"आज या नवीन आलेल्या साहेबांकडे कामाचा पहिलाच दिवस आणि ……बाईसाहेबांचा स्वभाव पण कळालेला नाहीये….. विचारू की नको ? "
असा प्रश्न ,या गावात कलेक्टर ऑफिसला नविनच रुजु झालेल्या "देवघरांकडे" स्वयंपाकासाठी आलेल्या ईंदुला पडला…..
"कसही करून आज सायंकाळी लवकर घरी जायला हवे….. आज आपल्या लाडक्या लेकीचा वाढदिवस …..".
हिम्मत करून तीने चाचरतच डायनिंग टेबलवर बसलेल्या विशाखाला विचारले,
" ताई, आज संध्याकाळचा स्वयंपाक करायला लवकरच चार वाजता आले तर चालेल का ?"
"का गं ? काही काम आहे ? साहेबांना गरम गरम जेवायला आवडत "…..
विशाखाने पुस्तकातून डोके वर काढत विचारले….
"आज माझ्या लेकीचा सुनेत्राचा दुसरा वाढदिवस आहे हो ! " शेजारच्या दोन-चार लहान मुलांना बोलावीन म्हणते ..….….. त्या साठी लवकर घरी जायला हवं तयारी करायची आहे !घरी कुणी नसत माझ्या !... ईंदुने विशाखा ला आपली अडचण सांगितली..
" हो का ? अगं माहीती असतं तर मी काहीतरी गिफ्ट आणून ठेवले असते तिच्यासाठी ! लहानच आहे गं तुझी मुलगी !तुझंही वय काही जास्त दिसत नाही कुणाकडे ठेवून येते गं ईतक्या लहान जीवाला तु?… " विशाखाने तीच्याकडे बघत विचारले.….
ताई, शेजारीच माझी ननंद राहते तिच्याकडेच दिवसभर.तीच्या मुलांसोबत खेळत रहाते ! ईंदुने सांगितले…
"अगं ईंदु, उद्या घेऊन ये तुझ्या मुलीला ईथे! आपण पुन्हा साजरा करू तीचा वाढदिवस !
मलाही मुलीची खूप आवड आहे गं, पण सुयश झाला आणि माझी तब्येत फार खराब झाली ….डॉक्टर म्हणाले आता चान्स घेऊ नका नाहीतर बाळाच्या आईच्या जिवाला धोका राहील…..आणि माझी मुलीची इच्छा अपुरीच राहिली गं! सुयश आता आठ वर्षाचा झाला "….. विशाखाने आपल्या मनातली व्यथा ईंदुला सांगीतली…
त्या दिवशी इंदू चार वाजताच देवघरांकडे येऊन स्वयंपाक करून घरी गेली….
दुसऱ्या दिवशी सकाळीच दोन वर्षाच्या मुलीला, सुनेत्राला घेऊन ईंदु निघाली.... देवघराच्या बंगल्याच्या गेट मधून आंत येताना तिने सुनेत्राला आपल्या कडेवरून खाली ऊतरविले…आणि व्हरांड्यातला झोपाळा बघून सुनेत्रा धावतच झोपाळ्याकडे निघाली...
झोपाळ्यावर बसलेली विशाखा कौतुकाने तिच्याकडे बघत होती.... पिंक कलरचा सुंदरसा फ्रॉक घातलेली... गोरीगोमटी गोबऱ्या गालाची सुनेत्रा, तीचे ते "दुडुदुडु "धावणे, विशाखाच्या मनाला सुखावून गेले….ती लगबगीने धावतच बंगल्याच्या चार पायर्या उतरून अंगणात आली…. आणि धावत येणाऱ्या सुनेत्राला तीने पटकन उचलून धरले आणि तीचे पटापट मुके घेऊ लागली….. कोण अवर्णनीय आनंद झाला तिला त्या पिटुकल्या जीवाला आपल्या छातीशी कवटाळून……
पण असं अकस्मात कोणीतरी आपल्याला ऊचलुन घेतलेलं सुनेत्राला आवडलं नाही. सुनेत्रा घाबरली आणि रडायला लागली….
"अले ,अले! काय झालं शोनुकलीला ? खाऊ हवाय का? थांब तुला खाऊ देते हं !"
म्हणून विशाखा तिची समजुत घालु लागली…. खाऊच नाव काढताच ,सुनेत्रा रडायची थांबली.विशाखाने घरात नेऊन तिला वाटीभर खाऊ दिला...
"खूप गोड आहे गं तुझी मुलगी! अगदी हवीहवीशी वाटणारी…. हे गोबरे गोबरे गाल आणि डोळे….. डोळे किती सुंदर आहेत लंबोळके ,काळेशार आणि पाणीदार… बाहुलीच दिसते गं !"म्रुगनयनी" नांव ठेवायला हवे होते हिचे तु !....पहिल्याच भेटीत मनमोहुन टाकणाऱ्या सुनेत्राचे किती वर्णन करू आणि किती नाही ,असे विशाखाला झाले होते…..पहाताक्षणीच विशाखाला सुनेत्रा मनापासुन आवडली….आणि सुरवातीला रडणारी सुनेत्रा आता विशाखाच्या कडेवर बसुनच खाऊ खाऊ लागली…..
विशाखा सुनेत्राला कडेवर घेऊन घरभर फिरली... सुनेत्रा तिच्याजवळ अगदी चुपचाप राहिली होती… इंदुचा स्वयंपाक होईपर्यंत सुनेत्रा विशाखा सोबत खेळत होती…. ईंदु घरी जायला निघाली… पण सुनेत्राला ईंदूजवळ द्दायला विशाखाचे मन होईना ….
विशाखा ईंदुला म्हणाली.. "आज संध्याकाळी पण घेऊन ये हीला ...मी केक आणते …. आणि ऊद्दापासुन माझ्याजवळच ठेवत जा सुनेत्राला ,मी सांभाळेन दिवसभर... संध्याकाळी स्वयंपाकाला आली की आली की मग घेऊन जात जा…"
इंदूने होकारार्थी मान डोलावली...ती मनातुन आनंदली... इतक्या चांगल्या घरच्या बाई ,आपल्या घरी माझ्या लेकीला आपल्या जवळ ठेवीन म्हणते... आणखी काय हवं माझ्या पोरीला ? चांगले चांगले कपडे लत्ते घालायला मिळेल... चांगलं चांगलं खायला मिळेल ...चांगले संस्कार होतील माझ्या पोरीवर आणि ईंदु सुनेत्राला घेऊन खुशीतच घरी आली….नवऱ्याला सगळं सांगीतले….. त्यालाही आनंद वाटला …… तो म्हणाला..
"अगं या साहेब लोकांच्या वर्षा ,दोन वर्षात बदल्या होत राहतात ,घेऊ दे त्यांना आनंद लेकीचा…."
सायंकाळी बलून लावून आणि केक कापून विशाखाने सुनेत्राचा बर्थडे साजरा केला.. केक कापतांना ...सुनेत्राच्या बाजूला "सुयश" विशाखाचा दहा वर्षाचा मुलगाही ऊभा होता... त्यालाही खूप आवडली सुनेत्रा , त्या छोट्याच्या परीला बघून आनंद झाला त्याला ..आपल्याला कुणीतरी खेळायला सोबत मिळालं म्हणून…
दुसऱ्या दिवसापासून "सुनेत्रा" जणु आता विशाखाचीच मुलगी झाली…. तिची हौस- मौज , सकट इतर सगळं ती करू लागली तीच्या साठी वेगवेगळी खेळणी , कपड्यांची खरेदी होऊ लागली… सुनेत्रा आता तीन वर्षाची झाली…
एक दिवस सुयश शाळेतून घरी आला... बेडरुमधुन सुनेत्राच्या रडण्याचा आवाज येत होता... सुयशने विशाखाला आवाज दिला…. "ममा मला भूक लागली आहे" !
…. विशाखा म्हणाली "अरे आता तू मोठा झाला आहेस ! खाण्याचं डायनिंग टेबलावर काढून ठेवल आहे मी तुझ्यासाठी ,तुझ्या हाताने घे….सुनेत्रा रडत आहे बघ " आणि ती रडणार्या सुनेत्राला शांत करू लागली….
"ममाssss माझे कपडे?" सुयशची हाक ऐकून विशाखाने रुममधुनच आवाज दिला….
"अरे घे ना तुझं तु"….
आणि असं नेहमीच घडू लागलं बारा वाजल्यापासून सुनेत्रा विशाखा जवळच असायची आणि विशाखा सुनेत्राच्या वात्सल्यात पार बुडाली . ऐक दिवस रात्री स्वयंपाक केल्यानंतर नेहमीप्रमाणे ईंदू सुनेत्राला घेऊन जाऊ लागताच विशाखा म्हणाली…." ईंदू ,अगं राहु दे सुनेत्राला माझ्याकडे….
इंदू म्हणाली ,"नाही ताई माझा नवरा रात्री कामावरून आल्यावर सुनेत्राची वाट बघत असतो... ."
पण विशाखाला ते रुचत नव्हते…. का कोण जाणे तिला वाटायचे मीच तिची आई होऊन तिचे संगोपन करावे…. रात्रीही ती आपल्या जवळच असावी.. सकाळी आठ वाजता ईंदु सुनेत्राला घेऊन यायची .एखादा दिवस ईंदूला यायला उशीर झाला तर विशाखा चा जीव कासावीस व्हायचा...
सुनेत्रा आता चार वर्षाची झाली... विशाखा तिला छान छान कपडे घालून रोज फिरायला न्यायची... सुयशच्या बालमनाला आपले प्रेम वाटले गेले आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही….सुयशला आपल्या प्रेमात वाटेकरी नको होता….
...…..सुरुवातीला सुनेत्राचा लाड करणाऱ्या सुयशच्या प्रेमाची जागा आता तिरस्काराने घेतली. शाळेतून आल्यावर आपली मम्मा सुनेत्रामध्ये गुंतून दिसली कि त्याला राग यायचा... तो आदळ आपट करायचा... कुठली कोण आहे ही मुलगी आणि तिची माझ्यासोबत बरोबरी ?.... आणि ऐक दिवस त्याने त्याच्या मनातले शल्य आपल्या बाबांजवळ बोलून दाखवलं… तो म्हणाला बाबा!
"आजकाल आईचं माझ्याकडे लक्षच नाही.. सारखी या सुनेत्राच्या मागे फिरत असते... "
त्याचे बाबा ….पंकजच्याही ते लक्षात आलं होतंच…. पण विशाखाचे सुनेत्रा बद्दलच वात्सल्य बघून त्यांना तिला काही म्हणून तिचं मन दुखावसं वाटत नव्हतं…..
सुनेत्रा आता चार वर्षाची झाली होती... एक दिवस सुयश शाळेतून आला आणि आपल्या आवडत्या गाड्या सुनेत्रा घरभर फेकताना बघून त्याला भयंकर राग आला…. आपली आई आजुबाजुला नाही असे बघून त्याने सुनेत्राला ढकलले…. सुनेत्रा खाली पडली ….तिचा रडण्याचा आवाज ऐकून विशाखा धावतच आली आणि रडणाऱ्या सुनेत्राला जवळ घेऊन तिने सुजयच्या गालावर चापट मारली….
सुजय रडतच लहान आपल्या रूम मध्ये गेला…. रात्री त्याने त्याचे बाबा आल्यावर घडलेली घटना सांगितली. पंकजने विशाखाला समजून पाहिले…... पण ते तीला पटलेले दिसत नव्हते...
विशाखा म्हणाली... अरे बारा वर्षाचा झाला आहे सुयश त्याला कसं कळत नाही, सुनेत्रा लहान आहे अजून ,हा तिचा द्वेष कां करतो ! याला काही कमी पडु देते का मी!
विशाखाला मुलींबद्दल वाटणारं विषेश प्रेम , आणि आता सुनेत्राबद्दल वाटणारी ओढ बघून तिला सुनेत्रापासून दूर करणे पंकजला अवघड वाटत होतं .सुनेत्राला विशाखा पासून तोडलं आणि तिच्या मनावर परिणाम झाला तर….. नको नको ते विचार पंकजच्या मनात यायला लागले .पण दुसरीकडे आपल्या पोटच्या पोराला दुर्लक्षुन विशाखाची सुनेत्रा बद्दल ची वाढती माया, सुयशच्या बालमनाचा विचार करता त्याला वाटत असलेली सुनेत्राबद्दलची असूया त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती ….त्यानी आपल्या मित्राला आपला प्रॉब्लेम सांगितला….
पंकज म्हणाले…" काय करू प्रशांत काही समजत नाहीये!"
प्रशांत म्हणाले .." वहिनीचं त्या मुलीबद्दलचा जिव्हाळा ,प्रेम सगळं ठिक आहे...मला सगळं कळतंय तुझं म्हणणं….पण तु या विषयावर वहीणीशी प्रेमाने पण स्पष्ट पणे बोल! ...समजावून सांग त्यांना... दुसऱ्याची मुलगी आपली होऊ शकत नाही म्हणावं... आणि तु ईथुन दुर बदली करून घे…..तिथे गेल्यावर वहिनीला ज्या कामात ईंटरेस्ट असेल ते करायला प्रोत्साहन दे…. कुठे एखाद्या छोट्या नोकरीत मन रमवायला सांग . जेणेकरून काही दिवसांनी तीची सुनेत्राची बद्दलच ओढ कमी होईल बघ !अरे काळ हेच औषध असतं बऱ्याच गोष्टींना"….
प्रशांतचे म्हणणे पंकजला पटले ... त्याने विशाखाची समजूत घातली ..विशाखालाही त्याचे म्हणणे पटवुन घेण्याशिवाय पर्याय नव्हता...शेवटी दुसऱ्याचीच लेक होती सुनेत्रा आणि पंकजने आपली बदली दुसऱ्या राज्यात करून घेतली….. सायंकाळी पंकज ऑफिस मधुन घरी येऊन म्हणाले….
"विशाखा, दिवाळीच्या आधीच आपल्याला सामानाची आवराआवर करावी लागेल आणि लगेच दुसऱ्या दिवशी निघावे लागेल बदलीच्या ठिकाणी …"
सुयशला ते ऐकून खूप आनंद झाला, काही दिवसांनी आपल्या मम्मावर आपल्या एकट्याच अधिकार असणार म्हणून… दिवाळी जवळ आली….यावर्षी भाऊबिजेच्याच दिवशी सुयशचा वाढदिवस आला होता…. विशाखाने सुयश आणि सुनेत्रासाठी दिवाळीची भरपूर खरेदी केली . भाऊबिजेच्या दिवशी सुयशचा वाढदिवसाचा केक कट करून मग सुनेत्राच्या हाताने दोन वर्षाप्रमाणे याही वर्षी सुयशला ओवाळुन घेणार होती…
लक्ष्मीपुजनाचा दिवस आटोपला ..ऐक दिवस मधे जाऊन भाऊबीज भाऊबिजेचा दिवस ऊजाडला...…. सकाळी विशाखाने वाढदिवसानिमित्त सुयशच्या आवडीचे पदार्थ बनविले ….त्या दिवशी सायंकाळी इंदू आणि तिचा नवरा सुनेत्राता घेऊन विशाखाकडे आले विशाखाने सुनेत्राला तिच्यासाठी खास आणलेला ड्रेस घातला. त्यापरी ड्रेस मध्ये ती खूप छान दिसत होती…. चार वर्षाच्या सुनेत्राचे पटापट मुके घेत विशाखा म्हणाली……"कीती गोड दिसते माझी परी…"
"पंकज सुनेत्राचे व माझे फोटो घे नं….…..आता यावर्षी ती माझ्या जवळ आहे ... काय माहित पुढे कीती वर्षानी भेट होईल तिची ! मी ईथुन गेल्यानंतर आठवण पण नाही येणार माझी तिला !" विशाखाला सुनेत्राचा विरह सहन होत नव्हता आणि असे म्हणतांना तीचे डोळे भरून आले…...
हे सगळं बाजुलाच ऊभ्या असलेल्या सुयशला खटकत होतं….तो मनात म्हणाला…" आज माझा वाढदिवस! या दिवशी तरी माझ्या मम्मानी फक्त माझाच लाड करायला हवा होता, पण …... तो हिरमुसला पंकज कडे गेला…. म्हणाला "बाबा आज माझा वाढदिवस पण आई माझा लाड करावयाचा सोडुन त्या सुनेत्रा सोबत फोटो घेत आहे…"
त्याला समजावत पंकज म्हणाले …."बेटा सुयश , अरे दोन-तीन दिवसांनी आपण इथून निघून जाऊ , मग ममा फक्त तुझी एकट्याचीच असणार . आज तुझा वाढदिवस ना, आणि भाऊबीज सुद्दा आहे आजच्या दिवशी नाराज नको होऊस!अरे भावाच प्रेम दे तिला ! थोड्या वेळात आपण केक कट करू ... आज भाऊबीज आणि तुझा वाढदिवस पण…. तिच्याकडून ओवाळून घे... अरे हे नातं मोठं विचित्र असते …. लहानपणी आपण ज्याचा दुःस्वास करतो, मोठं झालं की त्याच व्यक्तीची आपल्याला तीव्रतेने आठवण येऊन आपण तिला "मिस्" करतो... ती कुठे असेल म्हणून ! चल तुला फटाके ऊडवायला आवडतात ना….आपण फटाके ऊडवु…..
सुयश तसा ,समजदार होता आणि आता थोडा मोठाही झाला होता. त्याला त्याच्या बाबांचे म्हणणे पटले आणि चेहऱ्यावर हसू घेऊन तो लहानग्या सुनेत्राजवळ फुलझडी घेऊन आला, सुनेत्रा आपल्या वडीलांच्या हात धरून ऊभी होती
हातातली फुलझडी दाखवत सुयश म्हणाला…
"सुनेत्रा मी बघ आता कसा फटाका ऊडवितो "
विशाखा म्हणाली "अरे तिकडे लांब जा….सुनेत्रा अजुन लहान आहे, तीला या फटाक्यांना हात नको लावू देऊस् !"
सुयश फुलझडी घेऊन गेट कडे गेला . सुनेत्राला आपल्या दादाच्या हातातल्या पेटत्या फुलझडीच अप्रूप वाटलं आणि ती " दादा दादा "म्हणत आपल्या वडीलांचा हात सोडुन तिकडे,त्याच्याकडे पळत सुटली…
सुयशने हातातले राँकेट जमीनीवर ठेवले. रॉकेटला फुलझडी लावतांना दुरूनच त्याला सुनेत्रा त्याच्याकडे पळत येताना दिसली...तो ओरडला सुनेत्रा थांबsss... रॉकेटची वात पेटली होती आणि ...
आणि ...आणि ते रॉकेट वर न उडता सुनेत्राच्या दिशेने निघाले …डोळ्याची पापणी न लवते तोच
रॉकेट सुनेत्राच्या चेहऱ्या जवळुन गेले आणि सुनेत्राने जोरात किंकाळी फोडली…..
डोळ्यात होणाऱ्या जळजळीने सुनेत्रा हात पाय आपटत खाली बसली आणि असह्य होणाऱ्या वेदनेने जोरजोरात रडायला लागली…. क्षणभर कुणाला काय झाले ते कळलेच नाही...
सगळेजण तिकडे धावले आणि सुयशही जागीच स्तब्धपणे ऊभा राहीला …. त्याचे हातपाय कापायला लागले…..झालेला प्रकार सर्वांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही...
सुयश उभा होता.. विलक्षण घाबरला होता तो...त्यालाही समजत नव्हते की हे काय झाले म्हणुन… सुनेत्राचा आक्रोश… आणि सगळ्यांचा आरडाओरडा ऐकून तोही रडायला लागला.. पंकजने लगेच गाडी काढली… विशाखाने सुनेत्राला जवळ घेतले होते पण डोळ्यात होणाऱ्या अंगारामुळे ती ऊसळ्या घेत होती ... ईंदुहीतिचा नवरा गाडीत बसले... सगळे जण आय स्पेशलिस्ट कडे पोहोचले ...सुनेत्रा नुसती तळमळत होती... आणि आक्रोश करत होती…. तिच ते केविलवाणं रूप अस्वस्थ करीत होतं ….कोणाला काही सुचत नव्हते….
दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी तिच्या डोळ्यात ड्राप टाकले ...थोड्यावेळाने ती थोडी शांत झाली पण …..डोळे बंद असल्याने हात पुढे करून... आपल्या आईला "आई आई" म्हणून ईंदूला शोधू लागली…. विशाखाने तिला ईंदुजवळ दिले….आणि सुनेत्रा आईच्या कुशीत शिरून झोपी गेली….
डॉक्टर म्हणाले, डोळ्यात बारूदीचे कण गेले .. तिला काही सध्याच दिसणार नाही आणि इतक्या लहान वयात तिचं ऑपरेशनही नाही करता येणार फक्त ड्रॉप टाकत राहावे लागेल... थोडी मोठी झाल्यानंतर बघता येईल.. ऑपरेशनने तिची दृष्टीला वापस आली तर …..
ईंदूचे रडणे थांबले नव्हते,ती म्हणाली" "डॉक्टर, माझी सुनेत्रा कायमची आंधळी तर नाही ना होणार?"
डॉक्टर म्हणाले …"अगदी तसेच नाही पण काही वर्ष तरी तीला तुम्हाला सांभाळावे लागेल….पंधरा दिवस तरी तीला इथे दवाखान्यात ऍडमिट ठेवावं लागेल..... बघू काय फरक पडतो ते" ….
रात्रभर विशाखा ,, ईंदु व तिचा नवरा दवाखान्यात थांबले …..
सुनेत्रा डोळे ऊघडत नव्हती... फक्त आई ,आई करत आपल्या आईला चिटकून होती…. डोळ्यांची होणारी आग….आणि डोळ्यासमोर अंधारच अंधार दिसत असल्याने त्या लहानश्या जिवाला हे काय झालं काहीच कळत नव्हते….
सर्वांना सुनेत्राचे गोड बोलणे, हसणे, खेळणे बागडणे, सर्व सर्व आठवत होते आणि आता ती असहाय्य होऊन रडत असलेली बघून सर्वांच्या मनाला यातना होत होत्या….
बदली झाली असल्यामुळे पंकजने आपले सामान आधीच बदलीच्या ठिकाणी पाठवले होते ...मोजके सामान घेऊन ते थांबले होते ...पण आता ही घटना घडल्यानंतर पंकजने सुट्टी वाढवून घेतली आणि ते तिथेच थांबले .पंधरा दिवसांनी डॉक्टरांनी सांगितले की हिच्यावर सध्यातरी डोळ्यात ड्राप वगैरे सारखा उपचार सुरू ठेवावा लागेल…….
झालेल्या घटनेत सुयश ची काही चूक नव्हती पण सुनेत्राचे वडील सुयशलाच दोषी ठरवून त्याला वाटेल तसं बोलले आणि या सगळ्या घटनेला सुयशच जवाबदार आहे म्हणाले ….त्यामुळे सुयशची मनस्थिती खराब झाली होती…
पंकजने सुनेत्राच्या बाबांना समजावून पाहिले, म्हणाले "हे बघा यात सुयशची काहीही चूक नाही आहे ...पण तुम्ही उगीच सुयशला अपराधी ठरवत आहात ... जे घडले ते घडले ...आम्ही नेहमीच तुमच्या संपर्कात राहू आणि योग्य वेळ आल्यानंतर तिच्या ऑपरेशनचा सगळा खर्च मी करेल"….आम्ही ऊद्दा ईथुन जाणार…...सुनेत्राच्या खर्चासाठी हे पैसे ठेवा... ...
सुनेत्राचे वडील संतापून म्हणाले …"नको तुमचे उपकार ! जाऊ आम्ही सरकारी दवाखान्यात….. पुढे काय होईल ते होईल आमचं ते आम्ही बघून घेऊ , म्हणत त्याने हात जोडले …"आता सोडा आमचा पिच्छा!आमचं आम्हाला बघु द्दा…. !
विशाखा -पंकजला काय बोलावे काही सुचेना... ते निमूटपणे दवाखान्याच्या बाहेर पडले आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्या बदलीच्या गावी रवाना झाले…..मनात ऐक अपराधी पणाची भावना घेऊन……
बदलीच्या गावी येऊन पंकज आपल्या ड्युटीवर रूजु झाले आणि विशाखाने आपले मन रमवायला आपले छंद जोपासायला सुरुवात केली... सुयश च्या मनातून अपराधीपणाची भावना काढण्यासाठी ते सतत त्याच्या जवळपास राहू लागले ,त्याच्याशी संवाद साधू लागले... जास्तीत जास्त लक्ष आता सुयश कडे देऊ लागले .मधली वर्ष अशीच गेली... ऐन दिवाळीच्या आसपासच त्याचा वाढदिवस यायचा...सुयशने आपला वाढदिवस मनविने सोडून दिले होते. ती एक कटू आठवण त्याच्या मनात घट्ट बसली आणि दिवाळीला फटाक्यांच्या आवाजाने त्याला त्रास व्हायचा . आपल्या मुलाच्या वागण्या-बोलण्यात सगळ्या गोष्टीत फरक पडलेला बघून विशाखा, पंकजला वाईट वाटत होते …..पण काय करणार! त्यांनी समजावून बघितले पण सुयशच्या मनातली अपराधीपणाची भावना कमी होत नव्हती ….तो शांतपणे आपला अभ्यास करायचा पण ,अभ्यासात विशेष प्रगती करू शकला नाही…
सहा वर्षांनी पंकजची बदली पुन्हा सुनेत्रा रहात असलेल्या गावी झाली …
विशाखा म्हणाली। " पंकज बदली रद्द रद्द करून घे ना…. नको त्या गावी जायला…. पुन्हा कटू आठवणींना उजाळा मिळेल! सुयशच दहावीचं महत्त्वाचे वर्ष आहे हे!"
पंकज म्हणाले.. "बघतो प्रयत्न करून…. बदली रद्द होणार नाही... काही दिवसांसाठी तरी जावे लागेल .. सुयशला आपण या वर्षी तरी इथेच होस्टेल ला ठेवु…..
विशाखा म्हणाली "नको ईथेच एखादे घर घेऊन सुयश आणि मी रहाते, पुन्हा त्या गावात जायला नको" . सुयश आणि विशाखा तिथेच राहिली.दिवाळी आली… पंकज म्हणाले….
"विशाखा दिवाळीला मला ऐखाद्दा दिवसच सुट्टी मिळेल माझं तिकडे येणं जमणार नाही "
आणि त्या दिवाळीला विशाखा व सुयश दोन दिवसासाठी पंकज जवळ आले… त्यांनी साधेपणाने दिवाळी केली…. भाऊबीजेच्या दिवशी अचानक सुयश म्हणाला….
"आई कशी असेल गं ती? तीच्या डोळ्याच ऑपरेशन केल असेल का तिच्या बाबांनी?की कुठल्या अंध शाळेतच शिकत असेल…. ती आठवली की खुप अपराधी वाटते गं….."
विशाखाला तरी कुठे माहीत होतं सुनेत्राच पुढे काय झालं ते….ईतक्या वर्षात या बाजुला बदली नाही…. ईथल्या कोणाशी काही संपर्क नाही….आणि विचारायचे तरी कुणाला…ती सुयशला म्हणाली….
"सुयश अरे अशा घटना नकळत घडुन जातात…..तुझा त्यात काही दोष नव्हता, तु अपराधी वाटुन घेऊ नकोस… अरे संपूर्ण आयुष्य पडलयं तुझ्या समोर...आपल्या भविष्याचा विचार कर…करिअरचा विचार कर बाळा!"
"आई तुला बाबांना अनेकदा सांगीतलयं मी,.माझा निश्चय पक्का आहे "...पुन्हा एकदा सुयशने त्याची "आय स्पेशालिस्ट "होण्याची ईच्छा आपल्या आईजवळ बोलुन दाखविली….
विशाखा म्हणाली ,सुयश ! त्यासाठी परसेंटेज भरपुर लागतात ,खूप मेहनत घ्यावी लागते आणि तु मधे मधे डिस्टर्ब असतोस...आतापर्यंत तरी तुला जेमतेमच परसेंटेज मिळालेले आहेत…."
"पण मी करतोय ना अभ्यास आई! …...बाबांना तु फक्त समजाऊन सांग ना…. पण आई ,आपण कधीतरी "तीला" भेटायला जाऊ….तीच्या मनात अजुनही माझ्याबद्दलचा गैरसमज कायम असेल का गं?
ती लहानपणीची दादा!दादा म्हणत धावत येणारी सुनेत्रा ….आणि नकळतपणे घडलेला तो अपघात…सुयशच्या डोळ्यासमोर सहा वर्षापूर्वीचे द्रुष्य आठवले आणि…. डोळ्यात पाणी तरळले….
विशाखाने त्याला जवळ घेतले म्हणाली… मी बाबांशी बोलते ,आपण एकदा जाऊन सुनेत्राची व तिच्या आईबाबांची भेट घेऊ….त्याशिवाय तुझ्या मनावरच अपराधी पणाच ओझं ऊतरणार नाही.. आणि तुझं लक्ष अभ्यासात लागणार नाही….कितीदा तुला बाबांनी आणि मी समजावलयं...वारंवार ती घटना आठवुन तु स्वः ताला दोषी समजत जाऊ नकोस म्हणून…
आपल्या आईच्या डोळ्यात बघत सुयशने अचानकपणे विचारले.. …"आई सुनेत्राच्या जागी माझी सख्खी बहीण असती तर?"
"अरे अशा जर तर च्या गोष्टी नको करुस….जाऊ आपण त्यांच्याकडे….करु काहीतरी त्यांच्यासाठी…. चल सायंकाळी झाली… देवाजवळ दिवा लावायला हवा…"म्हणत आपल्या मांडीवर डोक टेकवून झोपलेल्या सुयशला विशाखाने ऊठविले…
सायंकाळी पंकजला…. सुयश म्हणाला ,"बाबा आपण सुनेत्राला भेटायला जाऊ या का? कशी असेल ती ? तिचं ऑपरेशन केलं की नाही, कुठल्या परिस्थितीत आहेत ते लोक…बघायला हवं!
पंकज ,विशाखा आणि सुयश तिघेही सुनेत्राच्या घरी पोहोचले... बाहेर दारात खुर्ची टाकुन एक दहा वर्षाची सुंदर मुलगी बसू" नमस्तेजी" मधलं
"हमे क्या जो हरसु उजाले हुए है …. के हम तो अंधेरोके पाले हुए है ।।
हे गाणं म्हणत होती .ते गाण्याचे बोल आणि सुनेत्राची सत्य परिस्थिती बघतातिघांनाही वाईट वाटलं…. विशाखा तिच्या जवळ पोहोचली .तिला लक्षात यायला वेळ लागला नाही हीच सूनेत्रा! विशाखाने आवाज दिला
"सुनेत्रा" !
सुनेत्राने आपलं गाणं थांबवलं … तिने विचारले "कोण? आणि मला सुनेत्रा म्हणून कशीकाय हाक मारली तुम्ही? माझं नाव नेत्राआहे... "सु"हा शब्द केव्हाच आयुष्यातून निघून गेलेला आहे"…
विशाखा काही बोलणार इतक्यात पंकज ने तोंडावर बोट ठेवून तिला आपली ओळख न देण्याबद्दल सांगितले!
इतक्यात सुनेत्राची आई "ईंदू "बाहेरून आली त्यांना बघून ती हात जोडून म्हणाली "नमस्ते साहेब"
सुनेत्राकडे बघुन म्हणाली... "नेत्रा ! अगं बघं तरी , कोण आलयं तुला भेटायला !
आई तुला माहीत आहे ना !मला दिसत नाही ते! कशी बघणार मी ?" सुनेत्रा म्हणाली….
सुयश पुढे झाला , सुनेत्राचा हात हातात घेतला म्हणाला.. "सुनेत्रा कशी आहेस ग ?आज भाऊबीज म्हणून मी तुझ्याकडून ओवाळुन घ्यायला आलोय !"
आणि ते ऐकताच सुनेत्राने त्याचा हात झटकला म्हणाली "तू ,तूच आहेस न माझ्या जीवनात अंधकार पसरविणारा, माझ्या आयुष्यातची वाट लावणारा आणि इथे कशाला आला आहेस?
आणि कोणाला बहीण मानतोस रे ? फुकटची सहानभूती दाखवू नकोस मला... जा इथून !जा म्हटलं ना! आणि माझ्या आयुष्यात पुन्हा भाऊ म्हणून येऊ नकोस आणि ती घरात निघून गेली…
इंदू म्हणाली "माफ करा साहेब ……..पण तिच्या बाबांनी तिच्या मनात गैरसमज भरून दिलेला आहे ,त्यामुळे ती तुम्हा सर्वांचा मनातुन खूप द्वेष करते…. कृपा करून आता तू इथून जा.... तुम्ही कुठे आहात ते मला सांगा, मी तुम्हाला भेटायला येईल"
पंकज, विशाखा ,सुजय तिथून निघाले आणि परत आपल्या बंगल्यावर आले .दुसऱ्या दिवशी सकाळी ईंदु त्यांना भेटायला आली आणि तिने "देवघरे" बदलुन गेल्यानंतरची सगळी हकीकत सांगितली….म्हणाली,
"त्यावेळेस पंधरा दिवसांनी सुनेत्रालच्या बाबांनी तीला सरकारी दवाखान्यात नेलं, आपल्या गोड गोजिऱ्या मुलीची असहाय अवस्था बघून तिच्या बाबांना खूप वाईट वाटायचं आणि त्यानंतर त्यांनी दारू घ्यायला सुरुवात केली... दिवसें दिवस सगळं वाढत गेलं आणि एक दिवस रात्री ड्युटीवरून येतांना ट्रक ने त्यांना ऊडविले….
तेव्हापासून मी आणि सुनेत्रा आम्ही दोघीच जणी राहतो . सुनेत्राला मी का आता अंध शाळेत घातले आहे तिथे ती गाणं शिकते…"
विशाखाने विचारले …. मग त्यानंतर पुन्हा द्रुष्टी येण्यासाठी ऑपरेशन वगैरे…
ईंदु हताश पणे म्हणाली.. "दाखवले होते डॉक्टरांना पण त्यांनी असमर्थता दाखवली म्हणाले की हीचे अंधत्व असेच कायम राहणार!"
सुयश ईंदूच सगळं बोलणं ऐकत होता , त्या दिवसापासून सुयश जोमाने अभ्यासाला लागला, तो मला म्हणाला... "आई !
मी आय स्पेशालिस्ट होऊन तिच्या केसचा अभ्यास करेल आणि तिची द्रुष्टी परत आणेन "
….आणि त्यानंतर सुयशने मागे वळून बघितलं नाही आणि विशाखाला त्याला अभ्यास कर म्हणून म्हणावे लागले नाही . दहावी मध्ये उत्तम प्रकारे पास होऊन , त्याने बारावी मध्येही चांगले परसेंटेज मिळविले आणि मेडिकल ला ऍडमिशन घेतली…. डिग्री मिळवून पुढे परदेशात जाऊन शिक्षण घेतले.. काही वर्षांनी एक नावाजलेला आणि सक्सेसफुल आय स्पेशालिस्ट म्हणुन तो ओळखला जाऊ लागला …. पण मनांत ईच्छा असुनही त्याची सुनेत्राला भेटायची हिम्मत होत नव्हती!
आज सुनेत्राच्या शाळेत विशेष कार्यक्रम होता . अंध शाळेला भेट देण्याकरिता काही नावाजलेल्या व्यक्ती, विशेष पाहुणे म्हणून येणार होत्या, त्याकरता कार्यक्रमाची रेलचेल ठेवलेली होती आणि कार्यक्रमाचा विशेष भाग म्हणून सुनेत्राची गाणीही ठेवलेली होती…
कार्यक्रम झाल्यावर सगळ्यांनी विशाखाच्या गाण्याची खूप तारीफ केली, कार्यक्रमाला आलेल्या विशेष पाहुण्यां पैकी एक जण आपल्या सोबत असलेल्या मैत्रिणीला म्हणाली,....
" सुंदर आहे ही मुलगी, डोळे पण कीती छान आहे, सुस्वभावी आणि आवाज तर ...काय गाते ,ऐकतच रहावेसे वाटते. मी नेहमी येत असते इथे या शाळेला भेट देण्याकरता !मला ही मुलगी आवडते ,हे अंधत्व सोडलं तर विधात्याच्या निर्मितीतला ही ऐक अविष्कार ठरली असती….
दुसऱ्या चिफगेस्ट म्हणाल्या "होना !किती गोड गळा आहे,सुमधूर आवाजाचं देण लाभलीय हिला पण काय करणार! देवाने एक कमतरता ठेवलीयं, नाहीतर माझ्या निनाद साठी सुन करुन घ्यायला आवडलं असतं मला…."
बाजूलाच उभ्या असलेल्या सुनेत्राच्या कानावर सगळं बोलणं पडत होतं आणि तिला स्वःताबद्दल थोडा गर्व वाटला आपल्या सौंदर्याचे वर्णन एकुन,
गालावर पुन्हा एकदा कळी खुलली...तसं लहानपणापासून… सगळे जण तिच्या आईला ईंदुला म्हणायचे...ईंदु तुम्हा नवराबायकोला शोभत नाही ही मुलगी… कुणा एखाद्या मोठ्या घरची लेक वाटते...सुवर्णासारखी कांती,चाफेकळी नाक ..आणि डोळे? ऐखाद्दा हरीणी सारखे... लांबोळके, काळेशार पाणीदार... सगळे माझ्या सौंदर्याची तारीफ करतात आणि मी फक्त ऐकते….पण हे सगळं सौंदर्य प्रत्यक्षपणे बघायला द्रुष्टीच ठेवली नाही देवाने….आता मी तारूण्यात प्रवेश केलाय मलाही माझ्या भावना आहेत ...कुणी तारीफ केली तर मन फुलुन येतं ….आई सांगते कुणीतरी देवधर काकु होत्या त्या मला "म्रुगनयनी" म्हणायच्या ... खुप लाडकी होते मी त्यांची...मुली सारखं वागवायच्या आणी त्यांच्याच मुलाने माझी द्रुष्टी हिरावली….मला अंधकाराच्या गर्तेत लोटुनस्वतः झगमगाटी दुनियेत वावरत असणार ,आपल्यामुळे कुणाचं तरी जीवनऊद्धस्त झालयं हे त्याच्या गावीही नसणार….आणी तिच्या मनात "त्याच्या" विषयी पुन्हा ऐकदा द्वेष दाटून आला…
सायंकाळी घरी आल्यावर सुनेत्रा आपल्या आईची वाट बघत विचार बसली होती..
आपल्या हसत्या खेळत्या लाडक्या लेकीला अस विचार करत बसलेलं बघून ईंदुला भरून आलं… पण तसे न जाणवु देता हसत हसत तीने सुनेत्राला विचारले ... काय विचार करते माझी लेक ?
आई आलीस् ? काही नाही गं !गाण्याची प्रँक्टिस करत होती….तिनेही आपल्या मनाचा आईला थांगपत्ता लागु दिला नाही….
नेत्रु !आपल्या गावातील डॉक्टर सरदेसाई कडे कुणी आयस्पेशालिस्ट येतोय म्हणे...महीण्यातुन ऐकदाच व्हिजीट असते...आपण जायच का ?
त्यांनी कितीतरी अंधाना द्रुष्टी प्रदान केली असं आज ऐकलं...आणि माझ्या पुलकित झाल्या गं, दाखवू त्यांना तुझे डोळे चलशील ना !
अगं आई! खोट्या आशेवर नको ना राहुस् ! या पुर्वी आपण दोन ,तीन डॉक्टरांना दाखविलेले ना ,त्यांनी स्पष्टपणे सांगीतलयं मी कधीच हे जग बघु शकणार नाही म्हणून….अगं मी स्विकारलयं माझं अंधत्व ! मी फक्त माझ्या डोळ्याने बघु शकत नाही ऐव्हढेच….बाकी सगळं येतं की मला.. लिहीता ,वाचता… अगदी आपलं स्वःताच रक्षण करायला ही शिकले मी !अगंआमची अंधशाळा म्हणजे प्रँक्टिकल लँबच असते...तुला काही कमी वाटते का आपल्या मुलीमध्ये ? आणि लग्नाच म्हणशील ,तर होईल माझ्यासारख्याच मुलाशी माझं लग्न काळजी नको करुस !अंधाचे विवाहही सफल होतात म्हणतात…" सुनेत्रा हसत आपल्या आईला म्हणाली … "आणि आई मी गायन क्षेत्रात माझं करीअर करणार सांगीतलयं तुला...सगळं ऊत्तम चाललयं आणखी काय हवं तुला ?……"
आपल्या सोन्यासारख्या लेकीच बोलणं ऐकुन ईंदुला समाधान वाटत होतं ,पण तरूण पोरगी तीही अंध, बघून काळजी तर वाटणाच…ती नेत्राला म्हणाली...
"नेत्रा काय हरकत आहे गं ….पुन्हा एकदा प्रयत्न करायला, कदाचित या डॉक्टरच्या हाताला यश येईल….माझ्यासाठी तरी चलशील ना नेत्रा?
मी अपॉइंटमेंट घेते…."
"आईsssकितीदा आशेचा किरण दाखवतेस्!बर
घे अपॉइंटमेंट! जगातल्या सगळ्यात सुंदर व्यक्तीला डोळे भरून बघता येईल मला.."म्हणत तीने आपल्या आईचा चेहरा ओंजळीत धरला… आणि दोघीही मायलेकी भावविभोर झाल्या…
सुनेत्रा म्हणाली "आई, ऐक ना! ऐक गंमत सांगु? आमचे नविन सर आले आहेत ना ,परवा त्या आमच्या सरांनी "वेट अंटील डार्क"नावाच्या ऐका ईंग्लिश सिनेमाची स्टोरी सांगीतली..ऐकतांना ईतकी गंमत वाटत होती….ऐक अंध स्त्री तिच्या घरात घुसलेल्या तीन गुंडाना कशी चकमा देते आणि अंध असुन कशी त्या गुंडाचा समाचार घेते , मॉरल स्टोरी होती...ऐकताना मला वाटत होत मीच त्या जागी आहे…..
ईंदु म्हणाली…." बरं नेत्रा खुप गोष्टी झाल्या चल आत… ऊद्दा अपॉइंटमेंट घेते डॉक्टरांची…"
पण आज दुपारी स्वतःची तारीफ ऐकल्यानंतर सुनेत्रा खुप खुष होती … सारखे त्या पाहुण्यांनी तिच्या सौंदर्याबद्दल केले केलेल्या वर्णनानी तिच्या स्वप्नांना पंख फुटले होते... मनात वाटत होते एखादा दिव्यद्रुष्टी असलेला राजकुमार येईल घोड्यावर बसून आणि त्यादृष्टीने मी हे सारं जग बघेल सातासमुद्रापार जाऊन …..तीने ईंदुच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही ...तीच बोलणं सुरुच होतं…."अगं आई माहीती आहे तुला ,आमच्या नविन सरांना दिसत नाही तेही आमच्यासारखेच आहेत,पण ऐका डोळस स्त्री ने त्यांच्याशी लग्न केलंयं केवळ त्यांच्यातली प्रतिभा जाणून...
आणि आई तुला वाटत असेल आपल्या अंध मुलीचं कसं होईल या जगात , पण खरं सांगु आम्हाला स्पर्शज्ञान जास्त असते आणि श्रवणशक्ती ईतरांपेक्षा जास्त…. "
हो का? आहेच माझी लेक गुणी! ईंदु स्वयंपाक करता करता..तीचं बोलणं ऐकून म्हणाली..
दुसऱ्या दिवशी ईंदु डॉक्टर सरदेसाईंच्या दवाखान्यात गेली.. पण आता डॉक्टरांच्या जागी त्यांचीआय सर्जन मुलगी "मुग्धा सरदेसाई" होती... डॉक्टर मुग्धाची भेट घेऊन...ईंदुने आपल्या तरूण वीस वर्षाच्या मुलीची हिस्ट्री सांगितली..
डॉक्टर मुग्धा म्हणाल्या…." तिला नक्की घेऊन या…. तुमच्या मुलीची केस मी डॉ.सुयशशी शेअर करते... डॉक्टर सुयश चांगले सर्जन आहेत... ते नक्कीच तुमच्या मुलीची दृष्टी परत आणतील... विश्वास ठेवा!
ईंदुने विचारले कोण आहे हे डॉक्टर ? नाव काय म्हणालात त्यांचे?
डॉ.मुग्धा म्हणाली !"डॉक्टर सुजय देवघरे"
आणि ते नाव ऐकल्या बरोबर इंदूच्या स्मृती जाग्या झाल्या... तिचा विश्वासच बसेना... तीला आनंदही झाला…. मनातल्या मनात देवाचे आभार मानले... किती विलक्षण योगायोग आहे... आज आपल्या बहिणीची द्रुष्टी परत आणण्यासाठी तीचा मानलेला भाऊ उपचार करायला एक देवदूत बनून आलेला आहे…. पण सुनेत्रा त्याला भाऊ मानत नाही आणि त्याचा द्वेष करते ,तिला नाव न सांगताच इथे दाखवायला आणावे लागेल ...तीने डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि खुषीतच घरी आली... आता तिला विश्वास होता आपली मुलगी नेत्रा तिच्या नेत्रज्योतीने हे जग नक्की बघु शकेल ….
सुनेत्राला घेऊन ती डॉक्टर मुग्धा सरदेसाईना भेटायला गेली….डॉक्टरांनी सुनेत्राचे चेकअप केले….केसपेपर तयार करून डॉक्टर सुयशला पाठविले….
डॉक्टर मुग्धाच्या हॉस्पिटलला विजिट देण्यासाठी डॉक्टर सुयश आले, सुनेत्राच्या केसपेपरवर नजर फिरवून… खात्री करण्यासाठी पुन्हा ऐकदा नाव वाचले…. डॉक्टर मुग्धाला म्हणाले…."या पेशंट सोबत कोणी आलयं"
"हो पेशंटची आई आहे"….डॉक्टर मुग्धा म्हणाली…
सुजय म्हणाला...हं!आधी त्यांची भेट घ्यायला हवी….पाठवा त्यांना !
ईंदुला बघून सुजय त्यांच्या पाया पडला..म्हणाला… "काकु मी सुनेत्राच्या डोळ्यांची सर्जरी करायला तयार आहे… आणि खात्री देतो तीची द्रुष्टी परत येईल...पण प्लीज माझं नाव घेऊ नका तिच्यासमोर…"
ईदु म्हणाली….."तीने विचारले तर काय सांगु ?"
काकु, तुम्हाला सगळं माहीती आहे….प्लीज… आणि बाकी सगळी माहिती डॉक्टर मुग्धा देतील… काही शंका असल्यास त्यांना विचारू शकता…..
डॉक्टर सुयशने सुनेत्राच चेकअप केलं …….ती गेल्यानंतर तो विचार करू लागला, आज ईतक्या वर्षानंतर सुनेत्राला पाहीले…तीच्या डोळ्याच ऑपरेशन माझ्यासाठी ऐक आव्हानच आहे पण सुनेत्राची दृष्टी परत आणण्याकरता ऐक शल्यचिकित्सक म्हणून हे आव्हान मला स्विकारावच लागेल….आणि ह्या अवघड शस्त्रक्रियेसाठी सिनिअर्स शी डिस्कस् करावे लागेल…..
घरी गेल्यानंतर सुयश आपल्या आईला विशाखाला सुनेत्राबद्दल सांगुन म्हणाला .".मम्मा ईंदु काकु सोबत असल्याने मी सुनेत्राला ओळखलं. पण तिच्या जिवनातील ईतकी अनमोल वर्षे हे जग न बघता गेली….याबद्दल वाईट वाटलं,पण द्रुष्टी आल्यावर मला माफ करेल नां ग ती?"
विशाखा म्हणाली "हे बघ यश !मनात कुठलीही अपराधीपणाची भावना न ठेवता स्वःता्वर विश्वास ठेवुन सर्जरी कर .तिच्याकडे ऐक अनोळखी पेशंट म्हणून बघ…... आता हे सुंदर जग बघायला तु तीला द्रुष्टी प्रदान करणार आहेस ! सुयश, आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहे..मला खात्री आहे ,सुनेत्राला द्रुष्टी मिळाली की ती नक्कीच तीच्या दादाचा शोध घेऊन त्याला भेटायला येईल….
सुनेत्राची सर्जरी करायची म्हणून दोन महिने सुयश खूप टेन्शन मध्ये होता... त्याने आपल्या सीनियर डॉक्टरांशी तिच्या स्पेशल केस बाबत चर्चा केली आणि त्याला कळून चुकले की ही सर्जरी आपण यशस्वी रित्या पार पाडू शकतो…. सर्जरीची तारीख जवळ आली... सुयशने त्याच्या आईला विशाखाला नमस्कार केला म्हणाला... "मम्मा मला आशीर्वाद दे…. मला माझ्या कार्यात यश मिळण्यासाठी …."
विशाखा म्हणाली…. एका आईचा आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी राहील बाळा आणि नक्कीच तु सफल होशील...आतापर्यंत तु सर्व परीक्षा यशस्वीरीत्या पास करून इथपर्यंत पोहोचलास …...यशस्वी सर्जन म्हणून तुझे नाव आहे….
सुयश म्हणाला ….आई त्या परीक्षा म्हणजे माझा माझ्यावरचा विश्वास होता आणि त्या विश्वासाने मी सर्व परीक्षा पास होऊन डॉक्टर झालो, पण आज ….आज दैवाच्या खेळामध्ये मी हस्तक्षेप करणार आहे आणि सुनेत्राला विजय मिळवून देणार आहे, त्यासाठी मला भरपूर शुभेच्छाचे पाठबळ हवे आहे….
दोन महीण्यांनी सुनेत्राच्या डोळ्यांची सर्जरी करण्याची तारीख आली आणि तो दिवस उगवला... रात्रीपासूनच डॉक्टर सुयशला थोडं टेन्शन वाटत होतं….सर्जरी सक्सेस होणार याची सुयशला खात्री होती….. ऑपरेशन टेबलवर अंध सुनेत्राला बघून त्याच्या मनाची चलबिचल झाली पण क्षणभरच आणि त्याच्यातला सर्जन जागा झाला , सुनेत्राच्या डोळ्यांची बराच वेळ सर्जरी सुरू होती . त्या दिवशी डॉक्टर सुयशने फक्त एकाच पेशंटची फक्त सुनेत्राच्या डोळ्यांची सर्जरी केली...
सर्जरी करतांना डॉक्टर सुयश सोबत , डॉक्टर मुग्धा होती... सुयश तिचा क्लासमेट होता .दोघेही बरोबरच शिकलेले होते. तिला सुयशचा स्वभाव पूर्णपणे माहीत होता… आत्तापर्यंत तिने सुयशला ईतक्या टेंशन मध्ये कधी बघितलं नव्हत …..पण आज ? ईतर वेळी सराईतपणे सर्जरी करणारा डॉ.सुजय आणि आजचा सर्जरी करतेवेळी थोडा ईमोशनल झालेला सुजय , तिला काही कळेना…. ती मनात विचार करत होती.. कोण असावी ही मुलगी, जिच्याबद्द्ल सुजय ईतका भावनिक झालाय?
सर्जरी सक्सेस झाली... डॉक्टर सुयशने डॉक्टर मुग्धाकडे बघितलं आणि अंगठा दाखवून खुणेनेच सगळे व्यवस्थित झालयं सांगितले... आवश्यक सुचना देऊन सुनेत्राची विषेश काळजी घ्यायला सांगितले...
ईंदु डोळयात प्राण आणून त्याची वाट बघत होती... सुजय बाहेर आला, ईंदूला म्हणाला…
"काकू ,काही काळजी करू नका !
ऑपरेशन सक्सेस झालेले आहे... आता सुनेत्रा हे जग बघू शकेल !
ईंदु म्हणाली "डॉक्टर! कसे आभार मानू तुमचे?" आज सोळा वर्षानंतर माझी मुलगी हे जग बघू शकेल!
सुयश म्हणाला…" काकू, डॉक्टर नाही तुमचा सुयश !आणि आभार मानु नका !"
आणिपुढे काही न बोलता तो आपल्या गावी जायला निघाला….
सायंकाळी सुजय आपल्या घरी आला... त्याची आई व बाबा बाहेरच्या पँसेज मध्ये त्याची वाट बघत बसलेले होते…. आजचा दिवस त्यांच्यासाठीही खूप महत्त्वाचा होता ….कारण... कारण ……...आजच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर त्यांना त्यांचा पूर्वीसारखा आनंदी हसरा सुयश परत मिळणार होता...नाहीतर नाहीतर… त्याच्या पुढच्या आयुष्याची कल्पना करवत नव्हती….
सुयशच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून विशाखा-पंकजला हायसे वाटले... सुयशने काही न बोलता त्यांना सर्व काही "डन" झाल्या बद्द्ल फक्त अंगठा दाखविला…. विशाखा उठून उभी राहिली आणि तिने सुयशच्या डोक्यावरून हात फिरवला ……... सुयश लहानपणी बिलगायचा तसा आज आपल्या मम्माला बिलगला आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले…..
काही दिवसांनी डॉक्टर मुग्धाने सुनेत्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली….हळूहळू डोळे ऊघडत तीने समोर बघितले...ऐक मंद हास्य ओठावर घेऊन तीने डोळ्यात अश्रू घेऊन ऊभ्या असलेल्या ईंदुकडे नजर टाकली, तीला जवळ बोलाविले…..तिचा हात हातात घेऊन म्हणाली… आई! आई आज सोळा वर्षांनी तुझी मुलगी आपल्या स्वतःच्या डोळ्याने तुला बघत आहे तुला आनंद नाही झाला?
ईंदुनेने तीच्या डोक्यावरुन ममतेने हात फिरवत म्हटले सुनेत्रा बाळा, माझ्या इतका आनंद आणखी कोणाला होणार गं!....... पण माझे आनंदाश्रु बघून तुझे डोळे भरून येतील म्हणून आज फक्त आपण एकमेकींना डोळे भरून बघू !
सुनेत्राने विचारले…. डॉक्टर मुग्धा….. तुमचे खूप खूप धन्यवाद आणि ते देवदूत कुठे आहे ज्यांनी माझ्या डोळ्याची दृष्टी परत आणली ?
डॉक्टर मुग्धा म्हणाली...
ते होय ,येतील ते आता पुढच्या महिन्यात व्हिजीटला !
सुनेत्राने म्हणाली... पुढच्या महिन्यात ,म्हणजे त्यांना मला ईतक्यातच नाही का भेटता येणार ? धन्यवाद द्दायचे आहेत त्यांना…...
डॉक्टर मुग्धा म्हणाली "अगं ते फक्त महिन्यातून एकदाच येत असतात... हे हॉस्पिटल माझ्या वडिलांच आहे, मी आयसर्जन होऊन आले आणि त्याच्यापुढच्या वर्षी माझे वडील अटॅकने गेले, आता माझ्याच अंडर मध्ये काही डॉक्टर येथे काम करतात आणि ज्यांनी तुझ्या डोळ्यांच ऑपरेशन केलं ते माझे क्लासमेट आहेत. त्यांची स्पेशालिटी बघून मी त्यांना माझ्या दवाखान्यात महिन्यातून एकदातरी भेट देण्याची विनंती केली आणि म्हणून ते इथे येतात... फार चांगले डॉक्टर आहेत ते"...
इतक्यात फोनची रिंग वाजली... डॉक्टर फोन उचलला समोरून डॉक्टर सुयशने विचारले… कसा आहे पेशंट?
एकदम छान !सगळे व्यवस्थित झाले डॉक्टर !तुम्ही म्हटल्याप्रमाणे तिला येथे आठ दिवस ठेवून घेते आणि त्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात येईल ..डॉक्टर मुग्धा ने सांगितले….
सुयश म्हणाला,"मुग्धा मी पुढल्या महिन्यात येऊ शकणार नाही मला कॉन्फरन्स साठी परदेशात जायचं आहे आणि सोबत आई-बाबांना घेऊन जाईन …. तिथे काही दिवस त्यांच्या सोबत घालवेन…. पुढल्या महीण्यातल्या अपार्टमेंट्स घेऊ नका आणि या पेशंटची काळजी घ्या ." असं म्हणून मुग्धाने काही विचारायच्या आतच डॉक्टर सुयशने फोन खाली ठेवला ……
बंद झालेल्या फोन कडे बघत डॉक्टर मुग्धा म्हणाली …. "म्हणजे स्वारी आता पुढल्या महिन्यात येणार नाही... दोन महिने वाट बघावी लागेल मला याची, फक्त फोनवरून आवाज ऐकावा लागेल ...किती त्रास देशील रे... तू डोळ्याने दिसावासं म्हणून मी माझ्या बाबांची समजुत घालून दवाखान्यात सर्जरीची खास व्यवस्था केली, आणि तुला किती विनंती केली तेव्हा कुठे तु तयार झालास ईथे यायला…. तुझ्या दर महिन्याच्या येण्याच्या तारखेला मी किती तुझी वाट पाहते ,तुला कल्पना आहे पण तु दगडाचा बनलेला आहे.. कधी तुझ्या मनाला पाझर फुटेल काय माहितं ? "
मुग्धा आपल्याशीच बोलत होती ... पण सुनेत्राला तिचे सगळे शब्द ऐकू जात होते ….ती म्हणाली…. मुग्धामॅडम हे काय ? तुमच्या डोळ्यात अश्रू कसले ? डॉक्टरांच तुमच्याशी काही नातं आहे का ?
"काही नाही गं असचं! आम्ही दोघं एका नदीचे दोन किनारे आहोत , नदी सागराला जाऊन मिळते तेव्हा त्या किनाऱ्याच मिलन होतं पण आम्ही…..त्याच्या मनात असूनही तो माझ्या प्रेमाला रिस्पॉन्स देत नाही ….कुठेतरी त्याच्या मनात सल आहे ,ती नेमकी कोणती आणि कशाबद्दल हे त्याने मला आत्तापर्यंत सांगितलं नाही! एक दिवस तो म्हणाला होता की माझं कार्य सफल झालं की नक्की मी तुझ्या प्रेमाचा स्विकार करेल पण अजूनपर्यंत तो दिवस उगवलाच नाहीयं ! आम्ही एकमेकांचं होऊ की नाही माहित नाही, फक्त वाटच बघणंच नशीबी आहे असं वाटतयं! तो येण्याची मी दर महिण्याला वाट बघते आणि तो डोळ्याने दिसतो यातच समाधान मानते…"
मुग्धा मॅडमच्या मनाची व्यथा सुनेत्राला कळली.ती म्हणाली मॅडम! सांगा ना मला, काय झालं असेल.. कोण आहेत हे डॉक्टर ? तुमच्या प्रेमाचा स्वीकार करत नाही म्हणता, पण कां? इथे येऊन, सोबत काम करून सुद्धा ?
आणि नाव काय म्हणालात डॉक्टरांचे?
बाहेर बसुन आतलं बोलणं ऐकत असलेल्या ईंदुला रहखवलं नाही ,ती आत येत म्हणाली…. "डॉक्टर सुयश देवघरे" तोच सुयश , इतकी वर्ष ज्याचा तु द्वेष करत आलीस्!
तिचे बोलणे ऐकून सुनेत्राला धक्काच बसला "...ती म्हणाली... आई ! तुला माहीत होतं कोणते डॉक्टर माझ्यावरवर सर्जरी करणार ते ?
"होय सुनेत्रा! डॉक्टर कोणआहे याची माहिती काढली होती मी आणि म्हणुनच तुला तयार केले... माझी भेट झाली होती सुयशशी या आधीही...आणि मला पूर्ण कल्पना होती आयस्पेशालिस्ट झालेला सुयशच तुझी दृष्टी परत आणेल , पण तुझ्या मनातला गैरसमज अजून गेलेला नव्हता ...त्याचे नाव समोर आले असते तर तु सर्जरी ला नकार दिला असता नेत्रा!
ईंदु म्हणाली…..
सुनेत्रा जरा त्वेषाने म्हणाली ... तुला सगळं माहित होतं ना आई! मग तू त्याच्याकडून माझी सर्जरी कां करून घेतली... त्याचे उपकार नको होते गं मला ! आता माझं मन मला खात राहील ,ज्याने माझी दृष्टी घालविली त्याने माझ्यावर उपकार केले म्हणून….. का केलस तू असं? आता जन्मभर मला "त्याच्या" उपकाराच्या ओझ्याखाली राहावे लागणार!
त्यांच बोलणं डॉक्टर मुग्धा ऐकत होती…. तिने विचारले ….काय झालं होतं ?कां सुयशचा द्वेष करते तु सुनेत्रा? ओळखता का डॉक्टर सुजयला तुम्ही दोघी ,म्हणजे सुनेत्राच्या केस हिस्ट्री मधला "तो " मुलगा म्हणजे सुयश होता तर ….मनाने ईतक्या चांगल्या असलेल्या सुयशबद्दल तुझ्या मनांत ईतका तिरस्कार?असं काय नातं आहे गं तुमचं ?
आणि इंदुने सगळी हकीकत डॉक्टर मुग्धाला सांगितली…
देवा शप्पथ सांगते सुनेत्रा त्यावेळी "त्या" दुर्घटनेत सुयश दोषी नव्हताच…. तु तुझ्या बाबांचा हात सोडून त्याच्याकडे धावली होती... त्याने आवाजही दिला पण आम्ही पोहोचेपर्यंत पेटते रॉकेट तुझ्या दिशेने आले आणि तुझ्या डोळ्याला ईजा करून गेले….
डॉक्टर मुग्धाच्या लक्षात सगळा प्रकार आला . तिने सुनेत्राला समजावले.. "सुनेत्रा, अभ्यासात विशेष इंटरेस्ट नसणारा सुयश तुझ्यासाठी आय स्पेशलिस्ट झाला. एवढं शिक्षण घेतलं त्याने ...पण त्याची हिंमत होत नव्हती तुझ्यासमोर येण्याची !
अगं माझं त्याच्यावर आणि त्याच माझ्यावर खूप प्रेम आहे, पण केवळ आणि केवळ तुझ्यासाठी म्हणून त्याने स्वतःला माझ्यापासून दुर ठेवलयं ! ती त्याच्या मनातली "सल्" तु होती तर...तुझ्यासाठी स्वतःचा आनंद बाजूला ठेवला त्याने ,खूप चांगला आहे गं माझा सुयश! चुकी नसताना त्याने स्वतःला शिक्षा करून घेतली, केवळ आणि केवळ तुझ्यासाठी! आणि तू त्याचा द्वेष करत राहिलीस ईतके वर्षे!"
मुग्धाच्या बोलण्याने सुनेत्राला आपली चुक ऊमगली... आई सांगत असतानाही आपण बाबांच्या शब्दावर विश्वास ठेवून सुयशचा द्वेष करत राहीलो. तिने डॉक्टर मुग्धाचे हात हातात घेतले... आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाली….
"मला माफ करा डॉक्टर! खरंच माझे चुकले, किती मोठी शिक्षा दिलेली मी माझ्या दादाला !आता या शिक्षेचं त्याला गोड फळ देणार मी अगदी त्याच्या मनासारखं! आता दिवाळी येत चाललीय ना जवळ !
होय ! आणि तुझ्या दादाचा वाढदिवसही आहे या भाऊबीजेला !
सुनेत्रा म्हणाली.."खरचं!मी जाणार आहे त्याला भेटायला ! आधी त्याचे पाय धरून माफी मागेन आणि मग आभार मानेन…. तेही तुझ्या उपस्थितीत तुला साक्षी ठेऊन"…. सुनेत्राने खट्याळपणे बघत डॉक्टर मुग्धाला विचारले... "येणार नं माझ्यासोबत दादा कडे?"
मुग्धा लाजुन हसली …. म्हणाली….."तुझी इच्छा असली तर नक्कीच यायला आवडेल मला तुझ्या दादाच्या घरी!"
सुट्टी संपवून डॉक्टर सुजय आपल्या आईबाबांना घेऊन गावी परत आला….दिवाळी जवळ आली...तो विशाखाला म्हणाला.. मम्मा!यावर्षी दिवाळी धुमधड्याक्यात साजरी करू…..
विशाखाचे डोळे आनंदाने चमकले…
ती म्हणाली… खरंच यश?
होय मम्मा !अंधकारमय झालेल्या सुनेत्राच्या डोळ्यातली ज्योती तीला परत मिळाली…
आता या दिवाळीत सगळीकडे तीला प्रकाशच प्रकाश दिसून तीचं जीवन ऊजळुन निघायला हवं!गेल्या सोळा वर्षापासुन ज्या गोष्टीचा ती फक्त स्पर्शाने आनंद मिळवित होती ..तो आनंद ती आनंद ती स्वःताच्या डोळ्याने अनुभवणार….
माझ्या डोळ्यासमोर तर ती दुडुदुडु धावत येणारी नेत्रा येते. … वीस वर्षापूर्वीची… आता कशी दिसते रे ती ? मला ओळखेल का रे ती ? विशाखाने विचारले..
आई! मी तिला अजूनही माझी ओळख दिलेली नाही…. ती छान गाते असं ऐकलयं! तिचं गाणं मी माझ्या एका संगीतकार मित्राला ऐकवणार आहे तिच्या तोंडून ! पण आधी तिने मला माफ करायला हवं!
लक्ष्मीपूजन झाले….आणि भाऊबिजेच्या दिवशी सकाळीच सुनेत्रा ,डॉक्टर मुग्धासोबत देवघरेंच्या घरी आली.. पण तिने डॉक्टर मुग्धाला बंगल्याच्या आडोशाला उभे राहायला सांगितले…..डोअरबेल वाजविली….आणि सुजय बाहेर आला...सुनेत्राला बघून तो आश्चर्य चकीत झाला….
सुनेत्राने त्याच्या हातात बुके दिला म्हणाली... हँपी बर्थडे डॉ.सुजय!आणि पुढे होऊन त्याच्या पाया लागली...म्हणाली… "दादा आज भाऊबीज ना रे!"
मी आलीय, भाऊबीज साजरी करायला... आज तुला ओवाळणार ही तुझी बहीण,घेणार न तु ओवाळून माझ्याकडून ?"
सुयशला काय बोलावे काही सुचेना...तो हतप्रभ होऊन तिच्याकडे बघतच राहीला….
आवाज ऐकून विशाखाही बाहेर आली…
सुनेत्रा तिच्या पाया पडली…… विशाखाने विचारले, सुनेत्रा आहेस ना गं तु ?
"होय काकू ! मीच तुमची लाडकी "म्रुगनयनी"
सुनेत्रा म्हणाली "काकू मी दादासाठी एक स्पेशल गिफ्ट आणलेलं आहे ओळखा पाहु,काय असेल ते ! भावाने बहिणीला दृष्टी देऊन तिच्यावर जन्मभरासाठी उपकार केले….आता बहीणही भावाला "अनोखी भेट" देणार…..अगदी त्याच्या मनासारखी! म्हणून तिने मुग्धाला आवाज दिला" वहिनी" ये ना गं,अगं दादा तुझी वाट बघतोय!"
मुग्धा दारात येऊन उभी राहिली ….
सुनेत्रा म्हणाली,
"सुयश दादा"आता तरी माझ्या वहिनीचा स्विकार करशील का? . ...विशाखाकडे बघत ती म्हणाली… काकु ही बघा मी तुमच्या साठी सुन आणलीयं कशी वाटली सुन तुम्हाला?
विशाखाने सुनेत्राला पोटाशी धरले….ती म्हणाली.." खरचं एक तरी मायेची मुलगी असावी... स्वतःची नसली तरी मानलेली"!
सुयश सुनेत्राच्या डोक्यावर हात ठेऊन म्हणाला आणि भावाला बहीण ,या नेत्रा सारखी !
सुनेत्रा म्हणाली.. चुकतोस तु दादा! नेत्रा नाही "सुनेत्रा"म्हणायचं मला आजपासून...
विशाखाने सुयश ,मुक्ता आणि सुनेत्राला पोटाशी धरले….. पंकज हे सगळं दृश्य बघत होते….. त्यांना कळेना बहिणीने भावाला "अनोखी "भेट" दिली की भावाने बहिणीला!...
"समाप्त"…