( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )  

क्लबमध्ये सभासद त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे रमी, ब्रिज, टेबल टेनिस, लॉन टेनिस, बुद्धिबळ ,वाचन, गप्पा ,इत्यादी गोष्टीमध्ये मग्न होते.एका ठिकाणी सात आठ सभासदांचा एक गट भूतयोनीवर गप्पा मारीत होता.भूत आहे की नाही यावर चर्चा नव्हती.भूत योनीचेअस्तित्व या गटापुरते तरी सर्वानीच मान्य केले होते.ज्याप्रमाणे एखादा माणूस मृत्यूनंतर भूत योनीमध्ये जाऊ शकतो त्याप्रमाणेच इतर प्राण्यांपैकी कांही प्राणी मृत्यूनंतर भूत योनीत जातात का? असा त्यांचा चर्चेचा विषय होता. चर्चा अगदी रंगत आली होती.

एक गट फक्त मनुष्य भूत योनीत जातो इतर प्राणी जात नाहीत अशा मताचा होता.

दुसरा गट सर्व प्राणी निदान उत्क्रांती अवस्थेमधील वरच्या पायरीवरील प्राणी भूत योनीत जाऊ शकतात,अशा मताचा होता.

एखादी व्यक्ती कांही इच्छा राहिली असेल तर भूतयोनीमध्ये जाते, अशी समज आहे.माणूस आहे तिथे काही ना काही इच्छा या असतातच.त्या इच्छांच्या पूर्तीसाठी पुनर्जन्म अस्तित्वात आहे.असे काय होते की त्यामुळे व्यक्ती पुन्हा मनुष्य जन्माला न येता भूत योनीत जाते.आणि नंतर भूतयोनीतून मुक्त झाल्यावर मनुष्य योनीत पुनर्जन्म घेते.याबाबत काहीही सांगणे मोठे कठीण आहे.जो गेला तो गेला तो पुन्हा कुठे गेला ते सांगायला येत नाही. मृत्यूनंतर जीवन आहे की नाही हेही कोणाला सांगता येत नाही. काहीजण तर जन्म व मृत्यू या दोन गोष्टी सत्य आहेत बाकी सर्व असत्य आहे असेही म्हणतात.बरेच तत्त्ववेत्ते,धर्मग्रंथ,साधूसंत,पुनर्जन्म आहे असे म्हणतात म्हणून आपणही त्याला मान तुकवत असतो.तीच गोष्ट भूतयोनीची आहे.भूत आहे असे कांही म्हणतात. तर कांहीजणांना भुताचा अनुभव आलेला असतो. कांही मनोवैज्ञानिक तर भूत हा केवळ मनाचा खेळ आहे असेही म्हणतात.एकूणच भूत या योनीबद्दल गोंधळाचे वातावरण आहे.   

पहिल्या गटाचे म्हणणे असे होते की तीव्र भावना असतील तरच मनुष्य भूत योनीत जातो.अशा तीव्र भावना मनुष्येतर प्राण्यांमध्ये असत नाहीत.तिथे इच्छा असतात पण त्या थोड्याच काळात नष्ट होतात.त्याचे मनुष्याप्रमाणे  दृढीकरण व विस्तार होत नाही.त्यामुळे मनुष्येतर प्राण्यांमध्ये भूत योनी नाही. मृत्यूसमयी जर एखाद्या भावनेची तीव्रता असेल तर तो मनुष्य ती भावना पूर्ण करण्यासाठी भूत योनीत जातो अशा मताचा हा गट होता.मृत्युसमयी जर एखाद्याला दुसऱ्या व्यक्तीबद्दल तीव्र द्वेष वाटत असेल तर तो मृत्यूनंतर भूतयोनीत जाऊन त्या व्यक्तीवर सूड उगवतो.द्वेष, सूड, असुया, प्रेम, तृष्णा, लोभ, आकांक्षा, इच्छा, थोडक्यात काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे विकार तीव्र स्वरुपात मनुष्यातच असतात.मनुष्येतर प्राण्यांत जरी इच्छा असल्या तरी त्या तेवढ्यापुरताच असतात.त्या दीर्घकाळ टिकून राहत नाहीत.त्याचे दृढीकरण होत नाही.त्यामुळे इतर प्राण्यांमध्ये भूतयोनी अस्तित्वात नाही.असे पहिल्या गटाचे म्हणणे होते. 

तर दुसरा गट  प्रत्येक मनुष्येतर प्राण्याला कांहीना कांही इच्छा असणारच.तेव्हा त्याला पुनर्जन्म असणारच.तसे असेल तर मग तो प्राणी भूत योनीत कां जाणार नाही?उदाहरणार्थ डास झुरळ चतुष्पाद प्राणी हे सर्व भूतयोनीत जाऊ शकतील.असे दुसर्‍या गटाचे म्हणणे होते.त्यांच्यातील काही प्राण्यांमध्ये तीव्र स्वरुपाच्या भावना असू शकतात.उदाहरणार्थ सूड घेण्याची भावना तीव्र स्वरुपात जर प्राण्यांमध्ये असेल तर तो मृत्यूनंतर भूतयोनीत जावून सूड घेईल  . 

मुळात भूतयोनी अस्तित्वात आहे की नाही हाही चर्चेचा विषय होऊ शकतो.परंतु मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तो चर्चेचा विषय नव्हता.तिचे अस्तित्व सर्वानी मान्य केले होते.

नेहमीप्रमाणे हिरीरीने उलट सुलट बाजू मांडल्या जात होत्या.उलटसुलट विधाने केली जात होती.कोणत्याही विषयावर मतमतांतरे असतातच.त्याप्रमाणे ती या विषयावरही होती.कुणीही माघार घ्यायला तयार नव्हता.मंडळी दमल्यानंतरच गप्प बसतील असे दिसत होते.

जवळच्या एका खुर्चीवर बसून एक काटकुळा इसम  त्यांची चर्चा शांतपणे ऐकत होता.तो मानसशास्त्राचा प्राध्यापक होता.शहरातील एका कॉलेजात तो व्याख्याता होता.तो क्लबचा नवीनच सभासद झालेला वाटत होता.तो त्या चर्चेमध्ये सहभाग घेण्यासाठी उत्सुक दिसत होता. ती उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.त्याला त्या चर्चेमध्ये कांही महत्त्वाची भर घालायची होती असे वाटत होते.थोड्याच वेळात पुढे सरकून तो म्हणाला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो.ही घटना सत्य आहे. त्याची सत्यता तुम्ही तपासून पाहू शकता.ती गोष्ट ऐकल्यावर इतर प्राण्यात भूतयोनी आहे की नाही ते तुमचे  तुम्हीच ठरवा.तुमचा तुम्हालाच उलगडा होईल.इतर प्राण्यात भूतयोनी असल्याची तुमची खात्री पटेल, याची ग्वाही मी देतो.  

वाद घालणारे सभासद गप्प झाले. गोष्ट तीही मनुष्येतर प्राण्यांच्या भुतांची असे  म्हटल्याबरोबर सर्वांनी कान टवकारले होते.तो आता काय सांगणार याकडे सर्व उत्सुकतेने पाहत होते.वादामध्ये भाग न घेतलेले असेही कांही सभासद आसपास गोळा झाले होते.

त्या इसमाने बोलण्यास सुरुवात केली.सह्याद्रीतील कुंभार्ली घाटामध्ये, ज्याला पूर्वी रडतोंडीचा घाट म्हणत असत,तो घाट उतरताना  आठव्या किलोमीटरच्या दक्षिणेला पंधरा वीस मैल अंतरावर दाट अरण्य  आहे.त्यांत मोठमोठे अनेक वृक्ष आहेत. तिथेच एक आदिवासी पाडा आहे.तिथे कांही कारणाने मला जाण्याचा योग आला.माझ्या एका आदिवासी विद्यार्थ्याकडे मी गेलो होतो.मी संशोधनासाठी गेलो होतो.कोणत्या विषयात संशोधन करीत होतो तो स्वतंत्र विषय आहे.

तिथे एक पडका वाडा मला दिसला.या आदिवासी वस्तीवर हा पडका वाडा कुठून आला यात कोण राहत होते असे मी सहज माझ्या विद्यार्थ्याला विचारले.त्याच्या वडिलांनी मला पुढील हकिगत सांगितली.ती मी जशीच्या तशी तुम्हाला सांगत आहे.

हा वाडा प्रथमपासूनच पडक्या स्वरूपात आहे. त्याच्या शाबूत भागाला कुलुप लावलेले होते.  तो कुणाचा तिथे कोण राहत होते याबद्दल आम्हाला कांहीही माहिती नाही.त्या वाडय़ात एक दिवस एक अवलिया राहण्यासाठी आला.त्याने वाडय़ाच्या मालकाची परवानगी आणली असावी.कुलूप उघडून राजरोसपणे तो आंत शिरला. त्याच्याबरोबर सात आठ नोकर होते.वाड्याची साफसफाई करून त्यांनी त्यात राहण्यास सुरुवात केली.त्यांचा येण्याचा हेतू काय होता ते आम्हाला माहीत नव्हते.आम्हाला त्यांच्यापासून कांही त्रास होत नव्हता. आम्हीही त्यांच्या तेथे राहाण्याला हरकत घेतली नाही. अर्थात आम्ही हरकत घेणारे कोण होतो?हा भाग वेगळा.थोड्याच दिवसांत ते कशासाठी आले होते त्याचा उलगडा झाला. त्यांचा व्यवसाय निरनिराळे प्राणी पकडून आणणे आणि त्यांत पेंढा भरून  हुबेहूब प्राणी तयार करणे,त्यांचे पुतळे तयार करणे,हा होता .

जयवंत त्या अवलियाचे नाव , तो अवलिया उत्तम शिकारी होता.येथे आसपासच्या जंगलात निरनिराळ्या प्रकारचे पशुपक्षी आहेत. तो व त्याचे नोकर जंगलात जाळी लावून पशुपक्ष्यांना पकडून आणीत असत.कांही वेळा खड्डा खणून त्यावर काटक्या टाकून सांपळा तयार करीत असत.अरण्यातील प्राणी फिरत असताना  त्या खड्ड्यांवर गेल्यावर   काटक्या मोडून खड्ड्यात पडत.नंतर त्यांना पकडून वाड्यावर आणले जाई.जर हिंस्त्र श्वापद असेल तर तो बंदुकीतून विषाची सुई त्या प्राण्याच्या डोक्यात मारी.त्याचा मृत्यू झाल्यावर लगेच वाड्यावर त्याला आणण्यात येई.

बंदुकीचा वापर तो शक्यतो करीत नसे .त्यामुळे प्राण्याची  कातडी फाटते व पेंढा भरणे कठीण होते.पेंढा भरून प्राणी तयार केला तरी जखमेची जागा व्यवस्थित करता येत नाही.किंमत बरीच कमी येते.

*पकडून आणलेल्या प्राण्याला डोक्यामध्ये तो एक इंजेक्शन देत असे.*

*इंजेक्शनमुळे त्याचा लगेच मृत्यू होई.नंतर तो व त्याचे नोकर त्या प्राण्याची कातडी काळजीपूर्वक दूर करीत व आंतील मांस इत्यादी सर्व भाग काढून टाकीत.*

*हे मांस ते पाळलेल्या गिधाडे कावळे वगैरे प्राण्यांना खायला देत असत.*

* हाडे एका खड्ड्यात पुरून टाकीत.  त्यामुळे स्वच्छता उत्तम रहात असे.*

.*तिथे गेल्यावर मांसाचा रक्ताचा कसलाही घाणवास येत नसे.*

(क्रमशः)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel