(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. )
प्रिय अलकनंदा,
आज प्रथमच तुला पत्र लिहीत आहे .तसे तर आपण रोजच भेटतो .कदाचित तू म्हणशील तुला जे काही सांगायचे असेल ते प्रत्यक्ष न सांगता पत्रातून कां सांगत आहेस ?
नंदा ते जर मी सांगू शकलो असतो तर पत्र कशाला लिहिले असते?गेले वर्षभर मी तुला ते सांगण्यासाठी प्रयत्न करीत आहे . परंतु प्रत्यक्षात तू जेव्हा जेव्हा मला भेटतेस तेव्हा मी बोलू शकत नाही .मी असे करीन, मी असे बोलेन,मी तसे करीन, मी तसे बोलेन, असे मनात मी अनेकदा ठरवीत आलो आहे .मनातल्या मनात अनेकदा रंगीत तालमी केल्या आहेत .परंतू रंगीत तालीम उत्कृष्ट व्हावी आणि प्रत्यक्षात स्टेजवर आल्यावर त त प प व्हावे तसे माझे दरवेळी होत आले आहे .
तुझे नाव जरी अलकनंदा असले तरी मी तुला नेहमी नंदू म्हणूनच हाक मारली आहे.आपली ओळख तशी लहानपणापासूनच आहे .त्यावेळी आम्ही चाळीत राहत होतो . तूही आमच्या शेजारच्या चाळीत राहात होतीस.आमच्याच शाळेत तू बालवाडीत दाखल झालीस. त्यावेळी मी पहिलीमध्ये गेलो होतो.तुझी आई रोज तुला शाळेत सोडण्यासाठी येत असे.माझी आई मला कित्येक वेळा काकूंबरोबर, (तुझ्या आईबरोबर)शाळेत पाठवीत असे .तर शाळेतून परत येताना माझ्या आईबरोबर तू व मी परत येत असू.
मी लहानपणी तुला नेहमी नंदू म्हणून हाक मारीत असे .तर तू मला शिर्या म्हणून हाक मारीत असस.मला सर्वजण श्रेयस म्हणून पूर्ण नावाने हाक मारीत असताना तू मात्र शिर्या म्हणून हाक मारीत असस.आपण जसे मोठे झालो तसे मी तुला नंदा म्हणू लागलो.तूही मला श्रेयस म्हणून हाक मारू लागली. तरीही जेव्हा आपण फक्त दोघेच असतो तेव्हा नंदू आणि शिर्या याच नावाने एकमेकांना हाक मारतो ,संबोधतो .
लहानपणी मी तुझ्या घरी कित्येक वेळा खेळायला येत असे . तूही माझ्याकडे खेळायला अनेकदा येत असस.लहानपणी एकमेकांची खेळणी शेअर करणे, एकमेकांशी भांडणे,खाऊ वाटून घेणे ,यामध्ये आपण मोठे केव्हा झालो ते कळलेच नाही . लहानपणी आपण जसे बरोबर येत जात होतो बरोबर खेळत होतो तसेच मला आयुष्यभर राहायचे आहे हे तुला कळले आहे का ?मला तुझ्या डोळ्यांमध्ये तसे भाव दिसतात .जेव्हा जेव्हा तू मला पहातेस तेव्हा तेव्हा तुझ्या डोळ्यात मला तशी चमक दिसते.माझ्याही डोळ्यात तशीच चमक तुला दिसत असावी .
ही इच्छा तुला कळावी. मला तुझ्या डोळ्यात दिसणारी चमक मी बरोबर ओळखली आहे हे तुला कळावे यासाठी तर हा पत्रप्रपंच .
आपण मोठे केव्हा झाले ते कळलेच नाही.हळूहळू आपण एकमेकांपासून दुरावत गेलो. तुला तुझ्या मैत्रिणी मिळाल्या .मला माझे मित्र मिळाले.तू तुझ्या मैत्रिणींमध्ये रमू लागलीस. तर मी माझ्या मित्रांमध्ये रमू लागलो.जरी रोजचे भेटणे हळूहळू कमी होत बंद झाले,तरी आपण एकमेकांना तसे पाहात होतो.अनेकदा फक्त एकमेकांना भेटत होतो.ओळखीचे स्मित करीत होतो.कित्येकवेळा मी मित्रांना टाळून तुझ्याबरोबर येत होतो तर तू तुझ्या मैत्रिणींना गुंगारा देऊन माझ्याबरोबर सिनेमा नाटकाला येत होतीस.
आम्ही चाळ सोडून गावाबाहेरच्या नवीन वस्तीत फ्लॅटमध्ये राहायला आलो. तुझ्या वडिलांनी आमच्याच सोसायटीत फ्लॅट घेतला.मी ए बिल्डिंगमध्ये राहात आहे तर तू बी बिल्डिंगमध्ये राहात आहेस.त्यामुळे आपण एकमेकांपासून दुरावलो नाही.आपण वारंवार भेटत राहिलो. एकमेकांना येता जाताना बघत राहिलो. एकमेकांकडे वारंवार येत जात राहिलो .अर्थात तू लांब राहिली असतीस तरीही अापण दुरावलो नसतोच.आपल्या भेटीगाठी होतच राहिल्या असत्या. अधूनमधून एकमेकांकडे येणे जाणे चालूच राहिले असते.आपण बरोबर फिरत राहिलो असतोच .
आपले भेटणे जरी हळूहळू कमी होत असले तरी आपण सिनेमाला काही वेळा एकत्र जात होतो.परस्परांकडे काही धार्मिक किंवा अन्य कार्यक्रम असले तर येत जात होतो. घराबाहेर भेटत होतो.बागेत फिरायला जात होतो .मित्र मैत्रिणींबरोबर पिकनिकला बरोबर जात होतो .मित्र मैत्रिणीना गुंगारा देऊन दोघे स्वतंत्र फिरत होतो.
आपल्या दोघांचे आई बाबा एकमेकांचे चांगले स्नेही आहेत .त्यांच्या मनात काय आहे माहीत नाही . तुझ्या मनात काय आहे त्याचा थांग लागत नाही.माझ्या मनात जे आहे तेच तुझ्या मनात आहे असा अंदाज मात्र आहे. मी मात्र तुझ्यावर प्रेम केव्हा करू लागलो ते माझे मलाच कळले नाही.माझी तुझ्याकडे बघण्याची दृष्टी हळूहळू बदलत गेली होती.केवळ मैत्रीण म्हणून तुझ्याकडे न पाहता सहचारिणी म्हणून मी पाहू लागलो होतो.
मुली अतिशय चतुर असतात असे मी ऐकतो.मुलांची पुरुषांची नजर त्या ताबडतोब ओळखतात असेही वाचतो ऐकतो. सिनेमा नाटक यामध्ये पाहतो . माझी बदललेली नजर तू ओळखली असशीलच .तू तेवढी चतुर नक्कीच आहेस .तुझ्याशी बोलताना, तू भेटल्यावर ,माझ्या डोळ्यात एक विशेष चमक येते ती तुला जाणवली असेलच .मलाही तुझ्या डोळ्यात ती विशेष चमक दिसते.
पूर्वी आणि अजूनही तुमच्या घरी एखादा विशेष पदार्थ झाला की तुझी आई तो घेऊन तुला आमच्याकडे पाठवते .मीही त्याच कारणाने तुमच्याकडे आई सांगते म्हणून येतो .तू दिसलीस, तू आलीस, की माझे मन विशेष उल्हसित होते.तुझेही तसेच होत असले पाहिजे असे मला वाटते .
मी तुला बागेमध्ये भेटण्यासाठी बोलाविले आहे.बागेतील पुष्करणीच्या काठी आपण दोघे जणच आहोत .मी तुला प्रपोज करीत आहे.एखाद्या प्रेमवीराच्या थाटात गुडघ्यावर बसून गुलाबाचे फूल तुला देत आहे असे मला नेहमी स्वप्न पडते.लाजत लाजत नेहमी तू त्या फुलाचा स्वीकार करतेस.मी जागा होतो तेव्हा ते स्वप्न होते हे माझ्या लक्षात येते . बऱ्याच वेळा मी तेच दिवास्वप्नही पाहतो .
तसे आपण अनेकदा सिनेमाला बरोबर गेलो आहोत .काही वेळा नाटकही बरोबरच पाहिले आहे .माझे मित्रही मला तुझ्यावरून काही वेळा टोमणे (टाँट) मारीत असतात.तुझ्याही मैत्रिणी तसेच करीत असणार .
आपल्या घरच्यानी आपले नाते कदाचित निश्चित केले असेल.मित्रानी व मैत्रिणींनी तर ते निश्चित केले आहेच.तू माझ्याकडून केव्हा सुचविले जाते त्याची वाट पाहात असशील.मीच तुला प्रपोज करावे असे तुला वाटत असेल .
तू जेव्हां जेव्हां माझ्याबरोबर असतेस तेव्हां तेव्हां मी तुला प्रपोज करीन असे मनात म्हणत असतो.कां कोण जाणे मला धीर होत नाही .तू होय म्हणशील अशी मला अंतर्यामी खात्री आहे. पण नाही म्हटले तर या विचाराने मला धीर होत नाही .
आपले महाविद्यालयीन शिक्षण पुरे झाले .आपण नोकरीलाही लागलो.एक दिवस आपल्या लग्नाची बोलणी घरात सुरू होतील .तू कदाचित दुसऱ्या कुणाशी तरी लग्न करून निघून जाशील .कदाचित मी प्रपोज करीन म्हणून तू वाट पाहून पाहून थकली असशील. माझ्या मनात तसे काही नाही असा तू गैरसमज करून घेशील अशीही भीती मला वाटते.
ही माझ्यावर प्रेम करीत नसेल तर अशी जी शंका मला तुझ्याबद्दल वाटते, तशीच शंका कदाचित तुला माझ्याबद्दलही वाटत असेल.
एकदा या सस्पेन्सचा, रहस्याचा, शंकेचा, शेवट केलाच पाहिजे.नाहीतर जेव्हां परस्परांना सत्य कळेल तेव्हां कदाचित उशीर झालेला असेल .
प्रत्यक्ष बोलून, प्रत्यक्ष आर्जव करून, याचा आनंददायी शेवट करावा असे मला अनेकदा वाटत आले आहे परंतु धीर झालेला नाही.
प्रत्यक्ष धीर होत नसल्यामुळे मी तुला पत्र लिहायचे ठरवले.
हे प्रेमपत्र नाही .
हे एक हमी पत्र आहे .
*तुझ्या सहवासात संपूर्ण आयुष्य मी राहू इच्छितो .त्याची हमी देणारे हे हमीपत्र आहे .*
तू उद्या मला भेटण्यासाठी आपल्या नेहमीच्या ठिकाणी ये .तू आलीस तर मी अर्थातच होकार समजेन.आली नाहीस तर नकार समजेन.
तुझ्याबरोबर आयुष्य काढण्याची इच्छा करणारा
तुझाच
श्रेयस.
हे पत्र श्रेयसने अलकनंदेच्या, त्याच्या नंदूच्या, हातात स्वतः ठेवले.(सिनेमात नाटकात कथेमध्ये हे असे पत्र बर्याच वेळा अपेक्षित व्यक्तीच्या हातात पडत नाही आणि त्यामुळे गोंधळ होतो असे त्याने पाहिले होते .त्यामुळे प्रत्यक्ष भेटून पत्र हातात ठेवायचे असे त्याने निश्चित केले होते !!)
*पत्र न वाचताच तिने त्यात काय आहे ते ओळखले.स्त्रिया पुरुषांपेक्षा चतुर नेहमी असतातच *
*काही वेळातच नंदूचा तिच्या शिर्याला फोन आला .*
*"मी तुझ्या आवडीचा गुलाबी ड्रेस घालून आपल्या नेहमीच्या ठिकाणी येत आहे "एवढे म्हणून तिने फोन बंद केला.*(नंदूने फोन करण्याचे कारण म्हणजे काही कारणाने प्रेयसी प्रियकराला ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी भेटू शकत नाही आणि त्यामुळे समजुतीचा गोंधळ उडतो .कथेचा शेवट दुःखपर्यवसानी होतो.तसा तो होऊ नये अशी तिची उत्कट इच्छा होती!!)
१५/३/२०२०©प्रभाकर पटवर्धन