माधवराव अंथरुणाला खिळले होते .त्यांचे नाव महादेव होते परंतु सर्वजण त्यांना माधवराव म्हणत.आज सहा महिने झाले होते.सर्दी खोकला यांचे निमित्त झाले आणि नंतर पुढे बारीक ताप येऊ लागला .डॉक्टरनी अनेक औषधे दिली. डॉक्टरही बदलून झाले .अनेक तपासण्या झाल्या परंतु काहीही गुण येत नव्हता .माधवराव हळूहळू खंगत चालले होते .सुरुवातीला ते तसेच नोकरीवर जात होते .परंतु पुढे अशक्तपणामुळे त्यांना नोकरीवर जाणे जमत नाहीसे झाले. भरपगारी रजा, अर्धपगारी रजा,संपून गेली आणि आता ते बिनपगारी रजेवर होते .ते  कोकणातील मालवण जवळील एका गावचे होते.त्यांना रेल्वेमध्ये नोकरी होती .हल्ली ते बंगलोर येथे रेल्वेऑफिसमध्ये होते.पगार नाही, जवळची पुंजी संपत आली,आता पुढे काय करावे असा प्रश्न होता .काही निदान होत नव्हते. त्यामुळे योग्य औषधोपचार करता येत नव्हता.काय रोग असावा यावर डॉक्टरांची मती गुंग झाली होती .एक दिवस त्यांचा एक मित्र प्रकृती बघण्यासाठी भेटण्यासाठी म्हणून आला .त्यांनी त्यांच्याशी सहज बोलता बोलता हा तुझा रोग डॉक्टरी उपायांनी बरा होण्यासारखा नाही असे दिसते.तू इतर काही उपाय का करून बघत नाहीस ? असे विचारले .माधवरावांना व त्यांच्या पत्नीला मित्राच्या बोलण्याचा रोख लक्षात आला नाही.त्यांनी त्याला जरा स्पष्टीकरण विचारले .तो म्हणाला जेव्हा एखादा रोग डॉक्टरी उपायांनी बरा होत नाही तेव्हा ते कदाचित  लागीर असते . म्हणजेच भूत,पिशाच्च,करणी, दृष्ट,यातील काही तरी असू शकते .बऱ्याच लोकांचा अशा गोष्टींवर विश्वास नसतो.जगात जसे चांगले व वाईट असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत त्याप्रमाणेच चांगल्या व वाईट शक्तीही आहेत .माना किंवा मानू नका जे आहे ते आहे . त्यादृष्टीने उपाय करायला काय हरकत आहे ?आपल्याला काय बरे वाटल्याशी कारण?अजूनपर्यंत या दृष्टीने कुणीही विचार केला नव्हता.असा विचारच कोणाच्या मनात आला नव्हता. स्वाभाविकपणे माधवरावांच्या पत्नीने मित्रांना विचारले की तुमच्या माहितीत असे कुणी जाणकार आहेत का ?त्यावर त्या मित्राने होय माझ्या ओळखीचे एक असे कन्नड ग्रहस्थ आहेत त्यांना मी उद्या घेऊन येतो असे सांगितले .

दुसर्‍या  दिवशी मित्र त्या गृहस्थांना घेऊन आला .माधवरावांना बघितल्याबरोबर त्यांची दृष्टी थोडी बदलली .त्यांनी तुमचे देव कुठे आहेत असे विचारले .वहिनींनी त्यांना देवघरात नेले .तिथेच एक व्याघ्रांबर गुंडाळी करून खुंटीवर ठेवलेले होते .ते पाहून त्यांना समाधान वाटले .त्यांनी बाथरूम कुठे आहे असे विचारले .हात पाय तोंड धुवून आल्यावर ते कोरडे करून नंतर व्याघ्रांबरावर ध्यानस्थ बसले.सुमारे पंधरा मिनिटे ध्यानस्थ बसल्यावर त्यांनी डोळे उघडले .त्यांनी पहिला प्रश्न वहिनीना विचारला .गेल्या वर्षभरात तुम्ही  तीर्थस्थानावर गेलेल्या असताना तुम्हाला तुमच्या नात्यातील कुणी भेटले का ?त्यावर त्यांनी जरा वेळ विचार करून होय आम्ही राजापूरच्या गंगेला गेलो होतो .तिथे मला माझ्या सावत्र सासूबाई भेटल्या होत्या असे सांगितले .त्यावर त्यांनी मला सुरुवातीपासून  सर्व काही सविस्तर सांगा असे म्हटले.

राजापूरची गंगा हे एक तीर्थस्थान आहे .तिथे काही कुंडे आहेत.ती नेहमी कोरडी असतात .अकस्मात केव्हातरी ती भरून वाहू लागतात .कुंडे भरून वाहू लागली म्हणजे गंगा आली  प्रकट झाली असे म्हणतात .तिथेच एक गंगा मंदिर आहे . त्यामध्ये गंगेची मूर्ती आहे .ही कुंडे किती दिवस महिने वहात राहतील त्याचा काही निश्चित काळ नसतो.एका वेळी एक दोन आठवड्यातच कुंडे वहायची थांबतात तर केव्हा केव्हा  काही महिनेही कुंडे वहात असतात .गंगा आली ही बातमी सर्वत्र चटकन पसरते .लोक स्नानासाठी तिथे गर्दी करतात.कारण गंगा केव्हा गुप्त होईल त्याचा नेम नसतो .(भूगर्भामध्ये पाणी साठल्यावर ते सायफन पद्धतीने वहात असेल असा एक शास्त्रीय अंदाज वर्तविला जातो .तसे असेल तर गंगा नियमितपणे आली पाहिजे व एकदा आल्यावर ती  निश्चित काळ वहात राहिली पाहिजे .येण्याचा वहाण्याचा गुप्त होण्याचा कालावधी निश्चित ठरलेला नाही .कुणी याची शास्त्रीय उपपत्ती दिलेली मी तरी वाचलेली नाही .काही शास्त्रीय किंवा अन्य कारणे असणारच .कोकणातील राजापूर नावाच्या शहराजवळ ही कुंडे असल्यामुळे तिला राजापूरची गंगा असे म्हटले जाते .कोकणातील लोकांना काशीइतक्या लांब जाणे शक्य नसल्यामुळे गंगा साक्षात इथे येते .व गंगामाता तिच्या मर्जीनुसार येते अशी कोकणातील सर्वांची श्रद्धा  आहे .)

वहिनींनी पुढे त्यांची हकीगत सांगण्याला  सुरुवात केली .आम्ही वर्षातून एकदा तरी कोकणात जातो.गेल्या वर्षी आम्ही कोकणात गेलेले असताना गंगा प्रकट झालेली होती .आम्ही तिथे स्नानाला गेलो होतो .अर्थातच गंगा दर्शनाला दागिने घालून नवे पातळ नेसून मी गेले होते .तिथे मला माझ्या सावत्र सासूबाई भेटल्या .त्या माझ्या दागिन्यांची किती तोळे आहे वगैरे चौकशी करीत होत्या .आमच्या घरी भाऊबंदामध्ये अठरा विश्वे दारिद्र्य आहे .माझ्या आजेसासर्‍यानी सर्व सुनांच्या व नातसुनांच्या अंगावर एक एक शेर (चाळीस तोळे) दागिने घातले होते.बाकीच्यानी ते सर्व विकून खाल्ले .आम्ही नोकरी निमित्त बाहेर असल्यामुळे व्यवस्थित राहतो ते बहुधा  इतरांना पाहावत नसावे.

पुढे वहिनी काही बोलणार तोच त्या गृहस्थानी हात वर करून त्यांना थांबविले .आणि ते पुन्हा देवाच्या पुढ्यात व्याघ्रांबरावर जाऊन ध्यानस्थ बसले. पंधरा मिनिटानंतर ते आपल्या ध्यानातून पुन्हा बाहेर आले .त्यांनी वहिनीच्या सावत्र सासूबाईंनी त्यांच्या भावाला सांगून हे सर्व काही केले आहे असे सांगितले .त्यांना तुमचे सुख आनंद बघवत नाही. माधवरावाना मृत्यू यावा यासाठी त्यांनी जबरदस्त *करणी*केलेली आहे .त्यांनी एका तांत्रिका(कोकणात त्याला भगत म्हणतात)  मार्फत  देवीला(विशिष्ट प्रकारचे भूत कमी जास्त शक्तीच्या अनेक देवी /भुते आहेत ) बारा बोकड  बळी दिले जातील. त्याचबरोबर आणखीही बरेच काही देण्याचे कबूल केले आहे. त्यातील काही भाग अगोदरच देवीला दिलेला आहे .त्यामुळे हे उलटवणे कठीण आहे .(म्हणजेच त्या तांत्रिकाने केलेले सर्व गारूड नष्ट करून ते भूत त्या व्यक्तीच्या मागे लागेल असे करणे )

हे सर्व ऐकून वहिनी व माधवरावांचा मित्र हादरून गेले.यावर उपाय काय असे विचारता ते म्हणाले अपायावर उपाय हा असतोच .फक्त आपल्याला तो मिळाला पाहिजे. आपल्या नशिबात तो असला पाहिजे.मी माझ्या गुरुजींना विचारून पाहतो .यात मला काही करता येण्यासारखे नाही .यातील काहीही माधवरावांना कळू देवू नका. नाहीतर त्यांच्या मनावर खोल वाईट परिणाम होईल .असे म्हणून ते गृहस्थ निघून गेले.वहिनी पूर्णपणे हादरून गेल्या .त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला .आजारातून उठल्या सारख्या व दहा वर्षांनी वृद्ध झाल्यासारख्या त्या दिसू लागल्या .माधवरावांचा मित्रही हे सर्व ऐकून पूर्णपणे हादरून गेला होता .काय करता येणे शक्य आहे ते मी बघतो असे म्हणून त्याने माधवराव व वहिनी यांचा निरोप घेतला .

दुसऱ्या दिवशी तो मित्र त्या अद्भुत गृहस्थाना घेऊन त्यांच्या गुरुजींकडे गेला .त्यांच्या गुरुजींना सर्व हकीगत सांगितल्यावर त्यांनी तुम्ही उद्या या मी सर्व बघून ठेवतो असे सांगितले .दुसऱ्या  दिवशी गेल्यावर त्या गृहस्थांनी तो तांत्रिक भलताच पोचलेला(शक्तीमान) आहे. त्याने काम फारच पक्के व मजबूत करून ठेवलेले आहे .मी दूर करण्याचा प्रयत्न करीन परंतु मला खात्री देता येत नाही. शिवाय यासाठी बराच खर्च येईल असे सांगितले .

माधवराव सहा महिने आजारी असल्यामुळे अगोदरच उत्पन्न थांबले होते. डॉक्टरी खर्च व इतर खर्च चालू होता. त्यात आणखी पैसे खर्च करणे कठीण होते .खर्च करून नक्की गुण येईल अशी खात्री नव्हती .जे काही सोने नाणे होते ते भविष्यकाळासाठी राखून ठेवणे आवश्यक होते .वहिनींपुढे काय करावे असा पेच निर्माण झाला .ते गृहस्थ, त्यांचे गुरुजी, सत्य सांगत आहेत की आपल्याला फसवत आहेत हेही लक्षात येत नव्हते. सर्वच संभ्रम निर्माण झाला होता .अशा वेळी त्यांना ज्यांनी आपली मुलगी मानले होते असे वकीलसाहेबच काही करू शकत होते .वकीलसाहेबांना सर्व हकीगत सांगितल्यावर त्यांनी क्षणभरही विचार न करता मी सर्व खर्च करतो तू काळजी करू नको माधव बरा झाल्यावर सावकाश माझे पैसे परत कर असे सांगितले .हे मी माझ्या मुलीसाठी करीत आहे मला पैसे परत नकोत परंतु तुला संकोच वाटेल म्हणून हे सांगत आहे .जेव्हा तुझ्या हाताशी पैसे येतील तेव्हा मला परत दे. देता नाही आले तरी चालेल.तू मुळीच संकोच करू नकोस असे सांगितले .

वहिनी अतिशय करारी स्वभावाच्या होत्या .कुणाचाही उपकार घेणे त्यांच्या स्वभावाविरुद्ध होते .लवकर निर्णय घेणे आवश्यक होते .एक एक दिवस जाईल तशी माधवरावांची प्रकृती जास्त जास्त होत होती .डॉक्टरांनी सर्व आशा सोडून दिल्या होत्या .वहिनीनी सर्व विचार करून दोन दिवसांत वकील साहेबांना व त्या गृहस्थाना जे काही जास्तीत जास्त करता येणे शक्य आहे ते करा म्हणून सांगितले .

गुरुजींना हे सर्व गारूड उलटवणे शक्य होते .म्हणजेच जी अवस्था माधवरावांची झाली होती ती सावत्र सासूबाईंच्या भावाची झाली असती. कारण त्याने हा सर्व उद्योग केला होता .त्याचा जाब त्याला द्यावा लागला असता .परंतु वहिनीनी हे उलटवू नका फक्त माधवरावांवरील संकट दूर होईल व पुन्हा असे संकट येणार नाही एवढाच बंदोबस्त करा असे सांगितले .दुसऱ्याने आपले वाईट चिंतिले म्हणून आपण त्याचे वाईट चिंतू नये .जश्यास तसे यामुळे अापण आपला माणूसपणा गमावून बसतो .शोध व प्रतिशोध याला अंत नाही .आपण आपला चांगुलपणा सोडू नये, अशासारखे त्यांचे काही संतवादी विचार होते .

गुरुजींनी मोठे अनुष्ठान करून व त्यांचे सर्व सामर्थ्य पणाला लावून माधवरावांवरील संकट दूर केले . माधवरावांना हळूहळू उतार पडू लागला .ताप येणे थांबले .खोकला गेला .प्रकृती हळूहळू सुधारली .पुढच्या दोन तीन महिन्यात ते आपल्या कामावर जाऊ लागले .कुटुंबावर आलेले मोठे गंडांतर ईशकृपेने त्यांचा मित्र वेळीच आल्यामुळे व योग्य उपचार करणारे तांत्रिक भेटल्यामुळे दूर झाले.(तो भामटा नव्हता नाही तर आम्ही सर्व काही करतो असे सांगून फसवणारेही असतातच .)

१८/२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel