(ही कथा काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

रमा त्या रस्त्याने किती तरी वेळ चालत होती.भवानराव पाटलांचा वाडा अजून बराच लांब होता.तिला तशी घाई  होतीही आणि नव्हतीही.भवानरावाना एकदा मृत्युदंडाची शिक्षा दिली की ती तिच्या, तिने स्वतःलाच दिलेल्या , वचनातून मुक्त होणार होती.मृत्यूदंड कसा द्यायचा ते तिने अजून निश्चीत केले नव्हते.वेळ येईल त्यावेळी ती परिस्थितीनुरूप  काय करायचे ते ठरविणार होती.मृत्यूदंड द्यायचा एवढेच तिने निश्चित केले होते .एवढ्यात समोरून एक मोटार आली. चालकाचे मोटारीवरील नियंत्रण बहुधा सुटले असावे .मोटार सरळ तिच्या अंगावरून जाणार होती.तेवढ्यात तिने रस्त्याच्या कडेला पटकन उडी मारली .ती बालंबाल बचावली .उडी मारल्यावर तिचे तिलाच हसू आले .अश्या  दहा मोटारी अंगावरून गेल्या असत्या तरी तिला आता काही भय नव्हते.मृत्यू येईल या भयातून ती मुक्त झाली होती .

भवानराव पाटलांच्या वाड्याकडे जायला निघण्यापूर्वी , विहिरी भोवती बराच वेळ ती घुटमळत होती .सभोवार खूप लोक जमले होते .त्यांच्या बोलण्याचा एकच कलकलाट होत होता .कोण काय बोलत आहे ते कळत नव्हते . सर्वजण शक्य तितके विहिरीत डोकावून पाहात होते .विहिरीत एका वीस बावीस वर्षांच्या मुलीचे प्रेत तरंगत होते .तिने आत्महत्या केली, की तिला कुणी ढकलून दिले, कि ती अपघातग्रस्त झाली हे पोलिसांच्या चौकशीअंतीच कळणार होते.पोलिसांना कुणीतरी फोन केला होता . पोलिस येण्याची सर्वजण वाट पाहात होते .थोड्याच वेळात पोलिसांची गाडी सायरन वाजवीत आली .पोलिसांनी थोड्याश्या  बळाच्या जोरावर गर्दी बाजूला केली.प्रेत कुणी पाहिले त्याची चौकशी त्यांनी सुरू केली .हणमंताने मी प्रथम  प्रेत पाहिले असे सांगितले.

नेहमी प्रमाणे विहिरीवर तो आंघोळीसाठी भल्या सकाळी आला होता.विहिरीत छलांग मारणार तोच त्याला कुणीतरी बाई तरंगतांना दिसली.त्याने हाका मारून  लोकांना बोलाविले .तो एकदा उडी मारून प्रेत वरती काढणार होता .परंतू पोलीस काय म्हणतील म्हणून तो तसाच उभा होता .पोलिसांनी सांगितल्यावर त्याने विहिरीत उडी मारून प्रेत वरती काढले.नंतर पोलिसांचे सर्व सोपस्कार पंचनामा वगैरे सुरू झाले.आता तिथे थांबण्यात अर्थ नव्हता.

रमा तर मेली होती .अजूनही तिला तिच्या देहाची आसक्ती दूर जाऊ देत नव्हती .संध्याकाळी उडी मारून तिने तिच्या सर्व यातनांचा अंत केला होता .शेवटी निग्रह करून ती तिच्या ध्येयाची वाट चालू लागली होती .ज्याने तिची अशी अवस्था केली त्या भवानरावांना  संपविल्याशिवाय तिला मुक्ती मिळणार नव्हती . वाटेत मोटार तिच्या अंगावर आल्यावर प्रतिक्षिप्त क्रियेने तिने उडी मारली होती. कितीही मोटारी अंगावरून गेल्या तरी ती आता मरणार नव्हती कारण ती अगोदरच मेलेली होती .तिला उडी मारण्याचे काहीच कारण नव्हते .मोटार तिला काही केल्याशिवाय तिच्या धूम्रमय देहातून आरपार निघून गेली असती.

तिची कर्मकहाणी दोन वर्षांपूर्वीपासून सुरू झाली होती .तिला कुणीतरी भवानरावांकडे  काम आहे म्हणून सांगितले .हरकामी म्हणून ती नोकरीला लागली.वाड्यावर तिला पडेल ते काम करावे लागत असे .धुणीभांडी, झाडू पोछा, स्वयंपाकपाणी, गाद्या घालणे काढणे,पडेल ते काम ती प्रामाणिकपणे व्यवस्थित करीत असे .जेवूनखाऊन तिला पगारही भक्कम मिळत होता .तिचे आईवडील भाऊबहीण जरी काहीना काही काम करून मिळवीत असले  तरी रमाचा पगार हा तिच्या कुटुंबाचा भक्कम आधार होता .

रमा एखाद्या झोपडपट्टीतील मुलगी आहे असे वाटत नसे .सडपातळ  रेखीव नाकी डोळी नीटस सावळी अशी तिची आकृती होती. एखाद्या दगडातून काढलेल्या शिल्पाप्रमाणे ती दिसत असे .ती पाहिल्याबरोबर तिची छाप (इम्प्रेशन)चांगले पडत असे .थोडक्यात ती छानपैकी आकर्षक होती .गरिबाने फार चांगले दिसू नये आणि भवानरावांसारख्या श्रीमंत बलदंड  कामुक माणसाच्या नजरेला तर पडूच नये हे खरे .

मोठ्या वाड्यात पडेल ते काम ती करीत होती .त्या मोठ्या राजवाड्यासारख्या वाड्यात अनेक नोकर चाकर बाई माणसे काम करीत होती .त्यातील एक रमा होती.एक दिवस घाईघाईने एका खोलीतून दुसऱ्या खोलीत ती जात असताना भवानरावांशी तिची टक्कर झाली.आता आपल्याला दाट बसणार यामुळे ती जागच्या जागी थरथर कापत उभी राहिली .भवानराव जे बोलतील ते ऐकण्यासाठी सहन करण्यासाठी ती खाली मान घालून उभी राहिली .भवानराव प्रथम चिडले होते परंतू रमाकडे पहात असताना  त्यांचा राग केव्हां मावळला ते त्यांचे त्यांनाच कळले नाही .

.                  त्यानी तिला तू इथे किती दिवस काम करीत आहेसं  असे विचारले .तिने खाली घातलेली मान वर न करता दोन वर्षे म्हणून उत्तर दिले .एवढे चांगले फळ आपल्या दृष्टीस अजून कसे पडले नाही याचे त्यांना आश्चर्य वाटले  त्यांनी कारभार्‍याना ताबडतोब बोलाविले .रमाला पगार किती आहे याची चौकशी केली .तिचा पगार दुप्पट करा म्हणून त्यांना आज्ञा दिली .त्याचबरोबर तिची अंतर्गृहात नेमणूक करा अशीही त्यांना आपल्या दिली.

भोळी भाबडी रमा पगार दुप्पट झाल्यामुळे आनंदीत झाली होती .मालकांचे गुणवर्णन ती घरी करीत होती .अंतर्गृहात याचा अर्थ कारभाऱ्यांना पुरेपूर माहीत होता .त्यांना रमाबद्दल कणव निर्माण झाली .भवानरावांचा तामसी कामुक स्वभाव कारभाऱ्यांना माहिती होता .आत्तापर्यंत त्यांनी अशी अनेक फुले पायदळी चिरडून   टाकली होती.रमाचीही तीच गत होईल याची त्यांना खात्री होती.रमाला सावध करावे असे एकदा त्यांना वाटले.परंतु ही गोष्ट भवानरावाना कळल्यास आपल्या नोकरीवर गदा येईल याची त्यांना  खात्री होती .जे होईल ते उघड्या डोळ्यांनी पाहणे याशिवाय त्यांच्या हातात काहीही नव्हते .

शेवटी एक दिवस भवानरावांनी तिचा घात केला.  त्यांच्या कुटील इच्छेला ती बळी पडली .भगवानराव पेहलवानी थाटाचा रांगडा उलट्या काळजाचा क्रूरकर्मा होता.फुलाला चिरडून त्यांची पाकळी पाकळी अलग केल्याशिवाय त्याचे समाधान होत नसे .तिला त्यांनी पैसे भरपूर दिले .तिला गोड गोड आश्वासनेही दिली .यातील काहीही तिच्या घरी किंवा अन्य कुणाला कळले तर त्याचे परिणाम वाईट होतील असा सज्जड दमही तिला दिला.   

ती लहान कोवळी अजाण पोर भीतीमुळे कोणाशीही काहीही बोलू शकली नाही. होणारा अन्याय, वारंवार होणारे अत्याचार, ती मुकाटय़ाने सहन करीत राहिली .

थोड्याच महिन्यांत भवानरावाना तिचा कंटाळा आला.तिला त्या काळात दिवसही गेले होते.जशी त्यानी तिला जवळ केली त्याचप्रमाणे तिला झटक्यात दूरही केली. भवानरावांची रोज होणारी भेट आता दिवसेंदिवस होत नाहीशी झाली.तिला आपली व्यथा आपली परिस्थिती घरी सांगता येईना भवानराव तर तिला आता एकांतात भेटतच नव्हते.चारचौघांसमोर त्यांना गाठून बोलण्याचे धैर्य तिच्याजवळ नव्हते.

शेवटी तिने विहीर जवळ करण्याचे ठरविले.त्यामुळे सर्वच दु:खातून तिची सुटका झाली असती.

तिने विहिरीत उडी टाकली .तिला पोहता येत नव्हते .वेळ तिन्हीसांजची होती .तिला कुणी वाचवायला येण्याचाही संभव नव्हता .थोड्याच वेळात पोटात पाणी जाऊन श्वास बंद होऊन ती मृत्यू पावली .तिची दुःखातून सुटका झाली असे तिला वाटत होते .एका संकटातून सुटका झाली तरी ती दुसर्‍या चक्रात सापडली होती.

भवानरावांनी केलेल्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी ती  अधांतरी लटकत होती.त्यांना मृत्यूदंड दिल्याशिवाय तिची या योनीतून सुटका होणार नव्हती.

चालता चालता ती भवानरावांच्या वाड्यासमोर  आली. आता ती भवानरावांच्या वाड्यासमोर उभी होती.आत जाऊन भवानरावांच्या नरडीचा घोट घ्यावा असे तिला उत्कटतेने वाटत होते.ती वाड्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागली . कां कोण जाणे परंतु तिला वाड्यात प्रवेश करता येत नव्हता.

* आहे त्या स्थितीत तिला आत जाता येत नव्हते.दुसरी काहीतरी युक्ती करणे आवश्यक होते .*

*भवानरावांच्या  विनाशाची दुर्दम्य इच्छा तिच्याजवळ होती .*

*याशिवाय तिच्याजवळ काहीही नव्हते.*

*ही दुर्दम्य इच्छाच तिला शक्ती व युक्ती देणार होती*  

(क्रमशः)

१६/२/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel