युवराज सोफ्यावर येऊन नुकतेच बसले होते .सकाळचे पेपर वाचता वाचता ते चहाचे घुटके घेत होते .युवराज कुठल्या संस्थानाचे वगैरे युवराज नव्हते, तर त्यांचे नावच युवराज होते. त्यांच्या आजोबांनी त्या जुन्या काळात स्वस्तात मिळणाऱ्या जमिनी घेऊन ठेवल्या होत्या .त्या जमिनीना आता वाढत्या शहरामुळे सोन्याचा भाव येत होता.मिळणारा पैसा निरनिराळ्या शेअर्समध्ये व इतर अनेक ठिकाणी वेळोवेळी गुंतवल्यामुळे त्यातून त्यांना आता नियमित चांगले उत्पन्न मिळत होते .त्याना कुठे पैशासाठी नोकरी करण्याची गरज नव्हती.एमए विथ फिलॉसॉफी अँड सायकॉलॉजी शिवाय लॉ केल्यामुळे त्यांना लोकांचे मानस चांगले कळत असे.असे म्हणण्यापेक्षा त्यांना अंत: प्रेरणेने लोकांचे मानस जास्त चांगले कळे असे म्हणणे जास्त योग्य होईल.
त्यानी त्यांच्या बंगल्यात एक ऑफिस थाटले होते .त्यावर *समस्या सल्ला केंद्र* म्हणून पाटी होती .त्यांच्या ऑफिसची सर्व देखभाल व मदतनीस म्हणून विजया काम करीत असे. ते नसत तेव्हा विजया संपूर्ण जबाबदारीने ऑफिस सांभाळीत असे .कौटुंबिक, वैधानिक, अपराध विषयक, कोणत्याही समस्यांवर ते सल्ला देत असत .या सल्ला केंद्रांमधूनहि त्यांना चांगले उत्पन्न मिळत असे. त्यांचे वय पस्तीस छत्तीस असावे. अजूनही ते अविवाहित होते .इन्स्पेक्टर शामराव त्यांच्याबरोबरच कॉलेजमध्ये होते.त्यांची कॉलेजमधील मैत्री तशीच पुढेही टिकून राहिली होती .आर्थिक दृष्ट्या फार फरक असूनही त्यांची मैत्री दृढ होती.शामराव एखाद्या गुंतागुंतीच्या केसमध्ये युवराजांचा सल्ला घेत असत.
चहा घेत असताना त्यांचा मोबाईल वाजू लागला .मोबाइलवर शामराव होते .सकाळी सकाळी त्यांना एके ठिकाणी बोलाविण्यात आले होते .डॉक्टर शेखर या प्रथितयश शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला होता .केस गुंतागुंतीची वाटल्यामुळे युवराजाना फोन करून त्यानी बोलाविले होते .गुंतागुंतीची केस म्हणजे युवराजांना स्फुरण चढत असे .निरनिराळ्या दृष्टिकोनातून ते केसचे विश्लेषण करत असत .त्यांनी केस हातात घेतली आणि ती सुटली नाही असे क्वचितच होत असे.
युवराज शामरावानी दिलेल्या पत्त्यावर पोचले .पोलीस खात्यातील निरनिराळे तंत्रज्ञ तिथे जमा झाले होते.वस्तूंवरील ठसे गोळा करणे, निरनिराळ्या कोनातून फोटो घेणे, संशयास्पद वस्तू ,गोष्टी, एकत्र करून त्यांची पाहणी करणे ,वाटल्यास वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये सील करून पाठविणे,पंचनामा करणे इत्यादी गोष्टींमध्ये सर्व गढून गेले होते.सर्व गोष्टी प्रोसिजर प्रमाणे होत आहेत की नाही यावर इन्स्पेक्टर शामराव लक्ष ठेवून होते .
युवराज आल्याबरोबर पोलिसाने त्यांना कडक सलाम ठोकला .इन्स्पेक्टर शामराव व युवराज यांच्यातील गाढ मैत्री आणि युवराजांचा गुंतागुंतीच्या केसेस सोडविण्यामधील सहभाग सर्वांनाच माहीत होता .आपापले काम संपल्यावर एकेक तंत्रज्ञ मंडळी निघून गेली .डॉक्टर शेखर यांचे प्रेत पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले. युवराज शांतपणे एका सोफ्यावर बसून सर्व हालचाली बारकाईने पाहात होते . बघ्यांची गर्दीही ओसरली .इन्स्पेक्टर शामराव मोकळे झाल्यावर युवराजांच्या शेजारी सोफ्यावर येऊन बसले व त्यांनी सर्व हकीगत सांगण्यास सुरुवात केली .
डॉक्टर शेखर अविवाहित होते . डॉक्टर शेखरने आतापर्यंत काही शोध लावले होते व त्याचे पेटंटही त्यांनी घेतले होते.चालू संशोधनाविषयी त्यांनी अत्यंत गुप्तता पाळली होती .त्यांच्या असिस्टंटलाही ते कशावर संशोधन करीत आहेत ते माहिती नव्हते.त्यांचे घर व लॅबोरेटरी एकत्रच होती.त्यांच्या घरात तीन नोकर होते .घरकाम , हरकाम करणारी मुलगी शारदा ,स्वयंपाक करणारी सीताबाई,मोटार संभाळणारा शोफर, त्याशिवाय त्यांना प्रयोगशाळेमध्ये मदत करणारा सदाशिव .शारदा सकाळी आठला येई ती रात्री नऊ वाजता परत जात असे .साफ सफाई ,बाहेरील सर्व कामे ,शेखरला जेवण वाढणे इत्यादी सर्व कामे तिची असत .तिला प्रयोगशाळेपासून कुठेही बंगल्यात प्रवेश असे.तिचे वय वीस बावीस असावे. सीताबाई दोनदा येऊन स्वयंपाक करून जात असत .त्या मध्यमवयीन पंचेचाळीस पन्नासच्या असाव्यात .शोफरला विशेष काम नसे.शेखर क्वचित बाहेर जात असत .कित्येक वेळा ते स्वत: गाडी चालवत .असिस्टंट सदाशिव सकाळी दहा वाचता येई.संध्याकाळी सहा वाजता जात असे.दुपारचे जेवण तो डॉक्टर शेखर बरोबर घेत असे .त्या चौघांनाही इन्स्पेक्टर शामरावानी चौकशीसाठी थांबवून ठेवले होते .
आज सकाळी आठ वाजता शारदा नेहमीप्रमाणे कामावर आली .तिने तीन चारदा बेल वाजविली पण दरवाजा उघडला गेला नाही.शेवटी तिने शेजारच्या बंगल्यात जाउन त्यांना सर्व हकीगत सांगितली .त्यांनीही प्रयत्न करून बघितल्यानंतर कुणी दरवाजा उघडत नाही असे पाहून पोलिसांना बोलावण्यात आले .पोलिसांनी बळाने दरवाजा उघडला .डॉक्टर शेखरचे प्रेत हॉलमध्ये पडलेले होते.वरवर पाहता केस ओपन अँड शट अशी वाटत होती .बहुधा हार्ट अटॅकने किंवा कार्डियाक अॅरेस्टने त्यांचा मृत्यू झालेला असावा .पत्ते टेबलवर पडलेले होते. ते स्वत: एकटे किंवा कुणाबरोबर तरी खेळत असावेत.त्यांच्या अंगावर कोणत्याही माराच्या खुणा नव्हत्या .गळा दाबून, गोळी घालून, एखादी जड वस्तू डोक्यावर मारून, उशी तोंडावर दाबल्यामुळे श्वास रोखून त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसत नव्हते.अर्थात शेवटचा पर्याय पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यावर निश्चित होणार होता . विषप्रयोगाचीही शक्यता वाटत नव्हती.ओठ किंवा अंग कुठेही काळेनिळे पडलेले नव्हते.झटापटीच्या कोणत्याही खुणा नव्हत्या.कुठे इंजेक्शनही दिलेले वाटत नव्हते .ते पत्ते खेळत होते म्हणजे शारदा गेल्यानंतर ते जिवंत होते असा अंदाज बांधता येत होता.काही तरी कुठे तरी आपल्या लक्षात येत नाही असे शामरावांना वाटत होते .त्यांचे सिक्स्थ सेन्स काहीतरी गडबड सुचवीत होते .आणि म्हणूनच त्यांनी युवराजांना बोलावून घेतले होते
सीताबाई आठ वाजता स्वयंपाक करून गेल्या .त्यानंतर शारदा व शेखर यांनी जेवण केले . तेव्हा जेवणातून काही विषप्रयोग झाला असण्याची शक्यता दिसत नव्हती .सदाशिव सहा वाजताच निघून गेला होता.शोफर आठ वाजता गेला .एकूण परिस्थिती पाहता वरवर तरी सदाशिव सीताबाई व शोफर यांचा मृत्यूमध्ये काही हात असण्याचा संभव दिसत नव्हता .शारदा खरे बोलत असेल तर तीही निर्दोष म्हणून सुटत होती.पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतरच काय ते नक्की कळू शकणार होते.सीताबाई ,शारदा, सदाशिव, व शोफर यांच्या बरोबरचे इ्न्स्पेक्टर शामरावांचे बोलणे युवराज लक्ष देऊन बारकाईने ऐकत होते .इन्स्पेक्टर शामरावांनी विचारलेले प्रश्न व त्यांची दिलेली उत्तरे ही रेकॉर्ड होत होती .नऊ वाजता शारदा परत जात होती त्यावेळी एक मोटार आत शिरताना तिला दिसली .तिने मोटारीतील व्यक्ती नीट पाहिली नाही परतू ते साळवे असावेत असे तिने सांगितले .साळवे हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होते .ते शेखर यांचे स्नेही होते .जर शारदा खरे सांगत असेल तर तिच्यावरही संशय घेता येत नव्हता .
युवराजांनी सदाशिवला एकच प्रश्न विचारला होता .डॉक्टर शेखर हल्ली संशोधन कशावर करीत होते ?त्याने ते मला माहित नाही .रात्री प्रयोगशाळेत बसून ते संशोधन करीत. त्याची टिपणे ठेवीत असत एवढेच सांगितले .ती टिपणे ते एका ड्रॉवरमध्ये ठेवीत व तो ड्रॉवर ते कुलूप लावून बंद करत असत.तो ड्रॉवर ते कधीही उघडा ठेवीत नसत .त्यांची टिपणे केव्हाही बाहेर टेबलावर ठेवलेली नसत .त्या ड्रावरची किल्ली नेहमी त्यांच्या खिशात असे एवढेच सदाशिवने सांगितले.ते इतर गोष्टींप्रमाणे त्यांची टिपणे संगणकावर का सेव्ह करत नाहीत असे विचारता,त्यांचा बहुधा संगणकावर विश्वास नसावा असे सांगितले.युवराजानी तरीही सदाशिवला त्या संशोधनाबद्दल काही माहिती आहे का असे खोदून खोदून विचारले .त्यावर त्याने माहित नाही एवढेच उत्तर दिले.एकदा बोलता बोलता ते म्हणाले होते की जर हे संशोधन यशस्वी झाले तर ते सर्व वैद्यकीय क्षेत्र हलवून सोडील.औषध कंपन्यांची कितीतरी उत्पादने बंद पडतील.मानव जातीची मोठी सेवा केल्याचे पुण्य मिळेल .नोबेल प्राइज त्यांनाच मिळेल.याशिवाय त्या शोधाबद्दल त्याला काहीही माहिती नव्हती.हल्ली डॉक्टर शेखर खूप खुषीत दिसत होते,असे सर्वाच्याच बोलण्यात आले.त्यांचा शोध पूर्ण तरी झाला असावा किंवा पूर्ण होण्याच्या बेतात असावा असा अंदाज करता येत होता.युवराजानी त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता ठीक एवढेच म्हटले .जसा काही तो मुद्दा त्यांना विशेष महत्त्वाचा वाटला नव्हता.नंतर युवराजनी सर्व बंगल्यांमध्ये एक चक्कर मारली. खोली खोलीमध्ये फिरून ते बारीक निरीक्षण करीत होते .हॉलमध्ये त्यानी जरा जास्तच सूक्ष्म निरीक्षण केले.नंतर त्यांनी प्रयोग शाळेची किल्ली मागितली .प्रयोग शाळेत गेल्यावरही ते सूक्ष्म निरीक्षण करीत होते .ज्या ड्रॉवरमध्ये ते आपल्या प्रयोगांची टिपणे ठेवीत तो ड्रॉवरही त्यांनी पाहिला.टिपणे पहाण्यासाठी त्यांनी त्या ड्राॅवरची किल्ली शामरावांजवळ मागितली. ती किल्ली कुठेच सापडेना. ते ती कुठे ठेवीत तेही कुणाला माहीत नव्हते.ड्रावरला किल्ली आणि शिवाय कॉम्बिनेशन लॉक होते.कॉम्बिनेशन फिरवून किल्ली लावल्यावरच ते कुलुप उघडत असावे असे दिसत होते.किल्ली शोधण्याचा प्रयत्न करण्यास शामरावाना युवराज यांनी सांगितले .
त्यांच्या मोबाइल फोनविषयी चौकशी करण्यात आली तेव्हा तो फोन ओपन करून त्यातून काही सुगावा लागतो का ते पाहण्यास सायबर ब्रँचला सांगण्यात आले आहे असे शामरावानी युवराजांना सांगितले. मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह साळवे यांचा नंबर डॉक्टर शेखरच्या डायरीमध्ये सापडला होता. त्यांना फोन करून ताबडतोब बोलाविले होते .त्याप्रमाणे ते आल्याची वर्दी एका पोलिसाने दिली.त्या वेळी सर्व मंडळी प्रयोग शाळेत होती .साळवे आता या केसवर काही प्रकाश पाडू शकतात का ते पाहावयाचे होते .
साळवे मध्यम उंचीचे घाऱ्या डोळ्यांचे विरळ केस झालेले मध्यमवयीन गृहस्थ होते.त्यांच्याकडे पाहिल्यावर चांगला किंवा वाईट काहीही ग्रह होत नव्हता.त्यांचे व्यक्तिमत्त्व चार चौघासारखे होते .त्यांची व डॉ.शेखर यांची कॉलेज जीवनापासून मैत्री होती.शेखर आर्थिक दृष्ट्या संपन्न वअत्यंत हुषार असल्यामुळे त्याने स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापन केली.युनिव्हर्सिटीमध्ये तो मधूनमधून लेक्चर्स देण्यासाठी जात असे. एमएस्सीनंतर त्याने बायोकेमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट केली होती .दोघांनाही रमी व बुद्धिबळ याची आवड होती .त्यामुळे खेळण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी दोघे अनेकदा एकत्र येत असत. शेजाऱ्यांनीही चवकशी केली त्या वेळी तशीच माहिती दिली होती .रात्री दोघेही रमी खेळत होते.रमीपेक्षा गप्पा मारीत होते.त्यांच्या संशोधनाबद्दल तो भरभरून बोलत होता .संशोधन पूर्णत्वाला गेले होते .उंदरावरील त्याचे प्रयोग यशस्वी झाले होते .आता माणसांवर प्रयोग करून बघणे बाकी होते .एवढे भरभरून बोलूनही त्याने संशोधन नक्की कशाबद्दल आहे ते सांगितले नाही असे साळवे म्हणाले.प्रयोग यशस्वी झाला की तुला सांगेन असे ते म्हणाले.औषधी कंपन्यांमध्ये खळबळ उडेल एवढेच त्याच्या बोलण्यात आले असेही साळवे म्हणाले .प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी शोध जाहीर करीन असेही शेखर म्हणाल्याचे त्यानी सांगितले. याहून काही जास्त साळवे यांना माहित नव्हते .रात्री ते निरोप घेऊन परत गेले त्यावेळी शेखर जिवंत होते असेहि त्यानी सांगितले.शेखरच्या मृत्यूने साळवे यांना खरेच फार दुःख झालेले दिसले .
एकूण केसमध्ये फारशी प्रगती होईल असे दिसत नव्हते.सर्व काही उद्या येणार्या पोस्टमार्टेम रिपोर्टवर अवलंबून होते. नैसर्गिक मृत्यू असे जर ठामपणे निदान झाले तर करण्यासारखे काहीच शिल्लक राहणार नव्हते.दुसर्या दिवशी रिपोर्ट आला .त्यामध्ये विषप्रयोग हार्टअटॅक इत्यादी सर्व शक्यता फेटाळून लावण्यात आल्या होत्या .तरीही मृत्यूचे निश्चित निदान करता येत नव्हते. विषप्रयोग असेल तर आत्तापर्यंत कोणालाही माहीत नसलेले विष असावे असा अंदाज वर्तविण्यात आला होता.अनैसर्गिक मृत्यू, कारण अज्ञात, असा शेरा मारण्यात आला होता .
एकूण गाडी जवळजवळ जिथे होती तिथेच होती .मृत्यू अनैसर्गिक असेलच तर तो कसा ते हुडकून काढणे हे आव्हान युवराज व शामराव यांच्यापुढे होते. प्रयोगशाळेतील ड्रॉवर उघडून त्यातील टिपणे व असल्यास अन्य काही वस्तू पाहिल्याशिवाय काही ठरविणे शक्य नव्हते .युवराजांना पोस्टमार्टेम रिपोर्ट आला त्या रात्री झोप येत नव्हती .संभाव्य अनेक शक्यता ते मनात पडताळून पाहात होते.अकस्मात त्यांच्या मनात एक कल्पना आली .त्यांनी शामरावांना फोन करून ताबडतोब शेखर यांच्या घरी बोलाविले .त्यांचा किल्ल्यांचा जुडगा बरोबर घेऊन ते शेखर यांच्या घरी जाण्यासाठी निघाले. त्यांच्या मनातील कल्पना खरी ठरली तर ती केस सुटणार होती .
युवराज व शामराव हे दोघेही एकाच वेळी डॉक्टर शेखर यांच्या घरी पोहोचले .शेखर यांची प्रयोगशाळा व ब्लॉक सील करण्यात आला होता. बंदोबस्तासाठी दोन पोलीस ठेवलेले होते.श्यामरावांना सील उघडून आत जाण्याची परवानगी होती .दोघेही प्रयोग शाळेत पोहोचले . शेखरचे कोणते कॉम्बिनेशन असेल याचा मानसशास्त्रीय विचार युवराजांनी केला होता .दोन तीन कॉम्बिनेशन्सचा प्रयोग करून पाहिल्यावर कुलुप उघडले .त्यांच्याजवळ असलेल्या अनेक चाव्यांचा वापर करून त्यांनी योग्य ती चावी निवडली व ड्रॉवर उघडला. ड्रावरमध्ये सुबक अक्षरात लिहिलेली एक डायरी होती .त्याशिवाय पाण्यासारखा द्रव असलेल्या तीन चार लहान लहान बाटल्या होत्या .प्रत्येकात साधारण पन्नास एम् एल् द्रव असावा असे वाटत होते .रात्रीचा एक वाजला होता .टेबल लॅम्प लावून युवराजांनी डायरी वाचण्यास सुरुवात केली .ती वाचता वाचता शेजारी शामराव आहेत हे युवराज विसरून गेले. शामरावही युवराजांची समाधी भंग न करता स्तब्धपणे आरामखुर्चीत बसून त्यांच्याकडे टक लावून पाहात होते .पहाट झाली आणि डायरी मधून युवराजांनी डोके वर काढले .डायरी बंद केली आणि श्यामरावांना कडक चहा बनविण्यास सांगितले .पहाट झाली होती .शामरावानी पोलिसाला कोपऱ्यावरच्या हॉटेलातून कडक चहा बनवून आणण्यास सांगितले.
चहाचे घुटके घेता घेता युवराजांनी श्यामरावांना केस विशद करण्यास सुरुवात केली.शेखर अशा एका औषधाचा शोध लावण्याचा प्रयत्न करीत होता की ज्यामुळे तुम्हाला जवळजवळ सर्व विषाणूप्रती प्रतिकार शक्ती निर्माण होईल .त्यामुळे तुम्ही एकदा ते औषध घेतले की तुम्ही व्हायरल इन्फेक्शनने आजारी पडणार नाही.अँटीबायोटिक्सचा वापर करण्याचे कारण पडणार नाही. हा शोध जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आला होता .फक्त किती प्रमाणात ते औषध पिण्यासाठी द्यावे म्हणजे रोगप्रतिकार शक्ती येईल हे निश्चित होत नव्हते .ते प्रमाण निश्चित करणे अजून शक्य झाले नव्हते .वजनानुसार प्रमाण निश्चिती झाली होती .प्रत्येकाचे योग्य वजन करून त्याप्रमाणे डोस देणे अव्यवहार्य होते .तान्ही मुले,मुले, तरुण, वृद्ध, असे तीन चार गट करून प्रमाण निश्चिती करणे आवश्यक होते .दोन चार महिन्यांमध्ये डॉक्टर शेखरने तेही शक्य केले असते.परंतु आता सर्वच संपले होते .
एवढा सर्व उलगडा होऊनही मृत्यू नैसर्गिक की अनैसर्गिक, अपघात, खून की आत्महत्या, याचा उलगडा होत नव्हता.खून असल्यास तो कोणी केला का केला व कसा केला हा प्रश्नही शिल्लक होता .खून असल्यास तो कोणी केला हे शोधण्यासाठी युवराजांनी एक प्रयोग करण्याचे ठरविले .
युवराजानी श्यामरावांना प्रेस कॉन्फरन्स बोलाविण्यास शंगितले. त्याची भरपूर जाहिरात होईल असेही पाहण्यास सांगितले .हा नैसर्गिक मृत्यू नसून अनैसर्गिक आहे .हा हेतूपूर्वक केलेला खून आहे .खून कोणी केला व कसा केला आणि कां केला याचा उलगडा प्रेस कॉन्फरन्समध्ये करण्यात येईल . असेही जाहीर करण्यास सांगितले. युवराजांनी शामरावांना आपण दिवे मालवून काळोखात प्रयोगशाळेत दबा धरून वाट बघत बसू .खुनी आपल्या पायांनी आपोआपच तिथे चालत येईल असे सांगितले.खुनी कोण असे विचारता तुम्हाला आपोआपच सर्व उलगडा होईल असेही सांगितले .
दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती. रात्री आठपासून दोघेही प्रयोगशाळेत दबा धरून गुपचूप बसून होते .तासा मागून तास जात होते दोघांनाही झोप येऊ लागली होती.रात्रीचे तीन वाजले होते.दोघेही मोठ्या कष्टाने जागे राहण्याचा प्रयत्न करीत होते .अशा तऱ्हेने वाट बघत स्तब्ध बसण्याची दोघांनाही सवय होती .सर्वत्र शांतता होती.आपला अंदाज चुकणार की काय असे युवराजांना वाटू लागले होते .एवढ्यात बंगल्याबाहेर काहीतरी हालचाल होत आहे असे वाटले. बंगल्याच्या सुरक्षेसाठी ठेवलेले पोलीसही हटवण्यात आले होते .अंधारात दबक्या पावलांचा आवाज आला .कोणीतरी लॅचकीमध्ये किल्ली घालून दरवाजा हळूच उघडल्याचा आवाज आला.पावले एकाच माणसाची असावीत .नीरव शांततेमध्ये पावलांचा आवाज जरा मोठाच वाटत होता .पावले येऊन प्रयोगशाळेच्या दरवाज्याजवळ थांबली .कुणीतरी बाहेर येऊन अंदाज घेत असावा असे वाटत होते .युवराज व शामराव एका हातात पिस्तूल व दुसऱ्या हातात बॅटरी घेऊन तयारीत बसले होते.थोडावेळ स्तब्धतेत गेला .नंतर हळूच प्रयोगशाळेच्या लॅचकीमध्ये किल्ली घातल्याचा व हळूच फिरविल्याचा आवाज आला.कुणीतरी दरवाज्यातून आत येऊन थांबले आहे व अंदाज घेत आहे असे वाटले. शांततेत श्वासाचाही आवाज जोरात वाटत होता .पावले हळूहळू ज्या ड्रॉवरमध्ये डायरी ठेवली होती तिथे येऊन थांबली.कुणीतरी सराईतपणे टेबलावरील टेबल लॅम्पचा दिवा लावला .दिव्याच्या प्रकाशात त्या व्यक्तीने हळूच किल्ली वापरून ड्रॉवर उघडला .त्या व्यक्तीला कुलुपाचे कॉम्बिनेशनही माहिती होते .व्यक्ती सराईत दिसत होती .त्या व्यक्तीने खिशातून एक बाटली काढली .
आता मात्र शामराव व युवराज एकदम उभे राहिले व त्यांनी खोलीतील स्विच दाबला.स्वच्छ प्रकाशामध्ये *साळवे* उभे होते .साळवे स्तिमित होवून गांगरून गेले होते.त्यांचा हात खिशाकडे जाऊ लागताच श्यामरावांनी गोळी घालीन म्हणून सांगितले.दोघेही त्यांच्यावर पिस्तूल रोखून उभे होते . शामरावानी ताबडतोब पुढे होऊन त्यांना बेड्या ठोकल्या.फोन करून त्यांनी लपलेल्या पोलिसांना बोलवून घेतले व त्याला त्यांच्या ताब्यात दिला .
डायरीमधील नोंदीवरून, शेखरची लहानपणापासून साळवेजवळ असलेली मैत्री लक्षात घेऊन व आणखी काही पुरावे पाहून युवराजांनी बांधलेला अंदाज शामरावांना सुसूत्र सांगण्यास सुरुवात केली.
शेखर त्यांच्या शोधासंबंधी साळवे जवळ बोलत असे.साळवे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असल्यामुळे तो ही गोष्ट सहज एका मोठ्या औषध कंपनीच्या सीईओ बरोबर बोलून गेला.हा प्रयोग जर पूर्णत्वाला गेला तर औषध कंपन्यांना किती तरी अँटीव्हायरल औषधे बाद करावी लागतील अशी भीती होती .जर या औषधामुळे अनेक व्हायरल इन्फेक्शनस् विरुद्ध, प्रतिकारशक्ती निर्माण झाली तर बाकी सर्व औषधे बाजारातून काढून घ्यावी लागतील .एवढे एकच नवे औषध बाजारात राहील .औषध कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम होईल. आर्थिक घडी विस्कटेल.अनेक डिपार्टमेंट्स बंद करावी लागतील .आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटेल.हा धोका लक्षात घेऊन कंपन्यांनी साळवेला हाताशी धरून त्याला मोठ्या पैशाची लालूच दाखवून तो शेखरचा खून करण्याला उद्युक्त होईल असे केले असावे.त्याने त्या द्रवाची एक बाटली चोरली असावी.त्याचा जादा डोस शेखरच्या पेयामध्ये मिसळून त्याला पाजला असावा .त्या औषधाची चव पाण्यासारखी असल्यामुळे शेखरला काहीच संशय आला नाहीं .त्या औषधाचा ओव्हरडोस झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा .शेखर मृत्यू पावल्याची खात्री करून नंतर साळवे हळूच तेथून घरी निघून गेला असावा .असा तर्क युवराजांनी सांगितला .त्याला ती डायरी व औषधी द्रव नष्ट करायचा असावा .परंतु संशय येईल म्हणून त्यांने ती गोष्ट पुढे ढकलली असावी .युवराज केसमध्ये आल्यामुळे सगळाच गोंधळ निर्माण झाला .तो युवराज व शामराव यावर पाळत ठेऊन होता .प्रेस कॉन्फरन्सच्या बातमीमुळे तो जास्तच घाबरला .धोका पत्करून सर्व पुरावा नष्ट करावा म्हणून तो त्या रात्री प्रयोगशाळेमध्ये आला .डायरीला आग लावण्यासाठी त्याने स्पिरीट बरोबर आणले होते.ते तो डायरीवर ओतून आग लावणार होता. दुर्दैवाने युवराज व शामराव यानी लावलेल्या सापळय़ामध्ये तो अडकला .
एवढे सर्व होईपर्यंत सकाळ झाली. रात्रीच्या जागरणाने डोळे चुरचुरत होते.एक मोठा आळस देऊन युवराज उठले .आणखी एक केस सोडवल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसत होता .मी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ सर्व बरोबर निघेल. ते वदवून घेण्याचे व इतर पुरावे शोधण्याचे काम तुमचे असे म्हणून युवराज त्यांच्या मर्सिडीजमध्ये बसून घरी निघून गेले .
थर्ड डिग्रीची नुसती भीती दाखविल्या बरोबर साळवे पोपटासारखा बोलू लागला .ती डायरी व बाटल्या पुरावा म्हणून कोर्टापुढे हजर करण्यात आला होता .नंतर त्यांचे काय झाले ते माहीत नाही .जवळजवळ सर्व हकीगत युवराजांनी सांगितल्याप्रमाणेच होती .दुर्दैवाने औषध कंपनी व त्याचा सीईओ हे मिळाले नाहीत .साळवेला जन्मठेप देण्यात आली.
१६/१२/२०१८©प्रभाकर पटवर्धन