किती सुंदर नावं न.
सुहासिनी हे मूळ नाव असणं आणि एखादीला तिच्या सुंदर हसण्यामुळे कौतुकानेे तिला सुहासिनी म्हणून बोलाविणे , हा म्हणजे तिचा गौरवच की !
त्यातल्या त्यात तिची ती मोत्यासारखी दंतपंक्ती आणि त्यातून निघणारे ते मोहक दिल घायाळ करणारं हास्य! बघणाऱ्याच्या तोंडातुन निघावे हाsssय ! नैसर्गिक देणंच असते हसण्याची ती एखाद्याला मधुबालासारखी !
अशीच एक आमची सखी आहे नांव आहे तिचं "मुक्ता"!
आम्ही सगळ्यां मैत्रिणी तिला गंमतीने "सुहासिनी" म्हणून हाक मारायचो आणि चिडवायचो अगं तू पोटात असताना तुझी आई नक्कीच दात घासायला "मुक्ता चमक" वापरत असणार म्हणून तुझेही दात पांढऱ्या शुभ्र मोत्यासारखे चमकतात . कीती सुंदर दात आहेत आणि मोहक हास्य आहे तुझे !
कॉलेज मधे तीच ते दिल घायाळ करणार हास्य बघून सगळे तिची तारीफ करायचे आणि म्हणुन आम्ही तीचं पुन्हा एकदा बारस केलं. मधाळ हास्याची स्वामिनी म्हणून आम्ही तीचं "सुहासिनी "हे नामकरण केलं.प्रेमळ, हसरी पण दूनियाभरची धडपडी, अतिच घाई तिला कुठल्याही गोष्टीची ! कॉलेज मधे जिना उतरताना सगळ्यात आधी धडधडत खाली पोहचायची.
आम्ही तिची गंमत करायचो, अगं पडशील ,जरा हळू.
ती म्हणायची "अगं, माझा माझ्या पायांवर विश्वास आहे, कधी डगमगणार नाहीत ते."
मधली वर्ष अशीच गेली ......
सगळ्यां आपापल्या घरट्यात रमल्या. मी, सुहासिनी आणि अजुन तिघी एकाच शहरात राहायचो ! त्यामुळे आमच्या भेटीत खंड पडला नाही. आमच्या ग्रुप मधे आणखी आमच्या स्वभावाला जुळेल अशाच मैत्रिणी मिळाल्या . मग काय धम्माल !
मधली वर्षे अशीच नोकरी व्यवसायात...गेली.साठी आली.. आम्ही सगळ्या.. सांसारिक जवाबदारीतुन मुक्त झालो . जरा मोकळेपणा मिळाला.....
मग काय ! झाले सगळ्यांचे "सूर " सुरू ! कुठेतरी फिरायला जाऊ या आपण मैत्रिणी मैत्रीणी.
पण कुठे ट्रीप काढायची .......
सर्वानुमते ठरले गोव्याला जायचं मस्त एन्जॉय करायला....... सगळी खरेदी झाली, तयारीही झाली. जाणं चार दिवसांवर आलं.....
आणि, आणि संध्याकाळी ऐका मैत्रीणीचा मला फोन आला, अगं,आपल्या सुहासिनीच्या स्कुटीला अपघात झालाय !खूप लागलयं तिला!
ऐकुन मनात धस्सच झाले. मी लगेच सुहासिनी ला कॉल केला . मी टेन्शन मध्ये .... ... .. . पलीकडुन सुहासिनी मला म्हणाली...….
" अगं... कालच "आपटली " मी . फार काही लागले नाही , पण तुमची दृष्ट लागली मला ! मी घरीच आहे...... या सगळ्याजणी भेटायला !"
आमच्या ग्रुपच्या सगळ्या जणी तिच्या घरी भेटायला गेलो .भेटायला जातांना काही फ्रुटस घेतले . ऐकीने ड्राय फ्रूटस घेतले आणि तिच्या घरी पोहचलो.
तिच्या मिस्टरानी दार उघडले ,हसून आमचे स्वागत केले . "या ..... तुमचीच वाट बघत आहे ती, तिच्या रूममधे." आम्ही तिकडे गेलो ती मस्त मोबाईल बघण्यात गुंग होती. आमचा आवाज ऐकुन तिने वर बघितले आणि जोरात हसली.
आम्ही तिचे "खैबर खिंडी " चे हसू बघून दचकलो !तिच्या समोरच्या चार दातांनी तिला अलविदा केल होतं !
मी विचारले…"अगं ! हे काय झाले ?"
ती म्हणते कशी…" हंम्म ,
तुमचीच दृष्ट लागली बघा मला! माझ्या खळखळत्या बत्तिसीने मला दगा दिला. पण बरे झाले बाई ,कॉलेज मध्ये धाडधाड जिने उतरताना नाही पडले . नाहीतर , कोणी लग्न केले असते गं या "भोबडीशी " ? " आणि ती पुन्हा जोरात हसली. आता तीच ते हसणं एखाद्या चेटकिणी सारखे वाटले.
पुन्हा हसून म्हणाली , "अगं पन्नाशी नंतर केव्हातरी पडणारच न दातं ! पण जरा घाई केली त्यांनी , थोडी अजून साथ दिली असती... . गोवा ट्रीप मधे मस्त एन्जॉय करू दिले असते ....आपण आपले मस्त खिदळतांनाचे फोटो काढले असते ! एखाद्या टूथपेस्ट कंपनीत add करायची शेवटची ईच्छा अपुर्ण राहीली ग माझी ! पण जाऊ द्या आता ! " आणि ती पुन्हा हसायला लागली.
"अगं ......पण हे घडले कसे ?" आमचा प्रश्न.
" माझी हौस भारी पडली मला आणि माझी धडपड दुसरं काय ! ती सांगू लागली,
सगळी ट्रीपची खरेदी आटोपली होती. बॅग पण भरून तयार होती . मनांत आले , गोव्याला जात आहे ,मस्त समुद्रात स्विमिंग करूया . म्हणून स्विमिंग ड्रेस आणायला गेले होते . तुम्हालाही घ्यायला सांगणार होते. पण कसं चे काय ! घरी लवकर परतण्याच्या घाईत स्कुटी जरा फास्ट चालवत होती मी .... अगदी घराजवळ आल्यावर आडव्या येणाऱ्या मांजरीला घाबरले... आणि गाडी स्लीप झाली समोरचे चार दात पडले आणि पायानेही दगा दिला . पायाचे ऑपरेशन सांगितले डॉक्टरने आता काही दिवस बसावे लागेल घरीच. तुम्ही ट्रिपला जाउन एंजॉय करुन या ! तुम्हाला कोणाला हवा असेल तर, स्विमिंग ड्रेस घेऊन जा मी आणलेला......"
मी म्हटले, "आता कॅंसलच करूया ट्रीप ! तूच नाही तर काय मज्जा येणार !"
सुहासिनी म्हणाली "अगं.... खरंच जा तुम्ही आणि माझी काळजी करू नका . डॉक्टरांच्या..अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आहे मी. आठ, दहा दिवसांत नाहीतर महीना भरात नविन दातं बसतील मला ! "
आम्ही सगळ्या म्हणालो ,नाही...... नकोच आता जायला . बघू पुढे कधीतरी अजुन दुसरीकडे. असे बोलून आणखी गप्पा मारून आम्ही परत घरी आलो .. .
जाताना जेवढा मनांवर ताण होता तो आता नाहीसा झाला होता.तिने सारे लाईटली घेतलं म्हणून... .
आम्हाला वाटले होतं , ती रडेल आता आपल्या सौंदर्यात बाधा आली म्हणून. पण ती पक्की धीराची. स्वतःच्या सकारात्मक विचारानं स्वतः आनंदी राहून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारी , आमची सखी सुहासिनी.....
मध्ये ऐक वर्ष असचं गेलं . परत सगळ्यांनी उचल खाल्ली ,फिरायची.पुन्हा प्लॅन बनला . आता ' मनाली ' ला जायचे ठरले !
अहाहा...... जायच्या आधीच अंगावर बर्फाचे तुषार उडायला लागले आणि त्याच बरोबर हास्याचेही....
आम्ही आठ जणी निघालो, मनाली साठी टूर कंपनी सोबत. आम्ही सुहासिनी ची गंमत केली, अगं स्विमिंग ड्रेस घेतला का ग ?
"काहीतरीच काय! बर्फाच्या पहाडावर चढायचे आहे थंडीचे सगळे कपडे तयार आहेत माझे ! महिनाभर आधीच तयारी करून ठेवली ,ऐनवेळी धडपड नको म्हणून.
नाहीतर माझ्यामुळे अजुन खोळंबा !"
आमचा टूर निघाला . सुरुवातीचे स्थळं पाहून आम्ही मनालीला पोहचलो. खूप अधीरता होती बर्फावर खेळण्याची. आम्ही सगळ्या बर्फावर मस्ती करत होतो पण, सुहासिनी.......ती कुठेच दिसत नव्हती !
बर्फावर चार -पाच तास मस्तपैकी एन्जॉय केला.तिथून निघायची वेळ झाली , आम्ही शोधले सुहासिनीला ,पण ती कुठेच दिसत नव्हती. कॉल केला पण लागला नाही .आम्ही गाडीजवळ येऊन बघीतले, तर ती आधीच गाडीत बसलेली होती.
जरा शांत शांत वाटली. "मी विचारले काय गं
काय झाले ? कुठे होतीस तू ?"
"काही नाही" म्हणून तिने नकारार्थी मान हलविली. गाडी निघाली . मध्ये ऐका ठिकाणी पाणीपुरी खायला उतरलो पण, तिने दात दुखत आहे असे खुणेनेच सांगितले.
सायंकाळी हॉटेलला पोहचलो.थकल्यामुळे फ्रेश होऊन सगळ्यांनी आराम केला.
मी व ती ऐकच रूम शेअर करीत होतो.जेवणासाठी ती खाली आली नाही फक्त ज्युस घेतला .मी जेवण करून रुममध्ये आली तर ती मोबाईल बघत होती . मी दिसताच तिने तोंडावर रुमाल धरला.
"खूप दुखंत आहे का ग दात ? "मी काळजीने विचारले. पण तिच्या चेहऱ्यावर मिस्किल हसू होतं म्हणाली...
"अगं परत न माझ्या दातांचा "अपघात" झाला."
ते ऐकून मी उडालेच. "काय ?"
" अगं खरंच ! पण कुणाला सांगू नको हं !
तोंडावर बोट ठेवून कुणाला न सांगण्याचा तिने माझ्या कडुन शब्द घेतला ! आणि सुहासिनी मला तिची आपबिती सांगु लागली.
म्हणाली…."अगं तुम्ही सगळ्या खाली बर्फावर खेळत थांबल्या. माझ्या पायात जोर ,मी पार गेले वर चढून.. .तिथे ऐक तरुण जोडपे एकमेकांना बर्फाचे गोळे फेकून मारीत होते ....मी त्यांच्या मधून जायला गेली आणि ........... "छपाक". माझ्या तोंडावर बर्फाचा गोळा बसला.मी सुन्न झाले सर्जरिने बसविलेले चारही दात माझ्या हातात आले.खाली उतरायला गेली तर बर्फावरुन पाय घसरला आणि सरळ खाली आली...... .ऑपरेशनचा पाय जरा जास्तच दुखत आहे गं ...कसं तोंड दाखवू मी आता बाकीच्यांना हसतील मला सगळ्या ......" आणि पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावर मिस्किल हसू पसरले.
मी म्हणाले," एक सांगु का तुला आता या वयांत धडपडणे बरे नव्हे. अगं माकड खुप उड्या मारत जगतो त्याचेआयुष्य फक्त वीस वर्षे असते आणि कासव तिनशे वर्षे जगतो...... संंथ गतीने श्वास घेत असतो म्हणून ! मानवाला देवाने एकशे वीस वर्षे आयुष्य दिले आहे ते अस धडपडत आपले अवयव मोडून घेण्यासाठी नाही."
खरंच तिच्याकडे बघून हसण्याबरोबरच तिची अगतिकताही लक्षात येत होती. नवीन ठिकाणी काय करावे काही सुचेना.
मी तिला धीर दिला. म्हणाले , "मी आहे ना तुझ्यासोबत बस...... आता उद्या सकाळी परतीच्या प्रवासाला निघतच आहोत आपण.
आतापर्यंत तोंडावर रुमाल धरून दात दुखीचे नाटक करत होतीस न तसेच चालू दे.
आपल्या गावी गेलो की जाऊ डॉक्टरच्या भेटीला ! "
तीही जोरात हसली व म्हणाली होय गं, तो पर्यंत मी या रुमालाने ही माझी "खैबर खिंड "लढविणार .....
सकाळी आमची बस निघाली. सगळ्यांनी
टूर एन्जॉय केला होता. आता परतीच्या प्रवासात सगळे लोक थकलेले होते.
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरच आम्ही
पोहचणार असल्याने सगळयांनी आप आपल्या घरी फोन करून सांगितले.
बस् , आता एखाद्या तासात घरी पोहचल्यावर मस्त दिवसभर ताणून द्यायचे ठरविले होते.सगळ्यांनी...पण अर्धवट झोपेत असतांना बसचा टायर ब्रस्ट झाल्याचा आवाज आला..आणि बस वाकडी तिकडी जात असल्याचे जाणवले….आणि एकच कल्लोळ झाला. आमची बस पूलावरून खाली कोरड्या नदी पात्रात उलटली. सर्वांच्या तोंडुन किंकाळ्या बाहेर पडल्या. एकच हाहाकार झाला. सगळे आप आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करीत होते…. ड्रायव्हर बेशुद्ध झाला होता… ट्रँव्हल कंपनीच्या मँनेजरही मार लागलेल्या अवस्थेत पडुन होता..बसमध्ये बहुतांश सिनिअर सिटीजन असल्याने प्रत्येक जण आपल्या सुरक्षेसाठी धडपडत होता...
आणि सुहासिनी…. ती बसच्या खिडकिची काच फोडून केव्हाच बाहेर निघून पोलिस ,अँब्युलन्स सगळ्यांचे नंबर फिरवुन तातडीने सगळ्यांची मदत मागवून…..बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढत होती….ऐका हातात कुणाचीतरी काठी घेऊन...ऐका पायाने लंगडत लंगडत….सगळ्यांचा जीव वाचविण्याची धडपड चालु होती…..स्वःताच्या जीवाची पर्वा न करता…
वेळेवर मदत मिळाली… आणि जखमी अवस्थेत सगळे हॉस्पिटलमध्ये पोहचले...जिवित हानी झाली नाही…. ..मी आणि बाकी मैत्रिणी नदीतल्या दगडावर बसुन तीची चाललेलीडपड बघत होतो…. सलवार सूट घातलेलली एका हातात काठी पकडुन असलेली केसांची लावलेली ती निघाल्यामुळे अस्ताव्यस्त झालेले ते केस... ती आमच्या बाजुने जाऊ लागताच मी तीला हाक मारली…
"सुहास" ! खरचं तुझ्या धडपड्या स्वभावामुळे सर्वांचे जीव वाचले बघ…..तशी मागे वळुन ती खळाळून जोरात हसली ...आणि आणि… समोरच्या आधी पडलेल्या चारादातां व्यतीरीक्त खालच्या बाजुच चार दात गायब होते…आज तिचे कार्य अभिमान वाटावा असेच होते....
ज्योती धनेवार-अलोने