिरावून घेतील म्हणून?
आमच्या पूर्वजांना भावी सर्व इतिहास करपुतळीत दिसणाऱ्या भविष्याप्रमाणे कोणी दाखविला असता तर त्यांनी व्यापारी वेषाच्या इंग्रजांचे उंटाचे पिल्लू तेव्हांच घरांत घुसू दिले नसतें ! पण तसे भविष्यचित्र त्यांना दिसले नाही व तें जर दिसले नाही तर त्यांना परकी व्यापाऱ्यांवर बहिष्कार न घातल्याबद्दल दोषहि देता येत नाही.
"कां न सदन बांधावे की, त्यांत पुढे बिळें करिल घूस ?" हाच न्याय या कामी लागू पडतो.
शिवाय इंग्रज व्यापाऱ्यांनी हिंदुस्थानांत राज्य स्थापणे हे घरांत घूस शिरण्याइतकेंहि स्वाभाविक मानतां येत नाही. तो केवळ दैवगतीचा फेरा होय पण ती तत्कालीन मराठ्यांच्या व्यापारी धोरणाची चूक नव्हे.