(ही कथा काल्पनिक आहे कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
एका गुन्ह्याच्या संदर्भात शामराव प्रयागराजला (अलाहाबादला ) गेले होते . काम संपल्यावर ते रेल्वेने मुंबईला येत होते .शामराव काही वेळा रेल्वेने प्रवास मुद्दाम करीत असत.युवराजांप्रमाणेच निरनिराळ्या प्रकारची माणसे पाहण्यात, अभ्यासण्यात, त्यांना रस होता .रेल्वेच्या प्रवासात अशी विविध ढंगांची माणसे नेहमीच भेटत असत .काही वेळा त्यांना हवे असलेले गुन्हेगारही अश्या प्रवासात अपघाताने भेटले होते .किंबहुना शामराव ट्रेनने प्रवास करणार म्हणजे कोणता ना कोणता नामचीन गुन्हेगार सापडणार असे विनोदाने कमिशनर्स ऑफिसमध्ये बोलले जात असे .
वेळ सकाळची होती .पँट्री कारमधील रेस्टॉरंटमध्ये बसून शामराव नाष्टा करीत होते. समोरच्या टेबलावरील एक व्यक्ती त्यांच्याकडे बराच वेळ रोखून पाहात होती .ती गोष्ट शामरावांच्या केव्हाच लक्षात आली होती .त्यांनाही ती व्यक्ती ओळखीची वाटत होती .किंबहुना त्यांनी त्या व्यक्तीला बरोबर ओळखले होते .या व्यक्तीला प्रथम आपण कुठे पाहिले ते आठवण्याचा शामराव प्रयत्न करीत होते.शामरावांच्या वयाचा तो मनुष्य होता.थोड्याच वेळात त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर ओळखीचे भाव निर्माण झाले .शामरावांच्या पुढ्यात येऊन तो बसला .काय शामू मला ओळखले का म्हणून त्याने हाक मारली .त्याचा आवाज ऐकल्याबरोबर मगाचपासून विचार करीत असलेल्या शामरावांना त्याचे नाव आठवले. पद्माकर किती वर्षांनी आपण भेटतआहोत? शामराव उद्गारले .
पद्माकर त्याच्या पोशाखावरून एक बिझनेसमन वाटत होता .त्याचे फार छान चालले असावे असे वाटत होते. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या .पद्माकर व शामराव हे लहानपणीचे शाळेतील दोस्त होते.दोघेही एका बाकावर शाळेत बसत असत .बरोबरच शाळेत जात बरोबरच शाळेतून गप्पा मारीत परत येत .खेळ भटकंती गप्पा या सर्वांमध्ये दोघेही बरोबर असत.पद्माकर मध्यम उंचीचा कृश गोरा पाणीदार डोळ्यांचा मुलगा होता .दोघेही एकाच आळीत जवळजवळ रहात होते.
शामरावाना लहानपणच्या सर्व गोष्टी आठवत होत्या .पद्माकर एक नंबरचा गप्पिष्ट मुलगा होता .त्याच्या बोलण्यात काहीतरी जादू होती .आपल्या बोलण्याने तो दुसऱ्याला मोहित करीत असे .त्याला दुसऱ्यांकडून वस्तू उधार घ्यायची सवय होती .उधार घेतलेल्या वस्तू बऱ्याच वेळा तो काहीना काही कारण सांगून परत करीत नसे .मुलेही त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असत . पैसेही तो मागत असे. त्याचे वडील राजकीय कार्यकर्ते होते.ते बऱ्यापैकी सधनही होते .त्यांच्याकडे पाहून दुकानदार त्याला उधारीवर वस्तू देत असत. बरेच वेळा तो त्याचे पैसे देत नसे .वडिलांपर्यंत ही गोष्ट गेल्यावर त्याला मारही पडत असे .त्याच्या जिभेवर साखर पेरलेली असे .गोड गोड बोलून तो हां हां म्हणता इतराना गुंगवीत असे. तसा तो चालू मुलगा होता.
शामरावांच्या वडिलांची नंतर बदली झाली .पद्माकरशी नंतर काहीच संबंध राहिला नाही. त्यानंतर जवळजवळ पंचवीस वर्षांनी दोघांची भेट होत होती .शामरावानी त्याला अगोदर ओळखलेच नव्हते .त्याला आपण अगोदर कुठेतरी पाहिले आहे एवढेच त्यांना वाटत होते .त्याच्या चेहर्यात खूपच फरक पडला होता .दोघांच्या लहानपणच्या गप्पा सुरू झाल्या .
गप्पांच्या ओघात तू काय करतोस असे शामरावांनी विचारले.त्यावर माझा बिझनेस आहे. माझे छान चालले आहे. मी नेहमी विमानाने प्रवास करतो .आज गंमत म्हणून ट्रेनने जात आहे असे पद्माकर म्हणला.तो खरेच बोलत असेल यावर शामरावांचा विश्वास नव्हता .त्याची थापा मारण्याची सवय शामरावाना माहीत होती .
तू काय करतोस असे पद्माकरने विचारले .त्यावर का कोण जाणे शामरावानी ते पोलिसांमध्ये आहेत असे न सांगता मी एका कारखान्यात सुपरवायझर आहे असे सांगितले.
शामरावाना पद्माकरच्या अनेक लीला आठवत होत्या.त्याने निरनिराळ्या लोकांकडून घेतलेली कर्जे , अनेक ठिकाणी केलेल्या उधारी,पैसे वसुलीसाठी त्याच्या पाठीमध्ये लागलेले लोक ,हे सर्व लक्षात घेता पद्माकर हल्लीसुद्धा सरळ असेल असे वाटत नव्हते . हा माझे सर्व छान चालले आहे असे जरी दाखवत असला तरी प्रत्यक्षात त्याचे छान काळ्या धंद्यातून चालत आहे याची शामरावांना खात्री होती.
शामरावांनी त्याला केव्हांच बरोबर ओळखले होते .त्यांच्या लॅपटॉपमध्ये त्याचे अनेक वेषातील फोटो होते .त्याने केलेले निरनिराळे गुन्हेही त्यांना माहीत होते .तो पँट्रीकारमधील रेस्टॉरंटमध्ये नाष्टा करीत असतानाच शामरावांनी त्याला हेरले होते .त्याला ते एवीतेवी लक्ष ठेवून पकडणारच होते .वीस पंचवीस वर्षात पद्माकर मध्ये खूप फरक पडला होता .आपल्याला कितीतरी महिने हवा असलेला गुन्हेगार आपला लहानपणीचा मित्र आहे याची त्यांना कल्पना नव्हती.
पद्माकर त्यांच्याजवळ येऊन बसला आणि त्याने शामू म्हणून हाक मारली तेव्हाच त्यांना तो आपला लहानपणीचा मित्र आहे याची जाणीव झाली होती .एकेकाळचा मित्र असला तरी आता तो कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार होता .शामराव त्याला कोणत्याही परिस्थितीत माफ करणार नव्हते .
ट्रेन मुंबईच्या दिशेने चालली होती .शामरावांनी पद्माकरला बरोबर ओळखले होते .पोलिसांना मोठ्या गुन्ह्यांच्या संदर्भात तो पाहिजे होता.
पोलिसांना तो वारंवार हुलकावणी देत होता .
शामराव पोलिसात आहे असे त्याला कळते तर तो सावध झाला असता .त्याने काही ना काही युक्ती करून सूंबाल्या केला असता .
शामरावांनी मुंबईत फोन लावला होता.आपण कोणत्या ट्रेनने येत आहोत ते कळविले होते .दादर स्टेशनला त्याला ताब्यात घेण्याची सर्व व्यवस्था केली होती.
*लहानपणच्या मैत्रीला स्मरून आपण स्वत: त्याला ताब्यात घ्यावे असे त्यांना वाटत नव्हते.*
*त्याचबरोबर त्याला मोकळा सोडावा असेही वाटत नव्हते .*
*दादर स्टेशन झपाट्याने जवळ येत होते .*
*थोड्याच वेळात पद्माकरचा खेळ संपणार होता.*
१९/२/२०२०©प्रभाकर पटवर्धन