( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)   

अण्णासाहेब (रघुनाथराव) त्यांच्या बेडरूममध्ये कॉटवर बसले होते.त्यांच्यासमोर पत्नीचा (सुमनचा) फोटो भिंतीवर टांगलेला होता .सुमन आता या जगात नव्हती.त्या जीवघेण्या अपघातामध्ये तिचा मृत्यू झाला होता .त्यांचाही मृत्यू व्हावा अशी योजना होती .परंतु अपघात घडवणाऱ्यांच्या दुर्दैवाने ते जिवंत राहिले होते .तो अपघात ज्यांनी  जाणीवपूर्वक घडवून आणला त्यांना शिक्षा केल्याशिवाय रघुनाथरावांना चैन पडणार नव्हते. त्यांच्या कारखान्यातील त्यांचे विश्वासू सहकारी व एकेकाळचे नोकर शिवराम, महादेव आणि कृष्णकांत यांनी तो अपघात घडवून आणला होता. रघुनाथरावांनी त्या तिघाना मनोमन देहांताची शिक्षा फर्मावली होती .आता फक्त त्या शिक्षेची अंमलबजावणी करायची होती.ती अंमलबजावणी कशी करावी याचाच विचार चालला होता.

रघुनाथरावांचे वय आता पंचावन्न होते.सुमनच्या फोटोकडे  बघता बघता गेल्या पंचावन्न वर्षांचा जीवनपट त्यांच्या डोळ्यासमोर उलगडत होता.रघूचा जन्म एका खेड्यात झाला होता.त्याचे वडील साधे मराठी शाळामास्तर होते. कुटुंबात आई वडील मुले मिळून सहा सात खाणारी तोंडे होती.त्यांची थोडीशी जमीन होती. त्यातून मिळणारे उत्पन्न व पगार यातून सर्वांचा कसाबसा गुजारा होत असे. गावातील शाळेत सातवीपर्यंत रघूचे शिक्षण झाले.पुढील शिक्षणासाठी शहरात जाणे भाग होते .रघूला शिक्षणाची ओढ होती.घरून कांही मदत होण्याची शक्यता नव्हती. तो शहरात आला .एका दूरच्या नातेवाईकांकडे राहण्याची सोय झाली .एका हॉटेलात नोकरीही मिळाली .दिवसा काम करून तो रात्रीच्या शाळेला जाऊ लागला .चांगल्या मार्कानी तो एसएससी पास झाला.

नंतर तो एका कारखान्यात नोकरी करू लागला.कारखान्यात जे पडेल ते काम तो करीत असे .त्याची हुशारी, त्याचा चुणचुणीतपणा, त्याची कार्यकुशलता,कारखान्याचे मालक दादासाहेब जठार यांना आवडली .कारखान्यातून त्यांनी  त्याची नेमणूक ऑफिसमध्ये केली.ऑफिसचे काम सांभाळून तो बाहेरून पदवीधर झाला.थोड्याच दिवसात तो सर्व ऑफिस व्यवस्थित सांभाळू लागला .कारखान्यातील कामगार, ऑफिसमधील सहकारी, सर्वांशी तो मिळून मिसळून वागत असे.    

दादासाहेबांनी त्याला कारखान्याच्या निरनिराळया  विभागांमध्ये काम करण्याची संधी दिली .उत्पादन, संशोधन, संघटन,श्रम, विपणन, वित्त, प्रत्येक विभागात त्याने काही नवीन प्रथा,नवीन प्रयोग दादासाहेबांच्या संमतीने सुरू केले .नवीन प्रयोग त्याने यशस्वीही करून दाखविले.थोड्याच दिवसांत दादासाहेबांचा विश्वासू हात म्हणून सर्व कारखाना त्याला ओळखू लागला.जर एखादे काम दादासाहेबांकडून करून घ्यायचे असेल तर रघुनाथरावांना सांगावे ते नक्की होईल याची सर्व कामगारांना खात्री होती .

दादासाहेबांच्या मनात नक्की काय होते याचा सुगावा थोड्याच दिवसात लागला .दादासाहेबांना सुमन ही एकुलती एक मुलगी होती.दादासाहेबांची ती अत्यंत लाडकी होती .त्यांच्या मनात रघुनाथला घरजावई करून घ्यावा असे होते .सुमन दिसायला चारचौघींसारखी होती .तिच्यात खास असे काही वैशिष्ट्य किंवा चमक नव्हती.अबोल,बुजरी आणि स्वत:च्याच कोषात मग्न असणारी अशी ती मुलगी होती.दादासाहेबांच्या  बंगल्यावर  कामानिमित्ताने रघुनाथला अनेकदा जावे लागे.किंबहुना काही ना काही कारणाने दादासाहेब तसे प्रसंग घडवून आणीत असत.त्यांच्या पत्नीने वहिनीसाहेबांनी रघुनाथला पाहावे, पसंत करावे, तिच्याकडूनच दादासाहेबांना हवी असलेली सूचना यावी, अशी दादासाहेबांची योजना होती .त्यांची योजना यशस्वी झाली .हवी असलेली सूचना त्यांच्याकडून आली .सुमनलाही रघू पसंत होता.सुमन दिसायला चारचौघींसारखी असली तरी सुस्वभावी होती.रघूने तिला पसंत केले.रघूच्या आई वडिलांनीही सून म्हणून तिला पसंती दिली.

विवाह संपन्न झाला .दादासाहेबांच्या बंगल्यात परंतु स्वतंत्र असा त्यांचा संसार सुरू झाला .म्हटले तर एकत्र म्हटले तर स्वतंत्र अशी ती रचना होती .एका वर्षात दादासाहेबांना नात झाली.नात सुंदर गोड लाघवी होती.तिला खेळविण्यात तिच्या बाललीला पहाण्यात दादासाहेब व वहिनीसाहेब यांचा वेळ जाऊ लागला. दादासाहेबांनी हळूहळू कारखान्याच्या सर्व कारभार रघुनाथकडे सोपविला.

रघुनाथ आता रघुनाथराव झाले होते .नात मोहिनी आजोबांना दादा म्हणे तर बाबांना अण्णा म्हणू लागली.रघुनाथराव हळूहळू  सर्वांचे अण्णा किंवा अण्णासाहेब झाले.अण्णासाहेबांनी कारखाना केवळ सांभाळला एवढेच नव्हे तर त्याचा यशस्वी विस्तारही केला.थोड्याच वर्षात कारखान्याचा टर्नओव्हर कांही लाखातून कोटींमध्ये गेला.कांही प्रमाणात वाढलेली किंमत पातळी जरी याला कारणीभूत असली तरी वाढीव उत्पादन,त्यातील विविधता,उत्पादित  वस्तूंची आकर्षकता, विपणन कौशल्य हेही त्याला  कारणीभूत होते .

सर्व कारभार अण्णांकडे सोपविलेला होताच .दादासाहेब व वहिनीसाहेब पूर्णपणे निवृत्तीचे जीवन जगत होते .अण्णासाहेब त्यांचे जावईही होते त्याचबरोबर ते त्यांना मुलासारखेही होते. मोहिनी दिसामासाने वाढत होती.ती शाळेतून कॉलेजमध्ये केव्हा गेली, ती केव्हा मोठी झाली त्याचा पत्ता लागला नाही .मोहिनीचे रूपांतर एका सुंदर तरुणीमध्ये झाले होते.

नातजावई पाहावा. पणतू मांडीवर खेळवावा असे दादासाहेब व वहिनीसाहेब दोघानाही  वाटत होते . परंतू देवाच्या मनात तसे नसावे .मोहिनी शिकत असतानाच आजोबा आजींनी जगाचा निरोप घेतला.

वारसाच्या बाबतीत काही गुंतागुंत होऊ नये म्हणून दादासाहेबांनी वकिलांच्या सल्याने मृत्यूपत्र केले होते.सर्व इस्टेट सुमन व अण्णासाहेब यांच्यामध्ये  सारखी विभागून दिली होती .

शिवराम, महादेव व कृष्णकांत हे तिघेही शिकाऊ उमेदवार कामगार होते .ते त्यांच्या संघटन कौशल्याच्या,बुद्धिमत्तेच्या, जोरावर एकेक पायरी वर चढत गेले.अण्णासाहेब त्यांच्यावर विश्वास टाकू लागले.तेही विश्वासाने सर्व कामे करीत असत .अण्णासाहेबांनी  या तिघांवर विश्वासाने कारखान्याचा कारभार सोपवला होता.त्यांना कारखान्यात सहकारी म्हणून सहभागी करून घेतले होते.

मोहिनीने एक दिवस अण्णा व  आई यांच्याजवळ तिच्या मनातील गोष्ट बोलून दाखविली. तिने तिचा पती निवडला होता . त्याच्यात नाव ठेवण्यासारखे काहीही नव्हते.शिक्षण, रूप, खानदान, श्रीमंती, सर्व दृष्टीने तो अनुरूप होता.एकच गोष्ट अण्णांच्या मनासारखी नव्हती .त्याला परदेशात जाऊन स्थायिक व्हायचे होते .त्यादृष्टीने नोकरीसाठी त्याचे प्रयत्न चालले होते .आपला कारखाना जावई संभाळील. इतिहासाची पुनरावृत्ती होईल.ही आशा फलद्रूप झाली नाही .शिरीषला ऑनलाइन इंटरव्ह्यू  देऊन कॅनडामध्ये नोकरी मिळाली. मोहिनी व तो कॅनडाला रवाना झाले.

अण्णासाहेब व सुमन एकाकी झाले .

कारखान्याचा कारभार शिवराम, महादेव व कृष्णकांत, यांच्यावर सोपवून अण्णासाहेब  सहा महिने मुलीकडे जाऊन कॅनडात राहिले होते.तेवढ्या कालावधीत अण्णासाहेबांचे कारखान्यावर, तिथे चाललेल्या गोष्टींवर, स्वाभाविकच लक्ष व नियंत्रण नव्हते.या तिघांच्या मनात कली शिरला. त्यांनी मोठ्या प्रमाणात अफरातफर केली .कारखान्याला कित्येक  कोटींचा तोटा झाला .कारखाना जवळजवळ दिवाळे निघण्याच्या स्थितीत आला .

कॅनडाहून परत आल्यावर अण्णासाहेबांच्या सर्व परिस्थिती लक्षात आली .त्यांनी तिघांबरोबर मिटिंग घेऊन त्यांच्या सर्व लक्षात आल्याचे निदर्शनास आणून दिले . एक महिन्यात सर्व पैसे भरा किंवा परिणामांना तयार रहा असा अल्टीमेटम त्यांना देण्यात आला .सज्जन कार्यक्षम व विश्वासू वाटलेले चोर निघतील अशी कल्पनाही अण्णासाहेबांच्या मनात आली नव्हती .त्यांची माणसांची पारख चुकली होती. ते स्वतःलाच त्यासाठी दोषी ठरवीत होते .

ते तिघेही अफरातफर केलेले पैसे निदान काही प्रमाणात तरी भरतील अशी आशा अण्णासाहेबांना होती .परंतु येथेही त्यांची चूक झाली होती .ते तिघेही पार पोचलेले होते .त्यांनी अण्णासाहेब व त्यांची पत्नी सुमन यांच्या  खुनाचा कट रचला .ना रहेगा बास ना बजेगी बासुरी,अशी व्यवस्था करण्याचा तिघांचा विचार होता.दोघांचाही मृत्यू झाल्यावर कारखान्यावर कोणाचेच नियंत्रण राहणार नव्हते .शिरीष व मोहिनी केवळ और्ध्वदेहिक व आवाराआवर यासाठी इकडे आली असती.कारखान्याचे काय होते ते ती पाहणार नव्हती. जमेल तेवढ्या रकमेला कारखाना विकून ती दोघेही कॅनडाला निघून गेली असती.काही रक्कम देऊन कारखाना आपण विकत घ्यायचा असे त्यांनी ठरविले होते .

त्यानी एका मेकॅनिककडून अण्णासाहेबांच्या  मोटारीचे ब्रेक्स सैल करून ठेवले.परिणामी भीषण अपघात होऊन दोघांचाही मृत्यू व्हावा अशी योजना होती .ही योजना फसली असती तर त्यांनी आणखी काही दुसरी योजना आखली असती.कांही कारणाने अण्णासाहेब व सुमन एकाच वेळी मोटारीतून गेले नाहीत .आयत्या वेळी तेवढ्यात काही काम निघाल्यामुळे अण्णासाहेब कारखान्यावर  राहिले.सुमन मोटारीतून पुढे निघून गेली . कारखान्यावरून गावात जाताना छोटासा घाट होता.घाटात अपघात झाला .सुमनचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अण्णासाहेबांना हा अपघात नसून घात असावा असा संशय आला .त्यादृष्टीने त्यानी चौकशी केली. त्यांचा संशय खरा ठरला .ज्या मेकॅनिकने ब्रेक्स निरुपयोगी केले त्यानेच त्यांच्याकडे कबुली जबाब दिला . त्या तिघांची योजनाही अण्णासाहेबांच्या लक्षात आली होती. पोलिस केस केली असती ,एफआयआर दाखल केला असता, तर तिघेही अनेक प्रकारच्या गुन्ह्यात सापडले असते .आर्थिक अफरातफर, फसवणूक, खुनाचा प्रयत्न, प्रत्यक्ष खून, असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल होऊ शकले असते . यथावकाश त्यांना कमी जास्त शिक्षाही झाल्या असत्या .किंवा ते सुटलेही असते .त्यांची सुमन या नराधमांच्या कटाला बळी पडली होती. खटल्याचा शेवट कांहीही झाला असता तरी त्यांची सुमन आता परत येणार नव्हती. 

अण्णासाहेबांचा कधी नव्हे तो रागाने तिळपापड झाला होता .या नराधमाना आपणच मृत्युदंडाची शिक्षा द्यावी असे त्यांनी ठरविले होते .

शयनगृहात बसून सुमनच्या फोटोकडे पाहताना अण्णासाहेबांना या सर्व  गोष्टी आठवत होत्या .

*जे कांही करायचे ते शांतपणे करणे आवश्यक होते .*

*मृत्यूदंडाची योजनाही त्यांच्या मनात तयार होती.*

*फक्त त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे करायची होती .*

* योजनेची अंमलबजावणी करताना,त्यांना मृत्यू आला असता तरी हरकत नव्हती .*

*परंतु मृत्यूदंडाची शिक्षा अपूर्ण राहून जर अण्णासाहेबांना मृत्यू आला असता तर ते त्रिशंकूप्रमाणे लोंबकळत राहिले असते. *

*कोणत्याही परिस्थितीत त्या तिघांनाही मृत्यूदंड होणे आवश्यक होते .*

(क्रमशः)

३०/८/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel