( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
क्वचित केव्हांतरी कातकर्याने सोडलेला बाण माझ्या स्वप्नात आमच्यापैकी एखाद्याला लागतो.तो मरतो आणि मी घामाघूम होऊन घामाने निथळत जागा होतो.
अशावेळी मी अत्यंत अस्वस्थ असतो.मला त्या रात्री बहुधा पुन्हा झोप लागत नाही.माझा रक्तदाब त्यावेळी निश्चित वाढलेला असणार.हृदयाचे ठोकेही निश्चित वाढलेले असणार.
पुढे अनुभवाला येणारी आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला तो बाण लागलेला असतो त्याचा पुढील सहा महिन्यांमध्ये केव्हांतरी मृत्यू होतो.
दुसऱ्या दिवसापासून किंवा त्यानंतर केव्हाही हा मृत्यू होतो.केव्हां केव्हां त्या व्यक्तीचा झोपेतच मृत्यू झाल्याची बातमी दुसर्या दिवशी कळते. ही व्यक्ती माझ्या नात्यातील असते किंवा नसते.कातकरी मागे लागल्यामुळे पळणाऱ्या व्यक्तीमध्ये नातेवाईक असतात त्याप्रमाणेच ओळखीतले लोकही असतात.आतापर्यंत सात आठवेळा मी हा अनुभव गेल्या ऐंशी वर्षामध्ये घेतला आहे.वर्ष सहा महिन्यांनी एकदा हे स्वप्न पडते.कातकऱ्यांच्या बाणाला कुणीही बळी पडत नाही.कातकरी मागे लागलेले असताना आणि आम्ही जीव घेऊन पळत असतानाच मला जाग येते.
ज्यावेळी एखाद्याचा बाण लागून मृत्यू होतो, त्यानंतर जागा झाल्यावर मी स्वतःलाच अपराधी समजतो.जसा काही मीच त्याला बाण मारून ठार केलेला असतो.त्याचा प्रत्यक्षात मृत्यू होईपर्यंतचा काळ हा मला अतिशय वाईट जातो.त्याच्या किंवा तिच्या मृत्यूची मी प्रतीक्षा करीत असतो.एखाद्याच्या मृत्यूची अशी प्रतीक्षा करणे ही फार वाईट गोष्ट आहे याची मला जाण आहे.परंतु प्रत्यक्षात प्रतीक्षा केली जाते ही खरी गोष्ट आहे.एकदा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला की माझी प्रतीक्षा संपते.मी एकाचवेळी सुटकेचा व दु:खाचा सुस्कारा सोडतो.
सात वर्षांचा असताना मला जेव्हा पहिल्यांदा हे स्वप्न पडले तेव्हा मी अर्थातच खूप घाबरलो होतो.ती व्यक्ती समोर आली की मी बेचैन होत असे.आम्ही जिथे राहात होतो तिथे शेजारी राहणारे एक गृहस्थ त्यावेळी माझ्या स्वप्नात कातकऱ्यांच्या बाणाला बळी पडले होते.तीन महिन्यांनंतर तापाचे निमित्त होऊन ते प्रत्यक्षात मेले.असाच प्रसंग मी अठरा वर्षांचा असताना पुन्हा एकदा घडला.त्यावेळी पडलेल्या स्वप्नात माझे चुलत काका कातकऱ्यांच्या बाणाला बळी पडले होते.पुढे त्यांचा खराच मृत्यू झाला.ते पट्टीचे पोहणारे होते.नदीला आलेल्या पुरामध्ये उडी मारून ते पैलतीराला पोहत जात असत.मला स्वप्न पडले तो मे महिना होता.उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस होते.पुढे जुलैमध्ये पाऊस आल्यानंतर नदीला पूर आला.काकांनी नेहमीप्रमाणे लाल भडक फेसाळत्या पाण्यात उडी मारली.ते पैलतीराला पोहोचू शकले नाहीत.आठ दिवसांनंतर त्याचे प्रेत नदीला असलेल्या एका घळीमध्ये माशानी व उंदरांनी कुरतडलेल्या स्थितीत सापडले .तेव्हापासून माझी खात्री झाली की माझे स्वप्न हे भविष्य दर्शवीत असते. दरवेळी जेव्हा कुणाचा तरी बाण लागून माझ्या स्वप्नात त्याचा किंवा तिचा मृत्यू होतो तेव्हा तो किंवा ती प्रत्यक्षात खरेच मरते .असा आतापर्यंतचा अनुभव आहे.
कातकरी मागे लागल्याचे स्वप्न पडताच मी झोपेतच घाबराघुबरा होतो.कातकऱ्यांचा बाण चुकविण्यासाठी मी उरापोटी धावत असतो.स्वप्ने ढोबळमानाने दोन प्रकारची असतात.एका प्रकारात जागृती आल्यावर तुम्हाला स्वप्न पडत होते याची जाणीव होते.तर दुसऱ्या प्रकारात स्वप्न पडत असतानाच हे स्वप्न आहे याची जाणीव असते.मला दोन्ही प्रकारची स्वप्ने पडतात.जागृती आल्यावर स्वप्न होते याची जाणीव होणे आणि स्वप्नातच हे स्वप्न आहे याची जाणीव असणे अशा दोन्ही प्रकारची स्वप्ने मला पडतात. इतरांचे मला माहीत नाही.परंतु अशावेळी हे स्वप्न आहे याची जाणीव माझ्या मनात खोलवर कुठेतरी असते.कातकरी मागे लागले आहेत आणि आम्ही पुढे पळत आहोत हे स्वप्न दुसऱ्या प्रकारातील
असते. हे स्वप्न आहे अशी जरी माझी खात्री असली,ते स्वप्न थांबवण्याची माझी कितीही इच्छा असली,तरी मी ते स्वप्न थांबवू शकत नाही.अर्थात काही वेळा मी ते थांबवू शकत असावा.स्वप्न आपोआप संपल्यामुळे मी जागा होतो कि मी थांबविल्यामुळे स्वप्न थांबते आणि मी जागा होतो.कांही निश्चित सांगणे कठीण आहे.
आतापर्यंत दहा वेळा कातकऱ्यांचा बाण लागून कोणाचा ना कोणाचा मृत्यू माझ्या स्वप्नात झाला आहे.त्यातील तीन वेळा माझ्या ओळखीचे लोक होते.दोन वेळा माझे मित्र होते.तर पांच वेळा माझे नातेवाईक होते.पुढच्या वेळी कुणाचा नंबर असणार आहे माहीत नाही. कोणत्या स्थितीत त्या व्यक्तीला बाण लागताना व ते मरताना मी स्वप्नात पाहिले आणि प्रत्यक्षात ते केव्हां व कसे मेले त्याची मला पूर्ण आठवण आहे.या लोकांच्या मृत्यूला मी कोणत्याही प्रकारे जबाबदार नसतानाही उगीचच स्वत:ला मी जबाबदार समजतो. अशी अपराधी भावना माझ्या मनात कां निर्माण होते तेच मला कळत नाही. साथीच्या रोगामुळे, हृदयविकाराचा झटका येऊन,वृद्धत्वामुळे,अपघातात या लोकांचे मृत्यू झालेले आहेत.वस्तुत: मी या मृत्यूना कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही.तरीही जर मला स्वप्न पडले नसते तर या लोकांचा सहा महिन्यांच्या काळात मृत्यू झाला नसता असे मला कुठेतरी वाटते. त्यामुळेच अपराधीपणाची भावना माझ्या मनात आहे .अर्थात कधीतरी निसर्गनियमाप्रमाणे ते मेले असते हा भाग निराळा.
अशा प्रकारच्या स्वप्नात मला हे स्वप्न आहे याची जाणीव असते.स्वप्नातून जागे होण्याचा मी प्रयत्नही करीत असतो.बऱ्याच वेळा मी त्यात असफल होतो.ाझाडावरून उडय़ा मारीत, किंवा जमिनीवरून पळत, कातकऱ्यांपासून स्वत:ला वाचवण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करीत असतो. बहुतेक वेळा आम्ही त्यांत सफल होतो. तर कांही वेळा एखाद्याचा मृत्यू होतो. मला बाण लागू नये म्हणून मी स्वप्नातच देवाची प्रार्थना करीत असतो.
अनेकवेळा कुणालाच बाण लागत नाही.सर्वजण कातकऱ्यांना चकवण्यात यशस्वी होतात.असे स्वप्न साधारणपणे आठ दहा महिन्यांनी मला पडतेच.सुरवातीलाच सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत एकूण दहा मृत्यू स्वप्नात कातकर्यांनी बाण मारल्यामुळे झाले आहेत.प्रत्यक्षात त्या त्या व्यक्ती मृत्यू पावल्या आहेत.
असे स्वप्न पडू लागले की मी खूप घाबराघुबरा होतो.स्वप्नात मी घाबरल्याचे माझ्या लक्षात येते.हे स्वप्न पुढे सुरू राहू नये असे मला उत्कटतेने वाटते.कातकऱ्यांपासून वाचवण्यासाठी जीव तोडून धावत असताना,स्वप्नातून जागा होण्यासाठी, मी आटोकाट प्रयत्न करीत असतो.त्यांत मी कांही वेळा सफल होतो.धावणारे सर्वच सहीसलामत बचावतात.जेव्हां मी जागा होत नाही तेव्हां कुणाला तरी बाण लागतो नंतरच मला जाग येते.
असे स्वप्न मला कां पडते ते माहीत नाही.लहानपणी पाहिलेल्या दृश्याचा खोलवर परिणाम माझ्या मनावर झाला आहे.आम्ही पुढे व कातकरी मागे असे स्वप्न पडते इथपर्यंत ठीक आहे.केव्हा केव्हा एखाद्याचा बाण लागून मृत्यू होतो हेही समजू शकते.परंतु प्रत्यक्षात पुढील सहा महिन्यांत त्याचा मृत्यू कां होतो ते समजू शकत नाही.स्वप्न भविष्यदर्शी आहे ही गोष्ट लक्षात आल्यावर अशा प्रकारच्या स्वप्नात मी जास्तच घाबरतो.कुणाचाही मृत्यू झालेला नसला तरीही जागा झाल्यावर मी अस्वस्थ असतो.एखाद्याचा स्वप्नात मृत्यू झालेला पाहिला तर मात्र त्याचा प्रत्यक्षात मृत्यू होईपर्यंत मी अस्वस्थ असतो.ही अस्वस्थता प्रत्यक्षात त्या व्यक्तीला ठार करून संपवावी असे भयानक विचारही माझ्या मनात कित्येक वेळा येतात.हे सर्व भयानक आहे.एखादवेळी माझी अस्वस्थता संपविण्यासाठी मी कुणाचा खून करण्याची शक्यता डावलता येत नाही.
स्वप्नात बाण लागून माझाच मृत्यू व्हावा असे जागृत असताना मला नेहमी वाटत असते.
तरीही जेव्हा अशा प्रकारचे स्वप्न पडते तेव्हा मी स्वत:ला वाचवण्यासाठी जीव तोडून पळत असतो.त्यावेळी मला बाण लागावा, मृत्यू यावा, असे मुळीच वाटत नाही .
स्वप्नात जेव्हा केव्हा मला बाण लागेल तेव्हा मी बहुधा हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यूमुखी पडलेला असेन.
*मी त्या दिवशी उठणार नाही.*
*मला उठवण्याचा इतर प्रयत्न करतील.*
*माझी प्राणज्योत मालवलेली असेल.*
*एक दिवस मी मला वाचविण्याच्या प्रयत्नात अयशस्वी होणार आहे.*
(समाप्त)
२१/१२/२०२०©प्रभाकर पटवर्धन