( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
कपिल व अरुणा दोघेही सचिवालयातच काम करीत असत.दोघे जरी निरनिराळय़ा विभागांत काम करीत असली तरी ती गेले सहा महिने जोडीनेच ऑफिसला येत व जात असत.आजही रोजच्याप्रमाणे ऑफिस सुटल्यावर ती दोघे बरोबरच निघाली.दोघे बोरिवली पूर्व येथे रहात असत.चर्चगेट स्टेशनला ती नेहमीप्रमाणे पोहोचली.आज काहीतरी गाड्यांचा गोंधळ होता .बॉम्बे सेंट्रलला कुठे तरी एका गाडीला अपघात झाला होता.गाडय़ा अनिनियमितपणे सुटत होत्या.बोरिवलीला जाणारी गाडी केव्हा सुटेल आणि सुटली तर केव्हा पोहोचेल याची काहीही खात्री देता येत नव्हती.
दोघांनीही टॅक्सीने बोरिवलीला जाण्याचे ठरविले.सुदैवाने त्यांना टॅक्सी लगेच मिळाली.अशावेळी टॅक्सीवाले भरमसाट भाडे आकारतात.टॅक्सी उपलब्ध होणेही अत्यंत बिकट असते.त्यांचे दैव चांगले असावे त्यामुळे त्यांना लगेच टॅक्सी मिळाली. टॅक्सीवाला कदाचित बोरिवलीचा असावा.टॅक्सी बोरिवलीच्या दिशेने धावू लागली.बोरिवलीला पोचेपर्यंत भरपूर वेळ लागणार होता.ट्रॅफिक चोंदलेला (जॅम)किती असेल तेही सांगता येणार नव्हते. बोरिवलीला केव्हा पोचू त्याचा कांहीच अंदाज करता येत नव्हता.गेले तीन चार दिवस अरुणाचे मन थाऱ्यावर नव्हते.कितीही शांत राहायचे ठरविले,कितीही कामात लक्ष केंद्रित करायचे ठरवले,तरी तेच तेच विचार पुन्हा पुन्हा डोक्यात घोळत राहात असत.मनातील विचार असे काढून टाकता येत नाहीत.ते आपोआप येतात व आपोआप जातात.त्याचे साक्षीत्व फार तर आपल्या हातात असते असे म्हणायचे.खरे म्हणजे तेही आपल्या हातात नसते. साक्षीत्व जमले तर जमते नाहीतर नाही.मन एकाच विचारात दीर्घकाळ राहू शकत नाही हेच खरे.काळच सर्वांवर औषध असतो.
अरुणा दमली होती.तिने सीटवर मागे डोके टेकले आणि डोळे मिटून घेतले. तिच्या डोळ्यासमोर कपिल भेटला तेव्हापासूनचा सर्व चित्रपट उलगडू लागला होता.
कपिल तिला प्रथम भेटला त्याला सहा महिने झाले होते.ती रोजच्याप्रमाणे "बोरिवली चर्चगेट"जलद (फास्ट)मध्ये बोरिवलीला चढली होती.आज तिला स्टेशनवर यायला थोडा उशीर झाला होता. ती नेहमी स्त्रियांच्या प्रथमश्रेणीतून प्रवास करीत असे. गाडी चुकू नये म्हणून ती आज चटकन पुरुषांच्या डब्यात चढली होती.प्रथमश्रेणीच्या डबा असूनही तो खचाखच भरलेला होता. तिला बसण्यासाठी जागा मिळाली नव्हती.तिला दरवाजाजवळील मोकळ्या जागेत उभे राहावे लागले होते.गाडी सुटता सुटता एका चोराने तिच्या पर्सचा बेल्ट कापला आणि ती जोरात हिसकावून घेऊन धावत्या ट्रेनमधून उडी मारली.सुरक्षिततेसाठी पर्स पुढे घेऊन तिने त्याच्यावर एक हातही ठेवला होता. खांद्याला व हाताला हिसका बसल्याबरोबर पर्स चोरीला गेल्याचे तिच्या लक्षात आले.ती चोर चोर म्हणून जोरात ओरडली.चोराबरोबरच आणखी कुणीतरी गाडीतून उडी मारली.ती उडी नेमकी चोराच्या अंगावर पडली.तेवढ्यात कुणीतरी साखळी खेचली.
गाडी थांबल्याबरोबर लोक भराभर उतरून चोराकडे धावले.काही लोकांनी तर गाडी थांबायच्या अगोदरच उडय़ा मारल्या होत्या.कपिलने चोराला पकडले तर होतेच परंतु चार दणकेही दिले होते.पोलीस आले.कपिलची व अरुणाची गाडी चुकली. पोलिस स्टेशनमध्ये जाबजबाबामध्ये बराच वेळ गेला.तिची पर्स मिळाली. आंतील सर्व वस्तू व्यवस्थित होत्या. दोघेही पोलिस स्टेशनमधून एकत्रच बाहेर पडली.तिने कपिलचे पुन्हा पुन्हा आभार मानले. या सगळ्यामध्ये इतका वेळ गेला होता कि ऑफिसमध्ये जाण्यात काहीच अर्थ नव्हता.त्यानी ऑफिसला फोन करून न येण्याचे कारण सांगितले.
घरी परत जाता जाता,कपिलही बोरिवलीला पूर्वेलाच रहातो. तो सचिवालयातच नोकरीला आहे.दोघे रोज एकाच गाडीने चर्चगेटला जातात.येतानाही बहुतेकवेळा दोघे एकाच गाडीने बोरिवलीला परत येतात,इत्यादी उलगडा एकमेकांना झाला.असे असूनही आतापर्यंत त्यानी परस्परांना पाहिले नव्हते.
तेव्हांपासून दोघेही बरोबरच येऊ जाऊ लागली.
त्या दिवशी ती गाडी चुकेल या भितीने घाईघाईने पुरुषांच्या डब्यात शिरली होती. आणि नंतर वरती वर्णन केलेली सर्व घटना घडली होती.आता ती रोजच कपिलबरोबर पुरुषांच्या डब्यातून जाऊ लागली होती.
तिच्या डोळ्यासमोरून हा सारा गेल्या सहा महिन्यांचा प्रवास उलगडत होता.कपिलच्या व तिच्या तारा जुळल्या होत्या.एखादे दिवशी एक जण गैरहजर असेल तर दुसऱ्याला करमत नसे.कपिल आपल्याला एक दिवस घरी बोलवील म्हणून अरुणा वाट पाहत होती.परंतु त्याचे तसे लक्षण दिसत नव्हते.अरुणाला त्याला आपल्याकडे बोलवावे असे वाटत होते.परंतु प्रथम त्याने बोलवावे नंतर आपण बोलवू असा विचार तिने केला होता.
रोज कॅन्टीनला जाऊन दुपारी लंच टाईममध्ये जेवणे आरोग्यदृष्ट्या हितकारक नसल्यामुळे दोघेही घरून डबा आणीत असत.स्वाभाविक दोघेही डबा शेअर करीत असत.कपिलच्या डब्यातील पदार्थ नेहमी चविष्ट असत .एक दिवस अरुणा सहज कपिलला म्हणाली,तुझ्या डब्यांतील साधी भाजी पोळीसुद्धा चविष्ट असते.त्यावर तो म्हणाला होता, माझ्या आईच्या हाताची गोडी अवर्णनीय आहे.स्वाभाविकच अरुणाने अंदाज बांधला की तो अविवाहीत आहे.त्याची आईच त्याला भाजी पोळी किंवा निरनिराळे पदार्थ तयार करून देत असते.
कपिलचा स्वभाव उमदा होता. कुणालाही नेहमी मदत करण्यासाठी तो पुढे असे.त्या दिवशी जीव धोक्यात घालून त्याने त्या पर्स चोरावर हल्ला केला होता.तत्काळ निर्णय घेण्याची त्याची क्षमताही वाखाणण्यासारखी होती.जरी प्रथमदर्शनी प्रेम अशी परिस्थिती नसली तरी ती त्याच्या हळूहळू प्रेमात पडत होती.दिवसेंदिवस त्याचे निरनिराळे पैलू तिच्या निदर्शनास येत होते.ती त्याच्याकडे जास्त जास्त आकर्षित होत होती.तिचे त्याच्यावरील प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होत होते.कपिलच्या बाजूने मात्र तसा काहीच प्रतिसाद दिसत नव्हता.एखाद्या मित्राशी वागावे त्याप्रमाणे तो तिच्याशी वागत होता.
एक दिवस त्याने तिला आपल्या घरी बोलाविले.त्या दिवशी ती अतिशय उत्साहात होती.रविवार सुटीचा दिवस होता.सोसायटीबाहेर तो तिची वाट पाहत थांबला होता. तो स्वतः तिला आपल्या घरी घेऊन गेला.आईशी ओळख झाली. गप्पा झाल्या. एवढ्यात एक तरुण मुलगी बाहेरून आली.तिच्या हातात एक छोटी बॅग होती.तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते.थोडय़ाच वेळात ती त्याची पत्नी असल्याचे तिच्या लक्षात आले.ती दुसर्या गावी नोकरी करीत होती.सुटीत ती केव्हा इकडे येत असे तर केव्हा कपिल तिकडे जात असे.मुंबईला तिची बदली लवकरच होणार होती.ती शाळेत शिक्षिका होती.ती ज्या संस्थेच्या शाळेत काम करीत होती त्या संस्थेची शाळा बोरिवलीला होती.जूनपासून नवीन आर्थिक वर्षापासून तिची बदली इकडे होणार होती. आज त्याची पत्नी येणार होती म्हणूनच कदाचित कपिलने अरुणाला घरी बोलाविले होते.अरुणाच्या मनात काय आहे त्याचा अंदाज त्याला आला असावा.
आतापर्यंत दोघांच्या बोलण्यात त्याच्या लग्नाचा विषय निघालाच नव्हता.किंबहुना घरच्या माणसांबद्दल विशेष बोलणे केव्हाच झाले नव्हते.त्याचे लग्न झाल्याचे पाहून ती उदासीन झाली.पुढच्या रविवारी त्याला ती आपल्याकडे बोलावणार होती.आपल्या आईवडिलांची ओळख करून देणार होती.त्याच्याशी लग्न करून संसार थाटू असे मनसुबे मनातल्या मनात तिने रचले होते.तिच्या सगळ्याच मनोरथांवर पाणी पडले होते.तेव्हापासून गेली तीन चार दिवस ती उदासीन होती.तिचा मूड गेल्याचे त्याच्या लक्षात आले होते.त्याचे कारण अर्थातच त्याच्या लक्षात आले नव्हते. किंवा लक्षात येऊनही तो लक्षात न आल्यासारखे दाखवीत असावा.तुझी तब्येत बरी नाही का असेही त्याने एकदोनदा विचारले होते.त्यावर तिने कसनुसे हसत, नाही तसे काही विशेष नाही, ठीक आहे असे म्हटले होते.
तेव्हापासून तिचे मन थाऱ्यावर नव्हते.
ती आपल्याच तंद्रीत असे.
आजही ऑफिसातून निघतांना ती तशीच आपल्या तंद्रीत हाेती.
हा सर्व इतिहास तिच्या डोळ्यासमोरून सरकत होता.
काळच सर्वांवर औषध असतो.कांही दिवसांनी, महिन्यांनी, ती सावरली असती.
टॅक्सी बोरिवलीच्या दिशेने धावत होती.
ती तिच्या घराजवळ उतरली.कपिलला सोडण्यासाठी टॅक्सी पुढे निघून गेली.
* ती रस्ता क्रॉस करण्याला सुरुवात करणार होती.तोच एक मोटार तिचे नियंत्रण सुटल्यामुळे वेडीवाकडी होत फुटपाथवर चढली आणि तिच्या अंगावरून जाऊन भिंतीला धडकली.*
*तिचे मन अगोदरच मेले होते.*
*आता तीही जगातून निघून गेली होती.*
१२/१२/२०२०©प्रभाकर पटवर्धन