( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
रावसाहेब राजवाडे ही एक खानदानी रईस व्यक्ती होती.त्यांच्या कुटुंबातील अनेक पिढय़ानी अनेक दिशांनी धनसंचय केला होता. त्यांचे साम्राज्य एका दिवसांत निर्माण झाले नव्हते.त्यांना वैभवशाली इतिहास होता.एकामागून एक कर्तबगार पिढ्या निर्माण होत गेल्या होत्या.प्रत्येक पिढीने असणार्या उत्पन्नात मालमत्तेत भर घातली होती.त्यांचे कारखाने होते. फळबागांच्या बागा होत्या.अनेक कंपन्यांचे शेअर्स त्यांनी विकत घेतले होते.प्रत्येक पिढी कर्तबगार असल्यामुळे धनसंचयात वाढ होत गेली होती.दुर्दैवाने रावसाहेबांना मूलबाळ नव्हते.त्यांच्यानंतर संपत्ती स्वाभाविकपणे दूरच्या नातेवाईकांकडे किंवा त्यांनी मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणे त्या व्यक्तींकडे जाणार होती.त्यांनी आपल्या मुलाला दत्तक घ्यावा म्हणूनही कित्येक जणांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न केले होते.
रावसाहेबांचे वय पन्नास होते.रावसाहेबांची प्रकृती ठणठणीत होती.त्यांचे वय होते त्यापेक्षा कमी दाखवत असे.ते चाळिशीचे आहेत असे एखाद्याने म्हटले असते तरी चालून गेले असते.दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचे निधन वर्षभरापूर्वी झाले होते.त्यांनी पुन्हा लग्न करावे म्हणून त्यांचे मित्र,त्यांचे नातेवाईक,त्यांना गळ घालीत असत.आपल्या मुलीशी, बहिणीशी, त्यांनी विवाह करावा म्हणून प्रयत्न करणारेही कांही थोडे थोडके नव्हते.त्यांनी एखाद्या विधवेशी पुनर्विवाह करावा असे त्यांचे जिवलग मित्र व कारभारी भाऊसाहेब यांचे मत होते.अजून तरी रावसाहेबांचा तसा विचार दिसत नव्हता.तसे ते धार्मिक वृत्तीचे व चारित्र्याने शुद्ध होते.
त्यांच्याकडे स्वयंपाकीण म्हणून वत्सलाबाई जवळजवळ गेली वीस वर्षें काम करीत होत्या.वत्सलाबाईंचे लग्न झाल्यापासून त्या येथे स्वयंपाकीण म्हणून काम करीत होत्या. रावसाहेबांच्या प्रशस्त बंगल्यालाजवळ लांबलचक आउटहाउस नोकरांसाठी बांधले होते.आऊट हाऊसमध्ये प्रत्येक नोकर कुटुंबियांसह राहात असे.कुटुंबातील काम करता येण्यासारखे सदस्य, बंगल्यावर किंवा रावसाहेबांच्या कारखान्यात काम करीत होते.रावसाहेबांनी कारभार बघण्यासाठी एका व्यवस्थापकाची नेमणूक केली होती.एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ असावा त्याप्रमाणे हे व्यवस्थापक(मॅनेजर) भाऊसाहेब भदाणे होते.ते त्यांचे जिवलग मित्रही होते.सर्व जण त्यांना भाऊसाहेब म्हणत असत.रावसाहेबांच्या चौफेर सर्वदूर पसरलेल्या कारभारावर त्यांचे बारीक लक्ष व नियंत्रण असे.रावसाहेबांचा सर्व कारभार भाऊसाहेब समर्थपणे सांभाळीत होते.रावसाहेबांचा भाऊसाहेबांवर पूर्ण विश्वास होता.
वत्सलाबाईंचे (त्यांना बंगल्यातील सर्वजण काकू म्हणत,) पती रावसाहेबांच्या बागेमध्ये माळी म्हणून काम करीत असत.वत्सलाबाईना कमला नावाची एक मुलगी होती.ही कमल कमळाप्रमाणे सुंदर व नाजूक होती.तिच्याकडे पाहिल्यावर ती इतक्या गरीब कुटुंबात जन्माला आली आहे असे वाटत नसे.तिच्या चालण्यात बोलण्यात एक स्वयंभू खानदानीपणा व सौंदर्य होते.ती श्रीमंत कुटुंबात जन्माला आली आहे असे तिला न ओळखणाऱ्या लोकांना वाटत असे. लहानपणापासून ती आईबरोबर बंगल्यात येत असे.बंगल्यात सर्वत्र तिचा वावर असे.रावसाहेबांच्या पत्नीला मूल नसल्यामुळे त्या कमलवर मुलीप्रमाणे प्रेम करीत असत.तिचा वावर बऱ्याच वेळा बंगल्यात असल्यामुळे, माहीत नसलेल्या लोकांना ती रावसाहेबांची मुलगी वाटत असे.बाईसाहेब, रावसाहेबांचा हात संसारात अर्ध्यावर सोडून निघून गेल्या.रावसाहेबांचा जीवनावरचा विश्वासच उडाला.आपण कशासाठी जगतो! कशासाठी जगायचे?आपल्याला तर मूलबाळही नाही असे त्यांना वाटू लागले.ते औदासिन्यात (डिप्रेशनमध्ये)बुडून गेले.
कमल मुलीप्रमाणे सर्व बंगल्यात वावरत असे.तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च रावसाहेब करीत असत. तिचे रावसाहेब व बाईसाहेब यांच्यावर नितांत प्रेम होते.औदासिन्यातून त्याना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न कमल करीत होती.काळ लोटेल तसा ते वस्तुस्थितीचा स्वीकार हळूहळू करू लागले होते.एक दिवस कॉलेजातून आल्यावर बंगल्यात फिरत असताना कमलच्या मनात कलीने प्रवेश केला.या बंगल्यात आपण मालकिणीप्रमाणे कितीही फिरत असलो तरी आपण शेवटी एका नोकराची स्वयंपाकीणबाईंची मुलगी आहोत.आपण मालक कधीही होऊ शकत नाही.तिचे एक मन असा विचार करीत असताना तिच्या मनात शिरलेल्या कलीने तिला वेगळीच वाट दाखविली.तू जरा चतुराई दाखविलीस काळजीपूर्वक फासे टाकलेस तर तू या वैभवाची मालकीण होऊ शकतेस.तो विचार मनात आल्याबरोबर ती चमकली.जिथे आपण मुलीसारखी वावरलो,जिथे बाईसाहेबांनी व रावसाहेबानी मुलीसारखी आपल्यावर माया केली,तिथे बाईसाहेब जरी या जगात आता नसल्या,तरी त्यांची जागा घेण्याचे स्वप्न चुकीचे आहे असे तिचे एक मन तिला बजावून सांगत होते.नलासारख्या सच्चरित्र राजाच्या मनात कलीने शिरकाव केल्यावर प्रभाव दाखविला तेथे कमलची काय कथा.
कली मनात शिरला असे प्रत्यक्षात कांही नसते.कली आपल्या मनात अगोदरपासूनच असतो.फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते.त्याची जेव्हां जाणीव होते तेव्हां तो बाहेरून आंत शिरला असे आपण म्हणतो.सगळे कांही कलीमुळे घडले असे आपण समजतो.सर्व कांही कलीवर ढकलतो.आपल्या मनालाच एक काळी बाजू आहे हे आपण मान्य करायला तयार नसतो.आपण आपल्या मनाची समजूत करून घेतो.प्रत्यक्षात मन ही अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट आहे.
त्या दिवसापासून कमल रावसाहेबांकडे एका वेगळ्याच दृष्टीने पाहू लागली.बंगल्यात पहिल्यापासून सर्वत्र फिरण्याची तिला व ती रुबाबात फिरताना पाहण्याची इतर नोकरांना सवय होती.आता ती रावसाहेबांच्या लहानसहान गोष्टींमध्ये लक्ष देऊ लागली.त्यांच्या नजरेत जास्त वेळ कशी राहू याची काळजी घेऊ लागली.सकाळी नाश्ता,दुपारी व रात्री जेवण, यावेळी कटाक्षाने हजर राहून त्यांना जेवण वाढू लागली.त्यांची वैयक्तिक काळजी घेऊ लागली.
रावसाहेबांना वस्तू देण्याच्या मिषाने त्यांना स्पर्श करू लागली.हळूहळू रावसाहेबही तिच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागले.दोघांच्या वयात जवळजवळ तीस वर्षांचे अंतर होते.कमल त्यांना मुलीसारखी होती.आता कमलची दृष्टी बदलली होती.तिच्या नजरेची रावसाहेबांना भीती वाटू लागली.तोच कली रावसाहेबांच्या मनात शिरला.जर कमलला आपण पसंत असू, जर तिच्या मनात आपल्यासारखाच विचार असेल, असेल काय तिची दृष्टी तसेच सांगते, तर काय हरकत आहे ?असा विचार त्यांच्या मनात वारंवार येऊ लागला.एका दृष्टीने पाहिले तर त्यांत कांहीच गैर नव्हते.ते तर देवाधर्माच्या साक्षीने विवाह करणार होते.कुणी कुणावर बळजबरी करणार नव्हते.एकमेकांच्या पूर्ण संमतीने लग्न होणार होते.वयात अंतर असले म्हणून काय झाले .तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.लोकांनी कदाचित, कदाचित काय नक्कीच दूषणे दिली असती.पण लोक काय कांहीही केले तरी बोलतच असतात.
कमल चतुर होती.रावसाहेबांच्या दृष्टीत पडलेला फरक तिने लगेच ओळखला.ती मनात म्हणाली, मासा गळाला लागला.आपल्या कष्टाचे चीज झाले.प्रथम रावसाहेबांनी कमलच्या मनाचा वेध घेतला.तिचा होकार येताच रावसाहेबांनी पुढील पाऊल उचलले.वत्सलाबाईना एकदम विचारणे योग्य ठरले नसते.कदाचित त्यांची प्रतिक्रिया तिखट आली असती.त्यांनी वत्सलाबाईना विचारणे त्यांच्या पोझिशनला,त्यांच्या स्टेटसला उचितही नव्हते.
भाऊसाहेब,रावसाहेबांच्या खास विश्वासातील होते.रावसाहेबानी प्रथम त्यांचा विचार भाऊसाहेबांना बोलून दाखविला.कमल राजी आहे हे त्यांनी भाऊसाहेबांच्या लक्षात आणून दिले.भाऊसाहेबांनी पुढील सूत्रे आपल्याकडे घेतली.त्यांनी प्रथम वत्सलाबाईना कमलच्या लग्नाचे काय करणार आहात असे विचारले.ती शिकत आहे.अजून आम्ही त्याबद्दल विचारच केलेला नाही.तुमच्या पाहण्यात एखादे चांगले स्थळ असले तर सुचवा असेही वत्सलाबाई पुढे म्हणाल्या.भाऊसाहेबांनी रावसाहेबांबद्दल हळूच त्यांचा विचार मांडला.रावसाहेबांचे वय सोडले तर त्यांच्यात नांव ठेवण्यासारखे कांहीही नव्हते.
प्रथम वत्सलाबाईना भाऊसाहेबांची सूचना थोडी विचित्र वाटली.परंतु विचार केल्यावर आपली मुलगी राज्य करील, आपणही अप्रत्यक्षरीत्या राज्य करू,ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली.
पैशाचा मोह कुणाला पडत नाही?भलेभले त्याला बळी पडतात.त्यांची तत्त्वे वगैरे सगळी दूर राहतात.योग्य अयोग्य याचाही त्यांना विसर पडतो.आपल्या कृतीच्या समर्थनार्थ त्यांना अनेक मुद्दे सुचू लागतात.आपण घेतलेल्या निर्णयाची तरफदारी करू लागतात.बऱ्याच वेळा हे स्वत:च्या मनाला पटविणे असते.बऱ्याच गोष्टी सोयीस्करपणे विसरल्या जातात.
इथे तर वत्सलाबाई सामान्य होत्या.त्यांनी त्यांच्या पतीचा विचार घेतला.अप्रत्यक्षरीत्या उपकाराच्या ओझ्याखाली दोघेही दबलेली होती.रंकाचा राव होण्याची संधी त्यांना आली होती.
*तरीही त्यांनी मुलीचा विचार घेतला.कमलने साळसूदपणे तुमच्या आज्ञेबाहेर मी नाही मला रावसाहेब पसंत आहेत असे उत्तर दिले.*
*थोडय़ाच दिवसांत थाटामाटात रावसाहेबांचा विवाह संपन्न झाला.रावसाहेबांच्या पाठीमागे काही लोकांनी टीका केली.*
*बुढ्ढा घोडा लाल लगाम असा त्यांच्या टीकेचा आशय होता.दोघांचा संसार सुरू झाला.*
*कली अजून काय काय खेळ करणार होता ते कलीलाच माहीत होते.*
(क्रमशः)
२१/६/२०२१©प्रभाकर पटवर्धन