( हीकथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

जर त्या दिवशी तो माझ्या बायकोचा भाऊ निघाला नसता तर अनर्थ झाला असता.मी कराटेमध्ये प्रवीण आहे .मी ब्लॅक बेल्ट धारक आहे.पत्नीने हॉस्पटिलमध्ये जात असताना  अर्धवट शुद्धीत मला तोच तो  म्हणून त्याच्याकडे बोट दाखविले .माझ्या पत्नीची अशी दशा करणार्‍याबद्दल माझ्या मनात चीड व प्रचंड राग होता.मी मोटार थांबविली व माझ्या पत्नीची अशी दशा करणार्‍या त्या इसमाच्या पाठलागाला सुरुवात केली .तो एका गल्लीत शिरताच त्याच्या पाठोपाठ मीही गल्लीत वळलो.मला पाठीमागून अर्धवट प्रकाशात पाहताना तो माणूस ओळखीचा वाटत होता.बराच काळोख असल्यामुळे नक्की तो कोण आहे हे माझ्या लक्षात येत नव्हते. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.तो गर्रकन मागे वळला.तो  माझा मेहुणा सुभाष होता.मी खरं म्हणजे त्याला तुडवायला आलो होतो.त्याच्या शरीरातील हाडांची संख्या वाढवण्याचा माझा मनसुबा होता.पाठीमागून हल्ला करण्याऐवजी समोरून त्याच्यावर हल्ला करावा असा माझा इरादा होता. सुभाषला, माझ्या पत्नीच्या भावाला बघून मी स्वतःला सावरले. मी स्वतःला सावरून त्याला म्हटले.बरे झाले तू भेटलास.सुलोचनेची त्या नराधमाने पार वाट लावली आहे.मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो आहे.चल आपण बरोबरच जाउया.तुला बघून तिला बरे वाटेल.मला तुझी मदतही होईल. 

सुभाषने घाबरून काय झाले असे विचारले.मी मोटारीकडे त्याच्याबरोबर चालत जात असताना त्याला सांगण्यास सुरुवात केली.आज मी कामावरून आलो तेव्हा आमच्या फ्लॅटचा पुढचा दरवाजा सताड उघडा होता.हल्ली चोर्‍या  मार्‍या खूप होतात.आम्ही शक्यतो दरवाजा बंद ठेवतो.बेल वाजली की अगोदर आतला दरवाजा उघडतो. कोण आहे ते पाहून नंतरच बाहेरचा सुरक्षा दरवाजा उघडतो.  दरवाजा उघडा बघून मला आश्चर्य वाटले.कुणीतरी पाहुणे आले असतील आणि दरवाजा उघडा रहाला असेल असे मला वाटले.बाहेरच्या दिवाणखान्यात कुणीही नव्हते. बेडरूममध्ये सुलोचना विव्हळत पडली होती.ती जवळजवळ बेशुद्धावस्थेत होती.मी तिच्या चेहर्‍यावर व माथ्यावर पाणी थापले.ती जराशी शुद्धीवर आली.मला ओळखून ती म्हणाली त्या नराधमाने माझी अशी अवस्था केली.शेजारील काकू आल्या होत्या.त्या जाताना मी त्याना दोन्ही दरवाजे लावून घ्यायला सांगितले होते.दरवाजाचा आवाजही मी ऐकला.त्यांनी फक्त आंतला दरवाजा लावला होता.बाहेरचा दरवाजा उघडा टाकला होता.घंटी वाजल्याबरोबर मी जाऊन दरवाजा उघडला.तो चोर वादळासारख्या  आंत शिरला. अरे कोण तू?  तुला काय पाहिजे? असे मी म्हणेपर्यंत तो शयनगृहात शिरला.कपाट उघडून चोरी करण्याचा त्याचा इरादा होता.त्याला अटकाव करताच त्याने मला जोरात ढकलून दिले.मी भिंतीवर आपटून बेशुद्ध झाले.पुढचे मला काहीच आठवत नाही.तुम्ही पाणी मारून मला उठविले, तेव्हा मी जागी झाले. शुद्धीवर आले.सुलोचनेच्या डोक्याला पाठीमागच्या बाजूला मोठी जखम झाली होती.बराच रक्तस्रावही झाला होता.पडताना तिचा एक हात अंगाखाली आल्यामुळे तोही बहुधा फ्रॅक्चर झाला असावा.भिंतीवर व जमिनीवर जोरात आपटल्यामुळे तिच्या मणक्यालाही कदाचित इजा झाली असावी.तिला उभे राहता येत नव्हते.तिच्या डोक्यावरील जखमेला रुमाल बांधला .मी तिला तसेच उचलून मोटारीत ठेवले.हॉस्पिटलकडे मी जात होतो.पाठीमागच्या सीटवर सुलोचना विव्हळत पडली होती.

तेवढ्यात तिने मला हाक मारली व  तुझ्याकडे बोट दाखवत ~तोच तो तोच तो~त्यानेच माझी अशी अवस्था केली ,असे म्हणाली.तू पाठमोरा होतास. प्रकाश अंधुक होता.मी तुला ओळखले नाहकी.  त्याला पकडावा. त्याला चांगला धडा शिकवावा. त्याला जमल्यास  पोलिस स्टेशनला न्यावे म्हणून मी मोटार थांबविली व तुझ्या मागोमाग आलो.अंधुक प्रकाशात मी तुला ओळखले नाही.तरीही मला कुणीतरी ओळखीचा असावा असे वाटत होते.बरे झाले मी तुला पाठीमागून मारले नाही.नाहीतर मला सुलोचनेबरोबर तुलाही हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले असते.

आम्ही दोघेही मोटारीत बसलो व हॉस्पिटलकडे निघालो.पाठीमागच्या सीटवर सुलोचना अर्धवट बेशुद्धीत होती.तिच्या डोक्यावरील जखमेला बांधलेला रुमाल रक्ताने भरला होता.हॉस्पिटलमध्ये पोहोचताच मी इमर्जन्सी म्हणून सांगितले. सुलोचनेकडे बघून इमर्जन्सीचे स्वरूप वॉर्डबॉयच्या लक्षात आले.त्याने घाईघाईत स्ट्रेचर आणले.   सुभाष हॉस्पिटलचे आवश्यक कागदपत्रे भरण्यासाठी हेल्प डेस्ककडे  गेला.स्ट्रेचरवरून सुलोचनेला इमर्जन्सी रूममध्ये नेत होते.तेवढ्यात एका पेशंटला घेऊन आलेल्या गृहस्थाकडे बघून तिने पुन्हा~ तोच तो तोच तो~ असे शब्द उच्चारले.

ते शब्द ऐकल्याबरोबर मी चमकलो. हॉस्पिटलकडे येत असताना तिने सुभाषकडे बघून तेच शब्द उच्चारले होते.काळी पँट व पांढरा शर्ट घातलेला मध्यम चणीचा मध्यमवयीन दिसताच ती त्याला तोच तो मारेकरी म्हणून समजत होती.याचाच अर्थ तिच्या डोक्यात काहीतरी गडबड उडाली होती.तिला इमर्जन्सी रुममध्ये नेण्यात आले.खोलीवरील लाल दिवा लागला.सुलोचनेवर उपचार करण्यात डॉक्टर मग्न होते.बाहेर बाकावर मी बसलो होतो. आवश्यक कागदपत्र भरून सुभाषही माझ्या शेजारी येऊन बसला.मला चिंतामग्न  अवस्थेत बघून त्याने मला डॉक्टर काही म्हणाले का ?असे विचारले.नाही डॉक्टर उपचारात मग्न आहेत नंतर ते काय झाले ते सांगतील एवढेच मी बोललो.मी पुढे त्याला म्हटले. मी वेगळ्याच चिंतेत आहे.सुलोचनेच्या डोक्याला बसलेल्या मारामुळे तिच्या डोक्यात काहीतरी गडबड झाली आहे असे मला वाटते.येताना ती तुझ्याकडे बघून ~तोच तो तोच तो ~असे म्हणाली.आता स्ट्रेचरवरून जात असताना एका गृहस्थांकडे बघून तिने पुन्हा तेच शब्द उच्चारले. 

मनुष्याचा मेंदू म्हणजे एक अजब चीज आहे.मेंदूच्या कार्यशक्तीचा हजारावा भागही शास्त्रज्ञांना अजूनही उलगडलेला नाही.मेंदू कसा कार्य करतो?ज्ञानेंद्रियामार्फत आलेल्या निरनिराळ्या संवेदना तो कशा ओळखतो?त्यांचे वर्गीकरण कसे करतो?त्याचे नामकरण कसे करतो?ते स्मरणात कसे ठेवतो?प्रत्येक वेळी विशिष्ट स्मरण कसे होते?मेंदू शोधाशोध कशी करतो? जन्मापासूनची असंख्य माहिती तो कशी व कुठे साठवून ठेवतो?योग्य वेळी योग्य माहिती तो कशी पुरवतो?मेंदूचे रसायनशास्त्र कसे आहे?त्यामध्ये निरनिराळे द्रव कसे स्रवतात?त्यामध्ये गडबड होते म्हणजे काय होते?अशी गडबड कां होते?अनेक गोष्टी विसरल्या कशा जातात?विसरल्या असे वाटले तरी काही वेळा त्यांचे नेमके स्मरण कसे होते?स्मृतीभ्रंश होतो तेव्हा काय होते?अपघातामुळे स्मृतिभ्रंश कसा होतो? कां होतो?दुसऱ्या एखाद्या अपघातात स्मृती परत कशी येते?एखाद्या अपघातानंतर काही काळ स्मृती नष्ट कां होते ?नंतरचे सर्व लक्षात रहाते. अगोदरचे सर्व स्मरणात असते.असे कां होते?आपल्याला मेंदूसंबंधी फारच कमी ज्ञान आहे.    

सुलोचनेच्या डोक्यात काय गडबड झाली आहे?ती कोणालाही तिच्यावर आघात करणारा~ तोच तो~असे कां म्हणत आहे?ती पुन्हा पहिल्यासारखी होईल का?ती तिच्या मारेकऱ्याला, घरात शिरलेल्या चोराला, खरेच ओळखेल का ?मुळात खरेच घरात कुणी शिरला होता का?ती पडली.तिला लागले.तिच्या डोक्यात गडबड झाली.आणि म्हणून तिला कुणीतरी मारले. कुणी तरी घरात शिरला.असा उगीचच भास होत होता का?की खरेच घरात कुणीतरी शिरला होता? आणि त्याने तिला ढकलून दिल्यामुळे ती जखमी झाली?मला काहीच कळत नाहीसे झाले आहे. मला नुसते प्रश्न प्रश्न आणि प्रश्न आहेत.अशा अनेक प्रश्नांची माझ्या डोक्यात गडबड उडाली आहे .ती ज्याच्याकडे बघून तोच तो असे म्हणाली तो तू होतास म्हणून बरे झाले.अन्यथा एखाद्या सज्जन गृहस्थाची मी मोडतोड करून बसलो असतो.त्याला हॉस्पिटलमध्ये व पोलिसांकडे घेऊन गेलो असतो. मी वेगळयाच एका दुष्टचक्रात अडकलो असतो.

सुभाष अवाक् होऊन माझ्याकडे पाहात होता.एवढ्यात खोलीबाहेरचा लाल दिवा बंद झाला.खोलीचा दरवाजा उघडला गेला. डॉक्टर बाहेर आले.मी त्यांच्याकडे जाऊन पेशंट कसा आहे असे विचारले.त्यांचा चेहरा गंभीर दिसत होता. ते म्हणाले,बाईना झालेली जखम केवळ वरवरची बाहेरची नाही.त्यांच्या अंतर्गत मनोरचनेत,विचारचक्रात, फरक पडला आहे.त्या तुम्हाला ओळखतात हेच मोठे आहे.त्यांना मी निद्रेचे इंजेक्शन दिले आहे.जखमेवर मलमपट्टी केली आहे  .थांबा व पाहा, वेट अँड वॉच, याशिवाय आपल्या हातात काही नाही.त्या शुद्धीवर आल्यावर कदाचित पूर्णपणे पूर्वीसारख्या नॉर्मल होतील.कदाचित एखादी वेगळीच व्यक्ती निर्माण झालेली असेल.सर्व काही दैवाधीन आहे.डॉक्टरांच्या हातात बरेच काही आहे आणि बरेच काही नाही.कदाचित त्या जखम झाल्यापासून ते आत्तापर्यंतच्या सर्व गोष्टी विसरतील.कदाचित तेवढ्याच गोष्टी त्यांच्या लक्षात राहतील.कदाचित त्यांचा पूर्ण स्मृतिभ्रंश होईल.कदाचित त्याना अर्धवट काही गोष्टी आठवतील तर काही आठवणार नाहीत.कदाचित त्याला वेड लागण्याचाही संभव आहे.  त्यांच्या मेंदूत अंतर्गत रक्तस्राव झाला आहे.त्याची एक लहान गाठ बहुधा निर्माण झाली आहे .आम्ही औषधामार्फत ती गाठ विरघळवण्या  प्रयत्न करीत आहोत.आम्ही एमआरआय काढला आहे.कदाचित त्या पूर्णपणे ब्रेन डेड होतील.परिस्थिती गंभीर आहे.याशिवाय मला जास्त काही सांगता येत नाही.

एवढे बोलून त्यांनी माझ्या पाठीवर थोपटल्यासारखे केले.सुभाषने फोन केल्यामुळे सुलोचनेचे आईवडीलही आले होते.सुभाषने माझा हात हातात धरला होता.दुसरा हात माझ्या श्वशुरानी हातात घेतला होता .सासूबाई समोरच्या बाकावर बसल्या होत्या.कुणी कुणाचे सांत्वन   करावे असा प्रश्न होता.

*आम्ही चौघेही हॉस्पिटलमध्ये खोलीच्या बाहेर बसलो होतो.*

*सुभाषने नर्सला आत जाऊन पेशंटला पाहू का म्हणून विचारले.*

*आम्हाला आत जाण्यास व तेथे बसण्यास परवानगी मिळाली आहे.*

* सुलोचनेकडे पाहात,ती शुद्धीवर येण्याची वाट पहात आम्ही बसलो आहोत.*

* ती शुद्धीवर आल्यावर,ती दिलेल्या इंजेक्शनमधून जागृत झाल्यावर,तिचे व आमचे भविष्य काय आहे ते आम्हाला समजणार आहे.*   

(समाप्त)

**********************

उपसंहार  

(सुलोचना दुसर्‍या  दिवशी शुद्धीवर आली.हॉस्पिटलमधून तिला आठ दिवसांनी डिस्चार्ज मिळाला.आम्हा सर्वांच्या सुदैवाने ती पूर्णपणे बरी झाली.प्रत्यक्षात घरात कुणीही शिरले नव्हते.सुलोचना पाय घसरून पडली होती.त्यात तिच्या डोक्याला मार लागला होता.तिला बेल वाजल्याचा भास झाला म्हणून तिने दरवाजा उघडला.नंतर बेडरूममध्ये येऊन ती बेशुद्ध झाली होती.मी घरी पोचल्यावर तिला शुद्धीवर आणले होते.प्रत्यक्षात ती किती शुद्धीवर आली होती ते आपण पाहिलेतच.ही सर्व माहिती तिने अर्धवट सांगितलेल्या हकिगतीवरून व आम्ही काही बांधलेल्या अंदाजावरून लिहिलेली आहे.)              

५/११/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel