(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. )
थिबा पॉइंटच्या रस्त्यावर वाटेत एका वळणावर एक मुलगी स्कूटरसह माझ्या मोटारीला येऊन धडकली .
ती मुलगी भीतीने थरथर कापत होती.संध्याकाळी थिबा पॉइंटला जाण्यासाठी शहरातील लोक व पर्यटक यांचा ओघ चालू असतो.लगेच गर्दी जमायला सुरुवात झाली .
अश्या प्रकारच्या अपघातात नेहमी लोकांचा कल लोकांची सहानुभूती कमी किमतीच्या वाहनांकडे असते .स्त्री, असेल तर सहानुभूती मुलींकडे स्त्रियांकडे असते.इथे कमी किमतीचे वाहन व मुलगी असा योग जुळून आला होता . अर्थात येथे सर्वांची सहानुभूती त्या स्कूटरवरील मुलीकडे होती . ती स्त्री होती आणि त्यात तरुणी होती म्हणजे विचारायलाच नको .गुन्हेगार मोटारवाला यात शंकाच नाही .नाहीतरी हे मोटारवाले माजले आहेत .बघून चालवायला काय होते ? हळू चालवली तर पुढे फुल्या फुल्या फुल्या .असे उद्गार जमावातून येत होते .
तिला कितपत लागले ते पाहण्यासाठी मी मोटारीतून उतरलो.मला तिला शक्य ती सर्व मदत करायची होती.
चुकी तिचीच होती .वळणावर रस्त्याच्या मध्यातून ती माझ्या मोटारीवर येऊन आपटली होती .रत्नागिरीची पब्लिक तशी बरी आहे.लगेच हातघाईवर येत नाही.तिची चुकी होती .ती मान्य करण्याचा मोठेपणा तिच्या जवळ होता .एखादीने मी काही बोलण्याच्या अगोदरच कांगावा केला असता.चुकीचे खापर माझ्या डोक्यावर फोडले असते .प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला असता .अशा स्थितीत सर्व प्रेक्षक तिच्याच बाजूने गेले असते यात शंकाच नाही .परंतु तिने असे काहीही केले नाही .
तिने माझीच क्षमा मागितली.मी तिला स्कूटर बाजूला घेण्याला मदत केली .स्कूटर बंद पडली होती .स्कूटरचे मडगार्ड चेपून टायरमध्ये घुसले होते .मी माझ्या ओळखीच्या मेकॅनिकला फोन करून ती स्कूटर त्याला न्यायला सांगितले. मेकॅनिक येऊन स्कूटर नेईपर्यंत मी तिथे थांबलो होतो .अपघातात तिलाही थोडे खरचटले होते.माझ्या ओळखीच्या डॉक्टरकडे जाण्याचे मी सुचविले तीच नको म्हणाली . नंतर मी तिला तिच्या घरी पोहोचवले. तिने मला घरात बोलाविले.तिच्या आई वडिलांशी माझी ओळख करून दिली.तिने व तिच्या वडिलांनी माझे पुन्हा पुन्हा आभार मानले.
तिथून आमच्या ओळखीला सुरुवात झाली.तिची चण लहान होती.ती एवढ्याशा बाहुलीसारखी दिसत होती.फारतर कॉलेजात जाणाऱ्या मुलीसारखी ती दिसत होती .प्रत्यक्षात ती कॉलेजमध्ये लेक्चरर होती. विद्यार्थी तिला प्राध्यापक म्हणून कशी काय स्वीकारत असतील असा मला प्रश्न पडला . विद्यार्थी बहुधा तिची टिंगल टवाळखोरी करीत असावेत असे मला वाटले .माझ्या शेजारी एक कॉलेजमध्ये जाणारा मुलगा होता .त्याला मी मॅडमबद्दल विचारले .तो अत्यंत आदराने तिच्या बद्दल बोलत होता .ती आपल्या विषयात पारंगत तर होतीच परंतु तिला विद्यार्थ्यांना काबूत ठेवण्याची कलाही अवगत होती .विद्यार्थ्याना विषय सहज सुलभ करून ती सांगत असे .तो मुलगा तिच्याबद्दल आदराने बोलत होता .
ती दिसायला फार आकर्षक नसली तरी तिच्या चेहऱ्यावरील तेजाने ती उजळून निघत असे .तिच्या बद्दल चांगले मत ऐकून अगोदरच प्रभावित झालेला मी आणखीच प्रभावित झालो .अपघाताच्या दिवशीच आम्ही एकमेकांचे मोबाइल नंबर घेतले होते .माझा हेतू तिचे झालेले नुकसान भरून देण्याचा होता.त्या अपघातात तिला थोडे खरचटले होते .स्कूटर व ती दोघांचीही प्रकृती कशी आहे ते विचारण्याचाही हेतू तिचा मोबाइल नंबर घेण्यामागे होता .ती मला आवडली होती तिच्याशी ओळख वाढवण्याची माझी इच्छा होती. हा हेतू तिचा नंबर घेण्यामागे तर होताच होता .माझ्या मेकॅनिकला तिच्या स्कूटर दुरुस्तीचे पैसे मी दिले. तिने ते पैसे मला परत केले .मी नको नको म्हणत असतानाही ते घेण्यास भाग पाडले .
माझ्यामुळे अपघात झाला तेव्हा स्कूटर दुरुस्तीचे बिल मी देणार असा माझा मनसुबा होता .तर अपघात तिच्या चुकीमुळे झाला तेव्हा पैसे तीच देणार असे ती म्हणत होती.शेवटी मी माझा आग्रह सोडून दिला .
त्या भविष्य देवतेने मला स्वप्नात येऊन सांगितल्याप्रमाणे मी थिबा पॉइंटला संध्याकाळी जात असताना त्या वळणावर अपघात झाला आणि माझ्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले .त्यामुळेच दामिनी माझ्या आयुष्यात आली .
मी लग्न करावे ही माझ्या आई वडिलांची इच्छा अश्या प्रकारे पूर्ण झाली .
त्यानंतर त्या देवतेने मला पुन्हा दीर्घकाळ दर्शन दिले नाही .
मी दामिनीला त्या देवतेच्या दर्शनाबद्दल विवाह झाल्यावर सांगितले होते .त्या देवीमुळेच मी रत्नागिरीला राहिलो. तिच्यामुळेच मी त्या संध्याकाळी थिबा पॉइंटला गेलो .दामिनी माझ्या आयुष्यात यावी असा भविष्य संकेत होता .मी रत्नागिरी सोडून नागपूरला जाण्याचा कदाचित निर्णय घेईन.मी तो घेऊ नये म्हणूनच त्या दिवशी भगवती मंदिरला मी गेलो असताना भविष्य देवतेने मला दर्शन दिले होते.
तिनेच मला स्वप्नात येऊन संध्याकाळी थिबा पॉइंटला जावे असे सांगितले होते.
जेव्हा जेव्हा मी कोणत्याही कारणाने किल्ल्यावर भगवती मंदिरला जात असे त्या त्या
वेळी भविष्य देवतेचे दर्शन होण्याची मला कुठेतरी सुप्त आस असे. मला तिने कधीही दर्शन दिले नाही .
असिस्टंट मॅनेजरचा मी जनरल मॅनेजर झालो .माझ्या कंपनीचे मी शेअर्स विकत घेऊन भागधारकही झालो.संचालक मंडळाचा मी पंचावन्नाव्या वर्षी अध्यक्षही झालो.
माझ्या इच्छेप्रमाणे मी सड्यावर प्लॉट घेऊन बंगलाही बांधला .एक मुलगा,एक मुलगी, मुलीचे थाटामाटात लग्न केले.उच्चशिक्षित जावई मिळाला. मुलगा परदेशात जाऊन शिक्षण घेऊन परत भारतात आला .त्याचा विवाहही झाला.दामिनी मुळे माझ्या आयुष्यात आनंद व प्रकाश आला .माझे आयुष्य संपन्न झाले.
बंगल्याच्या प्रांगणात आराम खुर्ची टाकून मी आराम करत असताना एके दिवशी मला त्या भविष्य देवतेने पुन्हा दर्शन दिले .
तुझा अपघातात मृत्यू आहे असे तिने मला सांगितले . योग्य ती काळजी तू घेशीलच असेही तिने मला सांगितले.ते भविष्य ऐकून मी हादरून गेलो .तिने ते भविष्य मला सांगायला नको होते असेही मला वाटते .
भविष्य नेहमी चांगलेच कसे काय असणार ?जीवनात चढ उतार हे असायचेच .तिने हे भविष्य सांगण्यामागे नियतीचा काहीतरी हेतू असणारच .
माझा अंतकाळ जवळ आला आहे अशी सूचना तिने अप्रत्यक्षरित्या मला दिली होती .अपघात कोणत्या प्रकारचा होणार आहे हे विचारण्याची मला संधीच तिने दिली नव्हती.त्या अगोदरच ती अदृश्य झाली होती .
किंबहुना ती दर्शन देत होती. पुढे काय घडणार किंवा काय कर ते ती मला सांगत होती आणि अंतर्धान पावत होती .मला प्रश्न विचारण्याची संधी ती देत नव्हती. यावेळीही तसेच झाले होते .
अपघातात मृत्यू हे अत्यंत ढोबळ विधान आहे .सायकल, स्कूटर, मोटार,रेल्वे, जहाज, विमान,कसा, कुठे, अपघात होईल? घरात ,बाहेर, रस्त्यावर,कुठेही अपघात होऊ शकतो .छताचा स्लॅब डोक्यावर कोसळून मृत्यू होऊ शकतो .दहशतवाद्यांच्या बॉम्बस्फोटात अापण सापडू शकतो. कारखान्यात स्फोट होऊ शकतो. घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊ शकतो .वीजेचा शॉक लागून किंवा अन्य रितीने मृत्यू येऊ शकतो .
अपघाताचे हजार मार्ग आहेत.उगीचच काळजी करीत बसण्याऐवजी मी नेहमी प्रमाणेच वागण्याचे ठरविले .जे काही विधिलिखित आहे तसे घडणारच .फक्त भक्कम विमा उतरविला .व्यवस्थित मृत्यूपत्र करून ठेविले .आणि अपघात होणार हे मनोमन विसरून गेलो .अपघातात मृत्यू येणारच असेल तर तोपर्यंत मृत्यूच्या काळजीने मला उरलेले आयुष्य वाया दवडायचे नव्हते.
~माझा मित्र अरुणच्या डायरीतील काही भाग मी वर उद्धृत केला आहे .~
आपल्याला नेहमी न दिसणाऱ्या कदाचित बऱ्याच जणांना कधीही न दिसलेल्या अश्या काही अदृश्य शक्ती असतात का? असा सुरुवातीचा प्रश्न होता .त्याला अनुसरून माझा मित्र अरुण याच्या डायरीतली काही भाग मी प्रसिद्ध केला आहे .
अरूण पासष्ट वर्षे जगला.
भविष्य देवतेने त्याला सूचना दिल्याप्रमाणे त्याचा मृत्यू अपघातात झाला.
काही कामासाठी तो दिल्लीला जात होता .विमानतळावर त्याचे विमान लँडींग करीत असताना त्या विमानाला अपघात झाला .त्यात त्याचा मृत्यू झाला.
*भविष्य देवतेने त्याला आयुष्यात तीनदाच सूचना केली.?
*दोन वेळा त्याने त्याप्रमाणे आचरण केले आणि त्याच्या आयुष्याला वळण मिळाले.*
* तिसऱ्या वेळी सूचनेप्रमाणे त्यांचे आयुष्य संपले .*
*नेहमी ज्याला आपण निसर्ग असे म्हणतो त्याच्या अतीत काही शक्ती असतात की नाही ते आता तुमचे तुम्हीच ठरवा .*
(समाप्त)
९/३/२०२०©प्रभाकर पटवर्धन