दहा वर्षांची कुसुम दारात कितीतरी वेळ बसून होती .आज तिची ताई शहरातून येणार होती .एसटी बस दहा वाजता येत असे.आता अकरा वाजले होते .तिच्या आईने एकदा ओरडून तिला अंघोळ करून घे म्हणून सांगितले .बस लेट असेल किंवा काही कारणाने ती पुढच्या बसने येणार असेल असेही सांगितले .तरीही ती दारातून  दूर व्हायला  तयार नव्हती .तेवढ्यात तिचा दादा बाहेरून आला .त्याने काय ग ठमे ताईची वाट बघतेस का? म्हणून विचारले .तिने काही न बोलता दादाचा फोन मागितला . दादाने फोन दिल्यावर तिने ताईला फोन केला .एवढ्यात रिक्षातून ताई उतरताना दिसली .कुसुमने जाऊन तिला घट्ट मिठी मारली .कुसुमने तिचे गाल ओढीत काय ग ठमे म्हणून विचारले.त्यावर तिने फक्त नाक उडविले .तेवढ्यात कुसुमची वहिनी  बाहेर आली व तिने मालतीवरून (ताईवरून) भाकर तुकडा ओवाळून टाकला .

नंतर बॅग घेऊन मालती घरात शिरली .मालती शिक्षणासाठी शहरात राहत होती .तिचे आर्किटेक्टचे हे शेवटचे वर्ष होते.ताई घरात सर्वांची लाडकी होती. एवढ्यात पाटीलबुवा तिचे वडील आले.  मालती लगबगीने वडिलांच्या पाया पडली.वडिलांची ती फार लाडकी होती .गावात दहावीपर्यंत शाळा होती .मालतीने शहरात जाऊन शिकण्याचा हट्ट धरला होता .मुलींनी जास्त शिकू नये असे तिच्या बाबांचे मत होते .तरीही तिच्या हट्टास्तव त्यांनी तिला शिकण्यासाठी शहरात ठेविले होते.आता तिचे शिक्षण पुरे झाले होते .

तिचे लग्न अगोदरच ठरले होते .मुलीला जास्त दिवस लग्नाशिवाय ठेवू नये असे तिच्या आईचे मत होते.परंतु मुलीचा हट्ट बाबांची त्याला साथ यापुढे तिचे काही चालत नव्हते .आता मात्र जास्त काळ थांबण्याला तिची आई तयार नव्हती .मुलगा मालतीच्या पसंतीचा होता. तोही शहरात आता मोठय़ा अधिकाराच्या पोस्टवर नोकरी करीत होता.पाटलांच्या मित्राचाच तो मुलगा होता .लहानपणापासून मालती व अनुराग यांची ओळख होती .दोघेही एकमेकांना अनुरूप होती .व एकमेकांना पसंतही होते .अडचण कुठलीच नव्हती .

लगेच जूनमध्ये  चांगला मुहूर्त होता.लग्नाचे अगोदरपासूनच निश्चित झालेले होते .मालतीची परीक्षा होण्याचीच वाट तिची आई पाहात होती .तिचा दादा वहिनी बाबा आई सर्वजण उत्साहाने लग्नाची तयारी करीत होते .दारात मोठा मांडव घातला होता.कपडे दागिने यांची खरेदी उत्साहात झाली होती.पाटीलांची मोठी शेती होती.द्राक्षे पेरू केळी सीताफळ अशी विविध फळांच्या फळबागा होत्या .उसाचा मळा होता.गहू ज्वारी बाजरी ते काढीत असत.माणूस मालदार होता .पैशाला तोटा नव्हता .गावात राहण्याऐवजी मळ्यातच राहणे पाटीलबुवांना पसंत होते.मोकळी हवा, भरपूर जागा, भरपूर पाणी व शेतीवर प्रत्यक्ष लक्ष,या सर्वच गोष्टी मळ्यावरील घरात राहून साध्य होत असत.दारात दोन मोटारी दोन फटफटी होत्या . मळ्यावरून केव्हाही गावात जाता येत असे. कशाला काही कमी नव्हते .

आता लग्नाची तयारी जोरात सुरू झाली .मालती तिची आई वहिनी व लहानगी कुसुम या सर्वांच्या अंगावरील दागिने जवळजवळ चार पांचशे तोळे सहज होते.  थोडे बहुत दागिने जरी नेहमीच अंगावर किंवा घरात असले तरी बहुतेक दागिने गावातील लॉकरमध्ये ठेवलेले असत .जशी लग्नतिथी जवळ येत होती तसतशी घरात पाहुणे मंडळींची गर्दी होऊ लागली होती.सैपाक करण्यासाठी एक आचारी कायमचा ठेवलेला होता .पाटलांचे घराणे खानदानी होते. त्यांचा बारदाना मोठा होता .

वीस जूनला लग्नतिथी होती.आयत्या वेळी गर्दी नको म्हणून पंधरा तारखेलाच सर्व दागिने लॉकरमधून काढून आणले होते .सर्व दागिने गोदरेजच्या कपाटात ठेवले होते .पाटलांकडे गडी माणसेही भरपूर होती .पाटलांकडे बंदूक पिस्तूल यांचा परवानाही होता .आत्तापर्यंत त्यांच्या मळ्यातील बंगल्यावर केव्हाही चोरी झाली नव्हती .वाघासारखे दोन कुत्रे रात्री मोकळे सोडलेले असत .त्यांचे उग्र रूप पाहून नवख्या माणसाचे कपडे ओले होत असत.त्यामुळे कुणालाच चोरीची दरोड्याची भीती नव्हती .सर्व बिनधास्त होते .घरात एक दोन लाख रुपये नेहमीच सहज असत.

सोळा जूनला रात्री बारा वाजले असताना त्यांच्या घरावर दरोडा पडला.वाघासारखे कुत्रे गुंगीचा फवारा मारून बेशुद्ध करण्यात आले .हे अर्थात नंतर कळले .सर्वजण गाढ झोपेत होते .गडीमाणसांपैकी कुणीतरी चोरांना सामील असावा.त्यानेच आतून दरवाजा उघडला .कोण कुठे झोपले आहे. पाटीलसाहेबांची खोली कुठे आहे. इत्यादी सर्व माहिती त्यांना होती .पाहुण्यांना अज्जिबात चाहूल लागू न देता ते बरोबर पाटील साहेबांच्या खोलीत आले.कुणालाही काहीही हालचाल करण्याला अवधी दिला नाही.पिस्तुलाच्या धाकावर मोबाइल ताब्यात घेतला ..टेलिफोनची लाईन कापून टाकण्यात आली होती .सर्व गोष्टी इतक्या शांतपणे करण्यात आल्या कि आलेल्या पाहुण्यांना काहीही कळले नाही .शिवाय पाहुण्यांच्या खोल्याना बाहेरून कड्या लावण्यात आल्या होत्या. 

चोर तसे सभ्य होते .कुणीही बायकांच्या अंगावर हात टाकला नाही .त्यांच्या अंगावरील दागिने ओढण्याचा प्रयत्न केला नाही .गोदरेजच्या कपाटाची किल्ली मागितली.किल्ली देत नाही म्हणून सांगणे शक्यच नव्हते.मुकाटय़ाने पाटलांनी उशीखालून किल्ली काढून दिली.चोरांच्या तोंडावर काळे बुरखे घातलेले होते .त्यामुळे चोरांना ओळखणे शक्य नव्हते .तोंडावरील बुरख्यामुळे त्यांच्या आवाजातही बदल झाला होता .

आता सर्व दागदागिने गेले पैसेही गेले.लग्नात विघ्न उभे राहिले म्हणून पाटील काळजीत पडले .पैशाचा प्रश्न नव्हता.परंतू एवढे दागिने दोन दिवसांत तयार करून मिळणे शक्य नव्हते .शहरात जाऊन सोन्या चांदीच्या दुकानात मनासारखी खरेदी करून यायला सुद्धा अवधी नव्हता.  पाटलांना चोरीपेक्षा आपली अब्रू जाईल .एकाहून एक सरस दागिने मिळवता येणार नाहीत याची जास्त काळजी वाटत होती .

चोरांनी कपाट उघडले .लॉकर उघडला .त्यांना किरकोळ पाचपंचवीस हजार रूपयांपेक्षा आणखी काहीही मिळाले नाही .दोन तीन लाख रुपये सर्व दागिने कपाटातून गायब होते .पाटील व त्यांची बायको आश्चर्यचकित झाले .फडक्यांमध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवलेले दागिने कुठे गेले  तेच त्यांना कळेना. 

चोरसुद्धा अचंबित झाले.दागिने कुठे ठेवले आहेत त्याची त्यांना बित्तमबातमी होती. त्यांनी दरडावून पाटलांना दागिने व पैसे कुठे ठेवले ते सांगा म्हणून विचारले.पैसे द्या नाहीतर आत्ताच्या आता तुम्हाला ठार मारू म्हणून धमकी दिली.पाटलांनी मला खरेच माहिती नाही मी फडक्यात गुंडाळून सर्व पेट्या व्यवस्थित कपाटात ठेवल्या होत्या असे सांगितले. पाटलांचा व पाटलीणबाईंचा  दागिने नाहीत असे पाहून आश्चर्यचकित झालेला चेहराच चोराना त्यांना काही माहित नाही  हे सांगून गेला .

एवढ्यात कोपऱ्यात सावलीसारखे कुणीतरी उभे असलेले जोरात घराबाहेर पळाले. एका चोराच्या ती गोष्ट लक्षात आली.. चोरही त्या सावलीच्या मागोमाग पळाला.ती सावली घराजवळ असलेल्या विहिरीच्या दिशेने पळत गेली .त्या सावलीच्या पाठीमागून पळत असलेला चोर त्या सावलीला पकडणार इतक्यात त्या सावलीने काहीतरी जोरात विहिरीच्या दिशेने फेकले.पाण्यात काहीतरी जड वस्तू पडल्याचा धप्प असा आवाज आला .चोराने त्या सावलीला पकडले आणि तो पाहतो तो, ती एक लहान आठ दहा वर्षांची मुलगी होती.त्या चोराने दरडावून तिला विचारले की विहिरीत तू काय फेकले ?तिने निरागसपणे उत्तर दिले दागिने .चोराने रागाने तिला मारण्यासाठी हात उगारला.एवढ्यात कुणीतरी विहिरीवरच लाइट लावला .त्या प्रकाशात त्या मुलीच्या चेहर्‍याकडे पाहताना चोराला आपला हात आवरता घ्यावा लागला.एक नाजुकशी आठ दहा वर्षांची लहान मुलगी त्याने पकडलेली होती .

तो तिला घेऊन झपाट्याने घरात आला .त्याने आपल्या सहकाऱ्याला या मुलीने दागिने विहिरीत फेकले असे सांगितले .विहिरीत उतरून दागिने वर काढण्यासाठी चोरांजवळ  वेळ नव्हता.पोलिस किंवा गावकरी येऊन त्यांना पकडण्याचा संभव होता .शिवाय त्यांची ओळख पटण्याचाही संभव होता. चोर हताश झाले.त्यांनी बायकांच्या हातातील बांगड्या वगैरे काही दागिने त्यांना दरडावून देण्यास सांगितले .तेवढे दागिने व मिळालेले काही हजार रुपये घेऊन चोर पळून गेले.

ती सावली,ती एवढीशी लहान मुलगी,कुसुम होती .लहान मुले बहुधा  गाढ झोपतात.कशी कोण जाणे परंतु त्या दिवशी ती जागी होती . बाहेरील आवाज व इतर हालचाल लक्षात येताच चोरांनी घाला घातला हे तिच्या लक्षात आले.तिने उशीखालील किल्ली घेऊन कपाट उघडून दागिने ठेवलेले  बोचके उचलले. कपाट परत लावून किल्ली जाग्यावर ठेविली. आणि पळण्यास सुरुवात केली.तेवढ्यात चोर आत  आल्यामुळे ती एका कोपऱ्यात स्तब्ध उभी राहिली.आपल्याकडे कुणाचे लक्ष नाही असे पाहून तिने पळण्यास सुरुवात केली.एवढ्यात एका चोराचे तिच्याकडे लक्ष गेले .त्यानेही तिच्या मागे पळण्यास सुरुवात केली.तो तिला पकडणार एवढय़ात तिने हातातील बोचके विहिरीत फेकले.

चोर निघून गेल्यावर तिच्या बाबांनी आता विहिरीत उतरून कुणाला तरी दागिने वर काढावे लागतील .अट्टल पोहणारा आणि विहिरीत तळापर्यंत बुडी मारू शकणारा कोण आहे अशी चौकशी सुरू केली .कुसुमने प्रसंगावधान दाखविल्याबद्दल तिला शाबासकी दिली.

कुसुम काही न बोलता पुन्हा धावत विहिरीच्या दिशेने गेली .आणि तिथून एक बोचके पोटाशी धरून ती पुन्हा धावत घरात आली .ते बोचके तिने आपल्या वडिलांच्या हातात ठेवले.दागिन्यांचे बोचके पाहून तिचे बाबा आश्चर्यचकित झाले.

कुसुमने खुलासा केला .

*चोर मागून धावत येत असताना तिने चलाखीने बोचके एका झुडूपात फेकले होते .व दगड विहिरीत फेकला होता .*

*काळोखात तिने काय केले ते पाठीमागून धावत असलेल्या चोराच्या लक्षात आले नाही*

*चोराला तिने दागिने विहिरीत फेकले असे वाटले*

*कुसुमच्या हुशारीने पाटील कुटुंबियांवर ओढवलेला प्रसंग टळला* 

*मालतीचे लग्न थाटात व व्यवस्थित झाले हे सांगावयास नकोच* 

*लग्नात  कुसुमची हुषारी व प्रसंगावधान हीच गोष्ट  सर्वजण एकमेकांना सांगत होते*

*संपूर्ण लग्नात कुसुम ही कौतुकाचा व आकर्षणाचा  केंद्रबिंदू होती *

१/८/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel