(ही कथा काल्पनिक आहे नाव गांव किंवा आणखी  कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

माझ्या मनात एक विलक्षण कल्पना आली .         

त्या तलावात काहीतरी असे आहे की ज्यामुळे जिवंत प्राणी तिथे गेले तर ते तिथे आत ओढले जातात.ते मृत्यू पावतात .त्यांचे विघटन होते .पाण्यातील खनिज द्रव्य व  सर्व विविध प्राण्यांचे मांस अश्म यांच्यातून एक रसायन तयार होते. या रसायनाचा  संधीवातावर परिणामकारक उपयोग होतो.एवढेच नव्हे तर इतरही काही जुनाट चिकट रोगांवर त्यांचा उपयोग होत असावा .ही आलेली हाडे माणसाची होती. खूपच झिजलेली होती.निदान दहा पंधरा वर्षांपूर्वी किंवा त्याच्याही अगोदर त्या माणसाचा मृत्यू त्या तलावात झाला असावा.थोडक्यात तो तलाव म्हणजे एक सापळा होता . त्यात प्राणी सापडत होते . त्यात भूचर खग सर्व होते .भूचरमध्ये अर्थातच मानवही आलाच. त्यांच्या अस्थी मज्जारज्जू मांस इत्यादीपासून एक रसायन तयार होत होते.त्या रसायनाचा औषध म्हणून परिणामकारक उपयोग होत होता .पाण्याला विशिष्ट गंध कां येत होता त्याचाही उलगडा यामुळे होत होता .

*आता एवढाच शोध घ्यायचा होता की हा सापळा कोणता होता .*

तिसऱ्या दिवशी ही गडबड झाल्यामुळे मी जाऊ शकलो नाही .

चौथ्या दिवशी मी पुन्हा तलावाच्या काठावर जाऊन बसलो .आता मी अत्यंत सावधपणे बसलो होतो . त्या तलावात असे काही होते की त्या आकर्षणात आपण सापडल्यास तलावात खेचले जात होतो .मला त्या आकर्षणात सापडायचे नव्हते .मी एक लांब काठी बरोबर आणली होती .बरोबर काही जिवंत बेडूकही आणले होते .काठीला जिवंत बेडूक बांधून मी ती काठी पाण्यात बुडविली. त्या बेडकाच्या सभोवार असंख्य धागे गुंडाळले गेले.बेडकाची हालचाल त्यामुळे संपूर्ण थांबली .पाण्यातून एक कोळी-खेकडा तुरुतुरु पोहत आला.तो खेकडा आकाराने प्रचंड होता .त्याचा मुख्य आकार एखाद्या माणसाच्या डोक्याएवढा होता. लहानश्या  तलवारीसारख्या त्याच्या वक्र नांग्या होत्या.त्या नांग्यानी तो एखाद्या माणसाचा वध सहज करू शकला असता.कोणत्याही प्राण्याची मान त्याने एकदा कट्यारीत(नांगीमध्ये)पकडली की त्याचा अंत ठरलेला होता.

मी माझ्या जवळचा आणखी एक जिवंत बेडूक पाण्यात फेकला . त्या खेकड्याने क्षणार्धात त्याला पकडले .नंतर आपल्या तोंडातून असंख्य धागे काढून त्या बेडकाला जखडले .नंतर तो त्याला तलावाच्या काठी असलेल्या आपल्या बिळामध्ये  (बीळ कसले गुहाच ती) घेऊन गेला. 

कोळी नेहमी जाळे विणतो  नंतर त्यात सावज सापडेल म्हणून वाट पाहात राहतो.सावज जाळ्यात सापडले की ते सुटण्यासाठी धडपड करू लागते .चिकट धाग्यामुळे या धडपडीत सावज आणखी गुंतत जाते.जाळे हलू लागल्यावर कोळ्याला सावज सापडल्याचे कळते .नंतर तो त्याला खाऊन टाकतो . इथे प्रकार जरा उलटा होता.अगोदर  खेकडा कोळी झडप घालत होता , नंतर धाग्यांमध्ये सावजाला  गुंडाळत होता .त्यानंतर सावजाचे रक्त शोषून घेत होता.मांस इत्यादी  हव्या असलेल्या गोष्टी खाऊन झाल्यावर नको असलेले भाग फेकून देत होता . हे सर्व तो तलावातच करत होता किंवा गुहेमध्ये नेऊन करत होता.

कोणताही लहान मोठा प्राणी या खेकड्याच्या नांगीमध्ये सापडल्यानंतर सुटू शकत नव्हता.याचा पडताळा मला लगेच आला .एक बदकासारखा पक्षी तळ्याकाठी पाणी पिण्यासाठी आला .पाणी पीत असताना अकस्मात खेकड्याने त्यावर झडप घातली .त्याला धाग्यांमध्ये गुंडाळून जेरबंद केला .नंतर तो त्याला आपल्या गुहेत घेऊन गेला.

झऱ्यातून पडणाऱ्या पाण्यातून काल जी हाडे  आली होती त्याचा आता उलगडा होत होता .कधीतरी दहावीस वर्षांपूर्वी कदाचित त्याच्या अगोदर एखादा प्रवासी स्नानासाठी पाण्यात उतरला असावा .त्या कोळीखेकड्याने त्याचा बळी घेतला असावा . त्या खेकड्याचे आयुर्मान  किती होते देव जाणे .त्यांच्यानंतर दुसरा एखादा कोळी खेकडा त्याची जागा घेत होता कि काय तेही तो तलावच जाणे.

कदाचित यापूर्वी पोहण्यासाठी तलावात उतरलेल्या कित्येक पर्यटकांचे बळी गेले  असतीलही .नक्की काहीच सांगता येणार नाही .जवळच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी जे जात असत त्यांचा रस्ता इथूनच जात होता . विश्रांतीसाठी इथे थांबणे, पाणी पिण्यासाठी तलावावर जाणे, श्रमपरिहारासाठी  स्नान करणे,अत्यंत स्वाभाविक होते.त्यातील काही जण खेकड्याच्या तावडीत सापडणे स्वाभाविक होते. ऊष्ण पाण्यामध्ये स्नानासाठी उतरताना त्यामध्ये असलेल्या धोक्याची त्यांना कल्पना असण्याचे काहीच कारण नव्हते .

प्रदीर्घ कालखंडांमध्ये वेळोवेळी असे किती प्राणी,किती मनुष्य , बळी पडले असावेत ते सांगता येणे कठीण होते .तलावाच्या तोंडावर जिथून झरा निघत होता तेथे वेलींचे दाट जाळे होते . ही सर्व हाडे तिथे अडकून राहात असत .कधी तरी काही कारणाने त्यातील काही सुटून प्रवाहाबरोबर पडत असत .

गुहेमध्ये या खेकड्याचे कुटुंब रहात असावे .कोळी खेकडा व त्याच्या भक्ष्यस्थानी विविध प्राणी सापडणे ही अनेक दशके चालत असलेली स्थिती असावी.पाण्यामध्ये सल्फर सारखे एखादे रसायन असावे. त्यामध्ये हाडे, मज्जारज्जू ,मांस, इत्यादी विरघळवण्याचे सामर्थ्य असावे .त्यातून जे रसायन तयार होत होते त्यामुळे संधिवात बरा होत होता . तो खेकडा, तो तलाव ,ते विशिष्ट गुणधर्म असलेले पाणी,या सर्वामुळे एक असे अद्भुत औषध तयार होत होते की ज्यामुळे जुनाट चिवट संधीवाताचे रोगी बरे होऊ शकत होते .

निसर्गाची ही सर्व किमया अद्भूत होती . 

करवंद बुद्रुक गावातील त्या वैदूला मी विचारले एकदा हा रोग बरा झाल्यावर कायमचा बरा होतो की पुन्हा उद्भवू शकतो ?त्यावर तो हसून म्हणाला बहुधा  कायमचा बरा होतो.आणि समजा पुन्हा उद्धवला तर आम्ही आहोतच .

येथून जाताना तुम्ही मी देतो ते  पाणी बरोबर घेवून जा .मंत्राने मी ते पाणी औषधी गुणधर्मासह जसेच्या तसे दीर्घकाळ टिकेल असे केले आहे .त्या पाण्याचे काही थेंब पिण्याच्या पाण्यात टाकून आईना देत जा.हे पाणी जसेच्या तसे राहील.साधारण वर्षभर हे पाणी पीत जा.  माझा अनुभव आहे की आईना   पूर्ण बरे वाटेल.

मी येताना त्या झऱ्याचे पाणी सहा बाटल्या भरून मुद्दाम आणले.असे करण्याचा हेतू पाणी औषधी गुणधर्मासह टिकते की नाही ते पाहणे हा होता .महिन्याभरामध्ये पाणी नासले फेकून द्यावे लागले .वैदूने अभिमंत्रित करून दिलेले पाणी मात्र जसेच्या तसे होते.वैदूने खरेच एखादा मंत्र टाकला होता, की काही जडीबुटीचा वापर केला होता ते त्यालाच माहीत.

म्हणजेच औषधोपचार तेथेच जाऊन करणे आवश्यक होते .टँकरमध्ये पाणी भरून आणून औषध म्हणून वापरता येणे शक्य नव्हते.त्याचा उपयोग होणार नव्हता . 

* सुमारे दीड महिना तिथे राहून आम्ही सर्वजण परत आलो.*

*आईला आता पूर्ण बरे वाटले आहे .तिची काहीही तक्रार नाही .*

*संधिवात होण्यापूर्वीप्रमाणेच ती सर्व कामे करू शकते. *

* बरे वाटल्यास चारी धाम यात्रा करीन असा नवस ती बोलली होती .*

*त्याप्रमाणे आम्ही नुकतेच चारी धाम यात्रा करून सुखरूप परत आलो .*

*कुणाला तीव्र संधिवात असल्यास करवंद गावी जावून अनुभव घेण्यास हरकत नाही *  

*अशी शक्यता आहे की आणखी काही जुनाट रोग त्या पाण्यामुळे बरे होऊ शकतील*

(समाप्त)

१५/११/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel