(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

मी आता या तळघरात अशा ठिकाणी कैद आहे की यातून माझी जिवंत सुटका होईल असे वाटत नाही .चारही बाजूला दगडी भिंती आहेत .फक्त एकच दरवाजा आहे .तो बहुधा  पोलादाचा असावा.दरवाजा बाहेरून बंद करण्यात आला आहे .कडी लावल्याचा व कुलुप लावल्याचा  आवाजही ऐकला आहे.

कैदी घुसमटून मरू नये म्हणून दोन भिंतींच्या वरच्या बाजूला   गवाक्ष आहे .त्यामुळे वायुवीजनाची सोय आहे .बंद दरवाजा उघडून कुणी मला काही अन्न देईल  असे वाटत नाही .कोपऱ्यात एक माठ पाण्याने भरलेला आहे . त्याच्या शेजारी मातीच्या ताटलीमध्ये पांच भाकऱ्या ठेवलेल्या आहेत.दुसऱ्या कोपऱ्यात मलमूत्र विसर्जनासाठी एक मोठे मातीचे भांडे ठेवलेले आहे.

ज्या लोकांनी मला येथे बंद केले आहे त्यांनी जाताना तू हे अन्नपाणी जपून वापर ,हे तुला जितके दिवस पुरेल तितके दिवस तू जिवंत राहशील .तुझ्या मरणाची वाट उंदीर पहात राहतील .तू गलितगात्र झालास की ते तुझे जिवंतपणी लचके तोडतील.तू मेल्यावर ते तुझे सर्व मांस खाऊन केवळ सांगाडा शिल्लक ठेवतील.

आम्ही कधीतरी येऊन तुझ्या सांगाड्याची वाट लावू.हेच तुझे थडगे समज.आमच्या भानगडीत  जो पडतो त्याची आम्ही अशीच  विल्हेवाट लावतो . असे सांगून ते लोक निघून गेले आहेत .

मी येथे कसा आलो ते तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो .

या गोष्टीला जवळजवळ सहा महिन्यांपूर्वी सुरुवात झाली .एका रात्री मला विचित्र स्वप्न पडले.मी दरवाजा उघडून घराच्या बाहेर पडलो.आमच्या घराच्या जवळ अरण्य आहे . अरण्याच्या दिशेने मी चालायला सुरुवात केली .मी चालतच होतो. कितीही वेळ चाललो  तरी अरण्य येत नव्हते.शेवटी मी खूप दमलो आणि जागा झालो.  स्वप्नांत बऱ्याच वेळा कांही स्वप्नांमुळे खूप दमायला होते, त्यातीलच हे स्वप्न असेल असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले.दोन तीन दिवसांनी पुन्हा तसेच स्वप्न पडले . मी चालून चालून गलितगात्र  होऊन शेवटी जागा झालो.पाच सहा वेळा असेच स्वप्न  दोन तीन दिवसांच्या फरकाने पडल्यावर माझ्या स्वप्नात थोडा बदल झाला .

चालत चालत मी अरण्यात येऊन पोचलो होतो.अरण्यात मी भटकत होतो परंतु मला बाहेर पडायचा रस्ता सापडत नव्हता .शेवटी खूप दमून मी जागा झालो.हेच स्वप्न मला सतत दोन तीन दिवसांच्या फरकाने पडत होते.चालून चालून मी इतका दमलेला असे की मला दुसऱ्या दिवशी काही उत्साह रहात नसे.शेवटी मी डॉक्टरांकडे जाण्याचे ठरवले .

फॅमिली डॉक्टरानी मला झोपेच्या गोळ्या दिल्या. आता तुम्हाला गाढ झोप लागेल त्यामुळे स्वप्न पडणार नाही,स्वप्न पडले तरी ते तुमच्या लक्षात राहणार नाही, त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही,  असे सांगून आश्वस्त केले . चार आठ दिवस स्वप्नाविना गेले.नंतर पुन्हा स्वप्न मालिका सुरू झाली .मी चालत चालत अरण्यात जाऊन हरवत असे. बाहेर पडण्याचा रस्ता सापडत नसे.शेवटी दमून दमून जागा होत असे.

मी पुन्हा फॅमिली डॉक्टरांकडे गेलो .तुमच्या गोळ्यांनी माझी तक्रार दूर झाली नाही.स्वप्न  पडणे चालूच आहे असे त्यांना सांगितले.फॅमिली डॉक्टरांनी मला एका मनोचिकित्सकाचा  पत्ता दिला. चिठी दिली.त्याना जाऊन भेटण्यास सांगितले. त्यांनी मला औषधे दिली .बहुधा गुंगी आणणाऱ्या गोळ्या असाव्यात . माझे स्वप्न पडणे काही थांबले नाही.उलट स्वप्नांमध्ये आणखी वाढ झाली होती .

अरण्यात फिरता फिरता मी एका खंडहर जवळ येऊन थांबे. तो एक पडका वाडा होता .त्याच्या भिंतींची पडझड झाली होती .वाड्याला असलेल्या  तटबंदीचीही ठिकठिकाणी पडझड झाली होती. वाड्याचा दिंडी दरवाजा बंद असे . दरवाजा उघडत नाही असे पाहून मी परत घरी येण्यासाठी निघे. अरण्याबाहेर पडण्यासाठी रस्ता शोधता शोधता माझी दमछाक झालेली असे.त्यामुळे मी जागा होई तेव्हा खूप दमून गेलेला असे.हात हलविण्याची सुद्धा मला ताकद राहिलेली नसे.

एक दिवस माझ्या स्वप्नात आणखी थोडी भर पडली .मी दिंडी दरवाजा उघडण्यात यशस्वी झालो.आंत गेल्यावर मला समोरच एक तुळशीवृंदावन दिसले. वाड्याच्या मुख्य दरवाज्यासमोर ते तुळशीवृंदावन होते.वाड्याची एवढी पडझड झालेली असूनही तुळशीवृंदावन व्यवस्थित होते .

एक दिवस माझ्या स्वप्नात आणखी भर पडली . तुळशीवृंदावनामध्ये एक कृष्णाची मूर्ती मला दिसली. आत्तापर्यंत  ती मूर्ती मला दिसली नव्हती. मूर्ती जवळून पाहण्यासाठी मी तुळशीवृंदावनावर हात ठेवून किंचित वाकलो.वाकताना माझा कुठे तरी एका कळीवर हात पडला असावा. तुळशीवृंदावनाजवळची एक फरशी बाजूला झाली आणि तळघरात उतरण्यासाठी एक जिना दिसू लागला.मी आंत वाकून बघितले तो सर्वत्र काळोख दिसत होता.    

मी पुन्हा माझ्या डॉक्टरांकडे गेलो .डॉक्टरांनी   (मनोचिकित्सकाने)  मला संमोहित करून ,माझ्या स्वप्नांचा छडा लावण्याचा प्रयत्न केला . त्याना माझ्या स्वप्नांचे कारण कळत नव्हते .शेवटी मनोचिकित्सकाने माझ्याबरोबर अरण्यात येऊन वाडा वगैरे काहीही नाही असे सिद्ध करण्याचे ठरविले .एकदा वाडा अस्तित्वात नाही .तुळशी वृंदावन अस्तित्वात नाही. असे माझ्या लक्षात आले म्हणजे माझी स्वप्ने थांबतील.हाच एक उपाय दिसतो असे ते म्हणाले .

अगोदर ठरवून एक दिवस मी व मनोचिकित्सक अरण्याकडे प्रत्यक्ष निघालो.

मी ज्या वाटेने स्वप्नात अरण्यात जात असे त्याच वाटेने आम्ही निघालो.अजूनपर्यंत प्रत्यक्षात त्या वाटेने, अरण्यात ,मी कधीही गेलो नव्हतो .स्वप्नात पाहिलेल्या रस्त्याप्रमाणेच ही पायवाट होती. जात असताना मला सर्व काही ओळखीचे वाटत होते .शेवटी आम्ही पडक्या वाड्याजवळ पोहोचलो . मी  स्वप्नात पाहिल्याप्रमाणेच उजाड ओसाड तटबंदी व पडका वाडा होता .आम्ही दोघेही दिंडी दरवाजाजवळ येऊन थांबलो. मी वर्णन केल्याप्रमाणे प्रत्यक्षात तसाच ओसाड वाडा आहे असे पाहून मनोचिकित्सक आश्चर्यचकित झाला होता.

आम्ही जोर करून दिंडी दरवाजाची कडी काढली .आत गेल्यावर समोरच तुळशीवृंदावन  होते .तुळशीच्या बुंधाशी मी सांगितल्याप्रमाणे, स्वप्नात पाहिल्या प्रमाणे, कृष्णाची एक सुबक मूर्ती होती. 

मी जे जे स्वप्नात पाहिले ते ते प्रत्यक्षात तसेच  असलेले पाहून आम्ही दोघेही आश्चर्यचकित होत होतो . तुळशीवृंदावनासमोर उभे राहून स्वप्नात ज्याप्रमाणे मी कृष्णाची मूर्ती पाहण्यासाठी वृंदावनावर हात ठेवून वाकलो होतो, त्याचप्रमाणे तिथेच उभा राहून तसाच वाकलो. फरशी बाजूला होईल आणि तळघरात उतरण्याचा जिना दिसू लागेल म्हणून उत्सुकतेने आम्ही  पाहात होतो .कोणतीही फरशी सरकली नाही .माझे स्वप्न खोटे ठरणार असे वाटू लागले होते .मी  तुळशीवृंदावनाच्या निरनिराळ्या बाजूंना उभे राहून वाकून कृष्णाला पाहत होतो.तुळशी वृंदावनाला निरनिराळया ठिकाणी हात लावीत होतो .जोराने दाबीत होतो.कळीवर हात पडेल आणि फरशी बाजूला होईल याची वाट आम्ही दोघेही पहात होतो.ज्याअर्थी बाकी सगळे स्वप्न  खरे ठरले त्याअर्थी उरलेला भागही खरा ठरला पाहिजे असे आम्हा दोघांनाही वाटत होते. मनोचिकित्सकानेही प्रयत्न केला .कुणाच्या प्रयत्नाला यश आले, कुणाचा हात कळीवर पडला, आम्हाला कळलेच नाही .परंतु एक फरशी अकस्मात बाजूला झाली.तळघरांत  जाणारा जिना दिसू लागला.नक्की कळ कुठे आहे ते आमच्या लक्षातच आले नाही . जिन्याच्या पहिल्या दोन तीन पायऱ्या बाहेरच्या प्रकाशात दिसत होत्या .उरलेला जिना काळोखात बुडालेला होता.

आता आमची कसोटी होती .माझे स्वप्न येथेच संपले होते . तळघरात आम्ही गेलो तर आमच्या समोर काय वाढून ठेवलेले असेल त्याची आम्हाला काडीमात्र कल्पना  नव्हती. 

* जिन्याने खाली जावे की येथूनच परत फिरावे ते आमच्या  लक्षात येत नव्हते.*

आमचे कुतूहल अाम्हाला परत फिरू देत नव्हते.वाटणारी भीती आम्हाला जिन्याने खाली उतरू देत नव्हती .

मी स्वप्नात जिन्यातील काळोख पाहिला होता. तळघरात काळोख असणार याची मला कल्पना होती.आम्ही दोघांनीही पॉवरफुल टॉर्च घेतले होते.

*विचारविनिमय करून आम्ही खाली उतरण्याचे ठरविले .*

* मी एकटा असतो तर कदाचित उतरलो नसतो .*

*परंतु एकाला दोघे होतो *.

* शेवटी धीर करून आम्ही जिना उतरायला सुरुवात केली.*

(क्रमशः)

१४/५/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel