काही मंदिरातील मूर्ती गेल्या चार सहा महिन्यांमध्ये चोरीला गेल्या होत्या.चोरांचा काहीही छडा लागत नसल्यामुळे शेवटी शामरावांची या कामासाठी नेमणूक करण्यात आली होती.रायगड ठाणे पालघर या जिल्ह्य़ातील निरनिराळय़ा मंदिरातील मूर्तींच्या चोरीची फाईल शामरावांच्या टेबलावर पडलेली होती.संगणकावर सर्व माहिती लोड केलेली होती .शामराव निरनिराळ्या चोरींच्या हकीगती वाचत होते.या चोर्या एकाच टोळीकडून केल्या गेल्या की त्यामागे आणखी काही टोळ्या आहेत हे त्यांना पाहावयाचे होते. त्यासाठी ते निरनिराळ्या चोर्यांच्या पद्धती मोड्स ऑपरेंडी पाहात होते.एवढ्यात त्यांचा फोन वाजला .तेथून पन्नास किलोमीटरवरील रामनगर पोलिस ठाण्यातील इन्स्पेक्टर फोनवर बोलत होते.त्यांच्या ठाण्यापासून जवळच रामगड होता .गडावर रामाचे मंदिर असल्यामुळे त्या गडाला रामगड म्हणत.पायथ्याशी असलेल्या गावाचे रामनगर नाव होते .
मंदिर जुनाट होते .राम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या सुबक पितळी मूर्ती मंदिरात होत्या.रात्री आरती वगैरे झाल्यावर मंदिर बंद करून त्याला कुलूप लावण्यात येत असे .पुजारी नंतर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या घरी येत असे .रात्री मंदिरात कुणीही नसे.पहारेकरीही नेमलेला नव्हता .पुजारी सकाळी पुन्हा डोंगरावर मंदिरात जात असे.गाभाऱ्याच्या दरवाज्याला तीन कड्या होत्या .त्याना कुलुपे लावलेली असत .त्याशिवाय बाहेरच्या दरवाजालाही कुलुप लावलेले असे . मंदिर तसे दुर्लक्षित होते .रामनवमीच्या वेळी गडावर मोठा उत्सव असे.एरवी तुरळक पर्यटक किंवा पंचक्रोशीतील लोक दर्शनासाठी पिकनिकसाठी वगैरे येत .गड उंच असल्यामुळे ट्रेकिंगसाठी काही मंडळी येत. एकंदरीत गडावर व मंदिरात लोकांचे येणे कमीच होते. या चारी मूर्ती एका भक्कम पितळी चौथऱ्यावर होत्या . व तो एका दगडी चौथर्यावर ठेवलेला होता.पितळी चौथऱ्यासह चारी मूर्ती एकाच साच्यातून काढलेल्या असल्यामुळे त्या अलग करणे शक्य नव्हते .त्यांचे वजन जवळजवळ शंभर किलोपर्यंत असल्यामुळे एका दोघांना त्या उचलून नेणे शक्य नव्हते. कड्ड्या कुलपे तोडलेली नव्हती .त्याअर्थी कुणीतरी डुप्लिकेट किल्ल्या तयार करून घेतल्या असाव्यात.त्यांचा वापर करून दरवाजे उघडून मूर्तींची चोरी झालेली होती .
गडावर जाण्यासाठी मोटारीचा रस्ता नव्हता .मधून मधून पायऱ्या सपाटीवर कच्चा रस्ता अशी व्यवस्था होती.मंदिरात विजेचे दिवे होते .काल रात्रभर थोडाबहुत पाऊस पडत होता .त्यामुळे काही ठसे असलेच तर ते वाहून जाण्याची शक्यता होती .कदाचित काही नवीन ठसे सापडलेही असते .सकाळी पुजारी नेहमीप्रमाणे गडावर गेल्यावर त्याला मंदिरांचे दरवाजे सताड उघडे दिसले.दगडी चबुतऱ्यावर मूर्ती नव्हत्या .त्यामुळे कुणालाही सांगण्याच्या कळवण्याच्या माहित होण्याच्या अगोदर पुजारी पोलिस स्टेशनमध्ये आले होते .मूर्ती चोरीला गेल्या हे कळल्याबरोबर, एफआयआर लिहून घेण्याच्या अगोदर, पोलिस इन्स्पेक्टरने शामरावांना फोन केला होता .मी ताबडतोब तेथे येत आहे कुणालाही गडावर येऊ देऊ नका .कशालाही हात लावू देवू नका .मी येईपर्यंत ही माहिती शक्यतो गुप्त ठेवा .असे आदेश देऊन शामराव लगेच निघण्याच्या तयारीला लागले.
त्यांनी प्रथम युवराजांना फोन केला .कालच त्यांचे युवराजांशी या चोरीच्या संदर्भात बोलणे झाले होते .अगोदरच्या चोरीची सर्व माहिती शामरावांनी युवराजांना पाठविली होती .पुन्हा चोरी झाली तर मला कळवा मीही तुमच्याबरोबर येईन असे युवराज म्हणाले होते .युवराजांबरोबर त्यांची सेक्रेटरी विजयाहि निघाली .युवराज विजया शामराव जीपमधून गडावर निघाले .त्यांनी संदेशलाही बोलावून घेतले होते.
रस्ता सरळ चांगला असल्यामुळे ही चौकडी अर्ध्या तासात तिथे पोचली. गडाच्या पायथ्याशी गेल्यावर युवराजानी जीप अतिशय हळू घेण्यास सांगितले. मूर्ती वाहनाशिवाय नेता येणे शक्य नाही .गडावर वाहन जात नसल्यामुळे ज्या वाहनातून मूर्ती वोरण्यात आली ते पायथ्याशी उभे केले असणार .रात्री पाऊस पडला होता त्यामुळे वाहनाच्या टायरचेआणि इतर काही ठसे मिळण्याची शक्यता होती.युवराजांची कल्पना बरोबर ठरली .टायरचे ठसे पायथ्याशी चिखलात उठलेले दिसत होते.
तोपर्यंत चोरीची बातमी गावात पसरली होती .या गांवचे व आसपासचे लोक गडाच्या दिशेने निघाले होते .शामरावांनी त्या सर्व लोकांना उद्देशून विनंती केली.जर चोरीचा तपास लागावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गर्दी करू नका .गडावरही जाऊ नका कारण चिखलात उमटलेले ठसे नष्ट होतील. त्यामुळे आम्हाला मिळणारे धागेदोरे नष्ट होतील .त्यानी पोलिसांना लोकाना रोखण्यास सांगितले .
शामराव व युवराज यांनी पाहणी केल्यावर एकच वाहन आणण्यात आले होते असे आढळून आले .संदेशला त्यांनी ठसे तज्ज्ञांकडून टायरचे ठसे घेण्यास व इतरही काही ठसे सापडले तर ते गोळा करण्यास सांगितले .नंतर गडावर चढण्यास सर्वांनी सुरुवात केली .मधून मधून जो कच्चा रस्ता होता त्यावर युवराज न्यहाळून पाहात होते.मंदिराच्या सभोवती फिरल्यानंतर युवराजांनी मूर्ती गडावरच आहे बाहेर गेलेली नाही म्हणून सांगितले.
विजयाने कारण विचारता युवराजांनी बोलण्यास सुरुवात केली.मूर्ती चोरण्यासाठी चार जणांची गरज होती.जर मूर्ती गडावरून खाली नेण्यात आली असती तर जे ठसे आढळले ते चार जणांचे सारख्या अंतरावरती दिसणे आवश्यक होते.तसे ते नसून सर्वजण एकमेकामागून चालत आहेत किंवा बरोबर चालत आहेत असे दिसते .त्याचप्रमाणे जर खांद्यावर वजन असेल तर पायांचे ठसे ओल्या मातीत खोलवर दिसले पाहिजेत .तसे ते दिसत नाहीत .मूर्ती चोरण्यात आली गडावरून खाली न नेता इथेच कुठे तरी ती लपविण्यात आली.मंदिराच्या मागे काही पायांचे ठसे आढळून आले आहेत तेव्हा त्या बाजूला मूर्ती बहुधा. लपविण्यात आली असावी. सर्व काही शांत झाल्यावर केव्हातरी ती येथून नेऊ असा चोरणाऱ्यांचा विचार असावा.पावसामुळे काळोखातून मूर्ती खाली नेणेही कठीण असावे .संदेश शामराव व काही पोलीस गडावर झाडाझुडपातून मूर्ती शोधू लागले .थोड्याच वेळात एक पोलीस धावत आला .त्याने एका झुडपात एक प्रेत पडलेले आहे असे सांगितले .मूर्ती शोधता शोधता ती खुनाची केस झाली .सर्वजण तिथे पोचले .त्या माणसाच्या डोक्यात कुठल्या तरी जड वस्तूने आघात केलेला दिसत होता .एका फटक्यात तो मनुष्य गारद झालेला असावा .पावसाने रक्त आणि इतर खुणा वाहून नेल्या होत्या .त्या प्रेताचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी मुंबईला पाठविण्यात आले.
पुजाऱ्याला प्रेत दाखविता त्याने ते गंगारामचे म्हणून सांगितले .गंगाराम गावात पुजाऱ्याच्या घराच्या शेजारी दोन घरे टाकून त्याच गल्लीत राहत होता .गंगारामचे पुजाऱ्यांकडे येणे जाणे होते .किल्ल्या कुठून उपलब्ध झाल्या त्याचा उलगडा झाला .गंगारामने केव्हातरी पुजाऱ्यांकडे आलेले असताना किल्ल्यांचे ठसे घेतलेले असावेत.नंतर त्यापासून किल्ल्या तयार केल्या असाव्यात . चोराबरोबर गंगारामही गडावर आलेला असावा .चोराबरोबर काही कारणावरून वादावादी झाल्यामुळे त्याला मारण्यात आले असावे किंवा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला मारण्यात आले असावे .गंगाराम मार्फत चोरांपर्यंत पोचणे कदाचित शक्य झाले असते.म्हणूनहि त्याचा काटा काढला असावा .
युवराजांनी जास्त काळजीपूर्वक गडावर मूर्तीचा तपास करण्यास सांगितले.रात्री पडलेला पाऊस शोध घेण्यास उपयुक्त ठरत होता .एका दाट झुडपापर्यंत गेलेल्या आलेल्या पावलांचे ठसे मिळाले. झुडुपात जास्त तपास करता मूर्ती मिळाली .तोपर्यंत मंदिराच्या बाहेरील दरवाजा आतील दरवाजा इत्यादींवरील ठसे घेऊन झाले होते .मूर्ती सापडल्याची बातमी गडाखाली पोचली.लोकांना गडावर येण्यासाठी परवानगी देण्यात आली .पंचक्रोशीतील जमा झालेले लोक आनंदाने रामनामाचा गजर करीत गडावर आले .मूर्ती पुन्हा चौथर्यावर नेऊन ठेवण्यात आली .उद्या मंत्राच्या गजरामध्ये यज्ञ करून मूर्तीची पुनः प्रतिष्ठापना करण्याची घोषणा सरपंचांनी केली .
युवराजांच्या सूक्ष्म निरीक्षणामुळे मूर्ती गडावरून गेलेली नाही हे उघड झाले.शोध घेतल्यावर मूर्तीही सापडली. चोरीच्या तपासातून खुनाचा तपास करण्याची वेळ आली. या खुनाचा तपास लागल्यास चोरांचाही तपास लागण्याची शक्यता होती .
सर्व मंडळी मुंबईला परत आली .टायरच्या ठशांचा अभ्यास केल्यावर टायर नवे होते काही दिवसांपूर्वीच बदललेले असावेत असे आढळून आले .त्या टायरच्या विक्रेत्यांकडे जाऊन गेल्या महिन्याभरात टायर विकत घेतलेल्यांची यादी आणण्यास संदेशला युवराज यांनी सांगितले .अर्थात हे काम फारच किचकट होते.टायर मुंबईत घेतले असतील असेही सांगता येत नव्हते .टायर नवे लावलेले नसून गाडी नवी असेल अशीही शक्यता होती .टायर वरून गाडी शोधणेही बिकट होते .संगणकामुळे एकूण स्टॉक,किती विक्री झाली, कुणाला झाली ,वगेरे शोधणे जास्त सुलभ होते.
संदेशच्या काही माणसांना या कामावर लावल्यानंतर युवराजांनी गंगारामच्या खुनाचा तपास करण्याच्या दृष्टीने संदेशला काही सूचना दिल्या .त्या तपासामधून खुन्यापर्यंत व तिथून मूर्तीच्या चोरांपर्यंत पोहोचणे कदाचित शक्य झाले असते.दोन दिवसांमध्ये संदेशने गंगारामला गेल्या महिन्याभरात भेटायला येणाऱ्या माणसांची यादी व त्यांचे पत्ते आणले. युवराजांनी का कोण जाणे परंतु मुंबईतील पत्ते गाळले. उपनगरातील पत्त्यांवर लक्ष केंद्रित केले .परस्पर उपनगरात चोरी केलेली मूर्ती नेणे सोपे होते .तिथे उपनगरात मूर्तींची समुद्र किनाऱ्याला लाँचमार्फत विल्हेवाट लावणे सोपे होते.वर्सोव्यातील एका पत्त्यावर चौकशी करण्यास संदेशला युवराज यांनी सांगितले.तिथे समुद्रकिनाऱ्याच्या एका बंगल्यावर लक्ष ठेवल्यानंतर तिथे काही तरी संशयास्पद व्यवहार चालले असावेत असा संशय संदेशला आला.तिथे उभ्या असलेल्या अनेक गाड्यांपैकी एका गाडीच्या टायरचा संदेशला संशय आला .जीव धोक्यात घालून त्या गाडीच्या टायरचे ठसे त्याने घेतले .ते ठसे रामगडाच्या पायथ्याशी सापडलेल्या ठशांबरोबर जुळले त्यामुळे संशय फिटला.चोरीशी व खुनाशी या बंगल्याचा काहीतरी संबंध आहे हे निश्चित झाले .
शामरावांना सर्व माहिती देऊन युवराजांनी त्या बंगल्यावर छापा घालण्यास सांगितले .पोलिस सर्व तयारीनिशी तिथे छापा मारण्यास गेले.छाप्यांमध्ये बंगल्याला एक तळघर सापडले .त्यात दोन मूर्तीही सापडल्या .बाकीच्या चोरलेल्या मूर्तींची त्याने अगोदरच विल्हेवाट लावली होती.त्या बंगल्याचा मालक राजनला अटक करण्यात आली . पोलिसी हिसका दाखविताच तो पोपटाप्रमाणे पटापट बोलू लागला .ज्या गंगारामला त्यांनी चोरीचा धागा मिळू नये म्हणून ठार मारले होते त्याच्यामुळेच खुन्यापर्यंत व चोरापर्यंत पोचता आले .टायरचे ठसे, राजनला मदत करणाऱ्या माणसानी दिलेल्या साक्षी तळघरात सापडलेल्या मूर्ती,गंगारामच्या खुनासाठी राजनला असलेले कारण व आनुषंगिक पुरावा, यांनी खुनाचा राजनवरील आरोप शाबीत झाला व त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. युवराजांचे सूक्ष्म निरीक्षण, त्यांनी अनुभवावर बांधलेले अंदाज,आणि त्यांची अंत:प्रेरणा याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
२६/१/२०१९©प्रभाकर पटवर्धन