(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
आमचे उटकमंडला जायचे ठरले होते. बॅग भरण्याचे काम चालू होते.आम्ही उद्या निघणार होतो .एवढ्यात मोबाइलची रिंग वाजली . कॉल माझा मित्र जयवंत याचा होता.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने मला विचारले की तू उद्या उटकमंडला जाणार आहेस ना? मी हो असे म्हणताच त्याने मला "भुताटकीचा कडा" अवश्य पाहा असे सांगितले.हा कडा कुठे आहे असे विचारता त्याने ते तुला गाईड सांगेल असे सांगितले .
उटकमंडचे नाव उदकमंडलम् असे आहे असे पु.ल.च्या एका प्रवासवर्णनात वाचल्याचे स्मरते.हे संस्कृत नाव साहेबाला उच्चारता येत नसल्यामुळे उटकमंड असे नाव रूढ झाले . चारी बाजूने पाण्याचा वेढा असल्यामुळे म्हणजेच तळी असल्यामुळे हे नाव पडले असावे .इतके दक्षिणेला असूनही ते इतक्या उंचीवर व अशा जागी आहे की तिथे वातानुकूलित यंत्र तर सोडाच परंतु पंखेही लागत नाहीत .पंखा पाहिजे असे वाटतच नाही,इतकी हवा थंड आल्हाददायक व उत्साहवर्धक अशी आहे .हिमालय सोडला तर, अशी आणखी एखादी जागा, जिथे चारही ऋतूंमध्ये आल्हाददायक हवा असेल, अशी भारतात असू शकेल असे वाटत नाही .
स्वाभाविकच आम्ही तिथे फिरत असताना गाईडला हा कडा कुठे आहे असे विचारले.त्याने त्याच्या दर्शनीय स्थळांच्या यादीत तो आहे असे हसून सांगितले. एवढेच काय परंतु उद्या सकाळी आपण तिथे जाणार आहोत असेही सांगितले .
दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास आम्ही तिथे गेलो .ऊन भासत नव्हते.थंडीचे दिवस नसूनही हवा थंड होती. उटकमंड हे एक उत्कृष्ट हिलस्टेशन आहे .हिल स्टेशनला आपण ज्या ज्या कारणांसाठी,जेव्हा जेव्हा जातो,तेव्हा तेव्हा इथे, त्या त्या कारणांसाठी, पुन्हा पुन्हा यायला कुणालाही आवडेल .आम्ही गरम कपडे घातले होते.उन्हातही ते अंगातून काढावे असे वाटत नव्हते.आम्ही कडय़ाच्या जवळ येत होतो .समोरून गार वारा येत होता .वाऱ्याचा वेग थोडा जास्तच वाटत होता .त्यामुळे अंगावर शिरशिरी उठत होती .आम्ही जसजसे कडय़ाच्या जवळ जात होतो तसतसा वाऱ्याचा वेग वाढत होता.कड्याजवळ एक पाटी लावली होती .आम्हाला "भुताटकीचा" कडा अशी ती पाटी असेल असे वाटत होते.जवळ गेल्यावर तिथे "रमामाधव कडा"असे इंग्रजी हिंदी व कुठच्या तरी दक्षिणी लिपीत लिहिलेले आढळले.
स्वाभाविकच आमचे कुतूहल जागे झाले आणि आम्ही गाईडला असे कां लिहिलेले आहे म्हणून विचारले.त्यावर तो म्हणाला प्रथम मी तुम्हाला या कड्याची गोष्ट सांगतो .नंतर आपण कडा पाहू .तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या गोष्टीत न मिळाल्यास मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईन.असे बोलून त्याने कथा सांगण्यास सुरुवात केली .
स्वातंत्र्य मिळाले त्यानंतची गोष्ट आहे .एकोणीसशे पन्नास साल होते .तुमच्या महाराष्ट्रातून हे रमा माधव नावाचे जोडपे आले होते . ती दोघे मुंबईची रहिवासी होती.दोघेही एकाच जातीची होती .लग्न करण्यास जात किंवा धर्म यांचा अडसर येण्याचे कारण नव्हते.
रमाचे वडील मोठे कारखानदार होते.त्यांच्या बंगल्याच्या आऊट हाऊसमध्ये राहणाऱ्या व बंगल्यावर काम करणाऱ्या एका नोकराचा माधव हा मुलगा .रमामाधव दोघेही साधारण एकाच वयाची होती .माधव पहिल्यापासून चुणचुणीत व हुषार असल्यामुळे रमाच्या वडिलांचे त्याच्यावर प्रेम होते.रमाबरोबरच त्यांनी माधवला चांगल्या शाळेमध्ये घातले होते.शिक्षणाचा सर्व खर्च रमाचे वडील करीत असत .शोफर दोघांनाही मोटारीतून शाळेत सोडीत असे व परत घेऊन येत असे .ही गोष्ट रमाच्या आईला मुळीच पसंत नव्हती .वडील उदारमतवादी होते .तर आई संकुचित वृत्तीची व श्रीमंतीची घमेंड असलेली होती .दोघांचे एकाच शाळेत जाणे ,शोफरने मोटारीतून त्यांना एकत्र नेणे, रावसाहेबांनी(रमाचे वडील ) माधवचा सर्व खर्च करणे , वगैरे गोष्टी आईला पसंत नव्हत्या.परंतु ती रमाच्या वडिलांसमोर काही बोलू शकत नसे.रमाच्या वडिलांच्या मनात माधवबद्दल काय होते ते कधीच कुणालाही कळले नाही.एका उत्तम सेवकाच्या हुषार होतकरू मुलाला दिलेले ते प्रोत्साहन होते?श्रीमंत गरीब असा भेदभाव करू नये असा तो समाजवाद होता?कि आणखी काही होते?ते कधी कुणाला कळले नाही.
यथावकाश दोघे मोठी झाली .दोघेही कॉलेजमध्ये जाऊ लागली .ती दोघे उत्तम मित्र होती.त्यांच्या वागण्यावरून एकमेकांच्या मनामध्ये नक्की काय आहे ते कुणाच्याही लक्षात येत नसे .लहानपणापासून एकत्र वाढल्यामुळे ती दोघे उत्तम मित्र आहेत?की त्यांच्यामध्ये भाऊ बहिण असे नाते आहे?की आणखी काही आहे?याचा पत्ता त्यांना तरी लागला होता की नाही माहीत नाही .बऱ्याच जणांना रावसाहेबांना म्हणजे रमाच्या वडिलांना मुलगा नसल्यामुळे, रमा एकुलती एक असल्यामुळे, माधवला जावई करून घेण्याचे त्यांच्या मनात असावे असे वाटत होते .तर काहीना ते माधवला दत्तक घेतील असे वाटत होते .रावसाहेबांच्या मनात काय आहे ते कुणालाच कळले नाही .अकस्मात एक दिवस रावसाहेब हार्ट अटॅक येऊन मृत्युमुखी पडले .
त्या दिवसापासून सर्व काही बदलले .रावसाहेबांचे दिवस वार झाल्यावर सर्व सत्ता बाईसाहेबांच्या हातात आली .त्यांच्या मनात त्यांच्या भावाच्या मुलाशी रमाचे लग्न करावे असे होते .त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले .त्या तसे रमाजवळ बोलल्या .त्या दृष्टीने त्यांनी आपल्या भावाजवळ बोलून हालचाली सुरू केल्या .तोपर्यंत रमाला आपले प्रेम माधववर आहे याची विशेष जाणीव नव्हती.एक चांगला मित्र म्हणून ती त्याच्याकडे पाहात होती .आता मात्र तिने माधवकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली.माधव सर्व घडामोडी पाहात होता .रमाच्या मनात काय आहे ते त्याला जाणवत होते .बाईसाहेबांमुळे त्यांच्या वारंवार भेटी होत नसत.त्याला अापण रमाला चिठी लिहून सर्वकाही स्पष्ट करावे असे वाटत होते.चिठी बाईसाहेबांच्या हातात पडली तर, म्हणून तो घाबरत होता .योग्य संधीची तो वाट पाहात होता .
एक दिवस रमानेच त्याला चिठी पाठविली.त्याला भेटण्यासाठी चौपाटीवर बोलाविले होते .तिथे भेटल्यावर परस्परांच्या मनात एकच गोष्ट आहे हे दोघांच्याही लक्षात आले .रमाने आईला मी संजयशी(तिचा मामेभाऊ ) लग्न करणार नाही म्हणून सांगितले.माधवशी लग्न करण्याच्या इरादा स्पष्ट केला. मायलेकीमध्ये मोठे भांडण झाले. माधवच्या वडिलांना कामावरून ताबडतोब काढून टाकण्यात आले.आऊट हाऊसमधील जागाही ताबडतोब रिकामी करण्यास सांगितले.
माधव अजून शिकत होता.वडिलांची या वयात नोकरी गेली होती.राहण्याच्या जागेची पंचाईत होती .गावाला जावून मोलमजुरी करून राहावे असाही एक त्यांचा विचार होता.किंवा इथेच झोपडपट्टीत राहावे व मिळेल ती नोकरी करावी असाही एक विचार होता.माधवचे शिक्षण अर्धवट राहिले होते.त्याला नोकरी मिळणेही दुरापास्त होते.पळून जाऊन लग्न केले तरी पुढे काय असा प्रश्न होता .रमाची आई व मामा यांनी तिचे बाहेर येणेजाणे कठीण करून सोडले होते.बळजबरीने लग्न करण्याचा घाट घातला होता .बंड केले तरी पुढे काय असा प्रश्न रमाला भेडसावित होता .
रमाच्या एका मैत्रिणीच्या घरी दोघांची भेट झाली.कुठलाच उपाय शिल्लक राहिला नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी वेगळाच विचार केला .जग एकत्र राहू देत नाही परंतु जग मरणापासून तर आपल्याला रोखू शकत नाही असा तो विचार होता.
शेवटी रमाने घरातून जमेल तेवढे पैसे दागदागिने घेवून माधवबरोबर पळून जायचे ठरविले.दोघेही येथे उटकमंडला आली.येथे एका ब्राह्मणाला सांगून पैसे देऊन त्यांनी वैदिक पद्धतीने लग्न केले.
पैसे संपल्यावर एक दिवस हातात हात घालून दोघांनीही या कड्यावरून उडी टाकली . या कड्याचे पहिले नाव "वादळी कडा "असे होते.इथे चारी ऋतूंमध्ये साधारणपणे चौवीस तास जोरात वारा वाहत असतो. तुम्ही कड्याच्या जसजसे जवळ जाल तसतसा वाऱ्याचा वेग वाढत जातो.येथून कुणी उडी मारण्याचा प्रयत्न करू नये म्हणून कठडा बांधलेला आहे.तसे पाहिले तर वाऱ्याच्या वेगामुळे तुम्हाला या कड्याजवळ जाणे अशक्य आहे.तेथून उडी मारणे तर अशक्यच आहे.वाऱ्याचा वेग व दाब एवढा प्रचंड असतो की तुम्ही मागे फेकला जाता.तरीही संरक्षण म्हणून, अगोदरच काळजी घेतलेली बरी, म्हणून हा कठडा बांधलेला आहे .
रमा माधव या जोडप्याने येथून उडी घेतली .तोपर्यंत इथे वारा जोरात वाहात असे परंतु हल्ली त्याचा जो जोर व दाब असतो तेवढा तो त्यावेळी नव्हता .त्यावेळी कड्यावरून उडी मारणे कष्ट साध्य होते .आता ते अशक्यप्राय आहे .वाटल्यास तुम्ही प्रयत्न करून पाहा .रमा माधवने येथून आत्महत्या केल्यानंतर का कोण जाणे वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला.उडी मारणे आता शक्य नाही .जर एखाद्याने आपल्याला संरक्षक भिंतीवर चढून झोकून दिले तरी तो हवेच्या दाबाने उचलला जाईल व मागे फेकला जाईल .हवे असल्यास तुम्ही एखादी वस्तू फेकून पाहू शकता .तेव्हापासून पूर्वींचे वादळी कडा हे नाव बदलून रमामाधव कडा असे नाव ठेवले आहे .परंतु लोक मात्र याला "भुताटकीचा कडा"असे म्हणतात .
असे म्हणून त्याने आम्हाला काही वस्तू फेकण्यासाठी दिल्या .आम्ही संरक्षक भिंतीजवळ कसेबसे जाउन त्या फेकल्या. त्या दरीमध्ये न पडता वेगाने आमच्या पलीकडे मागे जावून पडल्या .
ही कथा ऐकल्यानंतर आम्हाला कुणालाच काही बोलावे असे वाटत नव्हते .सर्व अंतर्मुख झाले होते .स्मशान शांतता पसरली होती .जो तो खिन्न झाला होता .
अाम्ही तसेच टॅक्सीत बसून हॉटेलवर परत आलो .
आमचा निरोप घेताना गाईड म्हणाला कृपा करून तिथून उडी मारण्याचा प्रयत्न कधी करू नका. तुम्ही हवेच्या दाबाने परत वगैरे काही येणार नाही. सरळ दरीत निघून जाल.
उद्या सकाळी ठरलेल्या वेळी मी येईन.नंतर आपण आणखी कुठे तरी साइट सिइंगला जाऊ.
*गोष्ट कशी वाटली ते उद्या मला अवश्य सांगा*
१७/४/२०१९©प्रभाकर पटवर्धन