(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

लिफ्टमन आणि खुर्चीत ही गोष्ट त्याला जरा विचित्र वाटली. त्याला त्याने पहिला मजला असे सांगितले.

लिफ्टमनने कांहीही हालचाल केली नाही.

कदाचित त्याला डुलकी लागली असेल म्हणून संवादने जोरात पहिला माळा असे  त्याला सांगितले.

त्याने तरीही काहीही हालचाल केली नाही.

संवादला संशय आला. काऊंटरमागील क्लार्क प्रमाणे हाही पुतळा असावा.

त्याने त्याला हळूच हात लावून पाहिला .तो हुबेहूब  बनविलेला पुतळा होता.

त्याला हात लावला तेव्हा त्याची त्वचा थरथरली असा संवादला संशय आला.

लिफ्ट स्वत:च ऑपरेट करून संवाद पहिल्या मजल्यावर आला.ओढत ओढत त्याने बॅगा त्याला दिलेल्या खोलीसमोर नेल्या. भामिनीबाईंनी सांगितलेल्या खोलीकडे बोळीतून जात असताना त्याचे विचारचक्र चालू होते. ही बाई धोकादायक दिसते .हिला पेंढा भरून ठेवण्यासाठी माणसे कशी काय मिळतात ? मेलेल्या माणसांचे नातेवाईक काही करीत नाही काय?कि त्यांचे नातेवाइक प्रेते त्यांना विकतात?या शहरातील पोलीस काय करीत आहेत?तेही सामील असतील तर हे फार भयानक आहे.ही काय मोगलाई आहे? आपण आताच येथून निघाले पाहिजे.

जड बॅगा घेऊन पुन्हा या घराबाहेर पडायचे, रिक्षा करायची, दुसरे हॉटेल शोधायचे, हे सर्व करण्यासाठी संवादला उत्साह नव्हता.प्रवासाने तो दमून थकून गेला होता.त्याला भूकही लागली होती .चहा घ्यावा,जेवावे, आजची रात्र येथे काढावी,उद्या दुसरीकडे आपली पथारी हलवावी,असा विचार तो करीत होता .

एकीकडे त्याचे विचारचक्र चालू होते .दुसरीकडे तो बॅगा उघडून आवश्यक सामान बाहेर काढीत होता. त्याने स्नान केले . तो ताजातवाना झाला .बॅगेत तळाला काही पैसे इमर्जन्सी म्हणून ठेवले होते.कंपनीने लगेच रुजू व्हावे लागेल असे सांगितल्यामुळे बरेच सामान त्याने आणले होते.एकच रात्र येथे रहायचे असे ठरविले असले तरी त्यासाठी त्याला बरेच सामान बॅगेतून बाहेर काढावे लागले होते.

बॅग उघडी ठेवून, पैशाचे पाकीट तिथेच ठेवून,कांही पैसे खिशात ठेवून,तो खाली जाण्यासाठी निघाला.तो हॉलमध्ये आला .भामिनीबाई त्याची वाटच पाहत होत्या. त्याने एकदा मांजराकडे व कुत्र्याकडे पाहिले.एवढ्या काळात त्यांनी आपले आसन बदलणे,बसण्याच्या पद्धतीत बदल करणे , स्वाभाविक होते. मांजर व कुत्रा त्याच स्थितीत अवस्थेत होते.मांजर निश्चेष्ट होते .त्याचे वेटोळे कायम होते .कुत्रा तसाच पुढे पाय ठेवून बसला होता .

संवादला संशय आला.बहुधा  हे प्राणीही पेंढा भरून केलेले असावेत.त्याच्या मनातील विचार बाईनी ओळखले.होय तेही पेंढा भरलेले आहेत.आमच्या इथे माझ्याशिवाय दिसणारे सर्व प्राणी मग मानव असो किंवा इतर प्राणी,सर्व पेंढा भरलेले आहेत .ही माझी खासियत आहे.तुम्हालाही मी गरज पडल्यास पेंढा भरून ठेवू शकते .माझ्याजवळ असे पुतळे बनवणारा कारागीर आहे . त्यांचे बोलणे ऐकून संवाद चांगलाच दचकला. या बाई काय बाई आहेत ?या अमानवी तर नाहीत ना ?हडळ हडळ म्हणून आपण ऐकतो ती हीच तर नव्हे?या विचारानेच तो दचकला .का याबाई अर्धवट आहेत?त्याला त्याच्या जीवाला धोका वाटत होता .त्याच्या अंगावर कांटा उभा राहिला .त्याला काहीच कळेनासे झाले होते . 

तुम्हाला असे मनुष्य किंवा प्राणी कसे काय मिळतात? संभाषण चालू ठेवण्यासाठी संवादने धीर करीत विचारले .भामिनीबाई म्हणाल्या त्यात काय अवघड आहे? माझ्याजवळ एक असे विष आहे कि ते घेतल्यानंतर मनुष्याचा मृत्यू स्वाभाविक वाटतो.मी कुणालाही मग तो उंदीर असो,पाल असो,कुत्रा असो, मांजर असो किंवा माणूस असो .त्याला विष देते.नंतर आमचा कारागीर आहे तो सर्व साफसूफ करून पेंढा भरतो .अशा पुतळ्यांना जबरदस्त किंमत देणारे रसिक आहेत.तुम्हाला म्हणून सांगते  लॉजिंग बोर्डिंग हे माझे  खरा व्यवसाय लपविण्याचे साधन आहे .त्याचप्रमाणे मला ग्राहकांच्या रूपात कच्चा मालही इथे मिळतो .लिफ्टमन व काऊंटरमागील हा क्लार्क सहा महिन्यांपूर्वी  येथे प्रवासी म्हणून आले होते.दुसऱ्या दिवशीच त्याना आम्ही पुतळा करण्यासाठी पाठविले!!त्यांची विक्री झालेली आहे .चार आठ दिवसांत पूर्ण पेमेंट करून पुतळे नेले जातील . माझ्या मालाला उठाव आहे .नंतर मी दुसरे पुतळे येथे आणीन. 

हॉलमधील अंधुक प्रकाशात त्यांचा चेहरा विचित्र दिसत होता .माणसे खाणारी  एखादी डाकीण, लावसट,हडळ,आपल्या समोर बसली आहे असा भास संवादला होत होता.त्याला आपल्या अंगाची थरथर जाणवत होती.हे सर्व ऐकून  त्याची तंतरली होती .असेच उठावे,सामान येथेच सोडावे, आणि येथून शक्य तितक्या लवकर पसार व्हावे असे त्याला वाटत होते.त्याचे पाय शिसे भरल्यासारखे जड झाले होते.या बाई वेड्या तर नाहीत ना ?आजची रात्रही इथे राहणे धोक्याचे आहे त्याचे अंतर्मन त्याला सांगू लागले.     

पुढे विचित्रपणे हसत भामिनीबाई म्हणाल्या, तुम्ही आता चहा पीत आहात त्यात विष नसेल कशावरून ?आणखी आठ दिवसांनी नवीन पाहुणा आमच्या लॉजमध्ये येईल.त्यावेळी तो तुमचा पुतळा नक्की पाहू शकेल !!आमचा कारागीर थोड्याच दिवसांत बेमालूम पुतळा तयार करतो .तुमच्या पुतळ्याला दरही चांगला मिळेल! चहा पिणारा संवाद एवढा दचकला कि त्याच्या हातातील कपबशी  निसटून खाली पडली .

लिफ्टमधील पुतळा, काऊंटर मागील पुतळा, कुत्रा मांजर  यांचे पुतळे ,हे सर्व भयानक होते .त्याहूनही त्या बाई, त्यांचे हसणे, बोलणे, वागणे, भयानक होते. 

त्याला गरगरल्यासारखे वाटत होते .एखाद्या हॉरर पिक्चरचा आपण भाग आहोत असे त्याला वाटू लागले होते.त्याने बाईंकडे निरखून पाहिले .बाईंचे हास्य, बाईंचा चेहरा, एकूणच  बाई भयानक वाटत होती .

आपण आताच चहा प्यायला त्यात विष नसेल कशावरून?समजा चहात विष नसेल तरी ही बाई जेवणातून आपल्याला विष देणार नाही कशावरून ?ही बाई  अर्धवट दिसते. ही खरीच अर्धवट आहे की पार पोचलेली आहे? ही काय करील सांगता येत नाही.विषाची परीक्षा  घेण्यात अर्थ नाही.

संवादने क्षणभरही विचार केला नाही.आवेगाबरोबर(इम्पल्स)  संवाद तसाच उठला आणि त्या विचित्र घराबाहेर धावत सुटला.मिळेल त्या रिक्षाने त्याने दुसरे हॉटेल गाठले .पुन्हा कधीही प्राण गेला तरी त्या घरात जायचे नाही असे त्याने निश्चित केले . सुदैवाने त्यांच्या खिशात पुरेसे पैसे होते .आपले सामान आणण्यासाठी पोलीस घेऊन जावे असे एकदा त्याच्या मनात आले .परंतु पोलीस बाईला सामील असले तर ?नकोच ती विषाची परीक्षा! 

तो जर परत आला असता,तर त्याला पुढील दृष्य दिसले असते .लिफ्टमन व तथाकथित क्लार्क दोघेही उठून हसत होते . आळोखे पिळोखे देऊन अंग मोकळे करण्याचे त्यांचे काम चालू होते. भामिनीबाईंचा चेहराही मिस्किल झाला होता.

असे प्रवासी या ठिकाणी आणायचे. त्यांना गूढ  वातावरणांत घाबरवून सोडायचे.ते पळून गेले की त्यांचा इथे राहिलेला माल हडप करायचा.असा त्यांचा धंदा होता .पळून गेलेला कुणीही सहसा पोलिसांच्या भानगडीत पडत नसे.यदाकदाचित एखादा पोलीस घेऊन आल्यास त्याला त्याची बॅग त्याच्या खोलीत जशीच्या तशी आढळत असे.कुठेच काहीच बेकायदेशीर नसे.प्रवासी पळून गेला याला सर्वस्वी प्रवासीच जबाबदार असे. तक्रार करणार्‍याला पोलीस वेड्यात काढीत असत.कुत्र्याचा किंवा मांजराचा पेंढा भरलेला पुतळा खरेदी करणे, हा काही गुन्हा नव्हता . 

पहिल्या मजल्यावर पाच सहा खोल्या होत्या .एक प्रवासी पळून गेला की रिक्षावाल्याला फोन जात असे.तो मिळेल तेव्हा  दुसरा प्रवासी पाठवीत असे.दिवसाला पाच सहा प्रवासी मिळाले तरी चौघांचा धंदा छान चालत असे.रिक्षावाला व हमाल यांचे साटेलोटे होते. हमाल बकरा शोधीत असे .त्याला त्याच्या सामानासकट विशिष्ट रिक्षात बसवीत असे .एकूण मिळणाऱ्या उत्पन्नापैकी एक तृतीयांश वाटा बाईंचा होता .उरलेला पैसा चौघे जण वाटून घेत असत .

*कस्टमर समोर पुतळ्यासारखे बसणे ही अभिनयाची कसोटी होती.*

*प्रवाशाला घाबरवण्यात, पळवून लावण्यात भामिनीबाईंचा वाटा मोठा होता.*

*दोन्ही पुतळे,लिफ्टमन व काऊंटरमागील क्लार्क,  त्यांचे चिरंजीव होते .*

*रिक्षावाला भाचा होता .हमाल नातेवाईक नव्हता. या पंचकडीचा धंदा झकास चालला होता.*

(समाप्त)

२०/२०/©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel