( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा ) 

विवाहसोहळा संपन्न झाला आणि वधूवर सजविलेल्या मोटारीतून रवाना झाले.संपूर्ण लग्नसोहळ्यामध्ये काम करणारी,उत्साहात भाग घेणारी,करवली म्हणून मागेपुढे मिरवणारी, वधुवर दोघांच्याही बाजुने असलेली मानसी, दमून भागून सोफ्यावर बसली.ती नुसतीच दमली नव्हती तर तिचे अंतःकरण संपूर्ण विवाह सोहळ्यांमध्ये आक्रंदत होते.ती जरी वरवर उत्साह दाखवीत असली आणि खरेच तिला लग्नसोहळ्यात रमेश व नलिनी या दोघांचा विवाह झाल्यामुळे आनंद होत असला, तरी अंतरीचे दु:ख ती टाळू शकत नव्हती.त्यामुळे तिला जास्तच थकवा जाणवत होता.

मानसी चाळीच्या वातावरणात लहानाची मोठी झाली होती.तिचे बाबा ती त्यांना भाऊ म्हणत असे ते खाजगी अर्बन  बँकेमध्ये नोकरी करीत होते.ते जिथे रहात होते तो एक वाडा होता.त्याचेच रुपांतर दोन किंवा तीन खोल्यांच्या भाडय़ाच्या जागेमध्ये वाड्याच्या मालकाने केले हाेते.मानसीची जागा दोन खोल्यांची होती.स्वच्छतागृह सार्वजनिक होते. वाडा चौसोपी असल्यामुळे बाहेर मोकळी जागा होती.तिथे मुले खेळत हुंदडत असत.सर्व सण समारंभ एकत्र उत्साहाने साजरे केले जात.चाळीच्या वातावरणामुळे सर्वांचे परस्परांकडे येणेजाणे होत असे. चाळीत खाजगी असे विशेष काही असत नाही.कोणतीही घटना लवकरच सार्वजनिक होते.प्रत्येकाला स्वतःचा म्हणून खाजगीपणा (स्पेस) हवा असतो  चाळीच्या वातावरणात तो मिळत नाही . प्रत्येक पध्दतीचे कांही फायदे तोटे असतातच.असे असले तरी स्वतःचा बंगला असावा,नवीन उभ्या राहणार्‍या  एखाद्या सोसायटीत स्वत:चा फ्लॅट असावा अशी अंतरी प्रत्येकाची मनीषा होती.शक्यता निर्माण झाल्याबरोबर, परिस्थिती अनुकूल होताच, प्रत्येक जण गावाबाहेर जात होता.     

गावाबाहेर नवीन वसाहती होत होत्या.गावाचे हळूहळू शहरीकरण होत होते.भाऊनी बंगला   बांधण्यासाठी  एक जागा विकत घेतली.बँकेकडून कर्ज घेतले.मानसीच्या आईचे माधवीकाकूचे दागिने मोडले.टुमदार दुमजली बंगला बांधला.गावातील जागा सोडून भाऊ गावाबाहेर स्वतःच्या बंगल्यात राहायला आले.हवेशीर म्हणून वरचा मजला भाऊंनी स्वतःकडे ठेवला.तळमजला भाड्याने दिला.

भाडेकरूही लगेच मिळाले.कलेक्टर ऑफिसमध्ये बदलून आलेले रमेशचे वडील तात्या यांनीच ती जागा भाड्याने घेतली.सरकारी ऑफिसमध्ये सामान्यतः दर तीन चार वर्षांनी बदल्या होतात.तात्यांची बदली पुन्हा चार वर्षांनी झाली.मुलांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी तात्यांनी आपले बिऱ्हाड या शहरातच ठेवले.पुढे तात्यांनी आपले बिऱ्हाड कायमचेच येथे ठेवले.तात्या या शहराचेच झाले. नोकरी करीत असताना तात्या शक्य झाले तर रोज येऊन जाऊन आपले काम सांभाळत असत.अन्यथा परक्या गावात रहात.निवृत्ती घेतल्यानंतर तात्यांनी याच गांवात राहण्याचे ठरविले.भाऊंच्या समोरचाच प्लॉट त्यांना सुदैवाने मिळाला.त्यांनीही भाऊंसारखा दुमजली बंगला बांधला.वरच्या मजल्यावर ते स्वतः राहू लागले तर तळमजला त्यांनी भाड्याने दिला. 

तात्या इथे राहायला आले तेव्हा राकेश दहावीत होता.तर मानसी आठवीत होती.रमेशला बहीण नव्हती तर मानसीला भाऊ नव्हता.बहिणीची व भावाची उणीव परस्परांनी भरून काढली.दोघांमध्ये स्नेहबंध जुळले.लहानपणापासून परस्परांकडे येणे जाणे राहले.तात्या व भाऊ यांच्यामध्ये मित्रत्वाचे संबंध होते.मानसीची आई माधवी व रमेशची आई सुनंदा यांच्यामध्येही चांगली मैत्री जुळली.

रमेश पुढे डॉक्टर  झाला.या शहरातच त्याने आपला दवाखाना सुरू केला.मानसी यथावकाश आर्किटेक्ट झाली.

तात्यांचा नवीन बंगला होईपर्यंत  मानसी वरच्या मजल्यावर राहत होती तर राकेश खालच्या मजल्यावर रहात होता. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक जिना बाहेरून होता तर एक जिना अंतर्गत होता.जर संपूर्ण बंगला स्वतःकडे ठेवला तर उपयोगी पडावा म्हणून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी अंतर्गत जिना ठेवलेला होता .त्याचा दरवाजा उघडला तर अंतर्गत येणेजाणे होत असे.नाहीतर बाहेरून जिना होताच .दोन्ही कुटूंबे खेळीमेळीनं एकत्र रहात असत.     

रमेश व मानसी यांच्यामध्ये भावबंध जुळले हे वेगळे सांगायची गरज नाही.सहवासाने प्रेम वाढते.प्रेमामुळे जास्त सहवास हवा असे वाटू लागते.रमेश व मानसी एकमेकांवर प्रेम करीत होते.सर्वसाधारणपणे प्रेम हा शब्द उच्चारला कि प्रियकर प्रेयसी यांचे प्रेम डोळ्यांसमोर येते.प्रेमाला अनेक पदर असतात.

रमेश मानसीवर मैत्रिणीप्रमाणे प्रेम करीत होता तर मानसी रमेशवर एखाद्या प्रेयसीप्रमाणे प्रेम करीत होती.आठवीच्या वर्गात असतानाच रमेशला पाहिल्याबरोबर त्याने तिच्या मनात घर केले होते. मानसीने अनेकदा सूचक बोलून सुध्दा ही गोष्ट रमेशच्या कधीच लक्षात आली नाही.प्रथम एकाच बंगल्यात आणि नंतर रमेशच्या वडिलांनी समोरच बंगला बांधल्यामुळे दोघांच्या गाठीभेटी, दर्शन, गप्पा, बरोबरच बऱ्याचदा येणे जाणे, स्वाभाविकपणे होत असे. रमेशच्या आईला सुनंदाकाकूना मानसी सून म्हणून पसंत होती.मुले  गोड बातमी देतील याची वाट ती पहात होती.मानसीच्या आईला माधवीला रमेश जावई म्हणून पसंत होता. दोघीनीही आपल्या मनातील विचार आपल्याजवळच ठेवले होते.

रमेशच्या वडिलांनी तात्यांनी भाऊंसारखाच बंगला बांधला होता हे मी अगोदरच सांगितले आहे.तेही वरच्या मजल्यावर राहात होते.खालचा मजला भाड्याने दिला होता.  

नलिनीचे वडील काकासाहेब यांनी ती जागा भाड्याने घेतली .ते एका राष्ट्रीकृत बँकेत नोकरी करीत होते.त्यांची बदली झाल्यामुळे ते या शहरात आले होते.त्यांची मुलगी नलिनी स्त्रीरोगतज्ज्ञ होती.तिने नुकतीच इंटर्नशिप पुरी केली होती.नोकरी करावी की दवाखाना सुरू करावा अशा विचारात नलिनी होती.दवाखाना कुठे सुरू करावा असाही तिच्यापुढे प्रश्न होता.तिच्या वडिलांची बदली वारंवार होत असल्यामुळे बदलीची सर्वच गावे त्यांची होती.एखाद्या विशिष्ट गावाशी त्यांची मुळे संलग्न नव्हती.तूर्त एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करावी अनुभव घ्यावा आणि नंतरच या संदर्भात काय ते ठरवावे अशा निर्णयावर नलिनी आली होती.तेवढ्यात तिच्या वडिलांची बदली या शहरात झाली होती.तिच्या वडिलांना जागाही रमेशच्या बंगल्यातच मिळाली.

दवाखाना आपल्याच बंगल्यात सुरू करावा असा रमेशचा  अगोदर विचार होता.परंतु त्याला बाजारपेठेत मोक्याच्या ठिकाणी दवाखान्यासाठी जागा मिळाली होती.त्यामुळे शेवटी बंगल्यातील जागा पूर्वीप्रमाणेच भाड्याने देण्याचे तात्यांनी ठरविले होते.अशाप्रकारे शेवटी नलिनी तेथे राहायला आली.          

रमेशला मोक्याची जागा दवाखान्यासाठी मिळाल्यामुळे येथील जागा भाड्याने देण्याचे तात्यांनी ठरविणे,नलिनीची इंटर्नशिप त्याचवेळेला पुरी होणे,काय करावे याबाबत तिची अनिश्चितता असणे,निर्णय घेण्याअगोदर तिच्या वडिलांची येथे बदली होणे,त्यांना जागा रमेशच्या बंगल्यातच मिळणे,हे सर्व योगायोग होते.

तिचे व रमेशचे आकडे चांगले जुळले.प्रेम जुळायला,प्रेम निर्माण व्हायला फार काळ लागतोच असे नाही.केव्हा केव्हा कित्येक महिने,कित्येक वर्षें, व्यक्ती चाचपडत असतात,तर केव्हां केव्हां कांही क्षणात चमत्कार घडून जातो.     

रमेशने मेडिसनमध्ये पदवी घेतली होती.नलिनी स्त्रीरोगतज्ज्ञ होती.ते एकत्र दवाखाना काढू शकले असते.त्यांना हॉस्पिटलही काढता आले असते.  दोघांचेही ज्ञान एकमेकांना पूरक होते.हा व्यवहार झाला.प्रेमात कुणी व्यवहार पाहत नाही.ती एकमेकांच्या प्रेमात पडली हे महत्त्वाचे होते.कोण कुणाच्या प्रेमात पडतो,किंवा पूर्वनियोजित  विवाहामध्ये कोणाचे कोणाशी लग्न होते,याचा कांहीच अंदाज लावता येत नाही.म्हणूनच परमेश्वर स्वर्गात गाठी मारतो आणि आपण ती गाठ येथे शोधत असतो असे म्हटले जाते.

मानसी रमेशवर प्रेम करीत होती.ती त्याचा आनंद आपला आनंद समजत होती.रमेश नलिनीवर प्रेम करतो हे पाहून मानसीला खिन्नता आली.परंतु मानसी सूज्ञ होती. प्रेम कोणावर लादता येत नाही याची तिला पूर्ण जाणीव होती.रमेशच्या मनाचा अंदाज तिला अगोदरच लागला होता.तो मानसीला आपली चांगली मैत्रीण समजत होता.तिने आपले प्रेम आपल्या मनातच ठेवले.त्याचा उच्चार कुठेही होऊ दिला नाही.तिने आपल्या आई वडिलांना तुम्ही उगीचच जावई जावई म्हणून  रमेशला कधीही म्हणत जाऊ नका असे सांगितले.ते रमेशला आवडणार नाही.असेही पुढे ती म्हणाली होती.

तिची नलिनीशीही मैत्री झाली.नलिनी व रमेश यांच्या आई वडिलांच्या संमतीने त्यांचा विवाह निश्चित झाला.मानसीने आपल्या मनातील भाव कुठेही प्रगट होऊ न देता त्या विवाह समारंभात भाग घेतला होता.विवाह सोहळा दणक्यात पार पडला होता.दोघांच्याही ओळखी भरपूर असल्यामुळे निमंत्रितांची संख्या मोठी होती. स्वागत समारंभ दणक्यात पार पडला होता.समारंभात ती हौशीने भाग घेत होती.रमेशला आनंदी पाहून तिलाही समाधान व आनंद वाटत होता.

* मंडपातून वधू वर निघून गेल्यानंतर तिला थकवा जाणवू लागला होता.*

*तिच्या हृदयाचे आक्रंदन तिला सहन होत नव्हते.*

*माधवीला तिच्या आईला तिची मन:स्थिती बरोबर समजली होती. तिने मानसीला हळूच कवेत घेतले.*

*मानसी आईच्या कुशीत  शिरली.*

*तिची आई तिला प्रेमाने थोपटीत  होती.*

*मानसीच्या डोळ्यांतील दोन कढत अश्रू तिच्या आईच्या हातावर पडले.*

१०/१२/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel