नविनच झालेल्या "विश्वरूप "सोसायटीच्या लॉनवर चालता चालता स्वराच्या पायाजवळ एक रंगीत मोठा प्लास्टीकचा बॉल येऊन पडला...तशी ती तिथेच थांबली...खाली वाकुन तीने तो रंगीत बॉल हातात धरला….आणि तिला लगेच एक हाक ऐकू आली…...
" ऐ दीदी ,माझा आहे तो बॉल ! "
स्वरांनी समोर बघितले ,तर एक चार -पाच वर्षाचा मुलगा तिच्याकडे बघुन आपला बॉल वापस मिळण्याची वाट बघत होता….
स्वराने तो हलकासा प्लास्टिकचा रंगीत बॉल उचलला आणि त्या मुलाकडे तो पास केला... आजूबाजूला तिची नजर गेली ,तर सगळीकडे छोटे बच्चे कंपनी त्या "प्ले-एरिया" मध्ये खेळत होती …… ऐकीच्या कडेवर चार- पाच महिन्याचं गोंडस बाळ होतं. स्वराने त्या बाळाकडे बघितलं आणि तिच्या ओठांवर हलकसं स्मित फुललं... लगेच तिने आपला हात आपल्या पोटावरुन फिरवला…... एकीकडे नजर गेली ,तर दोन मुलं आपसात भांडत होती ,मारामारी करत होती, काही मुलं घसरगुंडीवर बसून घसरत होती ,तर काही सी-सॉवर बसून वर-खाली होण्याचा आनंद घेत होती... काही मेरी गो राऊंड वर गोल गोल फिरत होती... तर एक लहानसे वर्षभराचे मुल घसरगुंडीच्या शीडीवर चढण्याचा प्रयत्न करत होतं. दोन-तीनदा त्याला अपयश आलं... पुन्हा त्याने प्रयत्न केला ,मागे वळून आपल्या आईकडे बघितलं आणि आत्मविश्वासाने एक पाऊल त्या घसरगुंडीच्या शिडीवर ठेवलं आणि दोन्ही बाजूनीआपले दोन्ही हात कठड्याला घट्ट धरले आणि एकेक शीडी चढत तो वर जाऊन पोहोचला ...दोन्ही बाजूने दोन्ही हाताने आजूबाजूचा कठडा पकडून आभाळाला गवसणी घालण्यासारख्या विजयी मुद्रेने वाकून त्याने आपल्या आईकडे बघितलं ,त्याची आई त्याच्याकडे नजर ठेवूनच होती. तो घसरगुंडीवरुन घसरत खाली वाळूत पडला... उठून उभा राहिला आणि विजयाच्या आनंदात त्याने टाळ्या पिटल्या... त्या मुलाची आई पुढे झाली आणि तिने कौतुकाने आपल्या मुलाला धरूनपटापट मुके घेतले... ते सर्व दृश्य बघून स्वराच मन खूप आनंदीत होत होतं…..
आई-बाबा ऑफिसला गेल्या नंतर दिवसभर आपण आपला वेळ कसा घालविणार याचा तिला विचार पडला होता. ती तिथेच प्ले एरियातल्या बेंचवर बसली... तितक्यात दोन , चार -पाच वर्षाची मुलं मारामारी करू लागली ते बघून स्वरा उठली आणि त्यांचे भांडण सोडवायला गेली ..तिने त्या दोघांनाही समजावले आणि दोघांना एकमेकांना सॉरी म्हणायला सांगून त्यांची फ्रेंडशिप घडवून आणली…
आपली मुलं मारामारी करतांना बघून त्या मुलांच्या आईही तिथे पोहचल्या …. त्यातली एक स्वराला म्हणाली…...
काय करावं !भरपूर वेळ आहे मुलांना , या करोना काळात शाळा बंद….क्लासेस बंद ,काही करमणूक नाही...कुठे जाणार ही मुलं ! कुठे कोणता क्लास लावून द्यायचा म्हटलं तरी बाहेर जायची बंदी आणि बाहेर तरी कुठे पाठवणार आहे या अशा काळामध्ये….
स्वरा त्या दोघींचं बोलणं ऐकत होती…. तिच्या मनात विचार आला ...ऐरवी आपण एक महिना इथे राहणार आहोत.. रिकामा वेळ कसा घालवायचा हा आपल्यालाही प्रश्नच आहे... आपण इथल्या कम्युनिटी हॉलमध्ये या मुलांच्या करमणुकीसाठी काहीतरी करूया... म्हणजे आपलाही वेळ जाईल आणि मुलांचेही मनोरंजन होईल . ही आयडिया मनात येताच ती लगेच सोसायटीच्या मॅनेजरशी बोलायला गेली... त्यांच्याकडून परवानगी मिळवली आणि सोसायटीच्या व्हाट्सअप ग्रुप वर लगेच मेसेज टाकला……
* बालविहार*
चार ते दहा वर्षांच्या मुलांसाठी सोसायटीच्या हॉलमध्ये "बाल विहार" सुरू करण्यात आलेला आहे ,कृपया आपण आपल्या मुलांना सहभागी होऊ द्यावे….. वेळ 12 ते 2 "
"आई ऐ आई!...."
पाच वर्षाचा सोम आईला आवाज देत...धापा टाकतच घरात शिरला...आणि समोर सोफ्यावर बसलेल्या आईला जाऊन बिलगला…
सोमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्याचे ओठ काहीतरी सांगण्यास ऊत्सुक दिसताच त्याची आई म्हणाली…..
"अरे बोल सोम...काय झालं?ऐव्हढा कसला आनंद झालाय?
"अगं आई, आपल्या सोसायटीतील ती स्वरा दिदी आहे ना, तीने सोसायटीच्या हॉल मध्ये सगळ्यांना बोलाविलेन आहे...
आई मला जायला आवडेल तिथे…"
आणि दुसऱ्या दिवशी विश्वरूप सोसायटीच्या हॉलमध्ये चार ते दहा वयोगटाची मुलं-मुली आपल्या पालकांसोबत जमली… स्वरानी आपली ओळख करून दिली…… म्हणाली...
" मी या मुलांची बारा ते दोन पर्यंत दोन तास काही ऍक्टिव्हिटीज किंवा यांच्याशी गप्पा गोष्टी करत वेळ घालवणार आहे…
",पालकांनाही तेच हवे होते. सगळे जण आपल्या मुलांना तिथे सोडून घरी परतले आणि स्वराचं "बालविहार" सुरू झालं... सर्व प्रथम तिने सगळ्यांशी ओळख करून घेतली , त्यांच्या आवडी निवडी विचारल्या ….
एवढ्यात तिला गोंगाट ऐकु आला... तिने बघितले तर एक सहा-सात वर्षांचा मुलगा, दुसऱ्या लहान मुलाच्या हातातील गाडी घेऊन तोडत होता.
ती म्हणाली "काय रे यश त्याची गाडी का तोडतोस ? "
यश म्हणाला, "मला गाड्या तोडायला खूप आवडते... मला जर कोणी गिफ्ट दिलं मी त्याची तोडफोड करून संध्याकाळपर्यंत त्याचे पार्ट वेगळे करून नवीन काहीतरी वस्तू बनवतो …"
स्वरा म्हणाली," अरे वा! म्हणजे तू मेकॅनिकल इंजिनिअर होणार तर तुझ्या बाबांसारखा !
छान ! आणखी कुणाकुणाला काय काय बनायला आवडेल मोठे होऊन ?
आणि त्यातील काहींनी आपल्याला मोठे होऊन काय बनायचे आहे, ती आपली स्वप्न सांगितली .काहीजण चुप बसून होते…. गप्पा गोष्टीत दोन तास कसे गेले मुलांना आणि स्वरालाही कळाले नाही….
पुन्हा दुसऱ्या दिवशी बारा वाजता येण्याचे प्राँमिस करुन मुलं आनंदातच घरी गेली…
मुलं लहान जरी असली तरी आतापासूनच त्यांच्या मनात देश प्रेम प्रेम रुजवले पाहिजे हे तिला कळत होते म्हणून "देश हीच माता" हे गाणं तिने त्यांच्यासमोर म्हटले... म्हणाली... तुम्ही पण तुम्हाला येत असलेला एखादा गाणं ...अगदी दोन ओळी गायल्या तरी चालेल …."
मग एक दोन मुलांनी त्यांना येत असलेली काही गाणी म्हणून दाखवली... दोन वाजले आणि मुलं घरी परतली…
तिसऱ्या दिवशी स्वराने टेबल वर प्राण्यांच्या काही प्रतिकृती ठेवल्या….
त्यांच्यासोबत तिने प्रार्थना म्हटली आणि टेबल वरचे प्राणी दाखवून त्यांना म्हणाली... "हे सगळे प्राणी तुमच्या ओळखीचेच आहेत…"
आता बघा मी यातील एक पक्षी दाखवते आणि त्या पक्षावरून तुम्हाला कुठली स्टोरी आठवत असेल तर ती सांगायची….. स्वराने एक कावळा उचलला आणि म्हणाली….
" कावळ्याच्या हुशारीच्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत…..".
आणि मग दोन तीन मुलांनी त्यांना येत असलेल्या वेगवेगळ्या कावळ्याच्या हुशारीच्या गोष्टी सांगितल्या …
"ससा व कासव "बघून एका स्वानंदीने त्यांच्या शर्यती ची गोष्ट सांगितली .. जास्वंदीने दोन बकऱ्यांच्या समजदारीची गोष्ट कथन केली, श्रेयाने कावळा आणि सापाची गोष्ट... अनघने उंदीर आणि सिंहाची गोष्ट , सायलीने मगर आणि माकडाची गोष्ट ….वाहीने ,चतुरलांडगा आणि कावळ्याच्या मूर्खपणाची गोष्ट सांगितली...अशा प्रकारे सर्व मुलांनी पंचतंत्रातल्या विविध गोष्टी सांगितल्या……वेळ झाली.. मुलं म्हणाली "दीदी आणखी थोडा वेळ बसू आपण…. खूप मज्जा येत आहे आम्हाला इथे ……
"नाही हं!फक्त दोनच तास... जास्त वेळ असलं तर कंटाळा येईल तुम्हाला " स्वरा म्हणाली….. आणि पुन्हा दुसर्या दिवशी येण्याचं कबूल करून मुलं घरी परतली….
पुन्हा दुसर्या दिवशी मुलं जमल्यानंतर स्वरा म्हणाली…. "आज मी तुमच्याकडूनच एक बालगीत तयार करून घेणार आहे तर तयार आहात ना तुम्ही ?
तिने एक लहानसा कुत्रा हातात धरला आणि विचारले हे काय आहे? आणि त्यांच्या कडूनच तिने एक एक शब्द जुळवुन जुळवुन बालगीत तयार करून घेतलं……..
एक होता कुत्रा ….
तो होता भित्रा …. मनीला पाहून भ्यायचा
दूर पळून जायचा….
तिकडून आला उंदीर मामा मनी म्हणाली हाय रे रामा !!
दुसऱ्या दिवशी सुमेधने एक कविता तयार करून आणली…… "दीदी मी शब्द जुळवले आणि बालगीत तयार केलयं ...म्हणून दाखवू ?
स्वरानी संमती देताच , सुमेधने त्याने लिहीलेले बालगीत म्हणून दाखविलं ……
पाहिला मी नागतोडा घोडा। पाहून त्याला भ्यायलो मी थोडा….
मग केली थोडी हिम्मत,
वाटलं करावी त्याची गंमत…. धरायला त्याला गेलो तर तो उडाला खालून वर।।
सुमेधची कविता ऐकून स्वराने व सगळ्यांमुलांनी टाळ्या वाजविल्या…..
स्वराने त्याचे कौतुक केले….म्हणाली... "खूप छान शब्दरचना केली आहेस तू….जमत तुला…. " आपली तारीफ ऐकुन सुमेध खूप खुश झाला….
त्यांच्यातील सुप्त गुणांना ती वाव देत होती ….हे तिने मुलांना समजून सांगितले, त्याच्यामुळे बऱ्याच मुलांच्या बोलण्यात मोकळेपणा आला...
अभ्यासाचं टेन्शन नव्हतं फक्त आणि फक्त मजा, त्यामुळे मुलं ही खूश होत होती.. स्वरा त्यांच्याकडून त्यांच्या शाळेतल्या गमती जमती ऐकायची ….कधी ती त्यांनाअवकाशातल्या गोष्टी सांगायची…. मुलंही अगदी मनमोकळेपणाने बोलायला लागली…. कधी एक्झरसाइज ,तर कधी मनशांती साठी योगा कधी पॉझिटिव्ह थिंकिंग साठी मॉरल स्टोरीज, कधी ड्रॉइंग काढून घेणे ,तर कधी पतंग उडवायला शिकवीणे... अशा ऍक्टिव्हिटीज घेण्यात येत असल्याने , ते करून घेताना तिलाही आनंद मिळुन तिचाही वेळ छान जात होता...
रोज एकत्र जमल्याने सोसायटीतल्या मुलांची आपसातली मैत्री वाढली….. त्यांच्या पालकांचीही एकमेकांशी ओळख झाली…..
असं करता करता एक महिना संपत आला स्वराने सगळ्या मुलांना त्याची कल्पना दिली….
"मुलांनो उद्या आपल्या भेटीचा शेवटचा दिवस…. उद्या मी तुम्हाला एक छानशी पंचतंत्रातील गोष्ट सांगणार आहे, कदाचित तुम्हाला ती माहिती असेल तरीपण त्यावरून काय बोध घ्यायचा ते मला सांगा….. आणि जमत असल्यास उद्या तुम्ही तुमच्या पालकांनाही घेऊन या ,आपण निरोप समारंभ ठेवू या!"
दुसऱ्या दिवशी मुलं- मुलीआणि काही पालक तिथे जमले ….सगळ्यांनी स्वराच्या "बालविहार" च
कौतुक केलं…
मेघना म्हणाली , तुझ्यामुळे आमची मुलं ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायला तयार झाले….. त्यांचं नॉलेज वाढलं ,एकमेकांची बोलणं ,शेअरिंग करणं, या सगळ्या गोष्टी इथे त्यांना शिकायला मिळाल्या... खूप खूप धन्यवाद स्वरा...
स्वरा म्हणाली" धन्यवाद तर मी या मुलांचे मानायला हवे !माझा एक महिना किती आनंदात गेला आणि या मुलांकडून मला कितीतरी गोष्टी शिकायला मिळाल्या ,मुलांची मानसिकता कळली या सगळ्या गोष्टी मला माझ्या पुढील आयुष्यात उपयोगी पडतील , मीच या सर्व मुलांची आभारी आहे….."
स्वरानी सगळ्यांना बसायला सांगितले आणि ती उभी राहुन म्हणाली आज मी पंचतंत्रातील तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे बहुतेक सगळ्यांना ती गोष्ट माहीत असणार सिंह आणि सशाची … पण आज नव्याने ऐका...
स्वराने सिंहाच्या शक्तिची आणि सशाच्या युक्तीची पुर्ण गोष्ट कथन केली...
अशाप्रकारे छोट्याशा सशाच्या युक्तीने मोठ्या सिंहाचा नायनाट झाला… तो मरण पावला आणि सगळ्या प्राण्यांची सुटका झाली….. स्वरा पुढे म्हणाली…..
" मुलांनो आणि पालकांनो ही झाली पंचतंत्रातील गोष्ट !पण हा करोना रूपी भस्मासुर आपल्यासमोर उभा ठाकलेला आहे... याचा नायनाट करणे तर आपल्याला शक्य नाही ,पण युक्ती वापरून आपण आपले जीवन सुरक्षित ठेवून स्वतःचा बचाव करू शकतो…. तर हा करोना म्हणजे सिंह आणि ससा म्हणजे?
दहा वर्षाचा देवेश म्हणाला…. ससा म्हणजे "मास्क" ! तोंडाला मास्क लाऊन आपण करोना या महामारी पासून स्वतःला वाचवू शकतो …."
विदीशा म्हणाली…. हो! आणि एक मैत्रीण सुद्धा आली आहे आता….."लस्" नावाची…. सगळ्यांनी मास्क वापरा आणि दोन लसीचे दोन डोज घ्या आणि सुरक्षित रहा…….
स्वरा म्हणाली... "चला तर ,आता मला निरोप द्या आणि मुलांनो उद्यापासून तुम्हाला सुट्टी!......
लीना समोर येऊन म्हणाली…. "नाही स्वरा मुलांना सुट्टी नाही, उद्यापासून मी घेत जाईन या सर्वांच्या ऍक्टिव्हिटी, गोष्टी सांगत जाईन आणि तू जसं या मुलांना शिकवलं तसंच या मुलांना वेळ देऊन त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करीन…… स्नेहा समोर आली म्हणाली…."मीही येईल तुझ्या सोबतीला……."
सगळ्यांना ही कल्पना पटली आणखी काहीजणी समोर झाल्या …..
विणा म्हणाली…."आपण असं करू या, रोज कुणीतरी दोघीजणी येत जाऊ!आपल्या मुलांचं भवितव्य आपण पालकांनीच घडवायला हवं नाही का आणि आई शिवाय दुसरा मोठा गुरु या जगात कोणी नाही ,हे ठाऊक आहे नं सर्वांना! सर्व पालकांनी मुलांच्या या रिकाम्या वेळेचा त्यांच्याच भल्यासाठी सदुपयोग करून घेऊया!"
सगळ्यांनी टाळ्या वाजवून या गोष्टीचे स्वागत केले ,पालकही खुश झाले आणि मुलंही! हसत्या खेळत्या वातावरणात स्वरानी सगळ्यांचा निरोप घेतला… एक भावी पालक म्हणून जबाबदारी स्वीकारत असतांनाच तीने सर्वांना त्यांच्या जवाबदारीची जाणीव करून दिली….मुलांनाही नवी दिशा दाखविली ……
विश्वरूप सोसायटीतल्या हॉल मधला "बालविहार" असाच सुरू राहील…. जोपर्यंत महामारीचा नायनाट होऊन सुरक्षित वातावरण तयार होत नाही तोपर्यंत!
समाप्त