(ही गोष्ट काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

परत आल्यावर दागिन्यांची पेटी तिने कपाटात व्यवस्थित ठेवली होती. लवकरात लवकर बहिणीकडे जाऊन दागिने परत करायचे असे तिने ठरविले होते .म्हणजे ती एका जबाबदारीतून मोकळी झाली असती . लगेचच बहिणीकडे जायचे ठरलेले असल्यामुळे  दागिने लॉकरमध्ये ठेवण्याऐवजी तिने घरातच ठेवले होते .ती बहिणीकडे जाण्यासाठी निघाली .सर्व दागिने व्यवस्थित आहेत ना हे पाहण्यासाठी तिने पेटी उघडली .बाकी सर्व दागिने त्यात व्यवस्थित होते .परंतु तो चपलाहार गायब होता .लग्नाहून परत येताना तिने चपलाहार बरोबर परत आणला हे तिला आठवत होते .पेटी कपाटात ठेवताना तिने सर्व दागिने व्यवस्थित आहेत ना याची खात्री केली होती असेही तिला आठवत होते .मग चपलाहार गेला कुठे तेच तिला कळेना.तिने कपाट उचकटून उलटसुलट करून पाहिले.चपलाहाराचा कुठेही मागमूस नव्हता.हार कुठे गेला तेच लक्षात येत नव्हते.बहुधा  लग्नाच्या गडबडीत कुणीतरी हार लंपास केला असावा किंवा कुठेतरी गहाळ झाला असावा.असा निष्कर्ष निघत होता .घरातून कुणी चोरला असेल असे वाटत नव्हते.कपाटात पेटी ठेवताना आपण नीट पाहिले नसावे असे तिला वाटू लागले . फोन करून दिराला कसे विचारावे?असे विचारले तर त्यांच्यावर संशय घेतल्यासारखे होईल. दीर किंवा भावजय म्हणेल जर हार आम्हाला सापडला असता तर आम्ही ते तुम्हाला लगेच कळविले असते. आम्ही काय तो दाबून ठेवला असता ?तुला असे विचारावे असे वाटलेच कसे?आम्ही काय चोर आहोत ?  त्यामुळे काय करावे ते कळत नव्हते .  

संध्याकाळी मकरंद फॅक्टरीतून परत आल्यावर त्याला आपल्या बायकोचा चेहरा कोमेजलेला दिसला.डोळे रडून रडून सुजलेले दिसले .त्याने तिला काय झाले म्हणून विचारले .तिने रडत रडत सर्व हकीकत सांगितली.तोही चिंताक्रांत झाला .असा जुन्या पद्धतीचा भरगच्च चपला हार कुठच्या दुकानात मिळेल आणि त्याला किती किंमत पडेल त्याचा तो विचार करू लागला . असा जुन्या पद्धतीचा चपलाहार मिळेल याबद्दल त्याला खात्री नव्हती.मिळाला तरी तिच्या बहिणीला हा हार आपला नाही हे ओळखता येईल याची त्याला खात्री होती .एवढा किंमती हार घेण्यासाठी पैसे कुठून आणावे हाही मोठा प्रश्न होता. काय करावे ते त्याला कळेना . दोघांनाही रात्रभर नीट झोप लागली नाही .

हार थोडा मोडला आहे. दुरुस्तीला टाकला आहे .आल्यावर देईन असे सांगावे असे एकदा वाटले .परंतु अश्या  टोलवाटोलवीत काही अर्थ नाही.नंतर तरी आपण हार कुठून आणणार आहोत ? काही दिवसांनंतर काय सांगणार? तरीही ती दोघेही चार सराफांच्या दुकानात जाऊन चपलाहार पाहून आली.तसाच चपलाहार एका दुकानात मिळत होता .त्याची किंमत सहा लाख रुपये होती .किंमत ऐकूनच त्यांची छाती दडपून गेली .अगोदरच आपल्याला कर्ज आहे. आपण दागिने गहाण ठेवलेले आहेत.नवीन कर्ज मिळणे शक्य नाही .कोणत्याही परिस्थितीत आपण नवीन हार घेऊ शकत नाही . त्यापेक्षा खरे काय ते बोलून टाकावे आणि त्याची किंमत विचारावी ते पैसे आपण जसे जमतील तसे फेडावे असेल असे दोघांनी शेवटी ठरविले.  

शिल्लक असलेले दागिने घेऊन सुषमा तिच्या बहिणीकडे गेली.तिने सर्व दागिने आपल्या बहिणीला परत केले.चपलाहार लग्नाच्या गर्दीत कुणीतरी चोरला असे सांगितले .हार पेटीत नीट ठेवला होता.पेटीला कुलुपही नीट लावले होते. परंतु काय झाले कोण जाणे? हार पेटीतून गायब झाला.त्याची किंमत तू मला सांग मी जसे जमेल तसे तुला पैसे देईनअसे सांगितले.

ताई रागावेल,ताई दूषणे देईल ,तो हार फार जुना होता, तो हार आमच्या खानदानात पिढ्यान पिढ्या चालत आलेला होता ,अनमोल होता,त्याची किंमत तू मला काय देणार? आणि मी तुला काय सांगणार?तू वेंधळी मी तुला तो हार द्यायलाच नको होता असेही कदाचित म्हणेल.ताई रागावणारच आणि ती रागावली तर त्यात काही चूक नाही ,असे तिला वाटत होते . वाटेल ते ऐकून घेण्यासाठी सुषमा खाली मान घालून बसली होती .

ताईने एकदा सुषमाकडे निरखून पाहिले .तिचा आपल्या धाकट्या बहिणीवर पूर्ण विश्वास होता .तिला लहानपणापासूनची आपली बहिण आठवली.तिचा करारीपणा, तिची सत्यवचन प्रियता, तिचा प्रामाणिकपणा,तिचे आपल्यावरील व आपले तिच्यावरील उत्कट प्रेम सर्व काही तिला आठवले .हार हरविल्यामुळे तिच्यावर कोसळलेल्या प्रसंगाची तिला जाणीव झाली.तिच्या मनातील दुःख, तिच्या भावना,अरुंधतीपर्यंत सरळ सरळ पोहोचल्या.क्षणार्धात ताईने मनाशी काहीतरी ठरविले .ती खो खो हसू लागली .आपल्याला दूषणे न देता, आपल्याला न रागावता, ही अशी काय हसते असे म्हणून सुषमाने मान वर करून पाहिले. 

ताई तिला म्हणाली अग वेडे तो हार खरा नव्हता खोटा होता .मी काही दागिने खरे अस्सल तर काही खोटे बनावटीचे ठेवते .खोटे दागिने घालून जरी मी गेले तरी सर्वांना ते खरेच वाटतात .त्याची किंमत केवळ पांच हजार रुपये होती .ते केव्हाही तू मला परत दे.नाही दिलेस तरी चालेल .तू तुझ्या मनातील अपराधाची भावना काढून टाक .तू तुझ्या परीने काळजी घेतली तरीही हार हरवला.जरी मी असते तरीही हार हरवला असता.मी तुला  खरे व खोटे सर्व दागिने त्या दिवशी दाखविले होते .तू काही दागिने खरे उचलले तर हा हार खोटा होता .मी तुला मुद्दामच तो खोटा आहे असे सांगितले नाही .तो हार पाहून जी चमक तुझ्या चेहऱ्यावर व डोळ्यात दिसली ती नष्ट झाली असती .तो हार घालताना तुला हा खोटा आहे असे जाणवत राहिले असते .ज्या रुबाबात व ऐटीत तू समारंभात मिरविलीस तशी मिरवू शकली नसतीस.आता हाराचा हा विषय तू विसरून जा.

हे सर्व ऐकून सुषमाच्या चेहऱ्यावरचा सर्व ताण नाहीसा झाला .ती एकदम नेहमीसारखी झाली .तरीही तिने तिच्या ताईला विचारले .तू खरे सांगत आहेस ना ?तिने तिला तू माझ्या डोळ्यात बघ आणि तुझे तूच ठरव असे सांगितले.सुषमाला जी काही थोडीबहुत शंका होती तीही दूर झाली .

* दोन दिवस बहिणीकडे राहून सुषमा आनंदाने परत गेली.*

* सुषमा गेल्यावर अरुंधतीच्या(ताईच्या) नवऱ्याने तिला विचारले.हार खरा असताना तू तिला असे का सांगितले ?

*  अरुंधती म्हणाली मी जर तिला तो हार पांच लाखांचा आहे असे सांगितले असते तर ती ओझ्याखाली दडपून गेली असती .

*  हाराची किंमत परत करण्यासाठी ती व तिच्या नवऱ्याने जिवापाड धडपड केली असती .

*  त्यामध्ये त्यांची आयुष्याची बहुमोल पाच वर्षे गेली असती .

*आपल्याला देवाने भरपूर दिले आहे .अापण तसा चपलाहार पुन्हा सहज विकत घेऊ शकतो.?

*माझ्या मताशी तुम्हीही सहमत असाल याची मला अंतर्यामी  खात्री होती*

*अरुंधतीच्या नवर्‍याने तिच्याकडे पाहात आश्वासक स्मित केले* 

*दुसऱ्याच क्षणी दोघेही हार हरवल्याची गोष्ट विसरून गेले.*

१६/९/२०१९©प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel