(ही कथा काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
नाथाची मनोरचनाही हळूहळू बदलत होती.आपण काहीही सांगितले तरी ते आई बाबांना खरे वाटते हे त्याच्या लक्षात आले .सदाला छळण्याच्या निरनिराळया क्लुप्त्या तो शोधू लागला .
तो सदाबद्दल आईबाबांना काहीही सांगू लागला.
त्याने मला चिमटा काढला .
त्याने मला मारले .
त्याने माझ्या हातातील चॉकोलेट ओढले इ.तो खरे सांगतो की खोटे सांगतो याची शहानिशा न करता सदाला आईकडून बाबांकडून मार बसू लागला .
तो कळवळून सांगत असे की मी चॉकलेट ओढले नाही. मी लाडू खाल्ला नाही.मी चॉकलेट खाल्ले नाही. मी करंजी चोरली नाही .मी त्याला चिमटा काढला नाही.मी त्याला मारले नाही. परंतु त्याचे कुणीही ऐकत नसे .नाथा खोटे कसे काय बोलेल ?तो सांगतो ते खरेच असणार!!सदा डँबीस आहे. तो खोटे बोलतो.आईवडील सदाला नाठाळ ठरवून त्याच्या अंगावर आपला हात साफ करून घेत असत. नाथाच्या बोलण्यामुळे आपल्याला मार मिळतो. माई व बाबा दोघेही आपल्याला नाथामुळे मारतात .त्यामुळे त्याच्या मनात नाथा बद्दलची अढी घट्ट होत असे.
नाथा डब्यातून काढून लाडू खातो आणि सांगतो सदाने डब्यातील लाडू खाल्ले. आणि शिक्षा म्हणून आपल्याला उपाशी ठेवतात.
सदा दिवसेंदिवस जास्तच बिथरत चालला होता.आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचे, आपल्याला बसणाऱ्या माराचे मूळ, नाथा आहे.त्याला दूर केला पाहिजे .अश्या प्रकारची अस्पष्ट धूसर भावना त्याच्या मनात निर्माण झाली .अशी भावना खोलवर निर्माण झाली आहे याची त्याला कल्पनाही नव्हती .त्याला दूर कसे करावे याबद्दल त्याला काही निश्चित कल्पनाही नव्हती . सर्व काही अस्पष्ट धूसर होते.एक लहान मुलगा तो, त्याच्या मनात हिंस्र भावना कश्या असणार ?पण कुठेतरी तो हळूहळू हिंस्र होत होता .नाथा प्रमाणेच आपल्याला वागणूक मिळावी एवढीच त्याची माफक इच्छा होती .
माईचे हिडीसफिडीस करणे .प्रत्येक बाबतीत त्याची हेटाळणी अवहेलना करणे .नाथाचे सदैव चिडवणे.बापाचे नेहमी होणारे दुर्लक्ष.यामुळे हळूहळू सदाच्या मनात एक स्फोटक रसायन तयार होत होते.नाथामुळे हे सगळे होत आहे असे त्याला वाटत होते.नाथा नसेल तर सर्व काही ठीक होईल. सर्व काही आपल्याला मिळेल. असे त्याला कुठेतरी वाटत होते.
त्याच्या मनातील अढी दिवसेंदिवस वाढत होती .
त्याच्या मनातील राग दिवसेंदिवस वाढत होता.
ही गोष्ट कुणाच्याच लक्षात येत नव्हती .याचे परिणाम किती भयंकर होतील हेही कुणाला कळत नव्हते .लहान काय किंवा मोठा काय त्यांच्या मनात काय चालले आहे ते कित्येक वेळा कळत नाही .अपमान दुर्लक्ष हिडीसफिडीस टाकून बोलणे याची परिणीती केव्हा तरी भयंकर गोष्टींमध्ये होऊ शकते .
त्यांच्या शाळेची ट्रीप निघाली होती .ट्रिपला फक्त नाथाला पाठवणार होते .परंतु एका मुलाला पाठविले व दुसऱ्याला नाही एक सावत्र दुसरा सख्खा हे वाईट दिसेल म्हणून सदालाही ट्रिपला पाठविण्यात आले .ट्रिप महाबळेश्वरला गेली होती .
महाबळेश्वरची थंड हवा, निसर्गरम्य वातावरण, याचा सकारात्मक परिणाम सर्वांवरच झाला होता.नाथा थोडा निवळल्यासारखा भासत होता.तरीही त्याचा इस्तरीचा ड्रेस ऐट काही और होती. सदा बिचारा मळक्या इस्तरी नसलेल्या चुरगळलेल्या कपड्यांत होता.दोघांना शेजारी शेजारी उभे केले तर ते भाऊ भाऊ आहेत असे मुळीच वाटत नव्हते . नाथाची अरेरावी गुर्मी उर्मटपणा जराही कमी झाला नव्हता .तो सदैव सदाला तुझ्यापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे हे सर्वांसमोर सांगत बजावीत हिणवत होता .त्याचे असे सांगणे सदाला अपमानास्पद वाटत होते .परंतु तो विशेष काही करू शकत नव्हता.
दुसऱ्या दिवशी सर्वजण निरनिराळे पॉइंट्स पाहण्यासाठी निघाले होते.आज सकाळीच आकाश भरून आले होते . केव्हाही पाऊस पडेल असे वाटत होते .तरीही सर्व एलिफंट हेड पॉइंटच्या दिशेने निघाले.पॉइंट जवळ आला आणि पावसाला सुरुवात झाली.सरानी सगळ्यांना एका लायनीत उभे केले.पावसामुळे सर्वत्र निसरडे झाले आहे.कुणीही कड्याजवळ जायचे नाही अशी सक्त सूचना दिली .
नाथा स्वतःला नेहमीप्रमाणे जास्त शहाणा समजत होता.सरांना सर्वांवर लक्ष ठेवणे शक्य नव्हते .नाथा हळू हळू कड्याच्या टोकाला सरकत होता.सदाच्या ते लक्षात आले होते .सदामधील अंगभूत चांगुलपणा जागा झाला त्याने तू पुढे जाऊ नकोस म्हणून सांगितले . त्याला सतर्क करूनही तो ऐकत नव्हता .उलट सदा म्हणतो तेव्हा ते ऐकायचे नाही असा त्याचा कल होता. वारा जोरात वाहात होता.नाथा सरांची नजर चुकवून आणखी थोडा पुढे गेला .त्याचा पाय निसरड्या वरून घसरला .अरे अरे सांभाळ सांभाळ म्हणून मुले ओरडत होती आणि तो दरीच्या दिशेने वेगात घसरत जात होता.
सदा प्रतिक्षिप्त क्रियेने त्याला वाचविण्यासाठी धावत सुटला.त्याने तिथे असलेल्या एका झुडुपाला एका हाताने घट्ट धरले .सफाईदारपणे उताणे पडून त्याने नाथाचा हात हातात धरला.सदाच्या हातात नाथाचे मनगट आले .झुडपाला घातलेली हाताची बळकट पकड, बळकट हातात धरलेले निसरडे झालेले नाथाचे मनगट,व दरीत लोंबणाऱा नाथा असे एकूण चित्र होते.
नाथा घाबरला होता.
नाथा केविलवाणा झाला होता.
आपण संपूर्णपणे सदाच्या मेहरबानीवर अवलंबून आहोत हे त्याला कळले.
क्षणार्धात त्याच्या डोळ्यासमोर त्याने सदाला दिलेली वागणूक उभी राहिली .सदा आपल्याला वाचवायला आलाच कसा? असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला.
सदा प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून धावला खरा, त्याने नाथाला पकडले खरे, परंतु आता त्याच्या मनात द्वंद्व सुरू झाले .
हीच वेळ आहे सर्व अपमानाचा बदला घेण्याची .अापण मुळात धावायलाच नको होते.
मूर्खासारखे आपण कशाला धावलो?
चांगला घसरून दरीत जात होता.परस्पर काटा निघाला असता .
आपण एकटेच राहिलो असतो .
धावलो तो धावलो अजून वेळ गेली नाही .
त्याचे हातात असलेले मनगट सोडून द्यावे.कुणाला काही कळणार नाही.
नाथाला सदाच्या मनातील विचार जणू काही कळले .तो गयावया करीत मला वाचव ,मला वाचव,वरती ओढून घे, म्हणून ओरडत होता.
दोघांनीही मृत्यू जवळून पाहिला .
संकटात पडलेल्याला शक्य झाले तर वाचवावे ही आतील सात्विक प्रेरणा व तडाख्यात सापडला आहे तर आतापर्यंतच्या सर्व अपमानाचा बदला घ्यावा ही स्वाभाविक दुसरी प्रेरणा,यांच्या झगड्यात सदा सापडला होता.
मूठ सैल व मृत्यू ,सर्व अपमानाचा बदला, तोही कुणाला नकळत.मूठ घट्ट व वरती सर्वांच्या मदतीने खेचून घेणे जीवन.
सदा आपल्याला नक्की सोडून देणार असे नाथाला वाटत होते.दोघांच्या मनातील या भावना वर्णन करण्याला कितीतरी वेळ लागला .
क्षणार्धात दोघांच्या मनात अशा भावना असे विचार आले.
प्रत्यक्षात सदाने नाथाला वरती खेचून घेतले.इतरांनी त्याला मदत केली .
यशस्वीपणे नाथाला वर घेण्यात आले.ओला, चिखलाने माखलेला, थरथर कापणारा, केविलवाणा, घाबरलेला,मृत्यू जवळून पाहिलेला नाथा सदाच्या शेजारी उभा होता.
मृत्यू जवळून पाहिलेला नाथा अंतर्बाह्य त्या एका क्षणात बदलून गेला .सदाचा चांगुलपणा त्याला कळला.
त्याने सदाला घट्ट मिठी मारली. त्या मिठीमध्ये पश्चाताप होता.सदाबद्दलची प्रेम भावना होती.अापुलीक होती .स्वतःची निर्भत्सना होती .त्या मिठीतून नाथा सदाची मनःपूर्वक क्षमा मागत होता .
*त्या दैवी क्षणात दोघे भाऊ मित्र झाले. सख्खे भाऊ झाले .*
*त्या दैवी क्षणाने दोघांनाही एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.*
* शेवटी सत्वाचा चांगुलपणाचा विजय झाला .*
(समाप्त)
(याचा शेवट अनेक प्रकारे होऊ शकतो .सदाने नाथाचा हात सोडून दिला/वरती आल्यावर नाथाने दुष्ट बुद्धीने सदाला ढकलून दिले .तो मेला ~~ वाचला व त्याने सूड घेतला /वाचविण्याचा प्रयत्न करूनही नाथा सदाच्या हातातून निसटला व मेला इ.सदा व नाथा यांच्या खोलवरच्या मुलभूत स्वभावाप्रमाणे निरनिराळे शेवट होऊ शकतील.
२८/५/२०१९©प्रभाकर पटवर्धन